ज्येष्ठ नेते शिमॉन पेरेस कालवश
०१. इस्राईलचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते व नोबेल पारितोषिक विजेते शिमॉन पेरेस यांचे निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ०२. पेरेस यांनी दोन वेळा इस्राईलचे पंतप्रधानपद भूषविले होते. यानंतर त्यांनी २००७ ते २०१४ या काळात इस्राईलचे अध्यक्षपदही सांभाळले होते.
०३. स्वतंत्र पॅलेस्टाईन देशाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ करणाऱ्या ‘ओस्लो करारा’ संदर्भात बजाविलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसंदर्भात पेरेस यांना १९९४ मध्ये पॅलेस्टाईनचे अध्यक्ष यासर अराफत व इस्राईलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्यासह नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते.गुरूच्या चंद्रावर पाण्याच्या वाफेचा शोध
०१. गुरूच्या युरोपा या चंद्रावर पाण्याच्या वाफा असल्याचे दिसून आले असून नासाच्या हबल अवकाश दुर्बीणीच्या मदतीने हे संशोधन करण्यात आले आहे. या चंद्रावर सूक्ष्मजीवसृष्टी असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 

०२. अॅस्ट्रॉफिजिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. युरोपा चंद्रावरील सागर हा जीवसृष्टीस पोषक असू शकतो. तेथील पाण्याच्या वाफांमुळे त्याबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

०३. गुरूच्या ६७ चंद्रांपैकी युरोपा हा सर्वात मोठा चंद्र असून २०१३ च्या अखेरीस तेथे पाण्याच्या वाफा हबल दुर्बीणीला दिसून आल्या होत्या. 

०४. पाण्याच्या वाफा २०० कि.मी. उंचीवर जातात. त्यामुळे तेथे पाऊसही पडतो. युरोपावर वातावरण आहे का हे शोधण्याचा या मोहिमेचा हेतू होता. युरोपा चंद्राभोवती पातळ वातावरण असून त्यात गुरूचा प्रकाश रोखण्याची क्षमता आहे. त्यामुळे सावलीसारखे दृश्य दिसते. युरोपा गुरूसमोरून तीन वेळा तरी जातो. पंधरा महिने तो गुरूसमोरून जात असताना निरीक्षण केले असता त्यात पाण्याच्या वाफा दिसल्या.पॅरिस हवामान करारास मंत्रिमंडळाची मान्यता
पॅरिस येथील ऐतिहासिक हवामान करारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. महात्मा गांधी जयंतीला म्हणजे २ ऑक्टोबर रोजी त्याची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे.

हा करार अमलात आणणाऱ्या देशात भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे भारताला पर्यावरण काळजी व हवामानविषयक काळजी आहे हेच या निर्णयातून सूचित केले आहे. 

आतापर्यंत ६१ देशांनी हा करार मान्य केला आहे. भारताने कार्बन उत्सर्जन ५१.८९ टक्के इतके खाली आणण्याचे मान्य केले आहे. तापमानवाढ २ अंश सेल्सियसच्या खाली ठेवण्याचा हेतू या करारात आहे.कोरिया-भारत करार

एकमेकांच्या सागरी शिक्षण संस्थांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याच्या दक्षिण कोरियाबरोबरच्या कराराला मान्यता देण्यात आली. १९७८ मधील प्रमाणित सागरी प्रशिक्षण जाहीरनाम्यानुसार हा करार करण्यात आला आहे.भारत व सिंगापूर करार
भारत व सिंगापूर यांच्यात नवप्रवर्तनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या समझोता करारास मान्यता देण्यात आली आहे. औद्योगिक मालमत्ता पेटंट, व्यापारचिन्हे या मुद्दय़ांवर द्विपक्षीय सहकार्याचा यात समावेश आहे.शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर
०१. सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणारे शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर केले आहे. शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार भारतातील विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. १९५८ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) संस्थापक संचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

०२. जैवविज्ञान प्रवर्गात भारतीय विज्ञान संस्था बेंगलोरचे ऋषिकेश नारायण व सीएसआयआर कोलकाताचे सुवेन्द्र नाथ भट्टाचार्य यांना पुरस्कार देण्यात आला.

०३. रसायन शास्त्र प्रवर्गात पार्थ सारथी मुखर्जी, जमीन वातावरण समुद्र शास्त्रात सुनील कुमार सिंग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभियांत्रिकीमध्ये आयआयटी कानपुरचे अविनाश कुमार अग्रवाल आणि मायक्रोसोफ्ट संशोधन भारतचे वेंकट नारायण पद्मनाभ यांना हा पुरस्कार देण्यात आला.

०४. टाटा इंस्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे अम्लेंदू कृष्ण आणि आयआयटी दिल्लीचे नवीन गर्ग यांना गणित शास्त्र प्रवर्गातील पुरस्कार देण्यात आला.

०५. आयआयटी कानपुरचे सुब्रमन्यम अनंत रामकृष्ण आणि आयआयएससी चे सुधीर कुमार वेम्पती यांना भौतिक शास्त्रातील पुरस्कार जाहीर झाला.

०६. महाराष्ट्रातील नियाझ अहमद यांना वैद्यकीय शास्त्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

०७. मूळचे अकोल्याचे व सध्या हैदराबाद विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. नियाज अहमद यांना जाहीर झालेला शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार हा निष्ठेने काम करीत राहणाऱ्या संशोधकाचा यथोचित सन्मान आहे. 

०८. अहमद यांनी पशू व मानव यांच्यातील समान धागे शोधत संशोधन करून प्रथमच एका पशुवैद्यकाला शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराचा मान मिळवून दिला आहे.

०९. अहमद अकोल्याजवळील पारस या लहानशा खेडय़ात जन्मले. अकोल्यातून बारावी झाल्यावर अहमदांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते, पण अवघ्या तीन गुणांनी प्रवेश हुकला व त्यांनी नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयाची वाट धरली. 

१०. पशुवैद्यकशास्त्रात पदवी मिळाल्यावर अहमद यांनी हरियाणातील कर्नालच्या राष्ट्रीय डेअरी संशोधन केंद्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९८ ला ते हैदराबादच्या डीएनए संस्थेत संशोधक म्हणून रुजू झाले. २००८ मध्ये विद्यापीठात दाखल झालेल्या अहमद यांनी गेल्या १५ वर्षांत संशोधन क्षेत्रात मोठी मजल गाठली आहे. 

११. जिवाणूंमुळे मानवाला होणारे आजार व त्याचे निदान, हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे. पशू व मानवांना होणाऱ्या आजारातील साम्य, तसेच पशूंच्या आजारामुळे मानवावर होणारे दुष्परिणाम, हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. 

१२. सध्या त्यांनी ‘वन हेल्थ’ या उपक्रमांतर्गत जिवाणूंमुळे मानवाला कर्करोग होतो का? आणि होत असेल तर त्याचे निदान, यावर संशोधन सुरू केले आहे. 

१३. त्यांच्या संशोधनामुळे प्रभावित झालेले ‘नोबेल’विजेते ऑस्ट्रेलियातील संशोधक गॅरी मार्शल यांनी २०११ मध्येच अहमद यांना हा पुरस्कार देण्यात यावा, अशी शिफारस वैद्यकीय व औद्योगिक संशोधन परिषदेकडे केली होती.