कौटुंबिक हिंसाचार कायद्यात बदल

०१. कौटुंबिक हिंसाचार कायद्याची व्याप्ती वाढविणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या कायद्यातील ‘प्रौढ पुरुष’ हे शब्द काढून टाकून पीडित महिलेने हिंसाचाराचा आरोप केलेल्या कुटुंबातील इतर महिला आणि मुलांवरही खटला चालविण्याचा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे.


०२. कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ च्या कलम २ मध्ये ‘प्रौढ पुरुष’ या शब्दांचा उल्लेख आहे. त्यानुसार कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी म्हणून ‘प्रौढ पुरुष’ या शब्दांचा वापर करण्यात येतो. 

०३. मात्र, हे शब्द या कायद्याच्या हेतूशी तर्कसंगत नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश कुरियन जोसेफ आणि न्यायाधीश आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठाने हे शब्दच कायद्यातून काढून टाकण्याचा आदेश दिला. मात्र, या कायद्यातील इतर शब्द कायम राहणार असल्याचे न्यायालयाने ५६ पानी निकालपत्रात स्पष्ट केले.

०४. या कायद्यातील ‘प्रौढ पुरुष’ या उल्लेखाचा शब्दश: अर्थ लावून मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दोन मुली, एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाची सुटका केली होती. हे चारही आरोपी ‘प्रौढ पुरुष’ या संज्ञेत मोडत नसल्याचे नमूद करत हा निर्णय दिला होता. या निर्णयाला पीडित महिलेने आव्हान दिले.
मंगळावरील शेतीसाठी नासाकडून प्रयोग
०१. विज्ञानातील प्रगतीचा वापर करून वनस्पतींच्या आहारासाठी पूरक वनस्पतींची लागवड करून मंगळावर बगिचा उभारण्यासाठी त्याचे सादृश्यीकरण प्रयोग नासाचे वैज्ञानिक करीत असून आगामी मंगळ मोहिमातील अवकाशवीर तिथे कुठल्या प्रकारच्या वनस्पतींची लागवड करू शकतील याचा अंदाज घेण्यात येत आहे.

०२. मंगळावरील मानवी स्वारीत तेथे पुरेशा अन्नाची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान आहे. मंगळ बगिचाचे सादृश्यीकरण नासाच्या केनेडी स्पेस सेंटर व फ्लोरिडा टेक बझ आल्ड्रिन स्पेस इन्स्टिटय़ूट यांनी केले आहे. त्यात मंगळावर वनस्पतींची लागवड करण्यातील आव्हाने संशोधकांनी दूर केल्याचे दाखवले आहे.

०३. मंगळावरील शेती ही पृथ्वीपेक्षा वेगळी असणार आहे. मंगळावरील मातीत ज्वालामुखी खडक असून सेंद्रिय घटक नाहीत, त्यामुळे तेथे वनस्पती जगणे अवघड आहे असे नासाचे म्हणणे आहे.

०४. मंगळ बगिच्याच्या सादृश्यीकरणात हवाई बेटावरील माती वापरण्यात आली, कारण ती मंगळासारखी आहे. यात नेमकी किती माती वापरावी लागेल, कोणती पोषके समाविष्ट करावी लागतील याचा अंदाज घेण्यात आला. लेटय़ूसची लागवड कुठल्याही पोषकांचे मिश्रण न करता होऊ शकते असे दिसून आले आहे, पण या मातीत लेटय़ूसची मुळे कमकुवत ठरली व अंकुरण दर कमी दिसून आला.फोर्ब्सच्या यादीत पाच भारतीय अमेरिकी व्यक्ती
०१. फोर्ब्स नियतकालिकाच्या अब्जाधीशांच्या यादीत पाच भारतीय अमेरिकी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. यादीतील एकूण ४०० जणांमध्ये मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स लागोपाठ २३व्या वर्षी पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.

०२. सिंफनी टेक्नॉलॉजीचे संस्थापक रोमेश वधवानी, सिंटेल भारत या आस्थापनेच्या सहसंस्थापक नीरजा देसाई, एअरलाइन्स कंपनीचे मालक राकेश गंगवाल, उद्योजक जॉन कपूर व सिलिकॉन व्हॅलीतील गुंतवणूकदार कविर्तक राम श्रीराम यांचा यादीत समावेश आहे. 

०३. फोर्ब्स मासिकाने ‘द रिचेस्ट पीपल इन अमेरिका २०१६’ ही यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात साठ वर्षे वयाचे गेट्स हे ८१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर आहेत.२०११ मध्येही भारताने केले होते सर्जिकल स्ट्राईक
०१. यापूर्वी २०११ मध्येही पाकमध्ये घुसून सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केले होते अशी माहिती समोर आली आहे. ऑपरेशन जिंजर नावाने ही मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमेत भारताने पाकिस्तानच्या तीन जवानांचे शिर कापून भारतात आणले होते.

०२. २०११ मध्ये भारतीय सैन्याच्या २५ जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. लष्कराचे निवृत्त मेजर जनरल ए के चक्रवर्ती यांनी याला दुजोरा दिला आहे. 

०३. पाकिस्तानी सैन्याने ३० जुलै २०११ मध्ये कुपवाडा येथे भारतीय सैन्याच्या राजपूत आणि कुमाऊ रेजिमेंटच्या तुकडीतील सहा जवानांवर हल्ला केला होता.पाकिस्तानी जवानांनी भारताच्या दोन जवानांचे शिर कापून स्वतःसोबत नेले होते. 

०४. हा प्रकार बघून सैन्याच्या गोटात संतापाची लाट उसळली आणि मग सैन्याने यााचा बदला घेण्याचा निर्धार केला. भारतीय सैन्याने ऑपरेशन जिंजर ही मोहीम तयार केली होती. या मोहीमेत लष्कराने पाकिस्तानच्या तीन चौक्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. जोर, हिफाझत आणि लष्दत या चौक्यांना सैन्याने लक्ष्य केले होते.

०५. २९ ऑगस्टला सैन्याचे विशेष प्रशिक्षित २५ जवान लाँचिग पॅडवर दाखल झाले. ३० ऑगस्टला पहाटे चारच्या सुमारास या जवानांनी पाकमध्ये घुसून भूसुरुंग पेरले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानच्या आठ जवानांचा खात्मा केला. यातील तीन जवानांचे शिर भारतात आणले. प्राजना चौथा यांना फ्रान्सचा नाईटहूड पुरस्कार
०१. हत्तींशिवाय भारताची कल्पनाही करता येणार नाही. हत्तींबाबत आतापर्यंत बरेच संशोधन झाले आहे, त्याच परंपरेतील संशोधिका प्राजना चौथा यांना फ्रान्सचा नाईटहूड किताब जाहीर झाला आहे. 

०२. हत्ती या प्राण्याने माणसाचे जसे लक्ष वेधून घेतले तसेच काही ठिकाणी शेतीला उपद्रवही दिला आहे. पण तो साहचर्यातील दोषांचा भाग आहे असे त्यांचे मत आहे. आशियात सध्या ५० हजार हत्ती उरले आहेत, पण काही शतकांनी हत्ती पाहायला मिळतील की नाही अशीच परिस्थिती आहे.

०२. ‘द ओल्ड एलिफंट रूट’ हा चित्रपट त्यांनी भारत-म्यानमार सीमेवर हत्तींच्या स्थलांतर मार्गावर केलेल्या संशोधनावर चित्रित केला आहे. 

०३. 
लंडन विद्यापीठातून प्रजना यांनी  मानववंशशास्त्र व कलाइतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली. कर्नाटकातील जेनू कुरुबा आदिवासींसमवेत काम करताना त्यांना हत्तींचे संशोधन करावेसे वाटले. जेनू कुरुबा जमातीतील लोक हे माहूतच जास्त आहेत. 

०४. प्राजना या मोजक्या माहूत महिलांतील एक आहेत. त्यांनी केरळात हत्तींवरून सवारी व त्याला नियंत्रित करण्याचे शिक्षण घेतले.

०५. आदिवासी लोकांचे हत्तींशी असलेले सहजीवन, पलाकप्पया नावाचे हत्तींचे डॉक्टर, हत्तींचे रामायणातील उल्लेख यांच्या आधारे त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. हत्तींबाबतची ती मार्गदर्शिका असून त्यात चित्रे व गोष्टी आहेत. त्यांनतर प्राजना चौथा दोन दशके हत्तींवर संशोधन करीत आहेत. 

०६. कर्नाटकातील नागरहोल येथे त्या पाच हत्तींबरोबरच राहतात. त्यांनी हत्तींशी नाते जोडताना आने माने फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. त्याचा उद्देश आशियायी हत्तींचे संवर्धन हा आहे. 

०७. त्यांची सात वर्षांची कन्या ओजस तसेच हत्तींबरोबरचा सहवास यावर त्यांनी तयार केलेला माहितीपट फ्रान्सच्या टीव्हीवर दाखवण्यात आला. आशियन हत्तींचे जतन केले पाहिजे, अन्यथा ते नष्ट होतील, असे त्या सांगतात. भारत व म्यानमार या देशांत एकूण १६ हजार देशी हत्ती आहेत. त्यांच्या संवर्धनावर त्यांचा भर आहे.अत्याचाराची तक्रार आता “पोस्को ई-बॉक्‍स”वर
०१. बालकावर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने बालकांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. मुलांचे संरक्षण करणारा लैंगिक अत्याचार गुन्हा विरोधी कायदा- २०१२ आहे. 

०२. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने मुलांवर होत असलेल्या तक्रारीसाठी आपल्या संकेतस्थळावर ‘पोस्को ई-बॉक्‍स’ तयार केला असून, त्यावर तक्रार नोंदवता येते. शाळेतील मुलांवरील होणाऱ्या मारहाण, लैंगिक छळ, दहशत इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी सादर करण्यासाठी हा ‘पोस्को ई-बॉक्‍स’ तयार केला आहे. 

०३. सर्व शाळांनी याबाबत पुढाकार घेऊन मुलांना या संकेतस्थळांची माहिती करून देणे बंधनकारक राहणार आहे. शाळा प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी शाळेच्या दर्शनी भागावर याबाबत माहिती लावली जावी, असे शालेय शिक्षण विभागाने म्हटले आहे.

०४. www.ncpcr.gov.in या संकेतस्थळावर POCSO e- BOX म्हटले हा बॉक्‍स तयार केला आहे. या ठिकाणी थेट तक्रार मुलांना करता येईल. त्यासाठी पालक, शिक्षक यांनी मुलांना संगणक साक्षर तसेच या संकेतस्थळाविषयी माहिती करून देणे शाळांना बंधनकारक केले आहे.