०१. सेरेना विलियम्स हिने तिच्या कारकिर्दीतील २०वे ग्रैंडस्लैम चषक जिंकले. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात लुसी साफारोवा हिला हरवून तिने हे चषक जिंकले. या वीस चषकात ३ फ्रेंच ओपन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन, ५ विम्बल्डन आणि ६ यु.एस. ओपन या चषकाचा समावेश आहे. 


०२. भारत-बांगलादेश दरम्यान गेली ४१ वर्षे सुरू असलेला जमीन सीमा वाद शनिवारी अखेर ऐतिहासिक करारानंतर संपुष्टात आला. या करारामुळे दोन्ही देश एकूण १६१ भूभाग एकमेकांना हस्तांतरित करणार असून, त्याबाबतच्या कराराची कागदपत्रे दोन्ही देशांनी एकमेकांना दिली. या करारास संसदेने गेल्याच महिन्यात मंजुरी दिली होती. 


०३. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही देशांनी एकमेकांना कागदपत्रे हस्तांतरित केली असून १९७४ च्या भारत-बांगलादेश कराराची अंमलबजावणी आता सुरू होत आहे.


०४. सीमावाद संपविण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांनी हा करार केला होता. या करारानुसार बांगलादेश भारताला ५१ वसाहती हस्तांतरित करणार आहे तर भारत बांगलादेशला १११ वसाहती हस्तांतरित करणार आहे. भारत बांगलादेशला १० हजार एकर जमीन देणार आहे तर भारताला ५०० एकर जमीन मिळणार आहे.


०५. भारत व बांगलादेश दरम्यान ४०९६ कि.मी.ची सीमा असून, तेथून दहशतवाद्यांना बांगलादेशात जाण्यास मदत मिळत असते. त्याला या करारामुळे आळा बसणार आहे. तसेच सुमारे ५० हजार रहिवाशांच्या नागरिकत्वाचा प्रश्नही सुटणार आहे.


०६. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स पॉवर कंपनीने तेथे मोठा वीज प्रकल्प व द्रव नैसर्गिक वायू आयात टर्मिनल उभारण्यासाठी ३ अब्ज अमेरिका डॉलर्सच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे बांगलादेशातील विजेची कमतरता काही प्रमाणात दूर होणार आहे.


०७. बांगलादेशला दोन अब्ज डॉलरचे कर्जही भारतातर्फे मंजूर करण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या दोन दिवसांच्या दौर्यावर सुमारे ८०० वर्षांचा इतिहास असलेल्या ढाकेश्वरी देवी मंदिरात जाऊन पूजा केली. 


०८. जपान आणि चीननंतर बांगलादेशात विशेष आर्थिक क्षेत्र(सेज) विकसित करण्यास रस दाखवणारा भारत हा तिसरा देश ठरला आहे.  बांगलादेशने सामंजस्य कराराअंतर्गत बांगलादेशमधील मोंगला आणि भेरमरा येथे भारतीय कंपन्यांसाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्याचे ठरवले आहे.

०९. भारत मोंगला येथे विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करणार आहे. पबन चौधरी हे बांगलादेश आर्थिक क्षेत्राचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. भारताला मोंगला येथे २०० एकर आणि भेरमरा येथे ४७७ एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्याअंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) बांगलादेशात विमा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे.१०. आरती अग्रवाल या वयाच्या ३१ व्या वर्षी  तेलुगू अभिनेत्रीचे अमेरिकेतील न्यू जर्सी इथल्या हॉस्पिटलमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आरती लठ्ठपणामुळे त्रस्त होती आणि तिला आतड्यांचा आजार होता.त्यावरच उपचार सुरू होते.मात्र अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला. 


११. बॉलीवूड मध्ये पागलपन या चित्रपटातून प्रवेश केला होता. महिनाभरापूर्वी लिपोसक्शन सर्जरीमुळे तिला श्वापसोच्छवास घेण्या्स अडथळा येत होता. आरतीनं २००१मध्ये तेलुगू चित्रपट ‘नुव्वु नाकु नचव’पासून अभिनयाला सुरूवात केली होती आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. तिनं ‘नुव्वु लेका नेनु लेनु’, ‘इंद्रा’ आणि ‘वसंतम’ या चित्रपटांमध्ये काम केलं. 


१२. २००५ मध्ये सहकलाकार तरुण सोबत असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये कटुता निर्माण झाल्यानं तिनं आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. आरतीनं जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केलं. तिचा अखेरचा चित्रपट ‘रनम-२’ हा ठरला.


१३. इटलीच्या युव्हेंट्‌स क्लबचा ३-१ असा सहज पराभव करत स्पेनच्या बार्सिलोना क्लबने पाचव्यांदा यूएफा चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. बर्लिनमधील ऑलिंपिक स्टेडियमवर अंतिम सामना झाला. गेल्या सहा वर्षांत तिसऱ्यांदा बार्सिलोनाने हे विजेतेपद पटकाविले आहे. बार्सिलोनाने “ला लिगा‘ आणि कोपा डेल रेय असे देशातील अव्वल साखळी आणि करंडक जिंकले आहेत. आता चॅंपियन्स लीगचे विजेतेपद मिळवून त्यांनी तिहेरी मुकुट मिळविला आहे.


१४. ‘नेस्ले’ या बहुराष्ट्रीय कंपनीची स्थापना स्वित्झर्लंडमधील वेवे शहरात १८६६ मध्ये झाली. लहान मुलांसाठीचे पॅकबंद अन्नपदार्थ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पशू आहार, आइस्क्रीम आणि कॉफी इत्यादींचे उत्पादन या कंपनीद्वारे केले जाते. तब्बल ३,३९,००० कर्मचारी असलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल २४७ अब्ज डॉलरची आहे. १९४ देशामध्ये नेस्लेच्या शाखा आहेत. 

१५. १९१२ मध्ये नेस्लेचा भारताशी प्रथम संबंध आला. पंजाबमधील मोगा येथे १९६१ मध्ये ‘नेस्ले’चा पहिला कारखाना सुरू झाला. त्यातून पंजाबमधील शेतकऱ्यांना डेअरी उद्योगांसाठी मार्गदर्शन करणे, प्रशिक्षण आणि भांडवल उपलब्ध करून देण्यास सुरवात केली. आज हे गाव डेअरी उत्पादनांमध्ये अग्रस्थानी आहे.

१६. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवालानुसार देशातील साठ शहरांमध्ये यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. देशभरात रोज १ लाख ४३ हजार ४४९ टन कचरा तयार होतो; पण त्यापैकी केवळ ३२ हजार ८७१ टन कचर्यावरच प्रक्रिया होत असल्याचे दिसून आले आहे.

१७. अहमदाबादमध्ये रोज २०४१.६२ मेट्रिक टन एवढा प्लॅस्टिक कचरा तयार होतो. हैदराबादमध्ये हेच प्रमाण १९४.४  मेट्रिक टन, बंगळूरमध्ये १४४.२१ टन, रानपूरमध्ये १०६.६६ टन, फरिदाबादमध्ये ८१.५५ टन आणि पुण्यामध्ये १०३.६२ टन एवढा कचरा तयार होतो. 

१८. देशातील मेट्रो शहरांचा विचार करता दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजे ६८८.८४ मेट्रिक टन, चेन्नईमध्ये ६२९.३ टन, कोलकत्यामध्ये ९४.८ टन आणि मुंबईमध्ये ३३.७ टन एवढा कचरा तयार होतो. गुजरातमधील सुरत हे एकटे शहर रोज १४९.६२ टन एवढ्या प्रचंड प्लॅस्टिक कचर्याची निर्मिती करते.

१९. आंध्र प्रदेशच्या नियोजित राजधानीचे ठिकाण असलेल्या अमरावती शहराचे भूमिपूजन मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू व त्यांच्या पत्नी भुवनेश्वहरी यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक दर्जाच्या या नियोजित अमरावती राजधानीचे भूमिपूजन तुल्लूर या गावात पारंपरिक पद्धतीने झाले. सिंगापूरमधील “जुरोंग अँड सुरबाना‘ या कंपनीने नव्या राजधानीचा आराखडा तयार केला आहे. 

२०. अखंड आंध्र प्रदेशचे एका वर्षापूर्वी विभाजन होऊन तेलंगण या वेगळ्या राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर आंध्र प्रदेशला नवी राजधानी करणे आवश्यभक ठरले होते. राजधानीसाठी ३३,००० एकर क्षेत्रफळ राखून ठेवले आहे. तसेच आंध्रला ३०,००० कोटी रुपये केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे.  सध्या केंद्र सरकारकडून ५०० कोटी रुपये मदत मिळालेली आहे. 

२१.  राज्य सरकारकडून वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रभात रंजन यांची नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या राजीनाम्यामुळे हे पद रिक्त होते. आता या पदावर १९८४ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी प्रभात रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रंजन हे सध्या कुलाबा येथील राज्य पोलिस मुख्यालयात प्रशासकीय विभागात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून काम पाहत होते. रंजन हे ३० ऑगस्ट २०१७ मध्ये निवृत्त होणार आहेत.

२२. मुंबईतील किनारपट्टीला लागून रस्ते बांधणी प्रकल्पाला (कोस्टल रोड) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ०८ जून २०१५ रोजी मंजुरी दिली. या प्रकरणी १५ जूनला ड्राफ्ट नोटीफिकेशन करण्यात येणार असून, १५ ऑगस्टपर्यंत अंतिम नोटिफिकेशन करण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत ९१ हेक्टर जमीन ग्रीन स्पेस करणार आहे. 

२३. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्बियाच्या अव्वल


मानांकित नोव्हाक जोकोविचचा ४-६, ६-४, ६-३, ६-४ असा पराभव करत 
स्वित्झर्लंडच्या स्टॅनिस्लास वाव्रिंकाने (स्टॅन वाव्रिंका) विजेतेपद मिळवले असून त्याचे प्रशिक्षक मॅग्नस नॉर्मन हे आहेत. 


२४. आयआयटी मद्रासने आंबेडकर-पेरियार अभ्यासगटावर घातलेली बंदी मागे घेतली. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर या अभ्यासगटाची मान्यता काढून घेण्यात आली होती.

२५. “इसिस‘ या दहशतवादी संघटनेचे इंग्रजी भाषेतील नियतकालिक “दबिक” हे आहे.