चालू घडामोडी २७ व २८ ऑक्टोबर २०१७

दिग्दर्शक गौतम अधिकारी यांचे निधन
'बंदिनी', 'परमवीर', 'हॅलो इन्स्पेक्‍टर' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शक गौतम अधिकारी यांचे वयाच्या ६७ व्य वर्षी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. 

गौतम अधिकारी हे 'अधिकारी ब्रदर्स' संस्थेचे सहसंचालक होते. त्यांनी 'बंदिनी', 'परमवीर', 'हॅलो इन्स्पेक्‍टर', 'धनंजय' व 'संघर्ष' आदी मराठी मालिकांचे, तसेच 'सुराग', 'पॅंथर', 'वक्त की रफ्तार', 'कुंती' या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले. '
भूकंप' व 'चेहरा' या हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन त्यांनी केले होते. 

मालिकांच्या सर्वाधिक भागांचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम अधिकारी यांनी केला. त्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली होती.



देशातील ऐतिहासिक वारशांची देखरेख खाजगी कंपन्यांकडे
पर्यटन मंत्रालयाच्या 'वारसा दत्तक योजने' अंतर्गत १४ स्मारकांच्या देखरेखीसाठी ७ कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दिल्लीत आयोजित 'पर्यटन पर्व' या उपक्रमात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात या कंपन्या 'स्मारक मित्र' म्हणून कार्यरत राहणार आहेत. 

दिल्लीतील जंतरमंतरच्या देखभालीसाठी 'एसबीआय फाऊंडेशन'चे नाव निश्चित करण्यात आले आहे. कोणार्क मधील सुप्रसिद्ध सुर्यमंदिर, भुवनेश्वरमधील राजा-राणी मंदिर आणि ओडिशामधील रत्नागिरी स्मारकाच्या देखभालीचे काम 'टी. के. इंटरनॅशनल लिमिटेड'ला सोपवण्यात येणार आहे. 

कर्नाटक मधील हंपी, जम्मू-कश्मीर मधील लेह पॅलेस, दिल्लीतील कुतुबमिनार आणि महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांच्या देखभालीची जबाबदारी 'यात्रा ऑनलाईन प्रा.लि.'कडे सोपवण्यात येणार आहे.कोचीमधील मत्तान चेरी पॅलेस संग्रहालय आणि दिल्लीतील सफदरगंज मशिदीची देखभाल 'ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' करणार आहे. 

गंगोत्री मंदिर क्षेत्र आणि गोमुख तसेच जम्मू-कश्मीरमधील माऊंट स्टोकंग्रीच्या देखभालीची जबाबदारी 'ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया' करणार असून, दिल्लीतील अग्रसेन की बावलीची देखभाल 'स्पेशल हॉलिडेज ट्रॅव्हल प्रा. लि.' करणार आहे. 

तसेच दिल्लीमधील पुराना किला या वास्तुच्या देखभालीसाठी एनबीसीसीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.



राजस्थान राज्य शासनाने विधानसभेत मागासवर्ग (BC) विधेयक मांडले
राजस्थान राज्य शासनाने विधानसभेत राजस्थान मागासवर्ग (राज्यात शैक्षणिक संस्थांमधील तसेच राज्य शासनाअंतर्गत सेवांमध्ये पद आणि नियुक्तीमध्ये जागांचे आरक्षण) विधेयक-२०१७ चा प्रस्ताव चर्चेसाठी मांडला गेला आहे.

विधेयकात गुज्जर आणि अन्य चार जातींना ५% आरक्षण देण्यासंबंधी तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकात राज्यामधील बंजारा, बालदिया, लबाना, गाडिया लोहार, गदोलीया, गुजर, गुर्जर, रैका, रेबरी, देबासी आणि गडारीया, गडरी, गयारी या जमातींचा समावेश करण्यात आला आहे. सध्या राजस्थानमधील आरक्षण ४९% (OBC-२१%, SC-१६%, ST-१२%) आहे



'ग्लोबल इन्व्हेस्टर्स इंडिया फोरम' ची तिसरी बैठक नवी दिल्लीत आयोजित
२६ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स इंडिया फोरम' ची तिसरी बैठक यशस्वीरीत्या पार पडली. हा कार्यक्रम 'आयडियेट, इनोव्हेट, इंप्लीमेंट अँड इन्व्हेस्ट इन इंडिया' या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आला होता.

१९२० साली स्थापित असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया (ASSOCHAM) कडून 'ग्लोबल इन्व्हेस्टर्स इंडिया फोरम' हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि यात मंत्रालये, अधिकारी वर्ग तसेच जागतिक उद्योग संघटनांचा सहभाग होता.

भारत स्मार्टफोनची जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ
अमेरि‍केला मागे सारत भारत आता स्मार्टफोनसाठी जगातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ बनली आहे. अजूनही चीन याबाबतीत अव्वल आहे.

कॅनालि‍स अॅनालि‍स्‍ट या कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, देशातील बदलत्या वातावरणामुळे हँडसेट आणि 4G मुळे मोबाइल बाजारात वृद्धी झालेली आहे. तसेच या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत ४ कोटी हँडसेटचा व्यवहार झाला.

वर्तमानात भारतामध्ये जवळपास १०० मोबाइल ब्रॅंड आपला व्यवसाय करीत आहे. भारतीय मोबाइल बाजारात टॉप ५ कंपन्यांचा ७५% वाटा आहे, ज्यामध्ये सॅमसंग, झा‍योमी, वीवो, ओप्‍पो आणि लिनोवो या कंपन्यांचा समावेश आहे. 

बाजारात पहिल्या क्रमांकावर सॅमसंग तर दुसर्‍या क्रमांकावर झा‍योमी आहे, ज्यांचा देशातील बाजारात ५०% वाटा आहे.



सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वाधिक शक्तिशाली
जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूरच्या पासपोर्टला पसंती देण्यात आली आहे. असे ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या माहितीतून उघड झाले आहे. 

तसेच जर्मनी दुसऱ्या स्थानी असून, स्वीडन आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे तिसऱ्या स्थानावर झेपावले आहेत.  गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत जर्मनी सातत्याने पहिला क्रमांक राखून होती, परंतु यंदा त्या देशाला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत १९३ देशांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये भारताचा क्रमांकात सुधारणा झाली असून, ७८ वरून तो ७५ क्रमांकावर झेप घेतली आहे.

यादीतील पहिल्या १० क्रमांकावर युरोपियन देशांचेच प्रभुत्व असायचे. परंतु यंदा पहिल्यांदाच आशियाई देशांनी या यादीत स्थान मिळवले आहे. 

सिंगापूरमधील नागरिकांना १५९ देशांचा व्हिसा सहजरीत्या (व्हिसा फ्री) मिळू शकतो. त्यानंतर जर्मनीतल्या नागरिकांना १५८ देशांचा व्हिसा उपलब्ध होतात. स्वीडन आणि दक्षिण कोरियामधील नागरिकांना १५७ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. 
भारतातील नागरिकांना ५१ देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात.



जगातील तब्बल ७५ टक्के अब्जाधीश चीनमध्ये
आशियातील अब्जाधीशांची संख्या यंदा प्रथमच अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. अब्जाधीशांकडील सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत मात्र अजूनही अमेरिकाच सर्वोच्च स्थानी आहे. 

आशियात चीनमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत. चीनमध्ये सरासरी दर तीन आठवड्यांत एक अब्जाधीश तयार होतो. सध्याची गती पाहता येत्या चार वर्षांत अमेरिकेला मागे टाकून आशियामध्ये जगातील सर्वाधिक संपत्ती असेल. 
यूबीएस आणि प्राईस वॉटरहाऊस कूपर्स या संस्थांनी एका अहवालाद्वारे ही माहिती जारी केली आहे



सौदी अरेबियाची पहिली रोबोट नागरिक सोफिया
मानवी आयुष्य सुकर करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या यंत्रमानवाला थेट मानवाच्या जोडीने देशाचे नागरिकत्व देण्याची अभिनव कृती सौदी अरेबियाने केली आहे. असे करणारा हा पहिला देश ठरलाआहे.

सोफिया असे या यंत्रमानवाचे नाव आहे. रियाधमध्ये झालेल्या एका सोहळ्यात तिला सौदी नागरिकत्व बहाल करण्यात आले.