चालू घडामोडी ४ & ५ फेब्रुवारी २०१७

राज्यातील महापालिकांचे महापौर आरक्षण जाहीर
महाराष्ट्रातील २७ महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढण्यात आली. त्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला) १६, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ७, अनुसूचित जातींसाठी ३, अनुसचूति जमातीसाठी एक असे आरक्षण काढण्यात आले.

२७ पैकी १४ महापालिकांमधील महापौरपद हे विविध प्रर्वगातील महिलांसाठी आरक्षित असेल. हे आरक्षण सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या महानगरपालिकासाठी असून उर्वरित महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत संपल्यानंतर हे आरक्षण लागू होणार आहे.गुजरातच्या दिव्यांग शेतकऱ्यास पद्मश्रीचा बहुमान
यंदाच्या वर्षी जे पद्म पुरस्कार जाहीर झाले त्यात फारसे नाव नसलेल्या पण चांगली कामगिरी असलेल्या काही व्यक्तींचा समावेश असून त्यात गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्य़ातील दिव्यांग (शारीरिक अक्षम) शेतकरी गेनाभाई पटेल (वय ५२) यांचा समावेश आहे. 

गुजरातमध्ये सात जणांना पद्मश्री सन्मान मिळाला असून त्यात पटेल यांचा समावेश आहे. त्यांनी डाळिंबाच्या शेतीच्या माध्यमातून शेतजमिनीचा सर्वोत्तम वापर केला आहे. 

बनासकांठा जिल्ह्य़ातील लखानी तालुक्यातील गोलिया खेडय़ात गेनाभाई पटेल यांनी पोलिओने अपंग असतानाही शेती केली. त्यांनी शेतीच्या अनेक कार्यपद्धती शिकून घेतल्या व ठिबक सिंचनाने कोरडवाहू जमिनीत डाळिंबाचे पीक घेतले. 

त्या भागात पाऊसही कमी पडत आहे. त्यांच्या शेताला किमान सत्तर हजार शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. त्यांची यशोगाथा ही इतरांसाठी आदर्श आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना पद्मश्री किताब जाहीर झाला आहे.

त्यांनी डाळिंबाची रोपे महाराष्ट्रातून नेली होती व ती २० हेक्टर जागेत लावली, त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. दोन वर्षांनी डाळिंबे लागली.यातून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. दोन वर्षांत संपूर्ण खेडय़ात डाळिंबाची लागवड झाली.

गेनाभाई यांना गुजरात व राजस्थानात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सृष्टी सम्मान मिळाला होता. २०१३ मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत व्याख्यान दिले होते. आयफोन आता मेड इन इंडिया, बंगळुरुत होणार उत्पादन
टेक्नॉलॉजी क्षेत्रात दबदबा असणारी 'अॅपल' या कंपनीने आता बंगळुरुत उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅपलच्या निर्णयाचे कर्नाटक सरकारने स्वागत केले असून अॅपलमुळे राज्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीचा विकास होणार आहे. जागतिक स्पर्धेमध्ये भारताला याचा फायदा होईल असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे.

'अॅपल'च्या प्रतिनिधी प्रिया बालसुब्रमण्यम (उपाध्यक्ष, आयफोन ऑपरेशन्स) आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी राज्यातील अधिकारी आणि मंत्र्यांची भेट घेतली होती.

अॅपलची प्रॉडक्ट्स भारतात उपलब्ध असली तरी या प्रॉडक्ट्सचे उत्पादन चीन, कोरिया अशा देशांमधल्या अॅपलच्या प्रॉडक्शन युनिटस् मधून होतं. 

अॅपलच्या या प्रयत्नांना भारतीय कायद्यामधल्या काही अटी जाचक ठरत आहेत. परदेशी कंपनीने भारतात उत्पादन सुरू केलं तर ३०% कच्चा माल देशांतर्गत स्त्रोतांमधून घ्यावा यासंबंधी काही कायद्यांमध्ये तरतुदी आहेत. 

अॅपलच्या दृष्टीने हा कच्चा माल म्हणजे त्यांच्या उत्पादनांना लागणारे भाग असू शकतात. हे भाग बनवण्याची सोय सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्याचं अॅपलचं म्हणणं होते. यावर काय तोडगा निघाला की अॅपलने या अटी मान्य केल्या हे अद्याप समजू शकलेले नाही.'नीट'साठी आता तीन प्रयत्न ग्राहय़
तीन किंवा त्याहून अधिक वेळा केंद्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्या वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशोच्छुकांना 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया'ने (एसीआय) दिलासा दिला आहे. 

वैद्यकीयसाठी केंद्रीय स्तरावर होणाऱ्या नीट या परीक्षेकरिता तीन वेळा केंद्रीय प्रवेश परीक्षा (आधीची एआयपीएमटी, नंतरची नीट) दिलेल्या परीक्षार्थीना अपात्र ठरविण्यात आले होते.

 मात्र हा नियम २०१७ पासून लागू करण्यात यावा, असा निर्णय एमसीआयने घेतल्याने या परीक्षार्थीना दिलासा मिळाला आहे. म्हणजेच २०१७ पासून पुढे विद्यार्थ्यांच्या नीटच्या तीन खेपा ग्राहय़ धरल्या जाणार आहेत. परिणामी एक किंवा त्याहून अधिक वेळा केंद्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना सलग तीन वर्षे नीट देण्याची मुभा मिळाली आहे.

नीट येण्याआधी एआयपीएमटी या केंद्रीय परीक्षेद्वारे केंद्राच्या अख्यत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालये, राज्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील अखिल भारतीय स्तरावरील (ऑल इंडिया) कोटा आदी ठरावीक जागांवरील प्रवेश होत. 

मात्र आता या परीक्षेची जागा नीटने घेतली आहे. तसेच, देशभरातील सर्वच सरकारी, खासगी, अभिमत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांकरिता आता नीट हीच परीक्षा ग्राहय़ धरली जाणार आहे. शकुंतला रेल्वे आता ब्रॉडगेजवर धावणार
विदर्भात ब्रिटिश काळापासून खासगी संस्थानाच्या मालकीची आणि अनेक छोटय़ा छोटय़ा गावांमधील लोकांना सेवा देणारी शकुंतला रेल्वे आता भारतीय रेल्वेचा अविभाज्य घटक बनली आहे. 

यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वेच्या रुळांची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी २१०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. २२५ किमी लांबीच्या या मार्गावरील रूळ रुंद झाल्यानंतर लांबपल्ल्याच्या गाडय़ाही या मार्गावरून धावणे शक्य होणार आहे.

शकुंतला रेल्वे या नावाने ही रेल्वे पुलगाव-आर्वी, मूर्तिजापूर-यवतमाळ आणि मूर्तिजापूर-अचलपूर या तीन मार्गावर धावत होती. माथेरान किंवा दार्जििलग या ठिकाणी धावणाऱ्या छोटय़ा गाडीसारखी गाडी या मार्गावरून धावते. या २२५ किलोमीटरच्या टप्प्यात अनेक प्रवाशांना सेवा देणाऱ्या या रेल्वेच्या उत्पन्नाचा काही वाटा अगदी आत्ताआत्तापर्यंत ब्रिटिश सरकारला जात होता, असेही सांगितले जात होते.

गेल्या वर्षी भारत सरकारने या रेल्वेचा ताबा घेत या रेल्वेचा विकास करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू केले होते. ही गाडी नॅरोगेज रुळांवर चालत होती. त्यामुळे या मार्गावर छोटी गाडी चालणेच शक्य होते. 

आता या मार्गावर ब्रॉडगेज रूळ टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी २१०० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूद करण्यात आली आहे. खासगी-सार्वजनिक भागीदारी या तत्त्वावर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

हा २२५ किलोमीटरचा मार्ग रुंद झाल्यानंतर या मार्गावर लांबपल्ल्याच्या गाडय़ा चालणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे.हाफिज सईदच्या जमात उद दवाचे नामांतर
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने आपल्या जमात उद दवाचे नामांतर केले आहे. तेहरीक आझादी जम्मू अॅंड काश्मीर असे त्याने आपल्या संघटनेचे नाव ठेवले आहे. पाकिस्तान सरकारने त्याला नजरकैदेत ठेवल्यानंतर आपल्या संघटनेचे नाव बदलून त्याने तेहरीक आझादी जम्मू अॅंड काश्मीर (टीएजीके) असे ठेवले आहे. 

जमात उद दवाचे जाळे पाकिस्तानमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तान सरकारने हाफिज सईदच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संघटनेची नाव बदलून आपले जाळे अबाधित ठेवण्यासाठी सईद धडपडत असल्याचे दिसत आहे.सईदची एक दुसरी संघटना आहे फलाह ए इंसानियत फाउंडेशन. सईदच्या या संघटनेला पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातून निधी येतो.

५ फेब्रुवारी रोजी काश्मीर दिवस आहे. या दिवशी लाहोर आणि पाकिस्तानातील इतर शहरांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सईदच्या नव्या संघटनेच्या नावाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

सईदच्या पाठीमागे पाकिस्तान सरकार हात धुवून लागले असे दिसत असले तरी त्याच्या कार्यकर्त्यांची आणि स्वयंसेवकांची संख्या अमाप आहे. नुकताच पंजाबमधील रावी नदीमध्ये नानकाना साहेब बोट बुडाली होती. या बचावकार्यात सईदच्या संघटनेतील स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हाफिज सईद याच्यावर पाकिस्तान सरकारने परदेश प्रवास करण्यास बुधवारी निर्बंध घातले. काही दिवसांपूर्वी त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले. त्याला तसेच त्याच्या काही साथीदारांवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. हाफिज सईदबरोबर इतर ३७ जणांनाही परदेश प्रवासावर निर्बंध लादण्यात आले आहेत.