बेळगावात होणार आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव 
२० जानेवारीपासून बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव होणार आहे. यासाठी १२ देशांमधील २२ जण, तर भारतातील सतरा पतंग उडवणारे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. 


तसेच सावगाव रोडवरील अंगडी इन्स्टिट्यूटच्या परिसरात २० ते २३ जानेवारी अखेर हा महोत्सव होणार आहे.पतंग महोत्सवाचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी प्रमाणेच यंदाही मुलांसाठी, मोठ्यांसाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. 



आधार पडताळणीसाठी आता चेहरा ओळख 
आधारच्या पडताळणीसाठी बोटांचे ठसे आणि बुबुळांप्रमाणे आता चेहरा ओळखण्याच्या पर्यायाचाही (फेस रेकग्निशन ) समावेश करण्यात येणार असून 1 जुलैपासून नवी सुविधा कार्यान्वित होणार असल्याचे युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय ) प्रसिद्ध केले आहे.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार आर्थिक व्यवहार करताना पॅन क्रमांकाच्या बरोबरीने आधार क्रमांक देणेही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी आधारची पडताळणी गरजेची ठरते. 

चेहऱ्याचा पर्यायही उपलब्ध होत असल्याने लोकांसाठी अतिरिक्त सुविधा मिळणार आहे. गेल्याच आठवडय़ात यूआयडीएआयने १६ आकडी आभासी क्रमांकाचा पर्यायही उपलब्ध करून दिला होता.



भारतात ७० वा लष्कर दिन साजरा
भारतीय लष्कराचा स्थापना दिवस म्हणून दरवर्षी १५ जानेवारीला ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. यावर्षी ७० वा लष्कर दिन साजरा होतोय.

‘लष्कर दिन’ हा देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या वीरांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या हेतूने साजरा करतात.
१५ जानेवारी १९४९ पासूनच भारताचे लष्कर ब्रिटिश लष्करापासून पुर्णपणे वेगळे आणि मुक्त झाले. 

या दिनाच्या स्मृतीत दरवर्षी ‘लष्कर दिन’ साजरा केला जातो. त्यावेळी के. एम. करिअप्पा यांना भारतीय लष्कराचे ‘कमांडर-इन-चीफ’ बनविण्यात आले होते आणि ते पहिले प्रजासत्ताक भारताचे प्रथम लष्कर प्रमुख बनले.


दिल्लीच्या त्रिमूर्ती चौकाला इस्रायली शहर ‘हैफा’ चे नाव दिले
दिल्लीच्या त्रिमूर्ती चौकाचे नामांतर करून त्याचे ‘त्रिमूर्ती हैफा चौक’ असे नाव ठेवले गेले आहे.

भारत आणि इस्रायल यांमधील संबंधांना मजबूत बनविण्याच्या दिशेने इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत भेटीवर आले आहेत. त्यावेळी हैफाच्या स्वातंत्र्य चळवळीत वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ हे नामंतरण करण्यात आले



सशस्त्र दल जेष्ठांचा दिवस १४ जानेवारी
१४ जानेवारी हा दिवस भारतात सशस्त्र दल जेष्ठांचा दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी कर्तव्य बजावताना आपल्या जीवाचे बलिदान देणार्‍यांना श्रद्धांजली दिली जाते. 

भारतीय लष्कर २०१८ हे वर्ष ‘कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकाचे वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे.

देशाच्या भारतीय लष्कर, नौदल आणि वायूदल या तिन्ही संरक्षण सेवांचे कार्यकारी आणि जेष्ठ तसेच युद्धात अपंग झालेले सैनिक वीरांना श्रद्धांजली वाहतात. 

फील्ड मार्शल करीअप्पा एम. यांनी दिलेल्या सेवेच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. करीअप्पा भारतीय सशस्त्र दलाचे पहिले कमांडर होते, जे १४ जानेवारी १९५३ रोजी सेवानिवृत्त झाले. 



टी-20 च्या इतिहासात ऋषभ पंतचे सर्वाधिक वेगवान शतक
हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळलेल्या ‘सईद मुश्ताक अली टी-२० करंडक’ स्पर्धेच्या सामन्यात केवळ ३२ चेंडूत शतक झळकावून ऋषभ पंतने टी-२० च्या इतिहासात सर्वाधिक वेगवान शतक झळकावले. शिवाय पंतचे टी-२० क्रिकेटमधील हे प्रथम शतक आहे.

दिल्लीचा ऋषभ पंत हा भारतातला डावखुरा एक आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो.


ख्रिस गेल याच्या नावावर इंडियन प्रीमियर लीगमध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी ३० चेंडूत शतक झळकावण्याचा विक्रम आहे.