०१. भारतीय टपाल खात्याने नुकताच सीएमएस इन्फोसिस्टम्स  कंपनीसोबत ३० कोटींचा करार केला असून त्यामुळे पोस्ट खात्याला १.५ कोटी रूपे डेबिट कार्ड तयार करून देण्यात येणार आहेत. सीएमएस इन्फोसिस्टम्स ही कॅश मॅनेजमेंट व पेमेंट सोलुशन्स सिस्टम आहे.


०२. भारतीय टपाल खात्याने येत्या दोन महिन्यात ५ लाख डेबिट कार्डचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.आतापर्यंत टपाल खात्याकडून १०.००० डेबिट कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. भारतीय टपाल खात्याच्या २,६०० शाखांमध्ये कोअर बँकिंग प्रणालीचा(सीबीएस) अवलंब करण्यात आला आहे. 


०३. भारतीय टपाल खात्याचा १,००० अतिरिक्त एटीएम केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. देशभरात टपाल खात्याच्या २५,००० शाखा आहेत व कोअर बँकिंग आणि नॉन-कोअर बँकिंग सेवा मिळून एकूण ३४ कोटी खातेधारक आहेत.


०४. आपत्कालीन वेळेत रेल्वे थांबविण्यासाठी वापरण्यात येणारी “चेन सिस्टीम‘ आता बंद होणार असून याऐवजी आता डोअर बेल सिस्टीम  लागू करण्यात येणार आहे. विनाकरण चेन ओढण्याच्या घटनांमुळे वर्षाला रेल्वेचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 

०५. चीनने नुकतेच डब्ल्यू-१४ या स्वप्नातीत अण्वस्त्र वाहकाची यशस्वी चाचणी केली आहे. डब्ल्यू-१४ हे अण्वस्त्र वाहक आवाजाच्या दहापट वेगाने प्रवास करू शकते, त्याचा वेग प्रतितास ७ हजार ६८० मैल एवढा आहे. 


०६. खरीप हंगामातील हवामानावर आधारित “पीकविमा योजना‘ या वर्षी १२ जिल्ह्यांत आणि सात पिकांसाठी राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची असून,बिगर कर्जदार शेतकऱ्यांनाही यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी ३० जून २०१५ ही अंतिम तारीख असल्याचे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले. 


०७. या योजनेत भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापसाचा समावेश आहे. प्रत्येक पीकनिहाय हेक्टीरी विमा संरक्षित रक्कम निश्चित केलेली आहे. त्या विमा हप्त्यामध्ये ५० टक्के अनुदान केंद्र व राज्य सरकारमार्फत देण्यात येत असून, उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी बॅंकेत भरून योजनेत सहभागी व्हायचे आहे. 


०८. योजनेसाठी कोकण विभागातून ठाणे व रायगड, नाशिक विभागातून जळगाव व अहमदनगर, पुणे विभागातून सातारा व सांगली, औरंगाबाद विभागातून लातूर व नांदेड, अमरावती विभागातून अमरावती व यवतमाळ तर नागपूर विभागातून नागपूर व वर्धा या जिल्ह्यांना निवडण्यात आले आहे. 


०९. रोसेटा या अवकाशयानातून धूमकेतूवर उतरणारे फिले  यान सात महिन्यांच्या निद्रेनंतर (हायबर्नेशन) जागृत झाले आहे. त्याचा पृथ्वीवरील केंद्राशी एका मिनिटासाठी संपर्क झाल्याचे युरोपीय अवकाश संस्थेने म्हटले आहे. धूमकेतूवर उतरणारे हे पहिलेच यान असून, ते उतरताच त्याने प्रयोगांना सुरवात केली होती. यामध्ये त्याने साठ तास पृथ्वीवर माहिती पाठविली. नंतर त्याची बॅटरी संपल्याने तो निद्रिस्त झाला होता. 


१०. पृथ्वीवर होणाऱ्या भूकंपाप्रमाणेच चंद्रावरही भूस्तरीय हालचालींमुळे भूकंप होत असल्याचे एका अभ्यासाअंती दिसून आले आहे. चांद्रयान-१ या यानाने घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला असता, चंद्राच्या पृष्ठभागाखाली पृथ्वीप्रमाणेच स्तरांची रचना असून, ते एकमेकांवर आदळून भूकंप होत असल्याचे विश्लेाषण करण्यात आले आहे. 


११. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील भूशास्त्राचे प्राध्यापक सौमित्र मुखर्जी आणि त्यांची विद्यार्थिनी प्रियदर्शिनी सिंह यांनी चांद्रयानावरील नॅरो अँगल कॅमेराद्वारे घेतल्या गेलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केला. चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीप्रमाणेच भूकंप होत असल्याचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील छायाचित्रांच्या माहितीवरून त्यांना लक्षात आले. 


१३. पृथ्वीच्या केंद्रावरील स्तरात हालचाली झाल्याने भूकंप होतात आणि चंद्रावर झालेल्या भूकंपाचा अभ्यास केला असता त्यासाठीही हाच प्रकार कारणीभूत असल्याचे लक्षात आले. यावरून चंद्रालाही केंद्र असून त्याची अंतर्गत रचनाही पृथ्वीप्रमाणेच असण्याची शक्यलता असून, दोन भूकंपाची तुलना करणेही शक्य आहे.


१४. पृथ्वीवरील भूकंपाचा अचूक अंदाज वर्तविणे सध्या शक्य नाही. त्यामुळे चंद्रावरील भूकंपाचा अभ्यास करून आणि त्याची पृथ्वीवरील भूकंपांशी तुलना करून हा अंदाज वर्तविणे शक्य् होऊ शकते. हा अभ्यास करण्याकरिता प्रा. मुखर्जी आणि त्यांच्या विद्यार्थिनीला अहमदाबाद येथील स्पेस ऍप्लिकेशन सेंटरचे सहकार्य मिळाले.

१५. शेजारील देशांतून भारतात आलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देण्याच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या धोरणाचा पहिला टप्पा पार पडला असून यामध्ये गेल्या एका वर्षात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या सुमारे ४३०० हिंदू आणि शीख नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. 


१६. सध्या भारतात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील एकूण दोन लाख हिंदू आणि शीख भारतात राहत आहेत. सध्या सुमारे १९ हजार निर्वासितांना मध्य प्रदेशात, ११ हजार निर्वासितांना राजस्थानात आणि ४ हजार निर्वासितांना गुजरातमध्ये दीर्घकालीन व्हिसा देण्यात आला आहे. 


१७. सेव्ह द चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय संस्थेवर सुरू असलेली कारवाई थांबविण्याचे आदेश पाकिस्तानच्या गृह खात्याने दिले आहेत.  देशविरोधी प्रकल्प राबवत असल्याच्या आरोपावरून मागील काही दिवसांपासून या संस्थेवर कारवाई करत त्यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले होते.


१८. माजी केंद्रीय मंत्री आणि हिमाचल प्रदेशच्या माजी राज्यपाल असलेल्या शीला कौल यांचे वयाच्या १०१व्या वर्षी निधन झाले आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या त्या मेहुणी असून, सर्वांत ज्येष्ठ माजी संसद सदस्या होत्या. पाच वेळा खासदार राहिलेल्या कौल यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९१५ मध्ये झाला होता.
१९. आयसीसीचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांची तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा १३ व्यांदा  निवड झाली आहे. २००२मध्ये ते पहिल्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यांचा कार्यकाल एक वर्षांचा असेल.


२०. चेन्नई येथे झालेल्या ८५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्रीनिवासन यांची अध्यक्षपदी निवड कऱण्यात आली.  सचिव काशी विश्ववनाथन यांचीही पुन्हा निवड करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्ष म्हणून व्ही.पी. नरसिंह यांची निवड झाली आहे.


२१. जगातील सर्वाधिक तेल उत्पादन करणारा देश सौदी अरेबियाला मागे टाकत अमेरिका प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. ब्रिटिश पेट्रोलियमने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने केलेल्या तेल संशोधनामुळे त्याला हे स्थान मिळाले आहे. अमेरिकेने २०१४ मध्ये प्रति दिवशी ११.६ दशलक्ष तेल पिंप उत्पादन काढले तर सौदीने ११.५ दशलक्ष पिंप तेल उत्पादन काढले. रोज १०.८ दशलक्ष पिंप उत्पादन करून रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे.


२२. जगातील तेल वापराचे प्रमाण २०१४ मध्ये केवळ ०.९ टक्क्याने वाढले. तर भारताचे ऊर्जा वापराचे प्रमाण ७.१ टक्क्याने वाढत आहे.  भारताला रोज ४.३ दशलक्ष पिंप तेल लागते. तेलाच्या वापरात भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. अमेरिका (१७.७९ दशलक्ष टन), चीन (१४.९ दशलक्ष टन), रशिया (६.३ दशलक्ष टन) तेल रोज वापरतो.


२३. दलित वस्ती सुधार योजनेतील कामांच्या मंजुरीचे व त्यासाठीच्या निधी वितरणाचे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांना असलेले अधिकार राज्य सरकारने काढून घेतले असून हे सर्व अधिकार आता जि.प.च्या सर्वसाधारण सभेकडे सोपवण्यात आले आहेत. 


२४. यासाठी असलेली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांची समितीही रद्द करण्यात आली आहे. सन २०११ पासून हे अधिकार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे देण्यात आले होते. या समितीत समाजकल्याण समिती सभापती सहअध्यक्ष होते. तर इतर सदस्य सर्व अधिकारी होते.


२५. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जानेवारी २०१२ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांची समिती रद्द करुन दलित वस्तीची कामे जि.प.मार्फत करण्याचा आदेश सामाजिक न्याय विभागाने काढला आहे.