चालू घडामोडी ०६ ऑक्टोबर २०१६

संगीत अकादमी पुरस्कार जाहीर
०१. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, नाटककार शफाअत खान यांच्यासह लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेखिका व समीक्षिका शांता गोखले यांना अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. 


०२. या वेळी विविध श्रेणींत देशातील ३९ नामवंत कलाकारांना त्यांच्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले, तर तीन मान्यवरांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख आणि ताम्रपट असे आहे, तर शिष्यवृत्ती स्वरूपात ३ लाख रुपये प्रदान करण्यात आले.

०३. प्रसिद्ध संगीतकार व गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुगम संगीत क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘उंबरठा’, ‘जैत रे जैत’ यांसह अनेक मराठी व ‘धनवान’, ‘मशाल’ अशा बऱ्याच हिंदी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. महाराष्ट्राचे भावगंधर्व म्हणून त्यांची ओळख आहे.

०४. नेपथ्यामध्ये सातत्यपूर्ण लक्षणीय कामगिरी करणारे प्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांना नाटय़ क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘वाडा चिरेबंदी’, ‘प्रपोजल दोन’, ‘स्पेशल’ अशा अनेकानेक नाटकांचे उत्तम नेपथ्य त्यांनी केले आहे.

०५. नाटय़ लेखनातील वैविध्यपूर्ण शैलीतून नाटक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे प्रसिद्ध नाटककार शफाअत खान यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘ब्लॅक कॉमेडी’ या दुर्मीळ नाटय़ लेखन प्रकारावर हुकमत असणारे नाटककार म्हणून शफाअत खान प्रसिद्ध आहेत. ‘किस्से’, ‘भूमितीचा फार्स’, ‘मुंबईचे कावळे’ यांसारख्या ब्लॅक कॉमेडी शैलीतील त्यांच्या नाटकांनी रसिकांना भुरळ घातली. ‘राहिले दूर घर माझे’, ‘शोभायात्रा’ अशी अनेकानेक नाटके लिहून त्यांनी नाटय़ क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.

०६. देशातील लोकनृत्यांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या महाराष्ट्रातील लावणी लोकनृत्याचा प्रचार व प्रसार करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रसिद्ध लावणी नृत्यांगना छाया व माया खुटेगावकर यांना लावणी नृत्यातील उल्लेखनीय योगदानासाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले.

०७. ललित कला व नाटय़ विषय लेखन तसेच नाटय़ समीक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी लेखिका व समीक्षिका शांता गोखले यांना संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
०१. जीन पेरी सॅवेज, सर जे फ्रेझर स्टोडार्ट, बर्नार्ड एल. फेरिंगा यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. बुधवारी नोबेल पुरस्कार समितीने याची घोषणा केली. 

०२. जगातील सर्वाधिक लहान यंत्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हे पारितोषिक मिळाले आहे. त्यांनी आण्विक यंत्रासाठी प्रमाणबद्ध रचना आणि संश्लेषणासाठी केलेल्या संशोधनात त्यांचे अमूल्य योगदान आहे.जगातील सर्वांत लहान अशी 'मॉलेक्‍युलर मशिन' त्यांनी तयार केली आहे.

०३. हालचालींवर नियंत्रण ठेवता येणारे रेणू या शास्त्रज्ञांनी तयार केले. त्यांना ऊर्जा दिल्यानंतर ते 'सांगितलेले' काम करू शकतात. या संशोधनाचा उपयोग इलेक्‍ट्रिक ट्रेन, वॉशिंग मशिन, पंखे, फूड प्रोसेसर आदी गोष्टींमध्ये या रेणूंचा वापर करता येऊ शकतो, असे नोबेल समितीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे. या तिघा शास्त्रज्ञांना आठ कोटी स्वीडिश क्रोनरचा पुरस्कार विभागून देण्यात येईल. 

०४. मॉलेक्‍युलर मशिन तयार करण्यासाठीचे पहिले पाऊल सुवेज यांनी १९८३ मध्ये टाकले. त्यांनी दोन कंकणाकृती रेणू एकत्र गुंफून त्याची साखळी तयार केली. सर्वसामान्यपणे दोन रेणू हे घट्ट बंधात बांधले जातात. त्यात अणूंभोवती फिरणारे इलेक्‍ट्रॉन विभागले जातात. परंतु साखळीमध्ये हा बंध जास्त मुक्त असा यांत्रिक बंध असतो. 

०५. एखाद्या यंत्र चालण्यासाठी त्यातील भागांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे असते. रेणूंच्या साह्याने तयार झालेल्या साखळीने नेमकेपणाने हेच काम केले आहे.

०६. या प्रक्रियेतील दुसरा टप्पा स्टोडार्ट यांच्या संशोधनामुळे १९९१ मध्ये गाठला गेला. त्यांनी रेण्वीय आस तयार करून त्याच्याभोवती रेण्वीय साखळ्या फिरू शकतात, हे दाखवून दिले. स्टोडार्ट यांनी या तंत्राद्वारे मॉलेक्‍युलर लिफ्ट, मॉलेक्‍युलर मसल आणि कॉम्पुटर चिप तयार करता येऊ शकते, हे दाखवून दिले.

०७. मॉलेक्‍युलर मोटर पहिल्यांदा तयार करण्याचा मान फेरिंगा यांच्याकडे जातो. त्यांनी १९९९ मध्ये मॉलेक्‍युलर मोटरचा वापर करून मॉलेक्‍युलर रोटर ब्लेड एकाच दिशेने फिरवून दाखविली. त्यांनी मॉलेक्‍युलरच्या मोटरच्या साह्याने नॅनोकारही तयार केली.एचआयव्ही आणि एड्स विधेयकांमध्ये सुधारणा
०१. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एचआयव्ही आणि एडस विधेयक २०१४ मधील सुधारणांना मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे एचआयव्ही आणि एडसबाधित रूग्णांना कायदेशीररित्या अँटी रेट्रोव्हायरल उपचार घेण्याचा हक्क मिळाला आहे. 


०२. नव्या विधेयकानुसार केंद्र आणि राज्य सरकारला एआरटी सेंटर (अँटी रेट्रोव्हायरल थेरपी) आणि संधीसाधू संक्रमण व्यवस्थापन सुविधा पुरवणे बंधनकारक राहील. तसेच एचआयव्हीबाधित व्यक्तींबरोबर कोणत्याही प्रकारचा प्रांतिक किंवा वैयक्तिक भेदभाव करता येणार नाही. 

०३. संयुक्त पुरोगामी सरकारच्या (यूपीए) काळात हे विधेयक सादर करण्यात आले होते. त्यानंतर यंदाच्या जुलै महिन्यात संसदेच्या स्थायी समितीने यामधील त्रुटी दूर करण्यासाठी हे विधेयक केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाकडे पाठवले होते.रूपा गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती
०१. अभिनेत्री व भाजपच्या नेत्या रूपा गांगुली यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रूपा गांगुली यांची नियुक्ती केली आहे.

०२. पश्‍चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रूपा गांगुली भाजपच्या उमेदवार होत्या. मात्र, त्या पराभूत झाल्या होत्या. 

०३. दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत गांगुली यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती. रूपा गांगुली यांचे नाव १९८८ मधील महाभारतातील भूमिकेमुळे घराघरांत पोचले.भारताविरुद्धची अणवस्त्र याचिका फेटाळली
०१. अण्वस्त्र स्पर्धा थांबविण्यात भारत, पाकिस्तान आणि ब्रिटन अपयशी ठरल्याचा आरोप करत मार्शल आईसलॅन्डने (बेट) दाखल केलेली याचिका संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयाने बुधवारी फेटाळली. या निर्णयामुळे मार्शल आईसलॅन्डला मोठा धक्का बसला आहे.

०२. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश रॉनी अब्राहम यांच्या अध्यक्षतेखालील १६ न्यायाधीशांच्या पीठापुढे या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेतील मुद्दे सुनावणीयोग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका फेटाळली. 


०३. सुमारे ७० हजार लोकसंख्या असलेल्या मार्शल आईसलॅन्डने अणुचाचणीचा फटका अनुभवलेला आहे. नऊ देशांनी अण्वस्त्र प्रसारबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप मार्शल आईसलॅन्डने २०१४ मध्ये केला होता. याबाबत मार्शल आईसलॅन्डने भारतासह नऊ देशांविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला. 

०४. त्यापैकी चीन, फ्रान्स, इस्रायल, उत्तर कोरिया, रशिया आणि अमेरिका या देशांविरोधातील याचिका सुनावण्यास न्यायालयाने आधीच नकार दिला होता. भारत, पाकिस्तान आणि ब्रिटनने अण्वस्त्र स्पर्धा रोखण्यात अपयशी ठरल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने भारतासह तिन्ही देशांना मोठा दिलासा मिळाला आहेगॅस अनुदानसाठी आधार कार्ड बंधनकारक
०१. १ डिसेंबरपासून ‘आधार’ कार्ड असल्याशिवाय कोणालाही स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून गॅस ग्राहकांना ‘आधार’साठी नोंदणी करण्याची दोन महिन्यांची शेवटची मुदत दिली आहे.

०२. सरकारी योजनांचे लाभ आणि अनुदान यासाठी ‘आधार’चा वापर करण्यासंबंधीचा कायदा १६ सप्टेंबरपासून लागू करण्यात आला असून त्यानुसार तेल मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

०३. तसेच हा निर्णय आसाम, मेघालय आणि जम्मू-काश्मीर ही राज्ये वगळून देशभर लागू होईल. 
सध्या सरकार घरगुती गॅस ग्राहकास वर्षाला स्वयंपाकाच्या गॅसचे १२ सिलिंडर अनुदानित दरात देते.

०४. अनुदानाची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते व त्याने गॅस सिलिंडर घरी आल्यावर त्याची पूर्ण किंमत द्यायची असते. 
नव्या आदेशानुसार ज्या गॅस ग्राहकांनी अद्यापही ‘आधार’ कार्ड घेतलेले नाही त्यांना नोंदणी करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.