आनंदला संयुक्त तिसरे स्थान
०१. भारताचा माजी विश्वविजेता खेळाडू विश्वनाथन आनंदने लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळवले.


०२. अमेरिकेच्या वेस्ली सो याने सहा गुणांसह अजिंक्यपद पटकावले. अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाने साडेपाच गुणांसह दुसरे स्थान घेतले.

०३. आनंदने शेवटच्या फेरीत रशियाच्या व्लादिमीर क्रामनिक याच्याशी बरोबरी स्वीकारली. आनंद, क्रामनिक व अमेरिकेचा हिकारू नाकामुरा यांनी प्रत्येकी पाच गुणांसह तिसरे स्थान मिळविलेविराटचा कसोटी कर्णधारपदी विक्रम 
०१. विराट सलग १८ कसोटी सामन्यांत अपराजित राहणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. विराटने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. 


०२. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग १८ कसोटीत अपराजित राहण्याच्या बाबतीत विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉशी बरोबरी साधली आहे. 

०३. गतवर्षी ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग १८ कसोटीत अपराजित राहिला आहे. यादरम्यान भारताने १४ कसोटीत विजय मिळवले आहेत, तर ४ कसोटी सामने अनिर्णीत राहिले आहेत. 

०४. याआधी सर्वाधिक कसोटीत अपराजित राहण्याचा भारतीय विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावे होता. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १९८५ ते १९८७ या काळात १७ कसोटीत अपराजित राहिला होता.

०५. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटीत अपराजित राहण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम क्लाइव्ह लॉइड यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघाच्या नावे आहे. जानेवारी १९८२ ते डिसेंबर १९८४ या काळात लॉइड यांच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ तब्बल २७ कसोटीत अपराजित राहिला होता.

०६. तर १९६८ ते १९७१ या काळात इंग्लंडचा संघ २६ कसोटीत अपराजित राहिला होता.  या यादीत ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या क्रमांकावर असून १९४६ ते १९५१ या काळात ऑस्ट्रेलियन संघ सलग २५ कसोटीत अपराजित राहिला होता. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनला पूर्ण सदस्यत्व
०१. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग जगतात परतण्याचा भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचा (बीएफआय) मार्ग अखेर अधिकृतपणे मोकळा झाला. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने मॉन्ट्र्यू, स्वीत्झर्लंड येथे झालेल्या ७०व्या वार्षिक मेळाव्यात बीएफआयला पूर्ण सदस्यत्व दिले आहे.

०२. बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंग यांनी यासंदर्भात सांगितले की, भारताला पूर्ण सदस्यत्व देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने एकमताने मंजुरी दिली. प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदाची ‘हॅट्ट्रिक’
०१. प्रफुल्ल पटेल बुधवारी चार वर्षांसाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडले गेले. हा त्यांचा अध्यक्षपदाचा सलग तिसरा कार्यकाळ आहे. 

०२. दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणुकीवरील स्थगिती उठविल्यानंतर सर्वसाधारण बैठकीचे आयोजन येथे करण्यात आले. निवडणूक अधिकारी न्या. चंद्र कांडपाल (सेवानिवृत्त) यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 

०३. पटेल यांना २०१७-२०२० या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. न्या. कांडपाल यांनी प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्ष म्हणून आणि कार्यकारी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली असल्याची घोषणा केली.

०४. पटेल हे प्रियरंजन दासमुन्शी २००८ मध्ये आजारी पडल्यानंतर एआयएफएफच्या प्रभारी अध्यक्षपदी विराजमान झाले.‘साधना’ ट्रस्टचे पुरस्कार जाहीर
०१. साधना ट्रस्ट व महाराष्ट्र फाऊंडेशन, अमेरिका यांच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये अतुल पेठे, अरुण साधू, हमीद दलवाई यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले.

०२. नाट्यकर्मी अतुल पेठे यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, साहित्यिक अरुण साधू यांना साहित्य जीवन गौरव. तर हमीद दलवाई यांना समाजकार्य जीवन गौरव (मरणोत्तर) पुरस्कार देण्यात येणार आहेत.‘साहित्य अकादमी’ पुरस्कार लोमटे यांना जाहीर
०१. साहित्य विश्वातील मानाचा समजाला जाणारा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मराठीतील प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे यांना जाहीर झाला असून त्यांच्या ‘आलोक’ या कथासंग्रहाला मराठी भाषेसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा झाली.


०२. साहित्य अकादमी पुरस्कारांचे वितरण २२ फेब्रुवारी २०१७ रोजी होणार आहे. १ लाख रुपये, ताम्रपत्र, शाल असे ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराचे स्वरुप आहे. 

०३. खेड्या-पाड्यातील कथा आणि व्यथा काळजाला भिडणाऱ्या शब्दांमधून मांडत मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या आसाराम लोमटेंना पुरस्कार घोषित झाल्याने मराठी साहित्य विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

०४. ‘इडा पीडा टळो’ आणि ‘आलोक’ या दोन कथासंग्रहांमुळे आसाराम लोमटेंचे नाव मराठीतील संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा लेखकांमध्ये घेतले जाते.हाँगकाँग मध्ये भारतीयांना व्हिसा फ्री एन्ट्री बंद
०१. हाँगकाँग प्रशासनाने भारतीयांसाठी असलेली व्हिसा मुक्त प्रवेश सुविधा नव्या वर्षाच्या २३ जानेवारीपासून बंद केल्याची घोषणा केली असून यामागे चीनी दबाव असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

०२. हाँगकाँग प्रशासनाने मात्र त्याविषयी अधिक माहिती दिलेली नसून कायम वास्तव्यासाठी येथे येण्याचे भारतीयांचे प्रमाण वाढत चालल्याने हा निर्णय घेतला असल्याचे कारण दिले आहे. 

०३. यामुळे आता हाँगकाँगमध्ये व्यवसाय, उद्योग व पर्यटनासाठी जाणार्‍या भारतीयांची मोठीच गैरसोय होणार आहे. नवीन नियमानुसार भारतीयांना प्रवेशपूर्व व्हिसा घेऊनच येथे जाता येईल. त्यासाठी ऑनलाईनवर अर्ज करता येणार आहेत.

०४. हाँगकाँग हे चीनचे विशेष प्रशासकीय क्षेत्र आहे. हाँगकाँगला व्यापार व उद्येागासाठी जाणार्‍या भारतीयांचे प्रमाण मोठे आहे तसेच भारतीय पर्यटकही मोठया संख्येने येथे जातात. दरवर्षी सरसरी ५ लाख भारतीय हाँगकाँगला भेट देत असतात.

०५. या सर्वांना आता व्हिसा मंजूर झाल्याशिवाय हाँगकाँगला जाता येणार नाही. इमिग्रेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार जे थेट फ्लाईटने येणार आहेत पण विमानतळाबाहेर येणार नाहीत त्यांना व्हिसा मिळविण्याची गरज नाही.सोव्हिएत काळातील चांद्रमोहिमा रशियात पुन्हा सुरू
०१. सोव्हिएत रशियाच्या काळात चालू असलेल्या चंद्रावरील संशोधनाचा अंतराळ कार्यक्रम रशियाची विज्ञान अकादमी पुन्हा सुरू करत आहे. 

०२. यासाठी रशियाने अनेक प्रकारची चांद्रयाने बनवली आहेत. चंद्रावर रशियाची संशोधन केंद्रे स्थापित करण्यास त्या मदत करतील. यासाठी तीन लाख डॉलर म्हणजेच दोन कोटी रुपये खर्च होणार आहेत.

०३. चंद्रावरील रशियन संशोधन केंद्राची स्थापना करण्यात गुंतलेल्या संस्था या सोव्हियेत काळातील संस्थाच आहेत. 

०४. रशियाच्या विज्ञान अकादमीतील अंतराळ संशोधन संघटन, रशियन अंतराळ संघटनेची मुख्य विज्ञान संस्था म्हणजेच केंद्रीय इंजीनियरिंग संशोधन संस्था आणि लावचकिन वैज्ञानिक उत्पादन संघटना इ. या त्या संस्था आहेत.

०५. सोवियत संघाने पहिल्यांदा १९६९ साली चंद्रावर यान पाठवले होते आणि चंद्राच्या संशोधनासाठी एकूण तीन मोहिमा राबवल्या होत्या. त्या तिन्ही मोहिमांमध्ये चंद्राचा पृष्ठभाग व सूर्यकिरणांच्या परावर्तनाचा अभ्यास करण्यात आला होता. जागतिक नाणेनिधीच्या प्रमुख दोषी
०१. सध्या जागतिक नाणेनिधीच्या प्रमुख असलेल्या ख्रिस्टिने लागार्द यांनी फ्रान्सच्या अर्थमंत्री असताना निष्काळजीपणा दाखवला, असा ठपका फ्रान्सच्या न्यायाधीशांनी ठेवला आहे. 

०२. मात्र तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे लक्ष देऊन त्यांना शिक्षा न देता सोडण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. या संदर्भात लागार्द यांना एका वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकली असती.

०३. बिझिनेस टायकून बर्नार्ड तापी यांनी सरकारी दंड भरला नसताना त्यांच्या विरोधात पावले उचलण्यात लागार्द यांनी कुचराई केली, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

०४. क्रिस्टीने लागार्द या व्यवसायाने वकील असून शिकागो येथे त्यांची कायदेविषयक फर्म आहे. जागतिक नाणेनिधीच्या प्रमुख म्हणून जगातील सर्वाधिक शक्तिशाली महिलांमध्ये त्यांची गणती होते. 

०५. यंदा, २०१६ साली, फोर्ब्सच्या आंतरराष्ट्रीय यादीत त्या सहाव्या स्थानावर आहेत. जी-७ देशांमधील त्या पहिला महिला अर्थमंत्री आहेत.