देबजानी घोष NASSCOM चे नवे अध्यक्ष 
इंटेल (दक्षिण एशिया) चे माजी व्यवस्थापकीय संचालक देबजानी घोष यांची राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM) चे अध्यक्ष (प्रेसिडेंट पदी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.


ही नियुक्ती आर. चंद्रशेखर यांच्या जागी करण्यात आली आहे. त्यांचा या पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. कॉरपोरेट भारतात देबजानी घोष या इंटेल इंडिया व MAIT (मॅनुफॅक्चर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी) यांच्या प्रथम स्त्री प्रमुख होत्या.

राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (National Association of Software and Services Companies -NASSCOM) हे भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) उद्योगाची व्यापार संघटना आहे. 

1988 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. NASSCOM ही एक जागतिक व्यापार संघटना आहे, ज्याचे जगभरात 2000 हून अधिक सदस्य आहेत. NASSCOM चे वर्तमान अध्यक्ष (चेअरमन) रमन रॉय हे आहेत.



चीनची ‘स्पेस लॅब’ कोसळली प्रशांत महासागरात 

सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.

या स्पेस लॅबने 1 एप्रिल रोजी सायंकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला अखेर ही लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळली. यापूर्वी ती लॅब ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कोठेही कोसळू शकते, अशी शक्‍यता चीनच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई व महाराष्ट्रात कोठेही ही लॅब कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 

‘तियांगोंग-1’ असे या अंतराळ स्थानकाचे नाव असून, त्याला चीनमध्ये ‘स्वर्गातील महाल’ असेही संबोधले जाते. हे अंतराळ स्थानक 1 एप्रिल रोजी दुपारी पृथ्वीच्या वातावरणापासून सुमारे 179 किलोमीटर अंतरावर होते. ‘तियांगोंग’ने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्याचे इंधन आणि अनेक भाग जळून खाक होतील. त्यामुळे अतिशय लहान अवशेष पृथ्वीवर कोसळले तरी त्यामुळे मोठे नुकसान होणार नाही.

तसेच, पृथ्वीवर कोसळल्यानंतर कुठलेही विषारी पदार्थ तयार होणार नाहीत, असे चिनी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या आधीच स्पष्ट केले होते. दोन वर्षांच्या नियोजित सेवेनंतर 2013 मध्ये या अंतराळ स्थानकाचा वापर थांबविण्यात आला होता.


नेल्सन मंडेला यांच्या पत्नी विनी यांचे निधन 
दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची पत्नी आणि वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यां विनी मंडेला (वय 81) यांचे 2 एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जोहान्सबर्गमधील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

नेल्सन मंडेला यांच्याशी विनी 1958 ते 1996 अशी 38 वर्षे विवाहबद्ध राहिल्या. नेल्सन मंडेला यांचे 2013 साली निधन झाले होते. दक्षिण आफ्रिकेतील वंशवादविरोधी लढय़ाचे नेतृत्व नेल्सन मंडेला यांनी केले असले तरी विनी-मडिकीझेला मंडेला यांचीही वंशवादविरोधी कार्यकर्ती म्हणून स्वतंत्र ओळख होती. 

पतीप्रमाणेच त्यांचीही उमेदीची बहुतांशी वर्षे कारावासात गेली. प्रत्यक्ष कारावास संपल्यानंतरही अनेक वर्षे त्या घरी स्थानबद्धतेत होत्या. नेल्सन मंडेला तुरुंगात असताना विनी यांनी त्यांचा लढा तेवत ठेवला होता.

विनी यांची नंतरची कारकीर्द मात्र अनेक आरोपांनी डागाळली गेली होती. मात्र वर्णभेदविरोधी लढय़ादरम्यान झालेल्या अत्याचारप्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. अपहरण आणि हल्ल्याच्या प्रकरणात 1991 साली त्या दोषी ठरल्याने त्यांना दंडही भरावा लागला होता. 

1997 साली त्यांच्यावर या प्रकरणात पुन्हा आरोप झाले. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या बहुवांशिक निवडणुकीत त्या संसदेत निवडून गेल्या. त्यानंतर त्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्या होत्या.



चीनने अमेरिकेकडून येणार्‍या 128 उत्पादनांवर 25% पर्यंत शुल्क वाढवला 

चीनने अमेरिकेकडून येणार्‍या 128 उत्पादनांवर 25% पर्यंत आयात शुल्क वाढवला आहे.

या मालामध्ये फळं आणि अन्य संबंधित 120 उत्पादनांवर 15% आणि डुक्कराचे मांस (पोर्क) आणि त्यासंबंधित अन्य 8 उत्पादनांवर 25% आयात शुल्क लागू करण्यात आला आहे.

अमेरिकेने अलीकडेच देशात आयात केल्या जाणार्‍या पोलाद (25%) व अॅल्यूमिनियम (15%) यासारख्या काही मुख्य वस्तूंवर अतिरिक्त आयात शुल्क लादला. या निर्णयाने चीनला सर्वाधिक फटका बसला. या नुकसानीला भरून काढण्याकरिता चीनने देखील तसेच केले.



हाफीज सईदचे ‘मिल्ली मुस्लिम लीग’ अमेरिकेच्या दहशतवादी यादीत समाविष्ट 

हाफीज सईदच्या ‘मिल्ली मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाला अमेरिकेनी विदेशी दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे.

अमेरिकेच्या दहशतवादी यादीत हे नाव समाविष्ट करत पाकिस्तानमधील सईदच्या राजकीय पक्षाला दहशतवादी गट म्हणून घोषित केले. शिवाय तहरीक-ए-आझादी-ए कश्मीर (TAJK) या गटाला देखील सामील करण्यात आले आहे.