चालू घडामोडी १२ ऑक्टोबर २०१६

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर करणार नाही
०१. भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे जाहीर न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

०२. हे पुरावे जाहीर झाल्यास पाकिस्तानी लष्कर अडचणीत येऊ शकते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते. त्यामुळे हे पुरावे सार्वजनिक न करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते. 

०३. राजनैतिक रणनीतीसाठी आम्ही कोणत्याही अमेरिकेसह कोणत्याही देशावर अवलंबून नाही. ही भारताची जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासूनची रणनीती आहे, इतकेच नव्हे अलिप्तवादही याच धोरणाचा एक भाग होता. 

०४. या सर्जिकल स्ट्राईकमुळे प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर येणारी हतबलतेची भावनाही दूर झाली आहे. तसेच यानिमित्ताने वेळ पडल्यास भारत निर्वाणीचा पर्याय अवलंबू शकतो आणि त्यासाठी सुरक्षायंत्रणांना गरजेची असणारी निर्णयाची स्वायत्तता आणि राष्ट्रीय इच्छाशक्ती भारताकडे आहे, असा संदेश जगापर्यंत पोहचला आहे.४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
०१. गोवा येथे २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान ४७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया) संपन्न होत आहे. तसेच या चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनातर्फे १० मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

०२. गेल्या वर्षी २० ते ३० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत पणजी येथे पार पडलेल्या ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ९ मराठी चित्रपटांची राज्य शासनातर्फे निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्रातून मराठी चित्रपट पाठविणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले. 

०३. तसेच या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांनी हे चित्रपट पाहिले. त्यामुळे मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचण्यास मदत झाली.

०४. गोव्यातील आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी २७ चित्रपटांच्या परीक्षणानंतर शासनाने नेमलेल्या समितीने १० चित्रपट निवडले. त्यात कटय़ार काळजात घुसली, नटसम्राट, सैराट यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसोबतच 
नाशिकचे सुहास भोसले दिग्दर्शित कोती या चित्रपटाचाही समावेश आहे. 

०५. तृतीयपंथीयांच्या बालपणावर आधारित हा चित्रपट असून आजपर्यंत विविध महोत्सवांमध्ये परीक्षकांकडून या चित्रपटाचे कौतुक झाले आहे. आतापर्यंत विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी निवड झालेल्या ‘कोती’च्या शिरपेचात हा एक मानाचा तुरा खोवल्याचे मानले जात आहे.

०६. मागील वर्षी गोव्यातच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागातील स्पर्धेसाठीही या चित्रपटाची निवड झाली होती.कान्स येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागासाठी मराठी भाषेतील केवळ कोती या एकमेव चित्रपटाची निवड झाली होती. 

०७. कोती चित्रपटाने याशिवाय दिल्लीतील एज्युकेशनल एक्स्पो टीव्हीच्या वतीने आयोजित महोत्सवात परीक्षकांच्या पसंतीचे दादासाहेब फाळके पारितोषिक, कोल्हापूरमधील संस्कृती कलादर्पण संस्थेच्या वतीने आयोजित मायमराठी महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकाविले आहे. सुहास भोसले दिग्दर्शित कोती या चित्रपटाचे डिसेंबरमध्ये प्रदर्शन केले जाणार आहे.

०८. याशिवाय या महोत्सवातील ‘फिल्म बझार’ या विभागासाठी राज्य शासनाच्या वतीने रिंगण, हलाल आणि वक्रतुंड महाकाय हे तीन मराठी चित्रपट राज्य शासनाच्या वतीने पाठविण्यात आले होते.तेलंगणात २१ नवीन जिल्हे
आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण राज्याची निर्मिती दोन वर्षांपूर्वी झाली. मंगळवारी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नवीन २१ जिल्ह्यांची घोषणा केली. यामुळे राज्यात आता एकूण ३१ जिल्हे झाले आहेत. आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण हे देशातील २९ वे राज्य म्हणून २ जून २०१४ रोजी उदयास आले आहे.गॅलॅक्सी नोट ७ चे उत्पादन बंद
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपले प्रचलित उत्पादन 'गॅलेक्सी नोट 7'चे उत्पादन आणि विक्री कायमची थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. खराब दर्जामुळे अनेक स्मार्टफोन माघारी बोलविण्यात आल्याने ब्रँडच्या प्रतिष्ठेला धक्का पोचला आहे. काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना घडल्यानंतर गेल्या महिन्यात कंपनीने २५ लाख गॅलेक्सी नोट माघारी बोलाविण्याची घोषणा केली होती. डॉ. नयनज्योत लाहिरी यांना जॉन एफ. रिचर्ड पुरस्कार
०१. इतिहासाच्या नामवंत प्राध्यापक आणि पुरातत्त्व क्षेत्रातील विद्वान डॉ. नयनज्योत लाहिरी यांच्या 'अशोका इन एन्शन्ट इंडिया' या बहुचर्चित पुस्तकाला २०१६ चा जॉन एफ रिचर्ड्स पुरस्कार जाहीर झाला आहे.

०२. अमेरिकन हिस्टरी असोसिएशनतर्फे (एएचए) दरवर्षी दक्षिण आशियाई इतिहासावरील पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो.

०३. प्रा. लाहिरी यांचा जन्म ३ मार्च १९६० रोजी दिल्लीत झाला. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट मिळवली. सध्या प्रा. लाहिरी ह्या हरयाणातील अशोका विद्यापीठात कार्यरत आहेत.

०४. आसाममधील प्राचीन स्थळांविषयी त्यांनी केलेले संशोधन मूलगामी स्वरूपाचे मानले जाते.सम्राट अशोकावरील पुरस्कारप्राप्त पुस्तकासाठीही त्यांनी भरपूर परिश्रम घेतले, प्रवास केला आणि अनेक ऐतिहासिक दस्तावेजांचा बारकाईने अभ्यास केला. पुरातत्त्व क्षेत्रातील त्यांचे अजोड काम लक्षात घेऊन इन्फोसिस फाउंडेशनने २०१३ मध्ये त्यांना ५५ लाखांचा पुरस्कार देऊन गौरवले होते.डॉ. रजनीश कुमार यांना तरुण वैज्ञानिक पुरस्कार
०१. डॉ. रजनीश कुमार यांना नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (नासी) व स्कॉप्स यांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनव संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना हा पुरस्कार दिला जातो. 

०२. मध्य प्रदेशातल्या सिंगरौली या छोटय़ा गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते रायपूरला आले. कुमार यांनी २००३ मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेतून स्नातकोत्तर पदवी घेतली, तर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीत पीएच.डी. केली. 

०३. २०१० मध्ये ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत दाखल झाले. पीएनएएस, जेएसीएस, यांसारख्या अनेक नामवंत नियतकालिकांत त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील सर्वात जास्त अभ्यासल्या गेलेल्या तीन शोधनिबंधांसाठी त्यांना याआधी एक पुरस्कार मिळाला होता. कॅनडातील नॅशनल रीसर्च कौन्सिलचे ते फेलो आहेत.सध्या ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करतात. 

०४. नॅचरल गॅस हायड्रेट्समध्ये अडकलेला मिथेन बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक कंपन्यांशी संलग्न राहून डॉ. कुमार यांनी गॅस हायड्रेट्सचे रेणवीय पातळीवर संशोधन केले आहे. 

०५. त्यांचे संशोधन नेहमीच्या चौकटीबाहेरचे आहे त्यात ऊर्जा व पाणी यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. हायड्रेट्समधून काढलेला मिथेन हा अपारंपरिक जीवाश्म इंधन मानला जातो, हायड्रेट्समधील मिथेनचे मोठे साठे भारतात आहेत. त्यामुळे पुढील शंभर वर्षांची ऊर्जा गरज भागू शकते असे त्यांनी सांगितले. 

०६. विज्ञानात संशोधनाची प्रेरणा त्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेत अभ्यास करीत असताना मिळाली, कारण तेथील शिक्षण दर्जेदार आहे. कार्बन डायॉक्साइड पकडणे व तो वेगळा काढणे, सागरी जलाचे निक्र्षांरीकरण व ऊर्जा संकलन या विषयात त्यांचे संशोधन आहे. पाण्याचा सॉल्व्हंट म्हणून वापर केला जातो ती क्लॅथरेट पद्धत त्यांनी वापरली.ज्युरासिक युगातील "इथेसॉर'चा शोध
०१. डायनॉसोरच्या युगातील (ज्युरासिक काळ) दुर्मिळ सागरी प्राण्याचा शोध संशोधकांना लागला आहे. अनेक दशकांपूर्वीच्या जिवाश्‍माच्या संशोधनातून ही बाब पुढे आली आहे. 'ब्रिटिश इथेसॉर' असे या माशाचे नाव असून, ही सागरी जात तेव्हाही दुर्मिळ समजली जात होती. 

०२. डॉल्फिन किंवा शार्कशी साधर्म्य असलेले 'ब्रिटिश इथेसॉर' हे सागरी प्राणी हे अत्यंत धोकादायक भक्षक होते. यातील काही जणांची लांबी १५ मीटर असण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हे प्राणी डायनॉसोर युगात म्हणजे २० कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्या वेळी ब्रिटन हा छोटा द्विपसमूहाच्या रूपात होता. 

०३. मॅंचेस्टर विद्यापीठातर्फे याबाबतचे संशोधन सहा वर्षांपासून सुरू आहे. 'ब्रिटिश इथेसॉर'ची कवटी व पंखांचे जीवाश्‍म आढळल्याने शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्न यशस्वी ठरले आहेत. या जीवाश्‍मावरून हे प्राणी इतरांपेक्षा वेगळे व दुर्मिळ असल्याचे निदर्शनास आले आहे. 

०४. ब्रिस्टॉल विद्यापीठामध्ये अनेक वर्षांपासून ठेवलेल्या सांगाड्याच्या अभ्यासावरून या नवीन सागरी जातीचा शोध लागला. मॅंचेस्टर विद्यापीठातील शास्त्रज्ञ डिन लोमॅक्‍स व अमेरिकेतील ब्रॉकपोर्ट महाविद्यालयातील प्राध्यापक ज्युडी मसारे यांनी याबाबत संशोधन केले. 

०५. सॉमरसेट प्रांतातील वॉल्टन येथे 'इथेसॉर'चा प्रचंड सांगाडा आढळला होता. ८० वर्षांपूर्वी हा सांगाडा सिटी म्युझियमने ब्रिस्टॉल विद्यापीठाला भेट दिला होता. १९१५ मध्ये तो या संग्रहालयाने विकत घेतला होता. १९३० मध्ये तो विद्यापीठाला देण्यात आला.

०६. ब्रिटिश जीवाश्‍म शास्त्रज्ञ नायगेल लार्किन यांच्या सन्मानार्थ त्याला 'इथेसॉर लार्किन' असे नाव दिले आहे. 'लार्किन' याचा अर्थ धोकादायक असा आहे.