* ऑलिम्पिक टेनिस

०१. इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरेने ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत दुसरे सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत मरेने अर्जेटिनाच्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोवर ७-५, ४-६, ६-२, ७-५ असा विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.मरेने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्येसुद्धा सुवर्णपदक पटकावले होते. 

०२. कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करून केई निशिकोरीने जपानला टेनिसमधील शतकातले पहिले पदक मिळवून देण्याचा मान पटकावला. या सामन्यात निशिकोरीने नदालला ६-२, ६-७ (१-७), ६-३ असे पराभूत केले. यापूर्वी जपानने १९२० साली पुरुष एकेरी आणि दुहेरीमध्ये रौप्यपदक पटकावले होते.


०३. अमेरिकेच्या व्हीनस विल्यम्सला मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत अमेरिकेच्याच बेथानी मॅटेक-सँड्स आणि जॅक सॉक यांनी व्हीनस आणि तिचा सहकारी राजीव राम यांना ७-६ (७-३), १-६, १०-७ असे पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले.

०४. व्हीनसने २००० साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर बहीण सेरेनाबरोबर २०००, २००८ आणि २०१२ या तीन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळवले होते.


०५. महिलांच्या टेनिस दुहेरीमध्ये मार्टिना हिंगिसलाही सुवर्णपदक पटकावण्यात अपयश आले. १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकनंतर मार्टिना पहिल्यांदा या स्पर्धेत खेळत होती. महिलांच्या दुहेरीमध्ये एलेना व्हॅसनिना आणि एकातेरिना माकारोव्हा यांनी हिंगिस आणि तिची स्वित्र्झलडची सहकारी तिमीआ बॅस्किन्सझ्की यांना ६-४, ६-४ असे सहजपणे पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले.* देशासह जगभरात ७० वा स्वातंत्र्यदिन साजरा
०१. इस्लामाबादमधील भारतीय दूतावासाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी साधासा समारंभ आयोजित केला होता. भारताचे राजदूत गौतम बंबवाले यांनी ध्वजारोहण केले. देवजी पटेल, आलोक तिवारी व कलिकेश नारायण सिंगदेव हे तीन खासदारही कार्यक्रमात सहभागी झाले होते. याप्रसंगी एक सांस्कृतिक कार्यक्रमही झाला. 

०२. बीजिंगमध्ये भारतीय दूतावासाच्या परिसरात भारतीय समुदायाच्या अनेक सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राजदूत विजय गोखले यांनी ध्वजारोहण केले. शांघाय व ग्वांग्झो येथील भारतीय वकिलातींमध्येही ध्वजारोहणाने हा कार्यक्रम साजरा झाला. 

०३. अमेरिकेत कॅलिफोर्नियातील फ्रेमाँट व न्यू जर्सीतील एडिसन येथे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठय़ा प्रमाणावर साजरा करण्यात आला. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. डल्लास, ह्य़ूस्टन, शिकागो, ओरलँडो व मिनिअ‍ॅपॉलिस या शहरांमध्येही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. 

०४. ब्रिटनमधील स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये बॉलीवूडचे लोकप्रिय गायक राहत फतेह अली खान यांची मैफल आणि भारतीय महिलांनी प्रथमच सादर केलेला ‘फ्लॅश मॉब’ यांचा समावेश होता. * महाराष्ट्रात स्वतंत्र सायबर फोर्स
०१. वाढत्या सायबर गुन्ह्य़ांना पायबंद घालण्यासाठी एक हजार प्रशिक्षित पोलिसांचा समावेश असलेला स्वतंत्र सायबर फोर्स तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. येत्या ऑक्टोबरअखेरपर्यंत संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आलेले असेल, अशी माहिती त्यांनी दिली.

०२. मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत सायबर कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

०३. इंटरनेटचा व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात सायबर प्रकल्प राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये एकाच दिवशी ४२ सायबर लॅब सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

०४. क्राइम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व पोलीस ठाणी एकमेकांना जोडण्यात आली आहेत.
राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, इत्यादी प्रमुख शहरे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आण्यात येत आहेत.