नरेंद्र मोदी ठरले ‘पर्सन ऑफ द इयर’
नामांकित टाइम मासिकाच्या ऑनलाइन सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘पर्सन ऑफ द इयर’ ठरले आहेत. टाइम मासिकाकडून दरवर्षी जगातील परिस्थितीवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. 


जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांना गेल्या वर्षी हा पुरस्कार मिळाला होता.


या ऑनलाइन सर्वेक्षणात मोदी यांच्याबरोबर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि विकिलिक्‍सचे संस्थापक ज्युलिअन असांजे आदींची नावे स्पर्धेत होती.

टाइम मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांना एकूण १८ टक्के मते मिळाली. टाइम मासिकाकडून ‘पर्सन ऑफ द इयर’चा विजेता सात डिसेंबरला जाहीर होईल.पीओके मधील वादग्रस्त धरणाला शरीफांची मान्यता
पाकिस्तान व्याप्त काश्‍मिरातील सिंधू नदीवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ४५०० मेगावॅटच्या वादग्रस्त दियामार-बाशा धरण योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.

जल आणि ऊर्जा मंत्रालयाचे सचिव मोहंमद युनूस डाघा यांनी प्रस्तावित धरणाचे आर्थिक तरतुदीबाबत अहवाल नवाज शरीफ यांच्यासमोर सादर केला. हे धरण गिलगिट-बाल्टिस्तानच्या दियामार जिल्ह्यात उभारले जाणार आहे. 

भारताकडून या प्रस्तावित धरणाला आक्षेप असून, जागतिक बॅंक आणि एशियन डेव्हलपमेंट बॅंकेनेही निधी देण्यासाठी आखडता हात घेतला आहे.

आगामी वर्ष संपण्याच्या आत प्रस्तावित धरणाचे काम सुरू करण्याबाबत शरीफ यांनी सचिव डाघा आणि नियोजन आणि अर्थ विभागाच्या सचिवांना निर्देश दिल्याचे रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तात म्हटले आहे.

दियामार-बाशा धरणाचा प्रस्ताव बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. या धरणाच्या कामाला २००९ मध्येच मंजुरी मिळाली होती. तत्कालीन अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी या योजनेला पुनरुज्जीवन देत २०१९ पर्यंत प्रत्यक्षात आणण्याचे नियोजन केले होते.न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी राजीनामा
आठ वर्षांच्या कारकीर्दीनंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी आज राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी कौटुंबिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले. 

पंतप्रधान पदाच्या राजीनाम्यासोबतच त्यांनी न्यूझीलंड राष्ट्रीय पक्षाच्या नेते पदाचाही राजीनामा दिला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांनी हा राजीनामा आपल्या पत्नीच्या सांगण्यावरुन दिला.जे जयललिता यांचे निधन

एआयएडीएमकेच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे सोमवारी रात्री ११.३० वाजता निधन झाले. ६८ वर्षीय जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. 

जयललिता यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४८ मध्ये पूर्वीच्या तामिळनाडूमधील पण सध्याच्या कर्नाटकमधील मेलूकोटे या गावात झाला. 

त्यांनी दक्षिणेतील सुमारे १४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या एम जी रामचंद्रन यांनी जयललिता यांना राजकारणात आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडू राज्याचे कार्यकारी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना AIADMK पक्षाच्या आमदारांच्या गटाचे नेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 

पनीरसेल्वम यांनी तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ६५ वर्षांच्या पनीरसेल्वम यांनी यापूर्वी दोन वेळेस मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला आहे. २००१ -२००२  आणि २०१४-२०१५ मध्ये पनीरसेल्वम हे राज्याचे मुख्यमंत्री होते.मुंबईत आयएनएस बेतवा युद्धनौकेचा अपघात
मुंबई गोदीत डागडुजीसाठी उभी असलेली नौदलाची आयएनएस बेतवा युद्धनौका कलडंल्याने झालेल्या अपघातात दोन नौसैनिकांचा मृत्यू झाला, तर अन्य १४ जण जखमी झाले आहेत. 

आयएनएस बेतवा या युद्धनौकेचे वजन ३८०० टन असून लांबी १२६ मीटर आहे. ३० सागरी मैल प्रति तास या वेगाने प्रवास करणारी ही युद्धनौका २००४ मध्ये नौदलात दाखल झाली.

त्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणाऱ्या या युद्धनौकेवर क्षेपणास्त्रे तसेच क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात आहेत.शरीर सौष्ठव स्पर्धेत भारताची दशकपूर्ती
अखेरच्या दिवशी हिजबूर रेहमानने रौप्यपदक (१०० किलोवरील) आणि मणि राजेंद्रनने (९० किलोखालील) कांस्यपदक मिळवत भारताच्या खात्यात दोन पदकांची भर घातली. 

आठव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला एकंदर पदकांची दशकपूर्ती (३ सुवर्ण, ३ रौप्य, ४ कांस्य) करता आली. मागील जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताला ११ पदके मिळवली होती. 

शरीरसौष्ठव विभागात १०० किलोवरील गटात भारताच्या हिजबुल रेहमानने रौप्यपदक मिळवण्याची किमया साधली. इराणच्या महदी सबझेवरीला सुवर्ण, तर ऑस्ट्रियाच्या अर्मिन गानल याला कांस्यपदक मिळाले. 

९० किलोखालील गटात मणी राजेंद्रनने कांस्यपदक पटकावले. इराणच्या रझा फैझिमाझराइहला सुवर्ण आणि युक्रेनच्या कार्पूक मायकोला रौप्यपदक मिळाले. 

यजमान थायलंडचे जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेच्या दोन्ही गटांमध्ये वर्चस्व दिसून आले. त्यांनी या स्पर्धेत एकंदर ३२ पदकांची (१३ सुवर्ण, १३ रौप्य, ६ कांस्य) कमाई केली. 

पुरुषांमध्ये सर्वाधिक ८७० गुणांसह त्यांनी अव्वल स्थान पटकावले. इराणला दुसरे स्थान मिळवता आले. दहा पदके मिळवणाऱ्या भारताने तिसऱ्या स्थानावर मुसंडी मारली.


महिलांमध्ये ३२५ गुणांसह थायलंडला पहिले स्थान मिळाले. युक्रेनने दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले, तर हंगेरीला तिसरे स्थान मिळाले.

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन’ हा किताब इराणच्या महदीला मिळाला. महदीच्या शरीरसंपदेपुढे कुणाचाच निभाव लागला नाही. त्यामुळे पंचमंडळींनीही त्याच्याच नावावर शिक्कामोर्तब केले.महिला क्रिकेट आशिया कपमध्ये भारत विजेता
भारतीय महिला क्रिकेटपटूंनी रविवारी आशिया कप स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखताना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानाचा पराभव केला आणि सहाव्यांदा जेतेपदाचा मान मिळवला.भारतीय कंपनी करणार चंद्रावर स्वारी
अवकाश तंत्रज्ञानाच्या स्पर्धेमध्ये आता खासगी क्षेत्रानेही उडी घेतली असून, या चढाओढीमध्ये ‘टीमइंडस’ या भारतीय कंपनीनेही आपले आव्हान निर्माण केले आहे. 

चंद्रावर रोव्हर सोडण्यासाठी होत असलेल्या स्पर्धेमध्ये ही कंपनी सहभागी होत असून, भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सहकार्याने या प्रकल्पावर काम करण्यात येत आहे.

चंद्रावर यान सोडण्याबरोबरच अवकाश तंत्रज्ञानामध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढावा आणि या तंत्रज्ञानामागील खर्च कमी व्हावा, यासाठी ‘गुगल’ने ‘लुनार एक्स’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. 

तीन कोटी डॉलरच्या या स्पर्धेमध्ये ३० कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यातील १६ कंपन्या स्पर्धेत आहेत. या १६पैकी चारच कंपन्यांनी प्रक्षेपणाचे करार अंतिम केले आहेत. यामध्ये दोन अमेरिकी आणि एक इस्रायली कंपनीचा समावेश आहे. 

या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर किमान ५०० मीटर अंतरापर्यंत प्रवास करावे आणि तेथील माहिती संकलित करावी, अशी अपेक्षा आहे. 

तसेच, या मोहिमेच्या खर्चापैकी ९० टक्के वाटा खासगी क्षेत्रातून यायला हवा. हे प्रक्षेपण पुढील वर्षी करण्यात येणार आहे. 

या मोहिमेसाठी ‘टीमइंडस’ ‘इस्रो’च्या ‘अँट्रिक्स’ या व्यावसायिक शाखेबरोबर काम करणार आहे.कॅस्ट्रोंचे नाव कशालाही दिले जाणार नाही
व्यक्तिचे महात्म्य वाढू नये म्हणून क्युबाचे दिवंगत माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचे नाव रस्ते किंवा स्मारकांना दिले जाणार नाही. 

क्युबाचे अध्यक्ष व कॅस्ट्रो यांचे भाऊ राऊल कॅस्ट्रो यांनी त्यांचे सरकार फिडेल कॅस्ट्रो यांच्याच इच्छेनुसार व्यक्तिचे महात्म्य वा स्तोम माजू नये यासाठी त्यांचे नाव वापरणार नाही, असे स्पष्ट केले.