पॅरिस करारावर भारताची स्वाक्षरी

०१. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटून जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण यावे यासाठी महत्त्वाच्या असलेल्या पॅरिस पर्यावरण कराराला भारताने मंजुरी दिली आहे. महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनीच भारताने या कराराला मंजुरी दिली आहे.

०२. पॅरिस करारावर भारताने अद्याप स्वाक्षरी केली नव्हती. गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारावर भारत स्वाक्षरी करेल, असे सूचित केले होते. त्यासाठी गांधी जयंतीचा मुहूर्त मुक्रर करण्यात आला होता. 


०३. त्यानुसार संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी असलेले सईद अकबरुद्दिन यांनी भारताची स्वाक्षरी असलेल्या कराराची प्रत संयुक्त राष्ट्रांच्या करारमदार विभागाकडे सोपवली. 


०४. जागतिक तापमानवाढीत विकसित आणि विकसनशील देशांकडून होणारे कार्बन उत्सर्जन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सर्व देशांनी एकत्रित येऊन स्वतवरच काही बंधने घालून त्याचे काटेकोर पालन करण्यावर एकमत झाले, व त्यातून पॅरिस करार अस्तित्वात आला. १७० देशांनी आतापर्यंत या करारावर स्वाक्षरी केली आहे.


बिहारमध्ये नवीन दारूबंदी कायदा
०१. दारूबंदीबाबत काढलेली अधिसूचना पाटणा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर दोनच दिवसांनी बिहार सरकारने राज्यात दारूबंदी करणारा नवा कायदा आणखी कठोर तरतुदींसह लागू केला आहे. ०२. देशात निर्मित विदेशी दारू, तसेच देशी दारूसह सर्व प्रकारच्या दारूची विक्री आणि सेवन यावर घातलेली बंदी कायम राहील हे सुनिश्चित करणारा ‘बिहार दारूबंदी व उत्पादन शुल्क कायदा २०१६’ राज्य सरकारने अधिसूचित केला. 


०३. जुन्या कायद्यातील काही तरतुदी कायम ठेवण्यासोबतच, नव्या कायद्यात आणखी काही कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. कैदेच्या कालावधीत वाढ, दंडाच्या रकमेत वाढ, घरात दारूची बाटली सापडल्यास घरातील सर्व प्रौढांना अटक आणि ज्या ठिकाणी दारूबंदीचे वारंवार उल्लंघन होते, तेथे सामूहिक दंड आकारणे यांचा त्यात समावेश आहे


ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर करंदीकर यांचे निधन
०१. ज्येष्ठ साहित्यिक, कवी, दंतचिकित्सक डॉ. विद्याधर सीताराम करंदीकर  यांचे शनिवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. ०२. १९९३ मध्ये त्यांच्या ‘चंदनी धुक्यामध्ये’ या कवितासंग्रहातील ‘किनारा’ कवितेचा सहावीच्या पाठय़पुस्तकात समावेश झाला होता. प्रसिद्ध साहित्यिक दया पवार यांनी त्यांच्या कवितेची निवड केली होती.


०३. डॉ. करंदीकर बाल साहित्यिक म्हणूनही राज्यात ओळखले जात होते. त्यांची बाल साहित्याची विविध पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या ‘पहिला माझा नंबर’ या बालनाटय़ाला राज्य शासनाचा ‘राम गणेश गडकरी’ पुरस्कारही प्राप्त झाला होता.


०४. कोमसापच्या झपूर्झा या मासिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते. ‘सावरकरांची नाटके’ या विषयावर त्यांनी संशोधन केले व मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. संपादित केली, तर उत्कृष्ट पीएच.डी.चा अंक म्हणून श्री. य. आकोलकर यांचे पारितोषिक प्राप्त झाले होते. ०५. वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या निवडक साहित्यावर आधारित ‘अमृतधारा’ या कार्यक्रमाचे लेखन डॉ. करंदीकर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रसारण करण्यात आले होते. विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम प्रत्यक्ष विंदांसमोर त्यांनी सादर केला होता. विंदांनाही हा कार्यक्रम आवडल्याने जाहीरपणे त्यांनी याचे कौतुक केले होते.


गुजरात व आंध्र प्रदेश हागणदारीमुक्त घोषित
०१. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचे दुसरे वर्ष या पार्श्वभूमीवर आज गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्ये म्हणून घोषित केली आहेत.


०२. गुजरातमधील पोरबंदर येथे केंद्रीयमंत्री नरेंद्र सिंह तोमर व मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या एका कार्यक्रमात राज्यातील सर्व १८० शहरे आणि गावे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. ०३. तिरुपती येथे आयोजित एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी राज्य हागणदारीमुक्त झाल्याची माहिती दिली. हे यश म्हणजे महात्मा गांधींना त्यांच्या जयंतीदिनी दिलेली एक अमूल्य भेट असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. 

०४. आंध्र प्रदेशला मोठ्या शहरांतील घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारकडून १८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. 


०५. या राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र, केरळ, हिमाचल प्रदेश, मिझोराम व ईशान्येकडील अन्य राज्ये हागणदारीमुक्तीच्या दिशेने जलद पावले टाकत असून, लवकरच ती हागणदारीमुक्त घोषित होतील.


०६. देशात 
आतापर्यंत ४०५ शहरे व गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. ८२ हजारांपैकी २० हजार वॉर्डचाही त्यात समावेश आहे. मार्च २०१७ पर्यंत ३३४ शहरे हागणदारीमुक्त होतील. वर्षभरात दीड कोटी शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट आहे.


आयएमएफ’च्या गंगाजळीत युआनचा समावेश
आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) गंगाजळीतील चलनांमध्ये चीनच्या युआन चलनाचा समावेश झाला आहे. यामुळे जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून ओळख मिळविण्याच्या चीनच्या मोहिमेतील निर्णायक पाऊल पडले आहे.


आयएमएफच्या मुक्त व्यापार योग्य चलनांमध्ये अमेरिकी डॉलर, युरो, पौंड आणि येनचा समावेश होता. आता यात युआनचा समावेश झाला आहे. आयएमफकडून मिळणारे कर्ज या ठराविक चलनांमध्ये संबंधित देशांना स्वीकारता येते. 
चीनमध्ये युआनला लोकांचा पैसा असे संबोधले जाते. 


युआनचा समावेश करण्याचे सूतोवाच मागील वर्षी आयएमएफने केले होते. युआनचा समावेश केल्याने वित्तीय बाजारपेठांवर फारसा परिणाम होणे अपेक्षित नाही. आयएमएफ आता अधिकृत गंगाजळीत युआनचा समावेश करणार असल्याचे चीनच्या आर्थिक आणि विनिमय धोरणाला बळ मिळणार आहे.


रोहिणी राऊतवर चार वर्षांची बंदी
०१. बंदी असलेले नॅनड्रोलोन या उत्तेजकाच्या सेवनात अडकलेली नागपूरची आंतरराष्ट्रीय धावपटू रोहिणी राऊतवर अखेर आंतरराष्ट्रीय
ऍथलेटिक्‍स महासंघाने (आयएएएफ) चार वर्षांची बंदी टाकली आहे. यासंबंधीचे आदेश आयएएएफने नुकताच जारी केला. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (नाडा)ने घेतलेल्या चाचणीच्या आधारे ही बंदी टाकण्यात आली आहे.


०२. नऊ वर्षांपूर्वी अम्मान येथे झालेल्या आशियाई क्रॉस कंट्री स्पर्धेत ज्युनिअर गटात रौप्यपदक मिळवून रोहिणी प्रकाशझोतात आली होती. ०३. यंदा जानेवारी, महिन्यात पतियाळा येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ऍथलेटिक्‍स स्पर्धेत रोहिणीने अर्ध मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक आणि दहा हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ही बंदी टाकण्यात आली असली तरी तिचे कुठल्या स्पर्धेतील पदक काढून घेणार का, याविषयी आयएएएफने काही स्पष्ट केले नाही. 

०४. आंतरविद्यापीठ स्पर्धेनंतर २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या दिल्ली मॅरेथॉनच्या वेळी ‘नाडा’ने तिची उत्तेजक चाचणी घेतली होती. तिच्या शरीरात 
नॅनड्रोलोन हे बंदी असलेले उत्तेजक निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात असल्याचे नाडाने २१ मार्च तिला कळविले होते.