* वेगळा रेल्वे अर्थसंकल्प बंद

०१. देशाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या रेल्वेचा अर्थसंकल्प आता इतिहासजमा होणार आहे. ९२ वर्षांची ही परंपरा २०१७ पासून खंडित होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा रेल्वे अर्थसंकल्प सामान्य अर्थसंकल्पात विलीन करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्वीकारल्यामुळे पुढील आर्थिक वर्षांपासून रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार नाही.०२. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अर्थसंकल्प विलीन करण्याच्या प्रक्रियेवर अर्थमंत्रालयाने पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीला आपला अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

०३. केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी मंगळवारी राज्यसभेत रेल्वे अर्थसंकल्प विलीनीकरण करण्यासाठी अर्थमंत्र्यांना विनंती केली होती. देशाच्या विकासासाठी हे अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

०४. रेल्वेला अनुदानावर ३२ हजार कोटी रुपयाच्या वार्षिक खर्चासह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यामुळे जवळपास ४० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. तसेच यासह अतिरिक्त प्रकल्पांच्या विलंबामुळे ते पूर्ण करण्यासाठी १.०७ लाख कोटी रुपयांची गरज आहे. तसेच ४४२ रेल्वे प्रकल्पांसाठी पुढील काम करण्यासाठी १.८६ लाख कोटी रुपयांची गरज आहे. जर विलीनीकरण झाले तर भारतीय रेल्वेला वार्षिक लाभांश देण्यापासून मुक्ती मिळणार आहे.

०५. जवळपास शंभर वर्षांची जुनी परंपरा संपविण्याचा निर्णय हा मोदी सरकारच्या सुधारणेतील एक महत्त्वपूर्ण अजेंडा असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. विलीनीकरणानंतर प्रवासी भाडय़ामध्ये वाढ करण्यासह अनेक निर्णय यापुढे केंद्रीय अर्थमंत्र्यांना घ्यावे लागणार आहेत.* बोल्टची सुवर्णपदकात हॅट्ट्रिक 
०१. जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याने रिओ ऑलिम्पिकमधील १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले आहे. या सुवर्णपदकासह बोल्टने ऑलिम्पिक सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली आहे. 

०२. बोल्टने ही शर्यत ९.८१ सेकंदात पूर्ण केली. या शर्यतीत बोल्टपुढे अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिन याचे तगडे आव्हान होते. जस्टिन गॅटलीनने ९.८९ सेकंदांसह रौप्य आणि आंद्रे दी ग्रेसने ब्राँझपदक मिळविले. गॅटलिनने २००४ मध्ये शंभर मीटर शर्यतीत ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले होते


०३. तंत्रशुद्ध, उत्तेजकविरहित धावपटू म्हणून बोल्टची साऱ्या जगात महान खेळाडू म्हणून ओळख आहे. त्या तुलनेत गॅटलिन हा अनेक वेळा उत्तेजकाच्या आरोपांमुळे बंदीच्या कारवाईस सामोरे गेलेला खेळाडू अशीच त्याची प्रतिमा झाली आहे. 
एक वर्षांपूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बोल्टने गॅटलिनवर मात केली होती.* मायकेल फेल्प्सची निवृत्ती

०१. फेल्प्सने शेवटच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या शेवटच्या अर्थात ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. ऑलिम्पिक कारकीर्दीतील फेल्प्सचे हे २३वे सुवर्णपदक तर एकूण २८वे पदक (२३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य) आहे. रिओ २०१६ मध्ये हे मायकल फेल्प्सचे पाचवे सुवर्णपदक आहे. 

०२. नॅथन अ‍ॅड्रियन, रायन मर्फी, कोडी मिलर आणि फेल्प्स या अमेरिकेच्या चौकडीने ३ मिनिटे आणि २७.९५ सेकंदांत शर्यत पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. इंग्लंडच्या संघाने ३ मिनिटे आणि २९.२४ सेकंदांत शर्यत पूर्ण करत रौप्य तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३ मिनिटे आणि २९.९३ सेकंदात शर्यत पूर्ण करत कांस्यपदक मिळवले.

०३. कारकीर्दीतील शेवटच्या शर्यतीच्या वेळी फेल्प्सची साथीदार निकोल जॉन्सन आणि त्यांचा तीन महिन्यांचा मुलगा बूमर उपस्थित होते. घरच्यांच्या बरोबरीने अमेरिकेचा महिला जलतरण संघही या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता.* पहिला हॅकिंगविरोधी उपग्रह चीनचा
०१. चीनने जगातील पहिला पुंज संदेशवहन उपग्रह (क्वांटम कम्युनिकेशन सॅटेलाईट) पाठवण्याचे ठरवले असून त्यामुळे वायर टॅपिंग व कॉल चोरून ऐकणे असे प्रकार करता येणार नाहीत. त्याच्या मार्फत होणाऱ्या संदेशवहनातील माहिती हॅकिंगपासून सुरक्षित राहणार आहे. 

०२. जर उपग्रहाने चांगले काम केले तर हॅकिंगमुक्त संदेशवहन प्रणाली उपलब्ध होईल, असे शिनहुआ या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हा उपग्रह काही दिवसांत सोडला जाणार आहे.

०३. चीन विज्ञान अकादमी व शांघायची इंटरनेट कंपनी अलिबाबा यांनी मिळून जुलै २०१५ मध्ये क्वांटम कॉम्प्युटिंग प्रयोगशाळा तयार केली आहे.

०४. ही प्रयोगशाळा क्वांटम संगणकाचे प्रारूप तयार करीत असून त्याची गणन क्षमता ५० ते १०० क्वांटम बीट असेल. तो संगणक २०३० पर्यंत तयार होईल. 

०५. गतिमान गणनातही धोका असतो कारण पारंपरिक संगणकातील सर्व माहिती त्यामुळे चोरता येते, पण पुंज यांत्रिकीमध्ये माहितीचे संरक्षण केले जाते, त्यात फोटॉन कणांमध्ये माहिती साठवलेली असते त्यामुळे ती वेगळी काढता येत नाही किंवा त्याची नक्कलही करता येत नाही. त्यामुळे वायरटॅप किंवा माहितीची चोरी हे दोन्ही प्रकार यात शक्य नसतात.

०६. उलट यात दोन संदेशवहन उपयोगकर्त्यांमध्ये जर संवाद चालू असेल व तिसरे कुणी माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते लगेच समजते. जी माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो ती संबंधितांना मिळतच नाही ती स्वनाश पावते.

०७. चीन असा जगातील पहिला सुरक्षित संदेशवहन उपग्रह तयार करीत असून तो यावर्षांतच पाठवला जाईल. बीजिंग-शांघाय नेटवर्क त्याचे काम करीत आहे असे चीन विज्ञान अकादमीचे पॅन जियानवे यांनी सांगितले. ते या क्वांटम संदेशवहन उपग्रह प्रकल्पाचे प्रमुख वैज्ञानिक आहेत. दोन हजार किलोमीटरचे हे नेटवर्क अर्थ, इलेक्ट्रॉनिक्स, सरकारी कामकाज यासाठी वापरले जाणार आहे.

०८. पॅन यांनी सांगितले की, उपग्रह व भूकेंद्रावरून माहितीची सुरक्षित देवाणघेवाण होईल. पॅन यांच्या मते क्वांटम संदेशवहन पुढील दहा वर्षांत आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असेल, त्यामुळे ऑनलाईन बँकिंग व पेमेंट या सेवा सुरक्षित होतील.* ८२ जणांना शौर्य पुरस्कार
०१. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अतुलनीय देशसेवेसाठी ८२ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत. 


०२. भारताच्या ७० व्या स्वांतत्र्यदिनाच्या औचित्यावर सशस्त्र सेना कर्मचारी आणि निमलष्करी दलांच्या सदस्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

०३. या पुरस्कारांमध्ये एक अशोक चक्र, १४ शौर्य चक्र, ६३ सेना पदकं, दोन नौसेना पदकं आणि दोन वायुसेना पदकांचा समावेश आहेत. 

०४. हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.


* अमेरिकेने ऑलिंपिकमध्ये जिंकली १००० सुवर्ण 
०१. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये अमेरिकेने आतापर्यंत तब्बल एक हजार सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली आहे. 

०२. रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जलतरणात अमेरिकेने महिलांच्या ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकत ऑलिंपिक स्पर्धांमधील हजारावे सुवर्णपदक मिळविले. 

०३. अमेरिकेसाठी पहिले सुवर्णपदक १८९६ च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिहेरी उडी प्रकारात जेम्स कोन्नोलीने मिळविले होते. त्यानंतर अमेरिकेचा सुवर्णपदके मिळविण्याचा धडाका सुरूच आहे.