* भात प्रजातीच्या संशोधनासाठी भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारी
०१. ऑस्ट्रेलियन संशोधकांनी भारताच्या एम.एस.स्वामीनाथन रीसर्च फाउंडेशनशी भागीदारी केली असून त्यात क्षारता सहन करू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाणार आहे. 


०२. टास्मानिया विद्यापीठ व स्वामीनाथन फाउंडेशन यांच्यात गेल्या आठवडय़ात चेन्नई येथे २० लाख अमेरिकी डॉलर्सचा करार झाला असून त्याला ऑस्ट्रेलिया-भारत धोरणात्मक संशोधन निधीचे पाठबळ आहे. यात क्षारपड जमिनीत टिकाव धरू शकणाऱ्या भाताच्या प्रजातीची निर्मिती केली जाईल. 

०३. भात हे आशियात अनेकांचे अन्न असून एकूण ९२ टक्के उत्पादनही आशियात होते. 

०४. ऑस्ट्रेलियाचा क्रमांक भात म्हणजे तांदळाच्या निर्यातीत तिसरा लागतो. कृषी उत्पादनांच्या एकूण निर्यातीत त्या देशाचा नववा क्रमांक आहे. 

०५. क्षारपड जमिनीत उत्पादन देणाऱ्या भाताच्या प्रजातीमुळे भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशातील शेतक ऱ्यांना फायदा होणार आहे. टास्मानिया विद्यापीठ वेस्टर्न सिडनी विद्यापीठाचे झोंगहुआ चेन यांचेही सहकार्य घेत आहे.* वीज वितरणात महाराष्ट्राचा १४ वा क्रमांक
०१. वीजवितरणातील विविध निकषांच्या आधारे देशभरासाठी तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये महाराष्ट्र तब्बल चौदाव्या स्थानावर आहे. महाराष्ट्राच्या क्रमवारीत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घट झाली आहे. 

०२. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या यादीमध्ये वर्षापूर्वी महाराष्ट्राचा सहावा क्रमांक होता. पण नव्याने जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये महाराष्ट्राची चौदाव्या स्थानावर घसरण झाली आहे. 

०३. महाराष्ट्रातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराला ‘बी प्लस’ असा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रासोबत बिहार, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल यांचाही समावेश आहे. 

०४. एकूण २१ राज्यांमधील ४० वीज वितरण कंपन्यांच्या कामकाजाची पाहणी केल्यानंतर ही क्रमवारी निश्चित करण्यात आली. या ४० वीज वितरण कंपन्यांपैकी केवळ तीनच कंपन्यांना ‘ए प्लस’ दर्जा देण्यात आला आहे. * अरुणाचलचे राज्यपाल राजखोवा पदमुक्त
०१. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशीनंतर राजखोवा यांना राज्यपालपदावरुन हटवले आहे.

०२. अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय पेच निर्माण झाला असताना राजखोव यांनी घटनात्मक नियमांचे उल्लंघन करत राष्ट्रपती राजवट लागू केली होती. राजखोव यांनी केलेल्या शिफारशी केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजूर केल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरुन केंद्र सरकारला फटकारले होते. त्यानंतर अरुणाचलमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली होती. 

०३. राजखोवा यांनी राजीनामा दिल्यानंतर मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांच्या अरुणाचलचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.* पॅरालिम्पिक मध्ये दीपा मलिकला रौप्य
०१. रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताची गोळाफेकपटू दीपा मलिकने रौप्य पदक मिळविले. पॅरालिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी दीपा पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

०२. दीपा मालिकने सहा प्रयत्नात ४.६१ मीटर अंतरावर गोळा फेकून रौप्य पदक जिंकले. तिच्यापेक्षा अधिक अंतरावर गोळा फेकणाऱ्या बहरिनच्या फतेमा नदीम गोळाफेक प्रकारात अव्वल राहिली. तिने ४.७६ मीटर अंतरावर गोळा फेकत सुवर्णावर कब्जा केला. तर ग्रीसच्या दिमीत्रा कोरोकिडाने ४.२८ मीटर गोळा फेकत कास्य पदक पटकाविले. 

०३. दीपा मलिक ही सेना अधिकाऱ्याची पत्नी असून ती दोन मुलांची आई देखील आहे. गोळाफेक व्यतिरिक्त दीपाने भालाफेक , मोटार शर्यत आणि पोहणे या प्रकारात सहभाग घेतला होता. १७ वर्षापूर्वी मणक्याच्या कर्करोगाने त्रस्त झालेल्या दीपाच्या कमरेखालील भाग निष्क्रीय आहे. मात्र, आपल्या खेळातील यशाने तिने अपंगत्वावर मात केली. 

०४. मार्च २०१६ मध्ये दुबईमध्ये झालेल्या आशियाई ओशियन स्पर्धेत दीपाने भालाफेकमध्ये सुवर्ण तर गोळाफेकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. खेळातील तिच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल तिला भारत सरकारने अर्जून पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

०५. मैदानात स्थैर्यासाठी ती चाकांच्या खुर्चीचा आधार घेते. दीपाच्या ऐतिहासिक पदकासोबत पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता एकूण तीन पदके जमा झाली आहेत.

०६. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये दोन शरणार्थींसह ४ हजार ३४४ खेळाडू सहभागी झाले आहेत. जगातील १५४ देशांमध्ये या खेळांचे थेट प्रसारण केले जात आहे. पॅरालिम्पिकची सुरूवात १९४८ मध्ये झाली होती.* रिओ पॅरालिम्पिक मध्ये भारताला दुसरे सुवर्ण

०१. रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने दुसरे सुवर्णपदक पटकावले. भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने विश्वविक्रम रचत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 


०२. अथेन्स येथे २००४ साली झालेल्या पॅरालिम्पिकमध्येही देवेंद्रने सुवर्णपदक पटकावले होते. ३६ वर्षीय देवेंद्रने ६३.९७ मीटर भालाफेक करून विश्वविक्रम रचला. अथेन्समध्ये त्याने ६२.१५ मीटर भालाफेक केला होता.

०३. रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. 

०४. राजस्थानचा असलेला देवेंद्रला २००४ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१२मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पद्मश्री पुरस्कार मिळवणारा तो पहिला पॅरालिम्पियनपटू आहे.

०५. झाडावर चढताना देवेंद्रला विजेचा धक्का बसला होता. त्यात त्याचा एक हात अर्धा निकामी झाला. तरीसुद्धा खचून न जाता त्याने क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी केली. देवेंद्रने यापूर्वी आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पियन समिती आयोजित जागतिक स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकावले होते. 

०६. २००८ आणि २०१२ च्या पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे या स्पर्धेत देवेंद्रला सहभागी होता आले नव्हते. २००४ साली अथेन्समध्ये सुवर्ण पदक पटकावल्यानंतर त्याने १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकले.* मिलिंद सोमण चा आणखी एक विक्रम
०१. मॅरेथॉन स्पर्धेत धावण्यापासून ते जगातली सगळ्यात खडतर शारिरीक स्पर्धा जिंकणारा मिलिंद सोमण आपल्या सगळ्यांसाठीच एक आदर्श आहे. 

०२. २०१५ मध्ये ‘आयनमॅन’ स्पर्धा १५ तास १९ मिनिटात पूर्ण करुन या स्पर्धेचा विजेता बनला होता. ही एक ट्राइथेलॉन स्पर्धा असते ज्यात ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकल चालवणे आणि ४२.२ किलोमीटर न थांबता पळणे अशी ही खडतर स्पर्धा असते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना ही स्पर्धा १७ तासात पूर्ण करणे आवश्यक असते. 

०३. मिलिंदच्या नावावर ‘ग्रीनेथन’साठी ‘लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ही आहे. ३० दिवसाच्या आत १५०० किलोमीटर धावण्यासाठी त्याचे नाव लिम्का बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. 

०४. नुकतेच मिलिंदने अहमदाबाद ते मुंबई ५२७ किलोमीटर अनवाणी धावल्यानंतर आता त्याने आसाममध्ये १८० किलोमीटर सायकलही चालवली आणि तीही फक्त एका दिवसात.* सर्वांत उंच पूल वाहतुकीसाठी खुला होणार
०१. चीनमधील ग्वेझोऊ प्रांतात नदीवरील जगातील सर्वांत उंच पूल बांधण्याचे काम सुरू असून तो लवकरच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 


०२. नदीपासून तब्बल ५६५ मीटर (१८५४ फूट) उंचीवर हा पूल आहे. ‘बेइपानजियांग’ असे या पुलाचे नाव आहे. या पुलाची लांबी १३४१ मीटर इतकी असून, त्याची दोन्ही टोके जोडण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. 

०३. चीनने मागील महिन्यात जगातील सर्वांत मोठ्या लांबीचा काचेचा पूल नागरिकांसाठी खुला केला होता.  मात्र, मागील आठवड्यात दुरुस्तीसाठी तो बंद करण्यात आला आहे.


* कौशल्य विकासामध्ये  महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक
०१. कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. कौशल्य विकासाचे कार्यक्रम उत्तमरीत्या राबविणाऱ्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे.


०२. २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्रात दोन लाख लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.


०३. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी पाच ते सात एकर जागा निश्चित करण्याबाबत या वेळी फडणवीस आणि रुडी यांच्यात चर्चा झाली. कौशल्य विकास मंत्रालय आणि भृपृष्ठ वाहतूक विभागाच्या संयुक्त सहभागाने या संस्था सुरू करण्यात येतील. 


०४. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी बंद पडलेल्या महापालिका शाळांचा उपयोग करून घेण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.* अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात १६००० शस्त्रक्रिया
०१. अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्रात गेल्या पन्नास वर्षांत एकूण १६ हजार नेत्रपटल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती राष्ट्रीय नेत्रपेढीचे अध्यक्ष जीवन तितीयाल यांनी दिली. 

०२. नेत्रपेढी डॉ. राजेंद्र प्रसाद सेंटर फॉर ऑपथॅलमिक सायन्सेस या संस्थेत स्थापन करण्यात आली आहे. नेत्रपेढीला पन्नास वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

०३. एकूण नेत्रपेढीकडे २३ हजार दात्यांनी नेत्रदान केले होते, त्यातील सोळा हजार नेत्रांचे प्रत्यारोपण करण्यात आले. गेल्या वर्षी १ हजार नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 

०४. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय नेत्रदान सप्ताह पाळण्यात आला. नेत्रदात्यांच्या १०० नातेवाइकांचा या वेळी सत्कार करण्यात आला.* स्पॅनिश टॅल्गोची तिसरी चाचणी यशस्वी 
०१. सध्याच्या वेगवान राजधानी एक्‍स्प्रेसपेक्षाही वेगाने धावणाऱ्या स्पॅनिश बनावटीच्या टॅल्गो रेल्वेगाडीची दिल्ली-मुंबई मार्गावरीलतिसरी चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले.


०२. नवी दिल्ली स्थानकावरून दुपारी पावणेतीनला सोडण्यात आलेली टॅल्गो मुंबईत मध्यरात्री दोन वाजून ३३ मिनिटांनी म्हणजे ११ तास ४८ मिनिटांनी पोचली. ‘राजधानी’ला सध्या हे अंतर कापण्यासाठी १६ तास लागतात. टॅल्गोमुळे तो वेळ १२ तासांवर येईल, असा रेल्वेचा दावा आहे.


०३. सध्याच्या लोहमार्गांवर व काही तांत्रिक सुधारणा करून ही नवी गाडी चालविली जाणार आहे. नऊ डब्ब्यांच्या टॅल्गो गाडीत एक्‍झिक्‍युटिव्ह वर्गाचे दोन डबे, चार चेअर कार, एक जनरेटर कार व एक कर्मचाऱ्यांसाठीचा डबा, असे वर्गीकरण राहणार आहे.* स्टॅन वॉवरिन्का अमेरिकन ओपनचा विजेता
०१. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या मानांकीत स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिन्काने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. वॉवरिन्काने अग्रमानांकीत नोवाक जोकोविचचा ६-७(१), ६-४, ७-५, ६-३ अशा सेटमध्ये पराभव करून पहिल्यांदाच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.

०२. याआधी वॉवरिन्का आणि जोकोविच २४ वेळा आमने-सामने आले असून, वॉवरिन्काला केवळ ५ सामने जिंकता आले आहेत. वॉवरिन्का यंदा पहिल्यांदाच अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता, तर जोकोविचची अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची यंदाची सातवी वेळ होती. वॉवरिन्काचे हे कारकीर्दीतील तिसरे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद ठरले.