चार राज्यांच्या भूसंपादन कायद्यांतील तरतुदी शिथिल
०१. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश व ओडिशा या ४ मोठय़ा राज्यांनी जमिनीच्या व्यावसायिक वापराशी संबंधित नियम र्निबधमुक्त करण्यासाठी निर्णायक पावले उचलली आहेत.


०२. गुजरातने यापूर्वीच स्वत:चा भूसंपादन कायदा मंजूर केला असून ऑगस्ट महिन्यात राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली आहे. यात ‘सोशल इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट’ आणि जमीन मालकाच्या संमतीची आवश्यकता या कलमांत सूट देण्याचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व ओडिशा यांनी केंद्र सरकारच्या कायद्याच्या धर्तीवर उद्योग सोपे करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

०३. उत्तर प्रदेशात पूर्वी विधवा, अज्ञान व अपंग व्यक्ती आणि संरक्षण खात्याचे कर्मचारी यांचा अपवाद वगळता इतर जमीनमालकांना जमीन भाडेपट्टय़ाने देण्यास बंदी घालण्यात आली होती. या राज्याने त्यानंतर या ‘एक्सेप्शन क्लॉज’मध्ये आणखी सुधारणा केली असून त्यामुळे उद्योगात गुंतलेल्या लोकांना शेतजमीन भाडेपट्टीवर देण्याची परवानगी मिळाली आहे. पाण्यात आणि जमिनीवर चालू शकणारी ‘डक बोट’
०१. पाण्यात आणि जमिनीवर चालू शकणाऱ्या एम्फिबियन बोटीचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उद्घाटन केले. या वाहन सेवेला ‘डक बोट’ असे नाव देण्यात आले आहे. 

०२. सुरूवातीचे काही दिवस मांडवी नदीच्या पात्रात पर्यटकांना या ‘डक बोट सफारीचा आनंद घेता येणार आहे. पुढच्या महिन्यांपासून ही सेवा पूर्णपणे सुरु होणार आहे.

०३. ‘एम्फिबियन डिझाइन प्रा. लिमीटेड’ या कंपनीने ‘एडव्हान्स अम्फिबियस डिझाइन इंक’ या अमेरिकन कंपनीची मदत घेऊन ही डक बोट तयार केली आहे. गोवा पर्यटनाच्या अधिकृत संकेत स्थळावर पर्यटकांना या सेवेसाठी आरक्षण करता येणार आहे. पणजी ते जुना गोवा तसेच डॉ. सलीम अली अभयारण्यापर्यंत ही सेवा सुरु असणार आहे.मालदीव कॉमनवेल्थ देशांच्या गटातून बाहेर
०१. मालदीव सरकारने गुरूवारी कॉमनवेल्थ देशांच्या गटातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. मालदीव सरकारच्या परराष्ट्र खात्याने गुरूवारी निवेदन जारी करून याबद्दलची माहिती दिली.  

०२. कॉमनवेल्थ गटाकडून आठवडाभरापूर्वीच मालदीवला लोकशाही सरकारच्या कारभारात सुधारणा न केल्यास सदस्यत्व रद्द करण्याची धमकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मालदीवकडून कॉमनवेल्थ गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. 

०३. अनेक दशकांच्या हुकुमशाहीनंतर मालदीवने २००८ मध्ये बहुपक्षीय लोकशाही राजवटीचा अवलंब केला होता.

०४. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांच्या अटकेमुळे मालदीवला न जाण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता निर्माण झाली आणि  मालदीवने चीनच्या पाठिंब्याचे निशाण नाचवण्याचा प्रयत्न केला होता.भारत-रशियामध्ये होणार महत्त्वपूर्ण करार
०१. भारत आणि रशियामध्ये १० कोटी अमेरिकन डॉलरचा हेलिकॉप्टर खरेदीचा करार होणार आहे. रशियासोबतचे संबंध अधिक घट्ट करताना भारत ‘कामोव २२६-टी’ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार आहे.

०२. मेक इन इंडियाच्या अंतर्गत हा करार करण्यात येणार आहे. शस्त्रसामग्रीची निर्मिती देशातच करण्यात यावी, जेणेकरुन शस्त्रसामग्रीचे देशांतर्गत उत्पन्न वाढेल. मोदी रशियाच्या दौऱ्यावर असताना २०० हेलिकॉप्टर्ससाठी प्राथमिक करार करण्यात आला होता.

०३. कामोव हेलिकॉप्टर कमी वजनाचे असून ते दुर्गम भागात अतिशय उपयोगी ठरते. रशियन हेलिकॉप्टर्सने कामोव हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. उंच डोंगर, उष्ण हवामान आणि सागरी भागात कामोव हेलिकॉप्टर्स उपयोगी ठरतात. कामोव हेलिकॉप्टर ७ सैनिकांना घेऊन उड्डाण करु शकते. २०० किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण करण्याची कामोवची क्षमता आहे. कामोव हेलिकॉप्टर ३ हजार ६०० किलोमीटर वजन वाहून नेऊ शकते.

०४. गोव्यात सध्या ब्रिक्स परिषद सुरू आहे. या परिषदेला रशियाचे अध्यक्ष पुतीन उपस्थित आहेत. त्यामुळे या हेलिकॉप्टरच्या करारावर लवकरच स्वाक्षरी होणार आहे. कामोव भारतीय सैन्याच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने चिता आणि चेतक हेलिकॉप्टरवरील भार कमी होणार आहे.

०५. भारत आणि रशियाकडून संयुक्तपणे २०० कामोव हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली जाणार आहे. 

०६. कामोव हेलिकॉप्टरचा करार पूर्ण झाल्यानंतर भारत रशियासोबत आणखी एक मोठा करार करणार आहे. भारत रशियाकडून पाच एस-४०० ट्रिउमॅफ क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. ही क्षेपणास्त्र रशियाची सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र म्हणून ओळखली जातात. अमेरिकेची एफ-३५ लढाऊ विमानांचा वेध घेण्याची क्षमता एस-४०० ट्रिउमॅफ क्षेपणास्त्रात आहे.मायकल जॅक्सन अजूनही ‘फोर्ब्स’च्या यादीत नंबर वन०१. मायकल जॅक्सन हे नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी अग्रस्थानी राहिले आहेत. ‘फोर्ब्स’ या मासिकाने त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एक यादीमध्ये जगप्रसिद्ध मायकल जॅक्सन यांना अग्रस्थानी ठेवले आहे. 

०२. या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार गेल्या १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणत्याही दिवंगत सेलिब्रिटी अथवा कलाकाराच्या तुलनेत मायकल जॅक्सन यांची कमाई सर्वात जास्त आहे. 

०३. या यादीतील वार्षिक अहवालानुसार प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये ‘एमजे’ यांनी तब्बल ८२.५ कोटी डॉलर्स इतकी कमाई केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे याच कमाईच्या बळावर मायकल जॅक्सन यांचे नाव या यादीत अग्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

०४. २००९ मध्ये या जगप्रसिद्ध ‘पॉप डान्सर’चा मृत्यू झाला होता. तेव्हापासून मायकल जॅक्सन या यादीमध्ये अग्रस्थानी आहेत. दरम्यान अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांच्या मृत्युनंतर २०१२ ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये त्या अग्रस्थानी होत्या. पण, यंदाच्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मृत्युनंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्यांना १३ वे स्थान देण्यात आले आहे.

०५. गायक एल्विस प्रेस्ली आणि प्रिन्स यांना पहिल्या पाच नावामध्ये स्थान देण्यात आले आहे. तर जॉन लेनन आणि बॉब मार्ले यांना पहिल्या दहा नावांमध्ये स्थान देण्यात आले आहे.बॉब डायलन यांना साहित्यासाठीचे ‘नोबेल’ जाहीर
०१. बॉब डायलन यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. बॉब डायलन हे अमेरिकी गायक आणि गीतकार आहेत. गेली ५४ वर्षे बॉब यांनी सतत नवे काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांमध्ये स्विडीश अकादमीने बॉब यांचे कौतुक केले आहे. 

०२. १९९३ मध्ये कादंबरीकार टोनी मॉरिसन यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. मॉरिसन यांच्यानंतर कोणत्याही अमेरिकन व्यक्तीला नोबेल पुरस्कार मिळाला नव्हता. अखेर २३ वर्षानंतर बॉब डायलन यांना साहित्याचे नोबेल मिळाले आहे.

०३. ७५ वर्षीय डायलन यांचे लिखाण पारंपारिक लिखाण पद्धतीला छेद देणारे आहे. साचेबद्ध लिखाण न करता वेगळ्या पद्धतीने लिखाण करणे हे डायलन यांचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही चौकटीत न बसणाऱ्या याच लिखाणाचा आता नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

०४. बॉब डायलन हे नोबेल पुरस्कार पटकावणारे २५९ अमेरिकन आहेत. आतापर्यंत ८ अमेरिकन व्यक्तींचा साहित्याचे नोबेल मिळाले आहे. साहित्यासाठी नोबेल पुरस्कार पटकावणारे बॉब डायलन हे नववे अमेरिकन साहित्यिक आहेत.

०५. बॉब डिलन या नावाचे वलय आणि त्याची दंतकथा १९६०च्या दशकापासून अद्याप सहा दशके संपलेली नाही. त्याच्याजवळ पॉप स्टार किंवा रॉकस्टारला साजेसा आवाज नाही किंवा गिटारच्या फ्रेट्सवर अवघड कॉर्ड्स वाजविण्याची हातोटी असलेली शैली नाही.

०६. त्याचे लोकसंगीत फक्त अमेरिकेचे संचित राहिले नाही. ‘ब्लोइंग इन द विंड’, ‘लाईक अ रोलिंग स्टोन’ आणि ‘द टाइम्स दे आर चेंजिंग’ ही डिलनची तीन गाणी जागतिक पातळीवर लोकप्रिय ठरली. 

०७. अमेरिकी नागरी हक्कासाठीची मोहीम, व्हिएतनाम युद्धविरोधी चळवळ यांना या गीतांनी प्रेरणा दिली. रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांत मोर्चेकरी ही समूहगीते गात असत. त्याकाळी दुभंगलेल्या समजात तरुणांना आपल्या मनातील विचारांना शब्दरूप देत असल्याची भावना या गाण्यांनी दिली.

०८. आफ्रिकेतील गरीबांची भूक भागविण्यासाठी आपल्या संगीतातील मानधन देण्याचा पहिला पायंडा पाडणारा संगीतकार म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. चकचकीत मासिकांच्या मुखपृष्ठांवर वैयक्तिक गॉसिप्ससह झळकण्याऐवजी त्यांनी समाजकार्यासाठी पुढाकार घेण्यावर भर दिला. लोकसंगीताला रॉक संगीताइतके महत्व केवळ बॉब डिलन या नावामुळे मिळाले.

०९. १९१३ मध्ये रवींद्रनाथ टागोर, १९७५ मध्ये युजेनियो मोंटाल, १९७७ मध्ये व्हिेसेंट अ‍ॅलेक्झांडर, १९७९ मध्ये ओडेसिस एलायटिस, १९८४ मध्ये जारोस्लाव सेइफर्ट, १९९५ मध्ये सीमस, १९९६ मध्ये विस्लावा झिंबोस्र्का यांना काव्यासाठी यापूर्वी नोबेल मिळालेले आहे.


१०. दुसऱ्या महायुद्धातील नरसंहाराचा परिणाम डिलन यांच्या बालमनावर मोठय़ा प्रमाणावर झाला. त्यांच्या लहानपणातच टीव्ही आणि रेडियोचे प्रस्थ समाजामध्ये वाढत होते. लहान वयातच वाद्यसंगीतामध्ये त्यांनी हुकूमत मिळविली होती. शिक्षण सोडून रॉकस्टॉर बनण्याची स्वप्ने ते पाहत होते. 

११. पन्नासच्या दशकात वुडी ग्रथी नामक डाव्या विचारांच्या कामगार नेता कवी आणि संगीतकार यांच्या संपर्कात ते आले. पेशाने साईन बोर्ड पेंटर असलेला ग्रथी गावोगाव गिटार घेऊन स्वरचित गीते गात कामगारांचे प्रबोधन करीत असे. 

१२. त्यांच्या प्रभावाने बॉब डिलन यांनी गिटार आणि माऊथ ऑरगन या वाद्यांसोबत गाणी रचण्यास सुरुवात केली. रॉबर्ट अ‍ॅलन झिमरमन या ओळखीला बदलून त्यांनी बॉब डिलन हे नाव अंगिकारले. 

१३. डिलन थॉमस या प्रसिद्ध कवीच्या नावावरून त्यांनी हे नाव स्वीकारले होते. त्यांच्यावर प्रसिद्ध अंध लोकसंगीतकार रॉबर्ट जॉन्सन , हँक विल्यम्स या ब्लूज संगीतप्रकार सादर करणाऱ्या गायकाचाही प्रभाव आहे.‘ईबीसी’ सवलत सहा लाखांपर्यंत
०१. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीची (ईबीसी) उत्पन्नमर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवून उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. 

०२. या योजनेबरोबरच ‘भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख योजना’ आणि ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना’ सुरू केल्या.या महत्त्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून उत्तम मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले आहेत.

०३. राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या माध्यमातून उच्च व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या सर्व घटकांतील विद्यार्थ्यांचे शुल्क सरकार भरणार आहे. या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत असणे आवश्‍यक असून, विद्यार्थ्याला प्रवेशासाठी किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्‍यक आहे. 

०४. अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना विनाअट लाभ मिळणार आहे. या दोन अटींव्यतिरिक्त कुठलीही अट योजनेसाठी लागू नाही. या योजनेमुळे सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. 

०५. ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी, तसेच रोजगार हमी योजना आणि अन्य योजनांवर नोंदणीकृत मजुरांच्या पाल्यांना शहरांमध्ये व्यावसायिक शिक्षण घेणे शक्‍य व्हावे, यासाठी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख योजनेच्या माध्यमातून अशा मुलांची मोठ्या शहरांमध्ये निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. मोठ्या शहरांमध्ये निवास व्यवस्थेसाठी प्रतिवर्ष ३० हजार रुपये, तर जिल्ह्याच्या ठिकाणी २० हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. 

०६. शुल्क प्रतिपूर्तीची योजना खासगी महाविद्यालयांसोबतच शासकीय महाविद्यालयांना लागू असणार आहे. या योजनेमुळे व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या तीन लाख ३५ हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 

०७. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच ते सहा लाख रुपयांदरम्यान आहे, अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज शासन अदा करणार आहे.काश्‍मिरमधील एनआयटीसाठी १०० कोटी मंजूर
०१. जम्मू आणि काश्‍मिरमधील नॅशनल इन्स्टिट्युट फॉर टेक्‍नॉलॉजीच्या (एनआयटी) अत्याधुनिकीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

०२. जम्मूमध्ये आणखी एक नवे आयआयएम उभे करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. तर श्रीनगरमधील एनआयटीच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ५० कोटी रुपये हे जम्मू, काश्‍मिर आणि लडाख येथे तीन वसतीगृहे उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत.पंजाबी विश्‍व साहित्य संमेलन पुण्यात
०१. गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीचे निमित्त साधून पुण्यात ‘पंजाबी विश्‍व साहित्य संमेलन’ १८ ते २० नोव्हेंबर असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे. 

०२. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे या कार्यक्रमाचे मुख्य पुरस्कर्ते आहेत. प्रख्यात पंजाबी कवी डॉ. सुरजित पट्टर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, त्यांचे चिरंजीव व उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल, स्नुषा व केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. 

०३. पुण्याच्या ‘सरहद’ या संस्थेने या संमेलनासाठी पुढाकार व आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. 
या संमेलनासाठी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन अशा परदेशांतील पंजाबी मान्यवरांप्रमाणेच देशातील पंजाबी साहित्य क्षेत्रातील नामवंतही सहभागी होणार आहेत.