रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ९ कोटींचा निधी प्राप्त
०१. या आराखडय़ानुसार रायगड किल्ल्यावरील प्राचीन वास्तूचे संवर्धन करण्यासाठी रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रज्जू मार्ग आदी कामे केली जाणार आहेत. यासाठी अंदाजे ५२० कोटींचा निधी आवश्यक आहे.


०२. किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने ५२० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ९ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या संवर्धन व सुशोभीकरण कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.०३. पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सन २०१६-१७ साठी २०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यातील १६० कोटींचा निधी डिसेंबर अखेपर्यंत वितरणासाठी उपलब्ध होणार आहे.


०४. या अंतर्गत रायगड किल्ल्यावर विविध ठिकाणी दगडी मार्गिका तयार करण्याची कामे केली जाणार आहेत.


०५. ही सर्व कामे पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून केली जाणार आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी हे या योजनेचे आहरण व सिवतरण अधिकारी कामकाज पाहणार आहेत. तर रायगडच्या जिल्हाधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून कामावर लक्ष ठेवणार आहेत.


३१ डिसेंबरपर्यंत एटीएम सेवा पूर्णपणे निशुल्क
मंगळवारी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाला. यामुळे सामान्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.


काही बँकांनीदेखील एटीएममधून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिन्याभरात एटीएममधून पाच व्यवहार मोफत केले जाऊ शकतात. यानंतरच्या व्यवहारासाठी बँकांकडून शुल्क आकारले जाते. मात्र अनेक बँकांकडून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत हे शुल्क आकारले जाणार नाही.


लोकांना जुन्या नोटा बदलण्यात अडचणी येत असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँका शनिवार आणि रविवारीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 


जुन्या नोटा जमा करण्याचे आणि एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क ग्राहकांकडून आकारले जाणार नाहीत.


भारतीय वंशाच्या पाच जणांची अमेरिकी काँग्रेसमध्ये यशपताका
०१. अमेरिकेतील निवडणुकीत भारतीय वंशाच्या पाच जणांनी यश मिळवले असून भारताची यशपताका फडकवली आहे. आजपर्यंत इतक्या मोठय़ा प्रमाणात भारतीय वंशाचे लोक अमेरिकी काँग्रेसमध्ये कधीच निवडून आले नव्हते. 


०२. कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्नियातून सिनेटची जागा जिंकली आहे, त्या दोन वेळा महाधिवक्ता होत्या. प्रमिला जयपाल यांनी सियाटल येथून प्रतिनिधिगृहाची जागा जिंकली आहे. जयपाल यांच्याशिवाय राजा कृष्णमूर्ती यांनी दुसऱ्या प्रयत्नात विजय मिळवला आहे. रो खन्ना व अमी हेरा यांनी कॅलिफोर्नियातून प्रतिनिधिगृहात प्रवेश मिळवला.


०३. जयपाल या प्रथमच अमेरिकी काँग्रेसमध्ये आल्या असून त्यांचा जन्म चेन्नईला झाला. त्या पाचव्या वर्षी इंडोनेशिया व सिंगापूरला आल्या, नंतर अमेरिकेत आल्या. जयपाल या १९९५ मध्ये भारतात आल्या होत्या. त्यांचे ‘पिलग्रीमेज टू इंडिया अ वूमन रीव्हिजिट्स हर होमलँड’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. 


०४. खन्ना हे येल विद्यापीठाचे पदवीधर असून ओबामा प्रशासनाचे माजी अधिकारी आहेत.


नासा सहा लघु उपग्रह सोडणार
०१. नासा सहा प्रगत उपग्रह सोडणार असून, ते आकाराने ब्रेडइतके ते वॉशिंग मशीनसारखे लहान असणार आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील चक्रीवादळे, ऊर्जा अर्थसंकल्प व हवामान यात दृष्टिकोन किंवा उपाययोजना ठरवण्यात मदत होणार आहे. 


०२. या उपग्रहांचा आकार लहान असून, त्यांचा खर्च कमी असणार आहे. इतर मोहिमांमधील अग्निबाणांबरोबर पूरक म्हणून हे उपग्रह पाठवले जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या अवकाशातील प्रक्षेपणाचा खर्चही कमी होणार आहे. नवीन तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रयोगांसाठी त्यांचा उपयोग होणार आहे.


०३. अवकाशातील नवीन प्रयोग त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग, संशोधकांना मिळणारा प्रत्यक्ष अनुभव यात महत्त्वाचा आहे. लहान उपग्रह तंत्रज्ञान अवकाशातून पृथ्वीच्या निरीक्षणासाठी उपयोगी ठरणार आहे. यातील पाच उपग्रह पुढील काही महिन्यांत सोडले जाणार असून, त्यात बदलत्या ग्रहाच्या अभ्यासात मदत होणार आहे. 


०४. या महिन्यात रॅव्हन हा उपग्रह सोडण्यात येणार आहे. त्याचे पूर्ण नाव रेडिओमीटर अ‍ॅसेसमेंट युजिंग व्हर्टिकली अलाइन्ड नॅनोटय़ूब्ज असे आहे. तो क्युबसॅट प्रकारातील उपग्रह आहे. त्याचा उपयोग पृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करून ऊर्जा समस्येवरील खर्च ठरवण्यासाठी होणार आहे. 


०५. २०१७ मध्ये दोन क्युबसॅट उपग्रह सोडले जाणार असून, ते ढगांचा अभ्यास करणार आहेत. त्यातून वातावरणाची माहिती मिळेल. 


०६. आइसक्युब हा उपग्रह नासाच्या गोडार्ड स्पेस सेंटरचे डाँग वू यांनी तयार केला असून, त्याचा उपयोग ढगातील बर्फाचे मापन करण्यासाठी होणार आहे. त्यात मायक्रोवेव्ह रेडिओमीटरचा वापर केला आहे. 


०७. हार्प म्हणजे हायपर अँग्युलर रेनबो पोलरीमीटर हा उपग्रह मेरीलँड बाल्टीमोर विद्यापीठाचे वँडेरली यांनी तयार केला आहे. त्यातून हवेतील कणांचे मापन व ढगातील बाष्पकणांचा आकार यांचा नवीन पद्धतीने अभ्यास केला जाईल. 


०८. मिराटा म्हणजे मायक्रोवेव्ह रेडिओमीटर टेक्नॉलॉजी अ‍ॅक्सिलरेशन मिशन हा उपग्रह २०१७ मध्ये सोडला जाणार असून, तो शूबॉक्सच्या आकाराचा आहे. तो हवामान उपग्रह आहे. त्यावर काही संवेदक असून त्यातून तापमान, पाण्याची वाफ, ढगातील बर्फ यांची माहिती गोळा केली जाईल त्यातून वादळे व हवामानाचा अंदाज घेतला जाईल.