चालू घडामोडी १ आणि २ मार्च २०१७

बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकार विधेयक आणणार
तामिळनाडूतील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर राज्यात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. 

यासाठी मुख्यमंत्र्यांनी कामकाज सल्लागार समितीमध्ये विधेयक आणण्याचे आदेश विधी आणि न्याय विभागाला दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधी आणि न्याय विभागाकडून बैलगाडी शर्यतीसाठी विधेयक आणले जाणार आहे.

बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांना अतिशय निर्दयीपणे वागवण्यात येत असल्याने २०११ मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली गेली होती. त्यामुळे बैलगाडा शर्यतींवरही बंदी आली. हा वाद पुढे न्यायालयात गेल्यावर निकाल बैलगाडा मालकांच्या विरोधात लागला. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला.

मध्यंतरीच्या काळात केंद्रात सत्ताबदल झाल्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली होती.डॉ. विजया राजाध्यक्षांचा आज जनस्थान पुरस्काराने सन्मान
मराठी साहित्यातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते आज (सोमवार) नाशिकमध्ये दिला जाणार आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार सोहळा महाकवी कालिदास नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. 

मराठी साहित्यात चौफेर विषयावर लेखन, स्त्रीवादी लेखिका व समीक्षक म्हणून डॉ. विजया राजाध्यक्ष परिचित आहेत. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालय व एसएनडीटी विद्यापीठात त्यांनी मराठीचे अध्यापन केले आहे. 

महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्रसिद्ध झाली. ‘अधांतर’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. विदेही, अनोळखी, अकल्पित, हुंकार यांसह त्यांचे १९ कथासंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत. मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचे चित्रण त्यांच्या कथांमध्ये दिसून येते. 

विजया राजाध्यक्ष यांनी सन २००० साली इंदूर येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच प्रतिष्ठानच्या वतीने ‘कुसुमाग्रज स्मरण’ या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. रिक्षा परवान्यासाठी मराठीची सक्ती बेकायदेशीर
रिक्षा परवान्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य असल्याचे सरकारचे परिपत्रक अवैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

रिक्षा परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांना मराठी भाषा यायला हवी, असे परिपत्रक राज्य सरकारकडून काढण्यात आले होते. मात्र अशाप्रकारे सक्ती करणे योग्य नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले होते. 

आज (बुधवारी) नवीन मराठी रिक्षा परवान्यांसाठी मराठी अनिवार्य असल्याचे राज्य सरकारचे परिपत्रक मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरले आहे.

या प्रकरणी बचाव करताना रिक्षा परवान्यांसाठी फक्त मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान आवश्यक असल्याचे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. मराठी भाषेच्या सक्तीचा निर्णय नव्या परवान्यांसाठीच लागू असल्याचेही राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाला सांगण्यात आले.'आयएनएस विराट' नौदलाचा निरोप घेणार
भारतीय नौदलाचा मानबिंदू ठरलेली 'आयएनएस विराट' ही विमानवाहू युद्धनौका येत्या ६ मार्चला भारतीय नौदलाचा निरोप घेणार आहे. या निरोपाच्या दिवशी संधिप्रकाशात विराटवरील नौदलाचा ध्वज अखेरचा खाली घेण्यात येईल. जवळपास ५७ वर्षे जगातील दोन महत्त्वाच्या नौदलांमध्ये सेवा बजावल्यानंतर ही युद्धनौका निवृत्त होत आहे.

'जलमेव यस्य, बलमेव तस्य' या आपल्या ब्रीदवाक्याला साजेशी कारकीर्द घडवणारी युद्धनौका म्हणून आयएनएस विराटकडे पाहिले जाते. 'सेंटॉर' वर्गातील या विमानवाहून युद्धनौकेचे वैशिष्टय़ म्हणजे या युद्धनौकेने भारतीय नौदलात ३० वर्षे तर इंग्लंडच्या 'रॉयल नेव्ही'मध्ये २७ वर्षे आपली सेवा बजावली. 

सर्वाधिक सेवा केल्याने या युद्धनौकेची गिनीज बुकच्या जागतिक विक्रमात नोंददेखील झाली आहे. निरोप समारंभात लष्कराच्या डाक विभागाकडून एक विशेष फलक तसेच एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.

विराट भारतीय नौदलात १२ मे १९८७ साली दाखल झाली होती. विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्याने त्या काळात भारतीय नौदलाच्या सागरी सामरिक ताकदीत वाढ झाली होती. 

विराटवर हवाई माऱ्याची क्षमता असलेल्या विमानांची तुकडी होती. यात सागरातील 'पांढरे वाघ' म्हणून ओळखली गेलेली सी-हॅरिअर ही विमाने, पाणबुडीरोधी सी-किंग एमके ४२ सी ही 'हार्पून' म्हणून ओळखली गेलेली विमाने तसेच चेतक हेलीकॉप्टर यांचा समावेश होता. 'ध्रूव' आणि रशियन बनावटीची 'कामोव-३१' हेलीकॉप्टरनेही विराटवरून उड्डाणे केली आहेत.

तीन दशकांत या युद्धनौकेवरील विमानांनी एकूण २२ हजार ६२२ तासांचा प्रवास केला आहे. २ हजार २५२ दिवस ही युद्धनौका या काळात कर्तव्यावर होती.सेवाकाळात विराटने ५ लाख ८८ हजार २८७ सागरी मैलांचा प्रवास केला. 

महत्त्वाची बाब म्हणजे सात वर्षे म्हणजे जवळपास २७ वेळा विराटने पृथ्वी प्रदक्षिणा केली. तसेच, युद्धनौकेचा बॉयलरदेखील गेल्या तीन दशकांत तब्बल ८० हजार ७१५ तासांसाठी चालला आहे.

१९८९ साली श्रीलंका येथे भारताने राबविलेल्या शांती मोहिमेत विराटने 'ऑपरेशन ज्युपिटर' ही महत्त्वाची कामगिरी बजावली होती. १९९० मध्ये गढवाल रायफल्सच्या जवानांसोबत विराटने एक मोहीम पूर्ण केली होती.

भारताच्या संसदेवर हल्ला झाल्यानंतर २००१ व २००२ या काळात ऑपरेशन पराक्रममध्येदेखील आपला सहभाग नोंदवला होता. १९८७ पासून २२ कप्तानांनी या युद्धनौकेचे सुकाणू यशस्वीरीत्या हाताळले असून ४० ध्वजाधिकारी आणि आजवरच्या पाच भारतीय नौदल प्रमुखांनी आयएनएस विराटवर आपली सेवा बजावली आहे. 

'रॉयल नेव्ही'मध्ये असताना १३ ब्रिटिश कप्तानांनी या नौदलाची धुरा सांभाळली होती.

या विषयीचा व्हिडियो पहाजितूची सुवर्णभरारी
स्पर्धेत प्रत्येक दिवसागणिक कामगिरीत सुधारणा करणाऱ्या अव्वल नेमबाज जितू रायने राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. 

मंगळवारी कांस्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या जितूने बुधवारी ५० मीटर पिस्तूल प्रकारात अव्वल स्थान पटकावले. सुवर्णपदकावर कब्जा करताना जितूने २३०.१ गुणांसह विश्वविक्रमाचीही नोंद केली. या स्पर्धेतले भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. 

जितूचा सहकारी अमनप्रीतने रौप्यपदक तर इराणच्या वाहीद गोलखानदानने कांस्यपदक मिळवले.

 महिलांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात मुस्कानला ५७६ गुणांसह १२व्या तर राही सरनोबतला २३व्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांमध्ये स्कीट प्रकारात रश्मी राठोड (१७), आरती सिंग (२४) तर सानिया शेख (२७) अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत.भारतीय युवा फुटबॉल संघाचे माटोस प्रशिक्षक
अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने पोर्तुगालच्या लुईस नोर्टन डी माटोस यांची भारतीय युवा (१७ वर्षांखालील)संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. 

खेळाडूंनी केलेल्या आंदोलनानंतर आधीचे प्रशिक्षक निकोलाय अ‍ॅडम यांनी वादग्रस्त परिस्थितीत राजीनामा दिला होता. 

डी माटोस यांनी भारतीय संघाचा कर्णधार बायच्युंग भूतिया आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक इंजेटी श्रीनिवास यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंगळवारी त्यांनी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे प्रशिक्षक प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. यानंतर प्रशिक्षकपदी माटोस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार
सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावण्याची किमया साधणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) देण्यात येणाऱ्या वर्षांतील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीच्या प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 
यंदाच्या हंगामात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तिन्ही प्रकारांत सर्वाधिक धावांचा मानही कोहलीच्या नावावर आहे. त्याने तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले आहे. 

अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या रविचंद्रन अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दुसऱ्यांदा पटकावणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला आहे. 

प्रदीर्घ रणजी हंगामात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या श्रेयस अय्यरला माधवराव सिंधिया पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कूचबिहार करंडक स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडणाऱ्या अरमान जाफरला एनकेपी साळवे पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

सी. के. नायडू चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या जय बिस्ताची एम. ए. चिदम्बरम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अनुभवी महिला क्रिकेटपटू मिताली राजची जगमोहन दालमिया पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

यंदाच्या हंगामात रणजी करंडक, सी. के. नायडू चषक तसेच महिला प्लेट लीग गटाच्या जेतेपदाची कमाई करत दिमाखदार यश साकारणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सर्वोत्तम राज्य संघटनेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. मुंबईने या हंगामात कूचबिहार चषक, विजय र्मचट चषक यांच्यासह महिला एकदिवसीय एलिट गट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे.

शिवलकर, गोयल, रंगास्वामी यांना जीवनगौरव
स्थानिक क्रिकेटमध्ये दिमाखदार कारकीर्द घडवणाऱ्या मात्र भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू न शकलेल्या राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर या दिग्गजांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

या दोघांच्या बरोबरीने माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांनाही याच पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी निवड होणाऱ्या रंगास्वामी पहिल्या महिला खेळाडू आहेत. ८ मार्चला बंगळुरू येथे होणाऱ्या सोहळ्यात त्यांना गौरवण्यात येणार आहे.

भारतीय क्रिकेटला अमूल्य योगदानासाठी वामन विश्वनाथ कुमार आणि दिवंगत रमाकांत देसाई यांना बीसीसीआयतर्फे विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

मन्सूर अली खान पतौडी स्मृतिप्रीत्यर्थ पाचवे व्याख्यान झाल्यानंतर पुरस्कार्थीचा गौरव करण्यात येणार आहे. माजी कसोटीपटू फारुख इंजिनीयर यंदा वक्ते असणार आहेत. यष्टींपाठी घोटीव चपळता आणि आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध फारुख यांनी ४६ कसोटी आणि पाच एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.

एन. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडल्जी यांचा समावेश असलेल्या समितीने पुरस्कार्थीची निवड केली.