राष्ट्रगीत गायनाचा जागतिक विक्रम
गुजरातच्या राजकोट जिल्ह्य़ातील कागवाड येथे शनिवारी एका कार्यक्रमात साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी राष्ट्रगीत गाऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

या शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या खोडल धाम मंदिरात खोडियार देवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खोडियार देवी ही विशेषत: लेवा पटेल समाजासाठी वंदनीय आहे. 


या प्रसंगी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत साडेतीन लाखांहून अधिक लोकांनी एकत्र राष्ट्रगीत गायले.

यापूर्वी २०१४ साली बांगलादेशात २ लाख ५४ हजार ५३७ लोकांनी राष्ट्रगीत गाऊन विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम शनिवारी मोडला.

सर्वाधिक लांबीची (४० किलोमीटर) शोभायात्रा आणि १००८ कुंडांचा ‘महायज्ञ’ यांचे आयोजन करून ट्रस्टने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सकरता दोन नवे विक्रमही प्रस्थापित केले.रशियाच्या मदतीमुळे भारतीय रेल्वे २०० किलोमीटर वेगाने धावणार
प्रवासी रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रशिया भारताला मदत करणार आहे. यामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांचा वेग २०० किलोमीटर प्रतितास इतका होणार आहे. 

रशियन रेल्वे सध्या भारतीय रेल्वेसोबत नागपूर ते सिकंदराबाद या ५७५ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या कामाला सुरुवात करणार आहे. यासाठी गेल्या आठवड्यात रशियन रेल्वेकडून अहवालदेखील सादर करण्यात आला आहे. 

भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी रशियन रेल्वेकडून अनेक तांत्रिक बदल सुचवण्यात आले आहेत. रेल्वे अलाईनमेंटची पुनर्रचना आणि वेग कमी होणाऱ्या भागात बदल करण्याच्या सूचना रशियन रेल्वेकडून करण्यात आल्या आहेत.

भारतीय रेल्वेकडे २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारे डबे नसल्याने नवे प्रवासी डब आवश्यक असल्याच्या सूचना रशियन रेल्वेकडून करण्यात आल्या आहेत. 

सध्याच्या रेडिओ संपर्क यंत्रणेपेक्षा डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित संपर्क यंत्रणा असावी, असा प्रस्तावदेखील रशियन रेल्वेकडून देण्यात आला आहे. 

वेगवान रेल्वेचे जाळे निर्माण करताना सुरक्षेलाही महत्त्व देण्यात येणार आहे. पादचाऱ्यांची आणि रेल्वे क्रॉसिंग करणाऱ्यांच्या सुरक्षेचे उपाय करण्यात येणार आहेत. रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी येणारी माणसे आणि जनावरे यांचा विचार करुन रेल्वेमार्गांजवळ तारांचे कुंपण उभारण्यात येणार आहे. प्रख्यात कवी, गीतकार नक्श लायलपुरी यांचे निधन
उर्दू भाषेवरील प्रेम चित्रपटातील गीतलेखनातून समाजापर्यंत पोहोचविणारे प्रसिद्ध कवी आणि गीतकार नक्श लायलपुरी यांचे रविवारी सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, सून असा परिवार आहे. रविवारी संध्याकाळी ओशिवरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंजाब येथील लायलपूर (सध्या पाकिस्तानात) गावात २४ फेब्रुवारी १९२७ रोजी नक्श लायलपुरी यांचा जन्म झाला. गावावरील प्रेमासाठी त्यांनी स्वत:चे जसवंत राय शर्मा नाव बदलून नक्श लायलपुरी केले होते. 

शालेय जीवनात त्यांचे उर्दू भाषेवरील प्रभुत्व पाहून शिक्षक आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी लाहोरला उर्दूचे पुढील शिक्षण घेतले. 

हिंदी चित्रपटांबरोबरच ४० पंजाबी चित्रपटांसाठी ३५० हून अधिक गाणी त्यांनी लिहिली आहेत.सायना नेहवालला मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे अजिंक्यपद
भारताची ‘फुलराणी’ म्हणून ओळख असलेली महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला अखेर विजयाचा सुर गवसला आहे. सायनाने रविवारी मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. 

मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत थायलंडच्या पोर्नपावे चोकयूवाँग हिच्यासोबतच्या अटीतटीच्या लढाईत सायना नेहवाल हिने २२-१०, २२-१० असा रोमांचक विजय प्राप्त केला. 

गेल्या वर्षभरात गंभीर दुखापतींचा सामना करणाऱया सायनाने अखेर दुखापतींवर मात करून यंदाच्या वर्षात झोकात पुनरागमन केले आहे. गंभीर दुखापतीतूनही पुनरागमन करता येते याची प्रचिती देत सायनाने अंतिम फेरीत अफलातून कामगिरी केली.

पोर्नपावे चोकयूवाँग हिच्यासोबत सायनाचा हा पहिलाच सामना होता आणि यात भारतीय बॅडमिंटनपटूने विजय साजरा केला आहे.सायनाने उपांत्य फेरीच्या सामन्यात यिप प्युई यिनवर २१-१३, २१-१० असा विजय मिळवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. 

सायनाने मलेशियन स्पर्धा जिंकून १ लाख २० हजार अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद गाठून आत्मविश्वास द्विगुणीत झालेली सायना यापुढेही आपली कामगिरी अशीच सुरू ठेवेल अशी आशा आहे.विशेष दुग्ध प्रकल्प यादीत चंद्रपूरचा समावेश
विदर्भ आणि मराठवाडय़ात दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दहा जिल्ह्य़ांच्या यादीतून यवतमाळला वगळून त्याऐवजी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा समावेश करण्यात आला आहे. 

यवतमाळात यापूर्वीच ‘अमूल’च्या माध्यमातून दुग्ध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याने हा बदल करण्यात आल्याचे कृषी खात्याकडून कळविण्यात आले आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाडा या भागात दुधाचे उत्पादन कमी होत असल्याने ते वाढावे म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. 

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून वरील दोन्ही मागासभागातील एकूण दहा जिल्ह्य़ात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या माध्यमातून विशेष प्रकल्प राबविण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. 

या प्रकल्पात विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ आणि मराठवाडय़ातील लातूर, नांदेड, जालना व उस्मानाबाद या जिल्ह्य़ांचा समावेश होता. मात्र, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने केलेल्या सूचनेनंतर यवतमाळऐवजी आता चंद्रपूरचा समावेश करण्यात येणार आहे.

२०१७ ते २०२० या काळात ही योजना राबविण्यात येणार आहे. प्रकल्पाकरिता कृषी खात्याच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाला शासकीय दूध योजनेची जागा भाडेपट्टीवर देण्यात आली आहे. तसा करारही यापूर्वीच झाला आहे.शासकीय वाहनांच्या खरेदीसाठी अर्थखात्याचे किंमत मर्यादा धोरण
राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती, लोकायुक्तांना त्यांच्या पसंतीनुसार शासकीय वाहन खरेदीची परवानगी देतांनाच अर्थखात्याने विविध पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांनाही त्यांच्या दर्जानुसार शासकीय वाहन खरेदीसाठी किंमत मर्यादा ठरवून दिली आहे. 

कॅबिनेट व राज्यमंत्री, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उपलोकआयुक्त यांना २० लाख व मुख्य सचिव, महाअधिवक्ता, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांना १२ लाख तर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ७ लाख रुपये किमतीची वाहन खरेदी मर्यादा ठरवून दिली आहे.

विविध शासकीय कार्यालये, प्रशासकीय विभाग कार्यालये, महामंडळ व क्षेत्रीय कार्यालयांकडून वाहन खरेदीचे प्रस्ताव सादर करतांना शासन निर्णय विचारात न घेताच महागडी वाहने खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यावर अर्थखात्याने हे किंमत मर्यादा धोरण निश्चित केले आहे. 

त्यानुसार नवीन वाहन खरेदी किंवा निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदी करताना विविध पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांसाठी पुढीलप्रमाणे किंमत मर्यादेतील वाहन त्यांच्या दर्जानुसार शासकीय वाहन म्हणून अनुज्ञेय राहणार आहे. 

या शासन निर्णयानुसार राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, राज्याच्या लोकआयुक्तांना त्यांच्या पसंतीनुसार वाहन खरेदीची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही खरेदी करतांना किमतीची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही, त्यामुळे राज्यपालांपासून, तर लोकआयुक्तापर्यंत अमर्याद किंमतीचे वाहन खरेदी करू शकतात.जगातील कमी वजनाचे घडय़ाळ बनवण्यात यश
जगातील सर्वात कमी वजनाचे घडय़ाळ वैज्ञानिकांनी तयार केले असून हे यांत्रिक घडय़ाळ ४० ग्रॅम वजनाचे आहे. ते ग्राफिन या पदार्थापासून तयार केले आहे. आरएम ५०-०३ हे घडय़ाळ ग्राफिन संमिश्राचे असून वजनाने कमी आहे.

ग्राफिन संमिश्र हे ग्राफ टीपीटी नावाने ओळखले जाते व त्याचे वजन घडय़ाळात एरवी वापरल्या जाणाऱ्या पदार्थापेक्षा कमी आहे. ग्राफिन हे एक अणूइतके जाड असलेले द्विमितीय घटक आहे. २००४ मध्ये ग्राफिन प्रथम वेगळे काढण्यात यश आले होते त्यानंतर त्याचे अनेक उपयोग सामोरे आले. 
वाहने, विमाने, लवचिक मोबाईल फोन व टॅबलेट, ऊर्जा संकलन उपकरणे यांचा त्यात समावेश आहे. 

नवीन घडय़ाळाचा पट्टा ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठाने तयार केला असून त्यात रीचर्ड मिली व मॅकलारेन एफ १ या उत्पादक कंपन्यांचे सहकार्य आहे त्यात ग्राफिनचा वापर आहे. पट्टय़ाचे रबर ग्राफिनयुक्त असून त्यामुळे त्याचे यांत्रिक गुणधर्म वेगळे आहेत. एकूण घडय़ाळाचे वजन ४० ग्रॅम असून ते टिकाऊ आहे.

ग्राफिनचा समावेश त्यात केला असून क्ष किरण टोमोग्राफी तंत्राचा वापर यात केला आहे. यांत्रिक गुणधर्म तपासण्यासाठी रामन वर्णपंक्तीशास्त्राचा वापर केला आहे. ग्राफिनचा वापर केल्याने त्याच्या सुटय़ा भागांचे कामही सुधारते व आगामी काळात कमी वजनाची घडय़ाळे बाजारात येण्यास त्यामुळे मदत होऊ शकेल.