* सामान्य नागरिक करू शकणार पद्मसाठी शिफारस
०१. आता भारतातील सामान्य नागरिकही देशातील प्रतिष्ठित पद्म पुरस्कारासाठी अर्ज करू शकतील. या पुरस्कार वितरणात पारदर्शकता यावी व यासाठी होणाऱ्या लॉबिंगला रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. 


०२. पुरस्कारासाठी अर्ज करतेवेळी आधार कार्ड सादर करण्याची मात्र सक्ती असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. आधार कार्डवरून संबंधित अर्जदाराची माहिती घेणे निवड समितीला सोपे जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. 


०३. देशासाठी योगदान दिलेल्या अपरिचित नागरिकांचा सन्मान व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुरस्कार समाजातील एखाद्या वर्गापुरताच मर्यादित न राहता त्याची व्याप्ती वाढावी हा सरकारचा दृष्टीकोन असल्याचे त्यांनी सांगितले. 

०४. विशेष म्हणजे या निर्णयामुळे नागरिकांना एखाद्या व्यक्तीलाही नामांकित करता येईल. या निर्णयामुळे देशातील अनेक अज्ञात असामान्य कर्तृत्व समाजासमोर येईल. त्यांच्या कार्याची माहिती देशाला होईल. * पॅरालिम्पिकमध्ये भारताची दिमाखदार कामगिरी
०१. भारताच्या मरियप्पन थांगवेलूने पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकून पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा आजपर्यंतचा तो तिसरा भारतीय खेळाडू आहे. 

०२. यापूर्वी मुरलीकांत पेटकर (१९७२- जलतरण) व देवेंद्र झाझरिया (२००४- भालाफेक) यांनी सुवर्णपदक जिंकले होते. प्रथमच एकाच क्रीडाप्रकारात भारताला सुवर्ण व कांस्य अशा दोन पदकांची कमाई झाली आहे. भारताचा शरदकुमार हादेखील याच क्रीडाप्रकारात सहभागी झाला होता. त्याने १.७७ मीटपर्यंत उडी मारली व सहावे स्थान मिळवले.

०३. भारताच्या संदीप व नरेंदर रणबीर यांना भालाफेकीत पदकाने हुलकावणी दिली. संदीपने ५४.३० मीटपर्यंत भालाफेक करीत चौथे स्थान घेतले. रणबीर याने ५३.७९ मीटपर्यंत भालाफेक केली व सहावा क्रमांक मिळविला.* डॉ. तुलसीराम यांना ‘राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार’ जाहीर
०१. डॉ. एच. व्ही. तुलसीराम. त्यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय जैवविज्ञान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. 

०२. सहा वर्षे अमेरिकेत संशोधन केल्यानंतर तेथील प्राध्यापक व स्वत:च्या कुटुंबीयांचा तेथेच राहण्याचा आग्रह डावलून केवळ देशाने आपल्यावर खर्च केला आहे, त्यामुळे त्याचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने ते संशोधनासाठी भारतात परत आले. आज ते राष्ट्रीय रासायनिक संशोधन प्रयोगशाळेत कार्यरत असून ते तरुण संशोधकांना उत्तेजन देत आहेत.

०३. डॉ. तुलसीराम यांनी बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून पीएच.डी. केली असून, आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. 

०४. त्यांना याआधी एनसीएल रिसर्च फाऊंडेशन व ‘सायन्टिस्ट ऑफ द इयर २०१६’ हे पुरस्कार मिळाले आहेत. 

०४. आयसोप्रेनॉइड नामक कार्बनीय घटकाच्या जैव संश्लेषणासाठी डॉ. तुलसीराम यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाकरिता या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 

०५. त्यांचा संशोधक गट सध्या नैसर्गिक घटकांच्या रासायनिक आणि जैविक पैलूंचा अभ्यास करीत आहे. यामध्ये त्या घटकांचे विलगीकरण, त्यांचे गुणधर्म, जैविक क्रिया आणि रासायनिक व जैविक विकरांशी संबंधित बदल यांचा अभ्यास अंतर्भूत आहे. 

०६. शिवाय पारंपरिक भारतीय औषधी वनस्पतींमधून आयसोप्रेनॉइडच्या जैवसंश्लेषण प्रक्रियेदरम्यान विशिष्ट जनुकीय गुणधर्माबद्दल माहिती संकलनासाठीदेखील त्यांचा समूह काम करीत आहे. 

०७. यादरम्यान, सजीव शरीरात निर्माण होणाऱ्या द्रव्य परिवर्तनाच्या अभ्यासावर त्यांचा मुख्य भर असेल. या अभ्यासाचा उपयोग जैविकदृष्टय़ा महत्त्वाच्या घटकांच्या उत्पादनामध्ये अभिप्रेत आहे.

०८. जैव उत्प्रेरक, आयसोब्रेनॉइड पाथवेज या क्षेत्रात त्यांचे संशोधन असून ते नैसर्गिक उत्पादनांशी निगडित आहे. रासायनिक रचना वैविध्यपूर्ण असलेल्या नैसर्गिक पदार्थाचे जैविक संश्लेषण महत्त्वाचे असते, त्यामुळे त्यांच्यातील जैवरासायनिक क्रियांचा उलगडा होऊन नवीन विकरे व उत्प्रेरकांची कार्यपद्धती समजते.
०९. झेनोबायोटिक्स या शाखेत त्यांचे संशोधन असून भारतातील पारंपरिक औषधी वनस्पतींचे विश्लेषण त्यांनी केले आहे. त्यातून काही जैविक रेणूंचा शोध घेण्यात यश आले आहे. 

१०. कुठल्याही नैसर्गिक उत्पादनाचे रसायनशास्त्र, जीवशास्त्र या दृष्टिकोनातून विश्लेषण केले तर त्यांच्या आयसोप्रेनॉइड जैवविश्लेषणात क्रियाशील असलेले घटक समजतात. यातून नवीन औषधे तयार करता येऊ शकतात. 

११. जैव कार्बनी रसायनशास्त्रात त्यांचा २२ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी कारकीर्दीची सुरुवात पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतूनच केली. अमेरिकेत त्यांनी प्रा. सी. डेल. पोल्टर यांच्या नेतृत्वाखाली उटाह विद्यापीठात संशोधन केले. आयोवा विद्यापीठात त्यांना प्रा. ब्राइस प्लॅप यांचे मार्गदर्शन मिळाले. 

१२. जैविक व व्यावसायिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे रेणू तयार करण्यासाठी त्यांनी काही उत्प्रेरकांचा वापर केला; त्यात यीस्ट किंवा इतर काही उपकारक जिवाणूंचा समावेश आहे.* कर्कविरोधी औषधाला कृत्रिम पर्याय
०१. चीनमधील तिबेटच्या उंच पठारी प्रदेशात नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या ‘वाइल्ड कॅटरपिलर फंगस’ नावाच्या औषधीला चिनी शास्त्रज्ञांनी कृत्रिम पर्याय शोधून काढला आहे. या औषधीत कर्करोगविरोधी गुणधर्म असून शरीराची प्रतिकारक्षमता वाढवण्यासही ती उपयोगी आहे.

०२. चीनमधील क्विंघाय-तिबेट पठारी प्रदेशात ‘वाइल्ड कॅटरपिलर फंगस’ नैसर्गिकरीत्या आढळते. त्याला स्थानिक भाषेत ‘विंटर वर्म’ किंवा ‘समर ग्रास’ या अर्थाच्या नावाने ओळखले जाते. 

०३. ‘ऑफिओकॉर्डिसेप्स सायनेन्सिस’ नावाची बुरशीची प्रजाती घोस्ट मॉथ नावाच्या पतंगाच्या अळ्यांमध्ये परजीवी म्हणून वाढते. नंतर अळी मरून त्याचा सुरवंटासारखा दिसणारा फळसदृश भाग तयार होतो. त्यालाच ‘वाइल्ड कॅटरपिलर फंगस’ म्हणतात. 

०४. तिबेटमध्ये त्याचा स्थानिक औषधींमध्ये पूर्वापार वापर होत आला आहे. आधुनिक विज्ञानाला त्याच्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून आले आहेत. त्यामुळे त्याची मागणी वाढून किंमतही भलतीच वाढली. अगदी डोंगराळ प्रदेशातील लहान गावांतही त्याला सोन्याच्या बरोबरीने किंमत मिळते. 

०५. मात्र या औषधीच्या वाढीचा वेग अतिशय मंद असून तिची व्यापारी उद्देशाने शेती करणे आजवर शक्य झालेले नाही. त्यामुळे औषध उत्पादन कंपन्यांना कच्च्या मालाच्या पुरवठय़ासाठी या प्रदेशात अल्प प्रमाणात मिळणाऱ्या औषधीवरच अवलंबून राहावे लागते. औषधीसाठी प्रमाणाबाहेर जमीन खणल्याने स्थानिक पर्यावरणही धोक्यात आले आहे.

०६. मात्र गेल्या ११ वर्षांच्या संशोधनाअंती चिनी शास्त्रज्ञांनी या दुर्मीळ औषधीला कृत्रिम पर्याय निर्माण करण्यात यश मिळवले आहे. या प्रक्रियेत शास्त्रज्ञांनी कॅटरपिलर फंगसमधील अनावश्यक भाग काढून टाकून ‘कॉर्डिसेप्स सायनेन्सिस’ किंवा ‘हिर्सुटेला सायनेन्सिस’ हा उपयुक्त भाग वेगळा काढला आणि त्याची वाढ केली. 

०७. अशा प्रकारे कृत्रिमरीत्या तयार केलेली औषधी व नैसर्गिक औषधी याच्या डीएनएमध्ये ९७ टक्केसाम्य आढळले. तसेच मूळ औषधी गुणधर्मही सारखेच राहिले. अशा प्रकारे किण्वन (फरमेंटेशन) प्रक्रियेद्वारे कॅटरपिलर फंगसची भुकटी तयार करण्यास चिनी सरकारने तांत्रिक व आर्थिक साहाय्य पुरवले. 

०८. प्रायोगिक तत्त्वावर निर्मिती केलेल्या औषधातून २० दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळाले. अशा प्रकारे वर्षांला २०० टन औषधी तयार करण्याचे या प्रकल्पांतर्गत उद्दिष्ट आहे.