चालू घडामोडी ०७ व ०८ मे २०१७

महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद यांच्यात सामंजस्य करार
महाराष्ट्र विधिमंडळ आणि न्यू साऊथ वेल्स संसद (ऑस्ट्रेलिया) यांच्यात संसदीय सामंजस्य करार करण्यात आला. 


तसेच या ऐतिहासिक करारावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तर न्यू साऊथ वेल्स संसदेच्या (ऑस्ट्रेलिया) वतीने न्यू साऊथ वेल्स कौन्सिलचे सभापती जॉन अजाका आणि विधिमंडळ अध्यक्षा श्रीमती शेली हँकॉक यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

विधिमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ सध्या आस्ट्रेलिया, न्यूझीलंड व सिंगापूर या देशांच्या अभ्यास दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स संसदेस भेट दिली. या वेळी सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील न्यू साऊथ वेल्स संसदेच्या प्रेस्टिन सभागृहामध्ये सामंजस्य करार झाला



'बाहुबली'ची जगभरात १००० कोटींची कमाई
दिग्दर्शक राजामौली यांच्या 'बाहुबली- द कन्क्‍लुजन' या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई करत इतिहास रचला. 'बाहुबली- द कन्क्‍लुजन'ने प्रदर्शनानंतर नवव्या दिवशीच ही कमाई केली आहे.

एकाच वेळी सर्वाधिक पडद्यांवर दाखविला जाण्याचा विक्रमही 'बाहुबली- द कन्क्‍लुजन'ने आपल्या नावावर केला आहे. कलाकारांच्या अभिनयाबरोबरच चित्रपटात वापरल्या गेलेल्या 'व्हीएफएक्‍स' तंत्रज्ञानामुळेही हा चित्रपट आवडल्याचे चित्रपटप्रेमींनी सांगितले.


'बाहुबली- द कन्क्‍लुजन'ने भारतात ८०० कोटींची आणि परदेशात २०० कोटींची कमाई केली आहे. कमाईचा आकडा १५०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. 

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या "बाहुबली द बिगिनिंग' हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने ६५० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता. 



'स्वच्छ उत्तर प्रदेश' मिशन सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेला पाठबळ देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी 'स्वच्छ उत्तर प्रदेश' अभियानाला सुरवात केली.

केंद्र सरकारकडून नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या देशातील १०० स्वच्छ शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील एकही शहराचा समावेश नाही. उत्तर प्रदेशातील ५० शहरांपैकी २५ शहरे सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये आहे. त्यामध्ये गोंडा हे शहर सर्वांत अस्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. 



भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सीईओ राहुल जोहरी यांनी नव्या जर्सीचे अनावरण केले. 

मोबाईल कंपनी 'ओप्पो' कंपनी भारतीय संघाची प्रायोजक आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघ परिधान करत असलेल्या जर्सीप्रमाणेच ही जर्सी आहे. मात्र, त्यावर 'ओप्पो' चा लोगो असणार आहे.

'ओप्पो' कडून प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयबरोबर पाच वर्षांसाठी १०७९ कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे.
सध्या भारतीय संघाचे प्रायोजक असलेल्या स्टार इंडियाने पुन्हा बोली लावण्यास नकार दिल्याने नवा प्रायोजक शोधण्यात आला.



हिंदुजा बंधू बनले ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंत
भारतीय वंशाच्या हिंदुजा बंधूंनी ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान मिळवला आहे. हिंदुजा समूहाची संपत्ती १६.२ अब्ज पौंड असून मागील वर्षापेक्षा यंदा त्यांच्या संपत्तीमध्ये ३.२ अब्ज डॉलरची वाढ नोंदविण्यात आली आहे. 

हिंदुजा बंधूंसह ब्रिटनमधील १००० प्रमुख अतिश्रीमंतांच्या यादीमध्ये ४० अन्य भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.'द संडे टाइम्स रिच लिस्ट'ने ब्रिटनमधील श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. 

मागील वर्षी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या निर्णयाचा ब्रिटनमधील अब्जाधीशांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे 'द संडे टाइम्स रिच लिस्ट'मध्ये नमूद करण्यात आले आहे. याउलट ब्रिटनमधील अब्जाधीश १४ टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

ब्रिटनमधील प्रमुख भारतीय वंशाच्या अब्जाधीशांच्या यादीत श्रीचंद आणि गोपीचंद हिंदुजा, डेव्हिड आणि सिमन रुबेम, लक्ष्मी मित्तल, मोहसीन आणि झुबेर इस्सा, लॉर्ड स्वराज पॉल, प्रकाश लोहिया, अनिल अगरवाल, सुनील वासवानी, नवीन आणि वर्षा इंजिनिअर, जसमिंदर सिंह, भिक्‍खू आणि विजय पटेल, जटानिया बंधू, अनिश कपूर यांचा समावेश आहे.



इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष
फ्रान्सच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इमॅन्युएल मॅक्रॉन यांना जनतेने कौल दिला आहे. मॅक्रॉन यांनी उजव्या विचारसरणीच्या मरीन ल पेन यांचा पराभव केला. मॅक्रॉन हे नेपोलियन बोनापार्टनंतरचे फ्रान्सचे सर्वांत तरुण नेते ठरले आहेत. 
मॅक्रॉन हे माजी इन्व्हेस्टमेंट बॅंकर असून, ते ३९ वर्षांचे आहेत. देशाचे ते सर्वांत तरुण अध्यक्ष ठरणार आहेत. प्राथमिक अंदाजानुसार मॅक्रॉन यांना ६५-६६ टक्के आणि ल पेन यांना ३३-३४ टक्के मते मिळाली आहेत. 

फ्रान्सच्या अध्यक्षपदासाठी ६५.३ टक्के मतदान झाले होते. अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी १९६९ नंतर हे सर्वांत कमी मतदान आहे. 

उजव्या विचारसरणीच्या नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मरीन ल पेन आणि एन मार्श या पक्षाचे संस्थापक इमॅन्युएल मॅक्रॉन हे रिंगणात होते.पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत इतर सर्व उमेदवारांमध्ये या दोघांनीच आघाडी घेतली होती. त्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी आज 'रन ऑफ' फेरी झाली. 



राजगौरी पवारचा बुद्ध्यांक आइन्स्टाइनपेक्षाही जास्त
आता मूळची बारामतीची आणि सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या राजगौरी सुरजकुमार पवार हिने 'ब्रिटिश मेन्सा' बुद्‌ध्यांक चाचणीमध्ये १६२ गुण मिळवत नवा विक्रम केला आहे. यामुळे राजगौरीचा बुद्‌ध्यांक थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षाही दोन गुणांनी अधिक भरला आहे.

अवघे बारा वर्षे वय असणाऱ्या राजगौरीने उच्च बुद्‌ध्यांकासाठी ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध 'ब्रिटिश मेन्सा' या संस्थेचे सदस्यत्वही मिळवले आहे. मागील महिन्यामध्ये मॅंचेस्टरमध्ये झालेल्या 'ब्रिटिश मेन्सा आयक्‍यू' परीक्षेत राजगौरी सहभागी झाली होती. या परीक्षेमध्ये तिला १६२ गुण मिळाले होते. एखाद्या अठरा वर्षांखालील मुलीने एवढे गुण संपादन करणे हा विक्रमच समजला जातो. 

'चेशायर काउंटी' मधील एक टक्का विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यात राजगौरीही होती. ब्रिटनमध्ये ज्यांचा बुद्‌ध्यांक अत्युच्च समजला जातो, अशा २० हजार व्यक्तींमध्ये १५०० विद्यार्थी असून, त्यात राजगौरीचाही समावेश आहे. 

राजगौरीचे वडील डॉ. सूरजकुमार पवार हे मूळचे बारामतीचे. मॅंचेस्टर विद्यापीठातील नोकरीच्या निमित्ताने ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. सध्या ते तेथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून, त्यांच्या सौरऊर्जेच्या संशोधनाची ब्रिटन सरकारनेही दखल घेतली आहे. 

आता बुद्‌ध्यांक परीक्षेत सर्वोत्तम गुण प्राप्त करणारी सर्वांत लहान वयाची मुलगी ठरण्याचा मानही राजगौरी हिला मिळाला आहे. राजगौरीला भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. 



जगन्नाथ वाणी यांचे कॅनडामध्ये निधन
१९६५ पासून कॅनडास्थित आणि सामाजिक कार्यातून भारतासह कॅनडात ठसा उमटविणारे, दानशूरतेतून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविणारे प्रा. डॉ. जगन्नाथ काशिनाथ वाणी यांचे कर्करोगाने कॅलगरी (कॅनडा) येथे निधन झाले. 

डॉ. वाणी यांनी धुळ्यात का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, मुक बधिरांसाठी शाळा स्थापन केली. विज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी रेऊ वाणी विज्ञान विहार, गरीब विद्यार्थ्यांची गावोगावी नेत्रतपासणी करून मोफत चष्मे वाटप, कमलिनी आय हॉस्पिटलची उभारणी व गरीबांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया, सिजोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांसाठी पुण्यात सामाजिक कार्याची उभारणी व त्यातील संघटनातून राज्यभरातील अशा रूग्णांच्या मदतीसाठी पुढाकार आदी विधायक कार्यातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

डॉ. वाणी यांना कार्यकर्तृत्वामुळे कॅनडा सरकारने तेथील सर्वोच्च बहुमानाच्या 'ऑर्डर ऑफ कॅनडा' या पुरस्काराने सन्मानित केले होते.