देशातील द्रुतगती महामार्गावर उतरली लढाऊ विमाने
०१. देशातील सर्वात मोठ्या आगरा-लखनऊ द्रुतगती महामार्गावर हवाई दलाच्या मिराज २००० चे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. उत्तरप्रदेशमधील नव्या महामार्गच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी लढाऊ विमाने महामार्गावर उतरुन पुन्हा उड्डाण करताना दिसली.


०२. या महामार्गावरील बांगरमऊ आणि गंज-मुरादाबाद दरम्यान तीन किलोमीटरच्या पट्टा हा हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या उड्डाण आणि लॅडिगसाठी निवडण्यात आला आहे. हवाई दलातील कोणकोणती विमाने या ठिकाणाहून उड्डाण करतील याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध नाही.


०३. देशातील सर्वात मोठ्या महामार्गासाठी १५ हजार कोटी इतका खर्च करण्यात आला असून या महामार्गाचे काम २३ महिन्यामध्ये पूर्ण करुन कमी कालावधीत हा महामार्ग उभारला असल्याचा दावा उत्तरप्रदेश सरकारने केला आहे. 

०४. आगरा ते लखनऊ या दोन शहरांना जोडणाऱ्या महामार्ग फिरोजाबाद -मैनपूरी- इटावा- ओरिया- कन्नोज -हरदोई- कानपूर -उन्नाव या शहरातून लखनऊ ला जोडला जाईल. या महामार्गामुळे आगरा -लखनऊ या दोन शहराच्या दरम्यानचे ३०२ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.

०५. यापूर्वी मागील वर्षी भारतीय हवाईदलाने मथुरा जवळच्या राया गावत यमुना महामार्गावर लढाऊ विमान उतरविले होते. युद्धपरिस्थितीमध्ये देशातील किती महामार्ग लढाऊ विमाने उतरविण्यासाठी उपयोगात आणता येऊ शकतात. याची चाचणी म्हणून हवाई दलाने या महामार्गावर देखील मिराज-२००० विमान उतरविण्यात आले होते.स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी २ चे यशस्वी प्रक्षेपण
०१. भारताने ओडिशा येथे सोमवारी पृथ्वी -२ या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले. संरक्षण खात्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, पृथ्वी-२ हे क्षेपणास्त्र २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. 

०२. ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरहून पृथ्वी-२ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण झाले. सकाळी ९.३५ वाजता एकीकृत परीक्षण केंद्रातील परिसर ३ येथील मोबाईल लाँचरवरुन या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण केले. 

०३. पृथ्वी २ ला दोन इंजिने आहेत. द्रवरुप इंधनावरही हे क्षेपणास्त्र चालते. तसेच यामध्ये ५०० ते १००० किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता आहे. पृथ्वी २ मध्ये जमिनीवरुन जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात अचूक मारा करण्याची क्षमता आहे. 

०४. यापूर्वी १२ ऑक्टोबर २००९ ला पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले असून, नऊ मीटर लांबीचे एकाच टप्प्यात थेट लक्ष्यभेद करण्याची क्षमता असलेले अतिशय प्रभावी स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र आहे.‘बीसीसीआय’च्या सर्व पदाधिकाऱ्यांना हटविण्याची शिफारस
०१. बीसीसीआय आणि तिच्याशी संलग्न असलेल्या सर्व क्रिकेट संघटनांमधील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना  हटविण्यात यावे, अशी शिफारस लोढा समितीने सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. याशिवाय, बीसीसीआयच्या विदेशातील कामकाजांवर देखरेखीसाठी माजी गृहसचिव जी.के.पिल्लई यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी देखील लोढा समितीने केली आहे.

०२. क्रिकेटचा कारभार स्वच्छ करण्यासाठी लोढा समितीने अनेक महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. लोढा समितीने सुचविलेल्या या बदलांना बीसीसीआयने तीव्र विरोध केला आहे.

०३. सुप्रीम कोर्टात याआधी झालेल्या सुनावणीत लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्टाने बीसीसीआयला ३ डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे.जपानच्या अणुऊर्जा प्रकल्प किनारपट्टीवर त्सुनामी
०१. जपानमध्ये मंगळवारी झालेल्या भूकंपानंतर फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या किनारपट्टीवर त्सुनामीच्या लाटा येऊन धडकल्या. या लाटा तब्बल १ मीटर इतक्या उंचीच्या असल्याची माहिती टोकियो ऊर्जा प्रकल्पातील अधिकाऱ्याने दिली. 

०२. जपानमध्ये मंगळवारी ६.९ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. भूकंपानंतर जगभरातील हवामान खात्यांकडून उत्तर जपानच्या किनारपट्यांवर त्सुनामी येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. 

०३. हा अंदाज खरा ठरला असून स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३८ मिनिटांनी फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या किनारपट्टीला त्सुनामीचा तडाखा बसला. दरम्यान, त्सुनामीच्या या लाटांमुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही.

०४. २०११ मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर फुकुशिमा येथे अणुभट्टीचा स्फोट झाला होता. त्यावेळी तब्बल १२ फूट उंचीच्या लाटांनी फुकुशिमाच्या किनारपट्टील झोडपले होते. त्यावेळी दोन अणुभट्ट्यांचा स्फोट होऊन किरणोत्सर्ग झाला होता.टाइम्स नाऊच्या मुख्य संपादकपदी राहुल शिवशंकर?
०१. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीच्या मुख्य संपादकपदी राहुल शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या वाहिनीचा नुकताच राजीनामा दिलेल्या अर्णव गोस्वामी यांची ते जागा घेतील. राहुल शिवशंकर हे सध्या न्यूज एक्स या वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक असून त्यांनी यापूर्वी टाइम्स नाऊ वाहिनीत काम केलेले आहे.


०२. राहुल शिवशंकर हे गेल्या २० वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. यापूर्वी त्यांनी इंडिया टुडे, हेडलाइन्स टुडे आणि न्यूज एक्स यासारख्या मोठ्या समूहात काम केलेले आहे. 

०३. यापूर्वी या वाहिनीचे मुख्य संपादक असलेल्या अर्णव गोस्वामींचा ‘न्यूज अवर’ हा कार्यक्रम कमालीचा लोकप्रिय आणि वादग्रस्त होता. अर्णव गोस्वामी हे आपल्या आक्रमक निवेदन शैलीसाठी प्रसिद्ध होते. 

०४. टाइम्स समूहाबरोबर सुमारे एक दशकाहून अधिक काळ काम केल्यानंतर त्यांनी एक नोव्हेंबर रोजी राजीनामा दिला होता. आता राहुल शिवशंकर यांची या जागी नियुक्ती झाल्याचे सांगण्यात येते.प्रख्यात गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे निधन
०१. कर्नाटकी संगीताला वेगळी दिशा देणारे प्रख्यात गायक एम. बालमुरलीकृष्ण यांचे मंगळवारी निधन झाले. बालमुरलीकृष्ण यांनी चेन्नईतील कनकासरी नगर येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते.

०२. मूळचे आंध्र प्रदेशमधील असणाऱ्या एम. बालमुरलीकृष्ण यांनी त्यांच्या जीवनातील बराच काळ चेन्नईमध्ये व्यतीत केला. एक सुप्रसिद्ध गायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालमुरलीकृष्ण यांनी संगीतकार आणि अभिनेता म्हणूनही भूमिका निभावल्या होत्या.

०३. तेलगू चित्रपट ‘भक्त प्रल्हाद’ यात त्यांनी नारदाची भूमिका साकारली होती. व्हॉयलिन, मृदंग आणि कंजिरा ही वाद्ये वाजविण्यातही ते निष्णात होते.

०४. भारतीय संगीत कलेमध्ये दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या नागरी क्षेत्रातील दुसऱ्या महत्त्वाच्या अशा ‘पद्मविभूषण’ या पुरस्काराने त्यांना १९९१ साली गौरविण्यात आले होते. प्रख्यात शास्त्रज्ञ एम. जी. के. मेनन कालवश
०१. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक एम. जी. के. मेनन यांचे निधन झाले आहे. देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मेनन यांनी पाच दशकांहून अधिक काळ योगदान दिले. वयाच्या ८८ व्या वर्षी मेनन यांनी जगाचा निरोप घेतला.

०२. एम. जी. के. मेनन यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संचालकपदाची धुरा खांद्यावर घेतली होती. १९७२ मध्ये मेनन यांची इस्त्रोच्या प्रमुखपदी नेमणूक झाली होती. 

०३. १९८२ ते १९८९ या कालावधीत एम. जी. के. मेनन नियोजन आयोगाचे सदस्य होते. तर १९८६ ते १९८९ या कालावधीत मेनन पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते. १९८९ ते १९९० दरम्यान मेनन यांनी उपराष्ट्रपतींसह वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम पाहिले. 

०४. १९९० ते १९९६ या कालावधीत मेनन राज्यसभेचे खासदार होते.एम. जी. के. मेनन यांनी व्ही. पी. सिंह सरकारच्या मंत्रिमंडळात विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले. याआधी मेनन केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. 

०५. मेनन यांनी वैश्विक किरण, पार्टिकल फिजिक्समध्ये मोठे संशोधन केले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीबद्दल मेनन यांचा पद्म विभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आले आहे.शरद कुलकर्णी यांचे निधन
०१. ‘एसडी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शरद कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील आदिवासींचा एकही पाडा किंवा वस्ती पाहायची ठेवली नाही. या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अक्षरश: दीपस्तंभाप्रमाणे म्हणायला हवे. 

०२. मूळ आवडीचा विषय अर्थशास्त्र. वकिलीची परीक्षाही दिलेली. पण सगळे आयुष्य केवळ आदिवासींच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच व्यतीत करायचे, असे मनाशी पक्के ठरवून एसडींनी आदिवासी जाणीव जागृती केंद्राची स्थापना केली. 

०३. तेव्हा गमतीने शबनमच्या पिशवीतील संस्था, असे म्हटलेही जायचे. पण खांद्यावरल्या शबनम बॅगेतील आदिवासींच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी जमवलेले कागदच त्यांचे आयुष्य व्यापून टाकणारे ठरले.

०४. एसडी गेली सुमारे चाळीस वर्षे केवळ आदिवासींना त्यांचे हक्क कसे मिळतील, याच विवंचनेत होते. वनसंरक्षण कायदा तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रक्रियेत ते सहभागी झाले, त्यामुळे युनायटेड नेशन्सच्या अभ्यासगटातही त्यांना भाग घेता आला. 

०५. ‘ग्रामायन’सारख्या संस्थेबरोबरच अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत राहिले. त्यामुळे आदिवासींचे प्रश्न जगभरातील अनेक चर्चासत्रांमधून मांडण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी त्यासाठी कधीही नकार दिला नाही. 

०६. पावलो फ्रेअरी या जागतिक कीर्तीच्या शिक्षणतज्ज्ञाने लिहिलेल्या पुस्तकाचे रसाळ आणि सुबोध भाषांतर एसडींनी ‘जाणीवजागृती’ या नावाने प्रसिद्ध केले. ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’ या नियतकालिकातही त्यांनी या विषयावर अनेक निबंध लिहिले. 

०७. सतत कामामध्ये स्वत:ला बुडवून घेणाऱ्या अशा व्यक्तीच्या निधनाने या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळय़ांमध्ये आपले छत्र हरपल्याची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे.