भारताचा ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार
०१. उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवरही बहिष्कार टाकला. इस्लामाबादमध्ये होणाऱ्या परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज स्पष्ट करण्यात आले. 


०२. भारताच्या या भूमिकेनंतर बांगलादेशानेही सार्क परिषदेला उपस्थित न राहण्याचा निर्णय जाहीर केला. अफगाणिस्तान आणि भूतान या देशांनीही सार्क परिषदेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे.


०३. गेल्या काही दिवसांतील घटना आणि घडामोडी पाहता इस्लामाबादमध्ये आयोजित ‘सार्क’च्या परिषदेमध्ये भारत सरकार सहभागी होऊ शकत नाही. ‘सार्क’चे सध्याचे अध्यक्ष असलेल्या नेपाळलाही याची कल्पना दिली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 

०४. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि भूतान हे देशही पाकिस्तानमधील परिषदेवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत.पश्चिम घाटातील जंगलात २०४ पक्ष्यांच्या प्रजाती
०१. पश्चिम घाटातील कॉफी, रबर व पोफळीची झाडे ही पक्ष्यांच्या २०० प्रजातींचा आशियाना असून त्यातील १३ प्रजाती या नष्टचर्याच्या मार्गावर आहेत. 

०२. गेली दोन वर्षे वैज्ञानिकांनी उष्णकटीबंधीय पक्षी विविधतेचा अभ्यास ३० हजार चौरस कि.मी क्षेत्रात केला. त्याचे नेतृत्व वन्य जीव संवर्धन सोसायटीचे डॉ. कीर्ती कारंथ यांनी केले. त्यात पक्ष्यांच्या २०४ प्रजाती सापडल्या असून त्यातील १३ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाटात त्या सापडल्या आहेत. कॉफीचे मळे, रबर व पोफळीची झाडे येथे पक्ष्यांची घरटी आहेत.

०३. पश्चिम घाट हा परिसंस्थात्मक दृष्टीने संपन्न मानला जातो. कबुतरासारखे मोठे पक्षी, हार्नबील हे कॉफीच्या मळ्यांमध्ये जास्त आहेत. हे पक्षी बिया पसरवण्याचे काम करीत असतात. झाडांची विविधता व दाटपणा यावर पक्ष्यांचे वास्तव्य अवलंबून असते.

०४. कृषी पद्धती बदलल्याने पक्षी आता कॉफी व पोफळीच्या मळ्यांकडे वळले आहेत. रबरासारखी पिके सारखी घेतली तर मात्र पक्ष्यांना कृषिवने फायद्याची ठरत नाहीत, असे ‘फ्रंटीयर्स इन इकॉलॉजी अँड इव्होल्यूशन’ नियतकालिकात म्हटले आहे. 

०५. कृषिवने पश्चिम घाटातील पक्ष्यांच्या संवर्धनाची भूमिका पार पाडतात. या जंगलांची जैवविविधता मोठी आहे, त्यांचा वापर आगामी नियोजनात व धोरण निर्धारणात करणे गरजेचे असते, त्यामुळे जैवविविधतेचे दीर्घकालीन रक्षण होईल.

०६. वैज्ञानिक निष्कर्षांचा वापर जर धोरणे व इतर क्षेत्रात केला तर कृषीजंगलांना प्राधान्य मिळून शाश्वत शेती पद्धती विकसित होतील. त्यामुळे रबर, पोफळी व कॉफीच्या झाडांच्या कृषीजंगलात पक्ष्यांची संख्या वाढेल, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक हिंदू विवाह कायदा मंजूर
०१. पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हिंदू विवाह कायद्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. पाकिस्तान संसदेने या कायद्याला मंजुरी दिली असून कायदा मंजूर झाल्याने पाकिस्तानमध्ये राहणा-या हिंदूंना लग्नाची नोंदणी करणे शक्य होणार आहे. या कायद्यानुसार हिंदू स्त्री-पुरुषांसाठी विवाहाचे वय १८ वर्ष निश्चित करण्यात आले आहे.

०२. पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा नसल्याने हिंदूंना त्यांच्या लग्नाची नोंदणी करता येत नव्हती. याचा फटका विशेषतः हिंदू महिलांना बसत होता. हिंदू विवाह कायदा तयार करावा अशी मागणी वारंवार केली जात होती. 

०३. अखेर २०१२ मध्ये हिंदू विवाह विधेयक पाकिस्तानमधील संसदेत सादर करण्यात आले. मात्र हे विधेयक संसदेत मार्गी लागत नव्हते. गेल्या वर्षभरापासून या विधेयकाला गती प्राप्त झाली. यावर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान संसदेच्या कायदा व न्याय खात्याच्या स्थायी समितीने हिंदू विवाह विधेयक २०१० ला मंजुरी दिली होती या समितीत पाच हिंदू प्रतिनिधींचाही समावेश होता. 

०४. अखेरपर्यंत या विधेयकावर निर्णय लांबवण्याचे प्रयत्न झाले व विधेयकात दोन दुरुस्त्या सुचवल्यानंतर ते मान्य करण्यात आले होते. पाकिस्तानमधील मानवाधिकार मंत्र्यांनी हे विधेयक नुकतेच संसदेत सादर केले. या विधेयकाला संसदेत बहुमताने मंजुरी देण्यात आली. आता पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन केल्यास ५ हजार पाकिस्तानी रुपयांचा दंड आणि सहा महिन्यांचा तुरुंगवास अशी शिक्षा दिली जाणार आहे.

०५. पाकिस्तानमध्ये हिंदू विवाह कायदा मंजूर करण्याच्या निर्णयाचे स्थानिक समाजसेवी संघटनांनी स्वागत केले आहे. हा कायदा मंजूर झाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

०६. पाकिस्तानमध्ये एकूण लोकसंख्येच्या १. ६ लोकसंख्या हिंदू असून अल्पसंख्याकांमध्ये हिंदूचा पहिला नंबर लागतो.