चार धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांना मंजुरी
०१. सागरी उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी रायगड जिल्ह्य़ातील चार समुद्रकिनाऱ्यावर ९ कोटींचे धूपप्रतिबंधक बंधारे बांधले जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने १ कोटी ८४ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.


०२. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या उधाणामुळे कोकण किनारपट्टीवरील अनेक किनाऱ्यांची धूप होत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना धोका निर्माण झाला आहे. 

०३. रायगड जिल्ह्य़ातील मांडवा, रेवदंडा, काशिद आणि दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर धूपप्रतिबंधक बंधारे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्तन विभागामार्फत हे काम केले जाणार आहे.येत्या महिन्याभरात चारही ठिकाणची कामे सुरू होणे अपेक्षित आहे.



विश्वात दोन महापद्म दीर्घिका निरीक्षणयोग्य टप्प्यात
०१. आपल्या विश्वात दोन महापद्म (ट्रिलियन) दीर्घिका निरीक्षणयोग्य टप्प्यात असून हे प्रमाण आधीच्या अपेक्षित प्रमाणापेक्षा वीस पट अधिक आहे, असे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

०२. हबल दुर्बिणीने गेल्या वीस वर्षांत ज्या त्रिमिती प्रतिमा मिळवल्या आहेत त्यांच्या मदतीने ही मोजदाद करण्यात आली असल्याचे अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलने म्हटले आहे. 

०३. १९२४ मध्ये अमेरिकी खगोलवैज्ञानिक एडविन हबल यांनी अँड्रोमिडा म्हणजे देवयानी ही दीर्घिका शोधून काढली होती. देवयानी ही दीर्घिका आपल्या आकाशगंगेचा भाग नसून शेजारची दीर्घिका आहे.
०४. आधुनिक खगोलशास्त्राच्या काळातही दीर्घिकांची त्यातही निरीक्षणयोग्य दीर्घिकांची संख्या शोधणे अवघड आहे. दूरस्थ गोलांकडून प्रकाश बाहेर टाकला जातो व तो पृथ्वीपर्यंत पोहोचतो, असा फार थोडा भाग आहे. बाकीचा भाग आपल्या निरीक्षणाच्या पलीकडे आहे. 

०५. हबल दुर्बिणीच्या अवकाश प्रतिमांच्या मदतीने असे दाखवून दिले, की या प्रतिमांची त्रिमिती रूपे तयार करता येतात, त्यातून विश्वाच्या इतिहासात विविध काळात किती दीर्घिका होत्या हे समजते. १३ अब्ज वर्षांपूर्वी महाविस्फोटातून विश्वाची निर्मिती झाली असे सांगितले जाते.

०६. दीर्घिका ही अब्जावधी ताऱ्यांची बनलेली असते, गुरूत्वाने हे तारे ग्रह प्रणालीशी एकत्र बांधलेले असतात. नवीन गणितीय प्रारूपे वापरून अनेक न दिसणाऱ्या दीर्घिकाही शोधता येतात, त्या दुर्बिणीच्या टप्प्यात येत नाहीत. जेव्हा विश्व काही अब्ज वर्षांचे होते तेव्हा अवकाशाच्या आताच्या आकारात दहा पट दीर्घिका होत्या.



पुणे मेट्रोला पीआयबीचा हिरवा कंदील
०१. पुण्याच्या बहुप्रतिक्षित मेट्रो प्रकल्पाला सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडून (पीआयबी) शुक्रवारी मंजुरी दिली. या मंजुरीमुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गती मिळणार असून आता फक्त कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीचीच आवश्यकता बाकी आहे. मेट्रो प्रकल्पाच्या मंजुरीतील हा महत्वाचा टप्पा होता. 

०२. शहरातील सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सात वर्षांपूर्वी मेट्रोचा पर्याय पुढे आला. दिल्ली येथील पीआयबीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.
मेट्रो प्रकल्पाला मान्यता देणारे पुणे हे देशातील पहिलेच शहर ठरले होते.

०३. मेट्रो प्रकल्पात पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी चिंचवड असा मार्ग निश्चित करण्यात आला असून या १६ किलोमीटरपैकी चार किलोमीटर मार्ग हा भुमिगत जाणार आहे. तर दुसरा टप्पा रामवाडी ते वनाझ असा १५ किलोमीटरचा राहील.

०४. पुणे मेट्रो हा १२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्प आहे. यातील २० टक्के केंद्र सरकार, २० टक्के राज्य सरकार, १० टक्के स्थानिक स्वराज्य संस्था तर ५० टक्के कर्ज घेऊन खर्च भागविण्यात येईल. यासाठी सुमारे ६३२५ कोटी कर्ज घेतले जाईल. प्रकल्पासाठी पुणे मनपा १२७८ कोटी रूपये देईल. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर टेंडर काढले जाईल.



भारत-रशियात संरक्षण करार
०१. भारत आणि रशिया पुन्हा एकदा संरक्षण क्षेत्रात सहकार्याचे धोरण अवलंबताना दिसत आहेत. चार युद्धनौका, पाच एस-४०० अँटी एअरक्राफ्ट आणि कामोव्ह- २२६ टी हेलिकॉप्टरचे उत्पादन भारतात संयुक्तरित्या सुरू करण्यावर सांमजस्य करार होऊ शकतो. 

०२. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अॅडमिरल ग्रिगोरोविच (प्रोजेक्ट ११३५६) श्रेणीच्या चारपैकी दोन युद्धनौका या रशियातून येतील तर दोन युद्धनौकांची निर्मिती भारतात केली जाईल. या युद्धनौकांच्या निर्मितीसाठी शीपयार्डची निवड करण्यात आली आहे. ३६२० टन वजनाची अॅडमिरल ग्रिगोरोविच युद्धनौकेवर ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात करता येईल.

०३. भारत आणि रशियामध्ये सुमारे ४.५ अब्ज डॉलर किंमतीचे पाच एस-४०० अँटी एअरक्राफ्ट खरेदी करण्याचा आंतरराष्ट्रीय करार होणार आहे. एस-४०० क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जगातील सर्वात अत्याधुनिक असल्याचे मानले जाते. सुमारे ४०० किलोमीटर अंतरावरील क्षेपणास्त्र, ड्रोन आणि फायटर जेट विमांनाचा वेध घेऊ शकते. 

०४. आता चीननंतर एस-४०० अँटी एअरक्रॉफ्ट क्षेपणास्त्र खरेदी करणारा भारत हा दुसरा देश ठरला आहे. याशिवाय भारत रशियाकडून २०० कामोव्ह-२२६ टी हलक्या वजनाच्या हेलिकॉफ्टरच्या संयुक्त उत्पादनाच्या करारावर स्वाक्षरी करू शकतो. हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड आणि रशिया याचे संयुक्तरित्या उत्पादन करतील.



राजीव गांधी कर्करोग संस्थेची दक्षिण दिल्लीत शाखा
०१. गेल्या काही वर्षांत दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील कर्करुग्णांची संख्या वाढल्यामुळे राजीव गांधी कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्राची नवी शाखा दक्षिण दिल्लीत लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

०२. राजीव गांधी कर्करोग संस्था आशियातील सर्वात मोठी कर्करुग्णांवर उपचार करणारी संस्था आहे. अत्याधुनिक सुविधा असलेली ही संस्था ‘नॅशनल चेस्ट इन्स्टिटय़ूट’च्या सहकार्याने गौतमनगर भागात उभारण्यात आलेली आहे.

०३. दिल्लीतील लहान मुलांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या २०१२-१४ अहवालानुसार दिल्लीत ५५१ नव्या कर्करुग्णांची भर पडली होती. ही संख्या देशातील एकूण कर्करुग्णांच्या संख्येच्या ५.४ टक्के इतकी होती. यामध्ये ३०९ म्हणजेच ३.२ टक्के मुलींचा समावेश होता, अशी माहिती राजीव गांधी कर्करोग संस्था आणि संशोधन केंद्राने दिली आहे. 

०४. संपूर्ण दिल्लीतील रुग्णांना सेवा देण्यासाठी दक्षिण दिल्लीमध्ये लवकरच नवी शाखा सुरू करण्यात येणार आहे.दरदिवशी १,३०० जणांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. त्याचप्रमाणे २००८-०९ पासून दिल्लीतील कर्करुग्णांची संख्याही झपाटय़ाने वाढत असल्याचे नेगी यांनी सांगितले.

०५. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या माहितीनुसार २०१६मध्ये देशातील कर्करुग्णांची संख्या १४ लाखांपर्यंत वाढेल. तर ती २०२०पर्यंत १७.३ लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढील चार वर्षांत ७.३६ ते ८.८ लाख जणांचा कर्करोगामुळे मृत्यू होण्याची शक्यताही वर्तविण्यात आलेली आहे



चीन बांगलादेशला देणार २४ बिलीयन डॉलरचे कर्ज
०१. बांगलादेशशी चांगले संबंध ठेवण्यावर भारताने भर दिला असून आता चीननेही बांगलादेशला तब्बल २४ बिलीयन डॉलरचे कर्ज देऊन भारतावर पलटवार केला आहे. यासोबतच ३० वर्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष बांगलादेशचा दौरा करणार आहेत.

०२. बांगलादेशपासून नेपाळ आणि श्रीलंका यासारख्या देशांमध्ये जास्तीत जास्त आर्थिक गुंतणूक करण्यावर भारताचा भर आहे. गेल्या वर्षी भारताने बांगलादेशला २ बिलीयन डॉलरचे कर्ज देण्याची घोषणा केली होती. 


०३. या खेळीला चीनने कर्जाच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. चीन बांगलादेशला २४ बिलीयन डॉलर्सचे कर्ज देणार आहे. या कर्जाच्या माध्यमातून चीन बांगलादेशमधील २५ प्रकल्पांचा विकास करणार आहे. यामध्ये वीज प्रकल्प, किनारपट्टीवर बंदराचा विकास करणे अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

०४. याशिवाय शी जिनपिंग ब्रिक्स परिषद झाल्यावर बांगलादेशच्या दौ-यावरही जाणार असून ३० वर्षांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष बांगलादेशमध्ये दाखल होणार आहेत. या दौ-यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांमध्ये नव्या पर्वाला सुरुवात होईल अशी आशा बांगलादेशने वर्तवली आहे.

०५. चीनपाठोपाठ जपानही बांगलादेशला भरभरुन आर्थिक मदत करणार आहे. जपानने अत्यल्प व्याज दराने बांगलादेशला वित्तपुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र नितीला धक्का बसण्याची शक्यता आहे. 

०६. चीनने बांगलदेश, म्यानमार, चीन आणि पूर्वोत्तर भारताला जोडण्यासाठी कॉरिडोर विकसित करण्याची योजना आखली आहे. पण भारत या कॉरिडोरसाठी अनुत्सूक आहे. 



आरोग्याला घातक पेयांचा सिंधू प्रचार करणार नाही
०१. आरोग्याला घातक अशा पेयांचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट संकेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने दिले. ऑलिम्पिक पदकानंतर सिंधूसमोर विविध स्तरांतून जाहिराती तसेच विविध उत्पादनांचे सदिच्छादूत होण्यासाठी असंख्य प्रस्ताव आहेत. मात्र लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा उत्पादनाच्या जाहिराती टाळल्याचे सिंधूने सूचित केले.

०२. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ परिवाराच्या ‘श्री श्री आयुर्वेदा’ उपक्रमाच्या ‘ओजस्विता’ या ऊर्जापेयाचे मुंबईत सिंधू आणि राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या हस्ते अनावरण झाले. त्या वेळी ते बोलत होते.



‘आझाद हिंद सेने’चे डॅनियल काळे यांचे निधन
येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॅनियल काळे (वय ९५) यांचे कोल्हापूर येथील मायसावली केअर सेंटरमध्ये निधन झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता. गेली सात वर्षे येथील व्हाईट आर्मी इंटरनॅशनल या संस्थेने त्यांची सर्व जबाबदारी घेतली होती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेचं मोठं योगदान आहे. सुभाषबाबूंच्या मोजक्या विश्वासू सहकार्‍यांपैकी एक म्हणजे कोल्हापूरचे डॅनियल काळे होत.



आयआयटी संस्थांना शुल्करचनेत स्वायत्तता मिळणार
०१. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी संस्थांना यापुढे त्यांचे शुल्क ठरवण्यासाठी स्वायत्तता मिळणार आहे. त्यांना त्यासाठी या संस्थांच्या सर्वोच्च संचालक मंडळाशी चर्चा करावी लागणार नाही. 

०२. सध्या आयआयटीची शुल्करचना मनुष्यबळ विकास मंत्रालय व आयआयटी संचालक तसेच प्रत्येक आयआयटीचे संचालक मंडळ यांच्या बैठकीत निश्चित केली जात असे. 

०३. आयआयटी या उच्च शिक्षणासाठी स्वायत्त संस्था मानल्या जातात व एकूण २३ आयआयटी देशात असून त्यात भिलाई, चेन्नई, दिल्ली, धनबाद, धारवाड, गोवा, गुवाहाटी, जम्मू, कानपूर, खरगपूर, मुंबई, रूडकी, भुवनेश्वर, गांधीनगर, हैदराबाद, इंदोर, जोधपूर, मंडी, पलक्कड, पाटणा, रोपड, तिरूपती व वाराणसी येथील संस्थांचा समावेश आहे.