चालू घडामोडी २० व २१ एप्रिल २०१७

जी. श्रीकांत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी
राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनामार्फत अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची निवड करण्यात आली आहे. 

नागरी सेवा दिनानिमित्त २१ एप्रिल रोजी मुंबईतील 'सह्याद्री' राज्य अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनामार्फत राज्यातील उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिन प्रताप सिंह यांची निवड करण्यात आली आहे.राजकपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर
राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना, तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. 

चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा केली.

जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. 

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.राज्यात एक मे पासून स्वस्थ अभियान
राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून, या अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यांत येत्या १ ते २७ मे २०१७ दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

तसेच त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून मोफत होणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांत पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.आशियाई स्पर्धेसाठी देशाचे नेतृत्व दुती चंदकडे
भारताची अव्वल धावपटू दुती चंद हिच्या नेतृत्वाखाली आगामी आशियाई ग्रां.प्री. २०१७ तीन सत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी १६ सदस्यांचा भारतीय संघ चीनला रवाना होणार आहे. 

जियाजिंग आणि जिन्हुआ येथे अनुक्रमे २४ आणि २७ एप्रिलला स्पर्धेचे पहिले व दुसरे सत्र पार पडेल. यानंतर अंतिम सत्र ३० एप्रिलला चिनी तैपई येथे होईल.

४०० मी. शर्यतीतील राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनास आणि इंचिओन आशियाई क्रीडा २०१४ क्रीडा स्पर्धेत ४०० मी. शर्यतीतील कांस्यपदक विजेती पूवम्मा राजू अंतिम सत्रादरम्यान भारतीय संघात सामील होतील.डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसामध्ये बदल केला 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली. 

तसेच याचा भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. हा व्हिसा जारी करण्यासाठी संपूर्ण नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. 

या व्हिसाचा गैरवापर रोखण्यात यावा तसेच सर्वोच्च कुशल आणि सर्वाधिक वेतनधारी विदेशी व्यावसायिकांनाच हा व्हिसा मिळावा, असे ट्रम्प यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.