चालू घडामोडी २३ जून २०१५

०१. प. बंगाल विधानसभेने २०१३ मध्ये मंजूर केलेल्या चिटफंडविरोधी विधेयकावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. प. बंगालमधील वित्तसंस्थांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्यासंबंधी हे विधेयक असून केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिल्याबाबत सोमवारी पत्र मिळाले असल्याची माहिती प. बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी येथे दिली.

०२. या विधेयकात आर्थिक गुन्हेगारांना कठोर शिक्षेची तरतूद असून त्यालाही केंद्राने सहमती दर्शविली आहे. तामिळनाडूमधील चिटफंड कायद्यानुसार केवळ आरोपींना दंड ठोठावून मुक्त केले जाते. चिटफंड घोटाळ्यात अडकलेल्यांना कारावास आणि दंड अशा दोन्ही प्रकारची शिक्षा ठोठावली जावी, असा युक्तिवाद प. बंगाल सरकारने केला होता, त्याला केंद्राने सहमती दर्शविली आहे.

०३. जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार आणि शहर नियोजनकार चार्ल्स कोरिया यांचे मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. वास्तुरचना क्षेत्रातील मातब्बरांपैकी एक असलेल्या चार्ल्स कोरिया यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

०४. वास्तुरचना क्षेत्रात केलेल्या कामासाठी कोरिया यांना १९७२ साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. तर, २००६ साली त्यांना पद्मविभूषणाने गौरविण्यात आले होते.'ओपन टू स्काय' पद्धतीला प्राधान्य देत स्थानिक तंत्राच वापर करण्याला पसंती देणाऱ्या कोरिया यांची नवी मुंबई शहराची उभारणी करताना प्रमुख वास्तुरचनाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 

०५. नवी मुंबई, बेलापूर येथे त्यांनी आर्टिस्ट व्हिलेज कलाग्राम देखील डिझाइन केले होते.साबरमती आश्रम, जयपूर येथील जवाहर कला केंद्र, मध्यप्रदेश विधानसभा यांसोबत गोव्यातल्या कला अकादमीची इमारत अशा अनेक प्रसिद्ध इमारतींची संकल्पना कोरिया यांची होती. तसेच दिल्ली, मुंबई अहमदाबाद आणि बंगळुरु येथील टाऊनशीपचेही त्यांनी डिझाइन केले होते.

०६. जगातील सर्वात लहान दिवा तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले असून, तो ग्राफिनच्या एका अणूइतक्या जाडीचा आहे. त्यामुळे ग्राफिन आता स्मार्टफोन, संगणक , मोटारी व इमारती तसेच उपग्रह यांचे रूप बदलून टाकणार आहे.

०७. अतिशय पातळ अशा ग्राफिनच्या थरापासून अतितप्त होऊ शकणारे आपल्या नेहमीच्या बल्बमध्ये असते तसे तारेचे वेटोळे तयार करण्यात आले आहे. ते २५०० अंश सेल्सियस तापमानाला प्रकाशमान होते.आण्विक पातळीवर असला तर या बल्बचा प्रकाश नुसत्या डोळ्यांनी दिसतो इतका प्रखर आहे. 

०८. ज्या सिलिकॉन चिपवर तो बसवलेला असतो तिचे कुठलेही नुकसान या जास्त तापमानामुळे होत नाही.नवीन प्रकारची स्वीच, प्रकाशीय संगणक, डिजिटिल माहितीचे वहन यात त्याचा उपयोग होणार आहे. माहितीचे वहन सिलिकॉन चिपपेक्षा वेगाने होईल असा वैज्ञानिकांचा दावा आहे. 

०९. इजिप्तच्या न्यायालयाने २०११ सालच्या क्रांतीत मोठ्या प्रमाणावर तुरूंग फोडण्याच्या व राष्ट्रीय सुरक्षा अस्थिर करण्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या खटल्यात माजी राष्ट्रपती मोहम्मद मुर्सी, मुस्लीम ब्रदरहुडचे सर्वोच्च मार्गदर्शक मोहम्मद बादी व अन्य १०० इस्लामिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. 

१०. इजिप्त न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेसंदर्भात मुफ्ती ए आझम यांच्याबरोबर चर्चा केली आहे. इजिप्तच्या कायद्यानुसार मुफ्ती ए आझम मृत्युदंडाच्या शिक्षेची समीक्षा करू शकतात मात्र त्यांचा निर्णय न्यायालयाला बंधनकारक नाही. 

११. याच खटल्यातील अन्य २२ आरोपींना जन्मठेप, आठ जणांना दोन वर्षे तुरूंगवास अशी शिक्षा सुनावली गेली आहे. या खटल्यात १२९ आरोपी होते.मुर्सीनी अन्य ३६ जणांसह पॅलेस्टीनी संघटना हमास व लेबानन दहशतवादी संघटना हिजबुल्ला सह कित्येक विदेशी संघटनांशी हातमिळवणी करून ही क्रांती घडवून आणल्याचा आरोप होता.

१२. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या ताज्या अहवालात भारत १० कोटी डॉलर्स किंवा त्यापेक्षा अधिक संपत्ती असणा-या कुटुंबाच्या संख्येच्या मानाने चौथ्या स्थानावर असून या यादीत अमेरिका अव्वलस्थानी असल्याची माहिती दिली आहे.चीन आणि भारताचा आर्थिक विकास कायम राहण्यासाठी एशिया-प्रशांत क्षेत्रातील लोकांच्या संपत्तीत वाढ होत आहे. 

१३. गेल्या वर्षी अमेरिकेत अल्ट्रा हाय नेटवर्क असलेल्या कुटुंबीयांची संख्या ५ हजार ३०२ एवढी आहे. याबरोबरच चीनमध्ये १,०३७, ब्रिटेनमध्ये १,०१९, भारतात ९२८ आणि जर्मनीमध्ये ६७९ आहे.भारतात श्रीमंत कुटुंबीयांची संख्या २०१३ मध्ये २८४ होती. परंतु वर्षभरात त्यात तिप्पट वाढ झाली आहे. 

१४. या अहवालात एशिया-प्रशांत क्षेत्रात खाजगी संपत्तीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केवळ २०१४ मध्येच संपत्तीत २९ टक्के वाढ झाली असून, ती ४७ हजार अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे युरोपला मागे टाकत हा भाग जगातील दुस-या क्रमांकाचे श्रीमंत क्षेत्र बनले आहे.

१५. अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेलेला अल्‌ कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या  ओसामा बिन लादेन याची बाहुली विक्रीसाठी ठेवण्यात आली असून या बाहुलीला डेव्हिल आइज नाव देण्यात आले आहे.प्रसिद्ध बाहुली निर्माते डोनाल्ड लेव्हिन यांनी बाहुली तयार केली आहे. 

१६. बेकायदेशीर कर्जरोखे विक्री प्रकरणातील आरोपी व सहाराचे संस्थापक सुब्रत रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने आता रॉय यांना नऊ हप्त्यांमध्ये तीन हजार कोटी रुपये चुकते करण्यास सांगितले आहे. या शिवाय, सहाराने ‘सेबी‘ला १८ महिन्यांच्या काळात ३६ हजार कोटी रुपये नऊ हप्त्यांमध्ये द्यावी असे न्यायालयाने सांगितले आहे.

१७. सुब्रत रॉय यांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी सहारा समूहाला मालमत्ता विकून निधी उभारण्याची सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी शेवटची संधी दिली होती. न्यायालयाने सुब्रत रॉय यांच्या जामिनासाठी दहा हजार कोटी रूपये रक्कम भरण्याचा आदेश दिला होता. त्यापैकी ५.००० कोटी रक्कम रोख तर उर्वरित रक्कम बँक गॅरंटीच्या माध्यमातून देण्यास सांगितले होते.

१८. आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेला डेटॉल साबण प्रयोगशाळा चाचणीमध्ये नापास झाला असून, कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे. डेटॉल साबणाचे १० नमुने घेण्यात आले होते. प्रयोगशाळा चाचणीदरम्यान त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे. 

१९. आग्रा येथील आरोग्य विभागाचे अधिकारी आर. सी. यादव यांनी सांगितले की, डेटॉल साबणाच्या पाकिटावर १२५ ग्रॅम वजन लिहिले होते. मात्र, प्रत्यक्षात ११७.०४७० वजन आढळून आले आहे. यांसह अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

२०. गेल्या पाच दशकांमध्ये प्रथमच स्कॉटलंडमधील कॅना या एका छोट्याशा बेटावर एक गुन्हा घडला असल्याने ते बेट चर्चेत आले आहे. या बेटाची एकूण लोकसंख्या फक्त २६ आहे तर गुन्हेगारीचे प्रमाण शून्य आहे तसेच पोलिस ठाण्यांची संख्या शून्य आहे. यापूर्वी १९६० मध्ये या बेटावरील एका चर्चमधून लाकडी वस्तू चोरीस गेल्या होत्या.

२१. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पक्षातर्फे शिवप्रकाश योजना राबविली जात आहे. रायगड जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील चार वाड्यांमधील ८० घरांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे दिवे पेटवण्यात आले. आतापर्यंत या वस्त्यांवर प्रकाश नव्हता. जेथे वीज पोहोचलेली नाही, तेथील प्रत्येक गावात सौरऊर्जेचे दिवे बसवण्याची शिवसेनेची योजना आहे.  मुंबईतील "व्हॅल्युएबल ग्रुप‘च्या मदतीने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. 

२२. राज्यातील वाळूमाफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी एमपीडीए (महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डेंजरस ऍक्टिोव्हिटी) अर्थात झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा हा राज्य सरकारने तयार केलेला कायदा आहे. एखाद्या गुन्हेगारावर या कायद्यांतर्गत कारवाई करावयाची असल्यास त्याचे आदेश गृह विभागातून काढले जातात. हे आदेश संबंधित पोलिस आयुक्तल किंवा जिल्हा पोलिस अधीक्षकांना पाठविल्यानंतर संबंधित व्यक्तीस तातडीने ताब्यात घेण्यात येते. 

२३. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आरोपीला उच्च न्यायालयात दाद मागता येते. उच्च न्यायालयात एमपीडीएच्या सुनावणीसाठी स्वतंत्र खंडपीठ असते. एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे सर्वाधिकार राज्य सरकारला असल्याने उच्च न्यायालयाकडून शक्यतो यावर शिक्काकमोर्तब होते.

२४. विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंची कथा आता नव्या रूपात लोकांसमोर येणार असून  पुलित्झर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक डेव्हिड मॅककुलॉघ यांनी हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचे नाव 'दि राइट ब्रदर्स' आहे. 'सिमन अँड शुश्टरर' या प्रकाशन संस्थेने ही राइट बंधूंची संशोधन गाथा प्रसिद्ध केली आहे. 

२५. परराष्ट्र मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच काही पदांवर शिक्षण आणि खासगी क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्याचे ठरविले असून परराष्ट्र व्यवहारासंबंधीच्या संसदीय समितीने हा निर्णय घेतला. या समितीचे अध्यक्ष शशी थरूर आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सार्वजनिक धोरण विभागात शिक्षण आणि खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. मंत्रालयात लष्कर आणि इतर काही सरकारी संस्थांमधून भरती होत असली तरी प्रथमच बिगर सरकारी सेवांमधील योग्य व्यक्तींची निवड करण्याचा विचार असल्याचे समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी सांगितले.