०१. पृथ्वीपासून आठ हजार प्रकाशवर्षे दूर असलेले व्ही ४०४ सिग्नी हे महाकाय कृष्णविवर तब्बल २६वर्षांनंतर जागृतावस्थेत आले आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था “नासा‘ आणि युरोपीय अवकाश संस्थेने अवकाशात एका दुर्मिळ हालचालींची छायाचित्रे टिपली. 


०२. त्याबाबत अभ्यास केला असता एका अज्ञात स्त्रोतातून क्ष किरणे आणि गामा किरणे बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. अधिक जवळून शोध घेतला असता ही किरणे गेली अनेक वर्षे निद्रिस्त असलेल्या व्ही ४०४ सिग्नी या कृष्णविवरामधून बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले. 

०३. शोषून घेण्यासाठी कृष्णविवराच्या आजूबाजूस तारे नसल्यास ते निद्रिस्तस्थितीत जात असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या कृष्णविवराने त्याच्या भोवती फिरणारा तारा गिळंकृत केल्यानेच त्यामधून अचानक क्ष आणि गामा किरणे बाहेर आली. 

०४. हे कृष्णविवर जागृत झाल्याने ते ज्ञात अवकाशातील प्रकाशाचा सर्वांत मोठा स्रोत ठरले आहे. याआधी तेजोमेघ (क्रॅब नेब्युला) हा प्रकाशाचा मोठा स्रोत मानला जात होता. हे कृष्णविवर या आधी तीन वेळा निद्रिस्त होऊन जागृत झाल्याची नोंद आहे.१९३८,१९५६ आणि १९८९ मध्ये ते जागृत झाले होते. 

०५. आयपीएलच्या सहाव्या मोसमात घडलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी २५ जुलैपर्यंत  लांबणीवर टाकण्यात आली आहे. पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

०६. आयपीएलच्या सहाव्या मोसमात म्हणजे २०१३ च्या आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण घडले होते. या प्रकरणातील ४२ आरोपींमध्ये निलंबित क्रिकेटर एस. श्रीसंत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यासह अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, त्याचा सहकारी छोटा शकील यांचा समावेश आहे. 

०७.  स्वीडनमधील टेलिकॉम उपकरणे तयार करणारी कंपनी ‘इरिक्सन‘च्या अहवालानुसार भारतीयांचा ४७% वेळ हा स्मार्टफोनवरील कम्युनिकेशन अॅप्सवर जातो. अहवालानुसार भारतीय लोक आपल्या वेळेच्या ४७% वेळ स्मार्टफोन्सवर ‘व्हॉइस‘, ‘इन्स्टंट मेसेजिंग‘, ‘व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल‘(स्काइप), ‘इ-मेल्स‘ व ‘सोशल नेटवर्किंग साईट्स‘चा वापर करण्यात घालवतात.

०८. या संशोधनात विविध देशातील लोकांच्या मेसेजिंग व सोशल मिडीया अॅप्सच्या वापराचा अभ्यास केला आहे. त्यासाठी भारत, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन व अमेरिकेतील अँड्रॉइड वापरकर्त्यांचे नमुने वापरण्यात आले होते. भारतात ७,५०० अँड्राइड वापरकर्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. 

०९. कंपनीच्या संशोधनानुसार अमेरिका, ब्रिटन आणि भारतातील लोक स्मार्टफोन्सवर ३०% पेक्षा जास्त वेळ कम्युनिकेशन अॅप्ससाठी वापरतात. स्मार्टफोन्सवरील एकूण डेटाच्या वापरापैकी ब्रॉडबँड इंटरनेटचा ४०-५०% वापर कम्युनिकेशन अॅप्ससाठी तर केवळ २०% व्हिडिओसाठी केला जातो.

१०. मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाची (व्यापम) प्रवेश आणि भरतीप्रक्रिया गैरव्यवहार प्रकरणातील आणखी दोन आरोपींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील २५  आरोपींचा  संशयास्पद मृत्यू झाला आहे. 

११. मध्य प्रदेशातील सर्वांत मोठ्या गैरव्यवहारांपैकी एक असलेल्या व्यापम प्रकरणात आरोपींचे संशयास्पद मृत्यू होत असल्याने याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. या प्रकरणात आरोपी असलेले डॉ. नरेंद्रसिंह तोमर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच जामीनावर बाहेर असलेले डॉ. राजेंद्र आर्या यांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाल्याने गैरव्यवहाराकडे लक्ष वेधले गेले आहे.

१२. भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विेनी पोनप्पा या महिला जोडीने

नुकतेच कॅनडा ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धा  स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. ज्वाला व अश्विनीने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत नेदरलॅंड्‌सच्या इफे मुस्केन्स आणि सेलेना पिएक या जोडीचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला.लंडनमध्ये २०१२ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेनंतर ज्वाला व अश्विनीने मिळविलेले हे पहिले विजेतेपद आहे.


१३. जगातील नामांकित उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आठ दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचाही समावेश असलेल्या शिष्टमंडळासोबत ते परकीय गुंतवणुकीसाठी अनेक करार करणार आहेत. 

१४. या दौऱ्यात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, उद्योग सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांचाही समावेश आहे. आठ दिवसांच्या या दौऱ्यात अनेक भेटीगाठी, सामंजस्य करार होणार आहेत. यासोबतच मुख्यमंत्री बृहन्मुंबई महाराष्ट्र संघाच्या कार्यक्रमालाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

१५. “इट्‌स रेनिंग ब्लॅक! क्रॉनिकल्स ऑफ ब्लॅक मनी, टॅक्सा हेवन अँड पॉलिसी रिस्पॉन्स‘ या पुस्तकाचे लेखक पत्रकार शैलेंद्र कुमार (टॅक्सयइंडियाऑनलाइन या संकेतस्थळाचे संस्थापक) आहेत. 

१६. माणसाळलेल्या हत्तींच्या आरोग्याची काळजी घेणारे देशातील पहिले रुग्णालय लवकरच केरळ राज्यात सुरू होणार आहे.हत्तींसाठीच्या या प्रस्तावित रुग्णालयात पाय कुजणे आणि इतर गंभीर आजार झालेल्या दहा हत्तींवर एकाच वेळी उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पशू डॉक्टरांना हत्तीच्या रोगाचे निदान होण्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळाही निर्माण करण्याची योजना आहे. 

१७. या रुग्णालयातर्फे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना हत्तीवरील उपाचार, सुटका मोहीम आणि शवविच्छेदनाचे शिक्षण दिले जाईल. पाळीव हत्तींना भेडसावणाऱ्या आरोग्य समस्यांवरही संशोधन करण्याचे ठरविण्यात आले आहे.रुग्णालयासाठी केरळ पशू विज्ञान विद्यापीठातील पाच एकर जागा निश्चि्त करण्यात आली आहे. रुग्णालय उभारणीसाठी दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

१८. जागतिक शांतता सूची २०१५(ग्लोबल पीस इंडेक्स) च्या यादीत भारताला १४३ वे स्थान मिळाले आहे. अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या उत्तर अटलांटिक समुद्रातील आइसलॅंड या देशाने जागतिक शांतता सूचीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.हिंसेचे प्रमाण, संघर्ष आणि सैन्यदलांचा वापर आदी मुद्‌द्‌यांवर प्रत्येक देशाला गुण देण्यात आले आहेत. 

१९. ज्या देशाला सर्वाधिक गुण मिळाले आहेत, तो देश सर्वांत कमी शांतता असलेला देश असे सूत्र ठरविण्यात आले आहे. त्यानुसार २,५०४ गुण मिळाल्यामुळे भारत १४३व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. या यादीतील पहिल्या दहा देशांमध्ये युरोपातील सहा देश असून, डेन्मार्क दुसऱ्या, तर ऑस्ट्रिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान १५४व्या क्रमांकावर असून, अफगाणिस्तान १६०व्या क्रमांकावर आहे.  


२०. अमेरिकेच्या अवकाश कंपनीने अवकाशात सोडलेले स्पेसएक्सह फाल्कन-९ हे मानवरहित रॉकेट प्रक्षेपणानंतर काही मिनिटांतच कोसळले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला साहित्याचा पुरवठा करण्यासाठी रॉकेटने फ्लोरिडा येथून उड्डाण केले होते. केटचे प्रक्षेपण कॅलिफोर्नियामधील एका खासगी कंपनीने केले होते. 

२१. या कंपनीने आधी केलेली सर्व उड्डाणे यशस्वी झाली होती. स्पेसएक्स  रॉकेटने उड्डाण केल्यानंतर दोन मिनीट एकोणवीस सेकंदानंतर त्याचे तुकडे होऊन ते पुन्हा पृथ्वीच्या दिशेने कोसळले.अवकाश स्थानकात पोचविण्यासाठी या रॉकेटमध्ये चार हजार टन वजनाचे सामान होते.

२२. इराणच्या वादग्रस्त आण्विक कार्यक्रमावरुन सध्या इराण व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि जर्मनी(पी ५+१ ग्रुप) या सहा महत्त्वपूर्ण देशांमध्ये सुरु असलेल्या राजनैतिक चर्चेच्या अंतिम टप्प्यास  २८ जून रोजी व्हिएन्ना येथे प्रारंभ झाला. या गटाचा उल्लेख बहुतेक वेळा E3+3 (or E3/EU+3) असाही केला जातो.

२३. आणीबाणी लागू होण्यासाठी संसदेतील दोनतृतीयांश सदस्यांनी महिन्यात मान्यता द्यावी लागते म्हणजेच लोकसभेत ३६२ आणि राज्यसभेत १६३ खासदारांनी आणीबाणीला एका महिन्यात पाठिंबा द्यायला हवा. 

२४. जनता पार्टी स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून एस. एम. जोशी, तर मुंबईचे अध्यक्ष आमदार प्रा. ग. भा. तथा बाळासाहेब कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

२५. ऑगस्टमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे श्रीलंकेचा कुमार संगकाराने घोषित केले आहे.