भारतीय कालगणनेत एका सेकंदाची भर
०१. भारतीय कालगणनेत रविवारी पहाटे पाच वाजून २९ मिनिटे व ५९ सेकंदांनी एका सेकंदाची भर घालण्यात आली. 


०२. जागतिक प्रमाणवेळेशी सुसंगती राखण्यासाठी हे सेकंद वाढविण्यात आले असून त्याला लीप सेकंद असे म्हटले जाते. भारतात आतापर्यंत ३६ वेळा लीप सेकंदाची भर घालण्यात आली आहे.

०३. पृथ्वीचे भ्रमण काहीसे मंदावल्याने सरत्या वर्षाच्या मध्यरात्री म्हणजे ११ वाजून ५९ मिनिटांनी व ५९ सेकंदांनी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे घड्याळ एका सेकंदासाठी थांबवण्यात आले. यानंतर रविवारी पहाटे लीप सेकंदाची भर घालून भारतीय प्रमाणवेळ जागतिक कालगणनेशी सुसंगत करण्यात आली.

०४. पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या कक्षेतील भ्रमणात सातत्य नसून काहीवेळा हे भ्रमण सरासरीपेक्षा जलद तर काहीवेळा संथ होते. भूकंप अथवा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हा बदल होतो. 

०५. सर्वसामान्य मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारात एका सेकंदाला फार महत्त्व नाही. परंतु उपग्रहांचे कार्य, खगोलशास्त्र आदी बाबतीत एक सेकंदही महत्त्वाचे असते. त्यामुळे या लीप सेकंदाची भर घालण्यात आली, अशी माहिती नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे संचालक डी. के. असवाल यांनी दिली. अग्नी-४ क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी
०१. भारताने आज अग्नी-४ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ओडीसातील बालासोर स्थित चांदीपूर तटावर ही यशस्वी चाचणी करण्यात आली.

०२. अग्नी-४ क्षेपणास्त्र ४ हजार कि.मी.पर्यंत मारा करून शकते आणि १ टन वजनाची क्षेपणास्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. 

०३. मागील आठवड्यातच भारताने अग्नी-५ ची यशस्वी चाचणी घेतली होती. या चाचणीनंतर चीनने तीव्रनाराजी व्यक्त करत यूएनकडे भारताची तक्रार करण्याचा मनोदयही व्यक्त केला होता.

०४. अग्नी-४ हे क्षेपणास्त्र संपूर्ण स्वदेशी बनावटीचे आहे. या क्षेपणास्त्राद्वारे जमीनीवरून जमीनीवर मारा करता येऊ शकतो. याची एक टन वजनाची क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. चार हजार कि.मी.पर्यंत अचूक निशाना साधण्याची क्षमता आहे. तसेच काही बिघाड झाल्यास स्वतःच दुरूस्त करणे शक्य आहे.

०५. सैन्य दलात ३००० किमी श्रेणीची अग्नि-१, अग्नी-२ आणि अग्नी-३ आधीच समाविष्ट आहेत.अनुराग ठाकूर यांची हकालपट्टी
०१. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णायक आसूड ओढला आणि मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर व चिटणीस अजय शिर्के यांची त्या पदांवरून तडकाफडकी हकालपट्टी केली. 


०२. येत्या १९ जानेवारीस मंडळावर प्रशासक मंडळ नेमले जाईल व हे प्रशासक लोढा समितीच्या देखरेखीखाली मंडळाचा कारभार करेल, असेही आदेश न्यायालयाने दिला.

०३. लोढा समितीच्या शिफारशी मंजूर करून, त्या अंमलात आणण्याचा आदेश न्यायालयाने यंदाच्या १८ जुलै रोजी दिला होता, त्याविरुद्ध केलेली फेरविचार याचिकाही फेटाळली गेली.

०४. तरीही बीसीसीआय न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याऐवजी त्यातून पळवाटा शोधत आहे, असा अहवाल लोढा समितीने दिल्यानंतर सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा घणाघाती आदेश दिला.

०५. प्रशासक मंडळ नेमले जाईपर्यंत मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून व संयुक्त सचिव चिटणीस म्हणून हंगामी स्वरूपात काम पाहातील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.सोमदेव देववर्मनने स्वीकारली निवृत्ती
०१. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी टेनिस एकेरीतील स्टार खेळाडू सोमदेव देव वर्मनने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली. 

०२. या ३१ वर्षीय खेळाडूची कारकीर्द २०१२ मध्ये खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे संपुष्टात आली. 

०३. सोमदेवने २००८ मध्ये टेनिसमध्ये पदार्पण केले त्यावेळी तो भारताचा एकेरीतील स्टार खेळाडू होता. 

०४. भारताच्या डेव्हिस कप संघाचा नियमित सदस्य असलेला सोमदेव १४ सामने खेळला आणि २०१० मध्ये भारताला विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

०५. सोमदेवने एटीपी टूर-२००९ चेन्नई ओपनमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश मिळवताना अंतिम फेरी गाठली होती. त्याचप्रमाणे २०११ मध्ये दक्षिण आफ्रिका ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली होती.सोमदेवने ग्वांग्झूमध्ये २०१० च्या आशियाई स्पर्धेत एकेरी व दुहेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

०६. २०११ मध्ये तो अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता. पर्यावरणस्नेही संमेलन पुण्यात
०१. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ५ जानेवारी रोजी पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

०२. या संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड करण्यात आली आहे. 

०३. संमेलनाचे उदघाट्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे यांच्या हस्ते होणार असून, उदघाट्न सत्रानंतर त्यांची प्रकट मुलाखत डॉ. मंदार परांजपे घेणार आहेतराष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी डहाके
०१. अकोला येथे २८ व २९ जानेवारी रोजी होणाऱ्या चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ही जबाबदारी पार पडू शकत नाहीत.

०२. त्यामुळे आता ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीकडून रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. डॉ. अभय पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत

०३. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने चार वर्षांपासून अकोला येथे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. 

०४. या वर्षी अकोला येथील स्वराज्य भवनच्या प्रांगणात २८ व २९ जानेवारी रोजी होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे.भारतीय वंशाच्या व्यक्तीची किर्गिजिस्तानच्या मेजर जनरलपदी निवड
०१. किरगिझस्तानचे संरक्षण मंत्री अली मिर्झा यांनी मध्य आशियाई देशांकडून आयोजित करण्यात आलेल्या एका अधिकृत समारंभात भारतीय वंशाच्या शेख रफिक मोहम्मद यांची किरगिझस्तान सैन्याच्या मेजर जनरलपदी नियुक्ती केली आहे. 


०२. शेख रफीक मोहम्मद हे मूळचे केरळचे आहेत. केरळमधील मल्ल्याळी व्यक्तीला दुसऱ्या देशाचे सैन्याचे प्रमुखपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.  ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. अशी घटना पहिल्यांदाच घडली असल्याची माहिती रफिक मोहम्मद यांचे माध्यम सल्लागर उमर अबू बकर यांनी दिली आहे.  रफिक यांच्याकडे किरगिझस्तानचे नागरिकत्वदेखील आहे. 

०३. रफिक याआधी २००५ आणि २०१० मध्ये माजी राष्ट्रपती कुर्मानबेक सेलियेविच बेकियेव यांचे सल्लागार होते. रफिक आणि बेकियेव यांची भेट इराणमध्ये झाली होती.

०४. किरगिझस्तानमधील कर रचना सोपी आणि सुटसुटीत करण्यावर रफिक यांनी भर दिल्यामुळे किरगिझस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाली. कर व्यवस्थेत सुधारणा होण्यापूर्वी किरगिझस्तानमधील थेट परकीय गुंतवणूक अतिशय कमी होती.  

०५. किरगिझस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी दिलेल्या या योगदानामुळे रफिक यांना काही महत्त्वपूर्ण योजना विकसित करण्यासाठी सौदी अरेबियाकडून निमंत्रित करण्यात आले.अवकाशस्थानकाचे छायाचित्र टिपण्यात ‘नासा’च्या छायाचित्रकारास यश
०१. नासाच्या एका छायाचित्रकाराने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक सूर्यासमोरून मार्गक्रमण करत असतानाचे छायाचित्र टिपले आहे. त्या वेळी अवकाश स्थानकाचा वेग ताशी २८९६८ कि.मी. होता.

०२. नासाचे छायाचिकार नोएल कोस्की यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे हे विलोभनीय छायाचित्र टिपले असून १७ डिसेंबरला सूर्यासमोरून मार्गक्रमण करता असताना ते कॅमेराबद्ध केले आहे. कोस्की यांनी या घटनेची अनेक छायाचित्रे टिपली, त्यातील दहा छायाचित्रे एकत्र करून संकलित दृश्य तयार केले आहे.

०३. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे मानवाने निर्माण केलेले अवकाशातील सर्वात मोठे वस्तीस्थान आहे तेथे अवकाशवीरांचे वास्तव्य सतत असते. तेथे अनेक वैज्ञानिक प्रयोगही केले जातात. पृथ्वीच्या सापेक्ष अवकाश स्थानक नेमके कुठे आहे हे अवकाश निरीक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

०४. अवकाशस्थानकाचे सूर्यासमोरून जातानाचे छायाचित्र सोपे नसते, पण ते टिपण्यात नासाच्या छायाचित्रकाराला यश आले आहे. त्यासाठी बरेच नियोजन लागते असे ‘टेक टाइम्स’ने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे ३३० ते ४३५ किलोमीटर उंचीवरून फिरत असते, त्यामुळे ते उच्चशक्ती दुर्बीणीशिवाय दिसू शकत नाही. अणुआस्थापनांच्या यादीची भारत-पाक यांच्यात देवाणघेवाण
०१. भारत व पाकिस्तान यांनी लागोपाठ सव्विसाव्या वर्षी त्यांच्या अणुआस्थापनांच्या यादीची देवाणघेवाण केली. एका द्विपक्षीय करारानुसार दोन्ही देशांना एकमेकांच्या अणुआस्थापनांवर हल्ला करण्यास प्रतिबंध आहे, त्यातील तरतुदीनुसार यादीची देवाणघेवाण करण्यात आली.

०२. भारत व पाकिस्तान यांच्यात एकमेकांच्या अणुआस्थापनांवर हल्ले न करण्याबाबत करारावर ३१ डिसेंबर १९८८ मध्ये करार झाला होता व तो करार २७ जानेवारी १९९१ मध्ये अमलात आला होता. 

०३. त्या करारानुसार दोन्ही देशांनी एकमेकांना अणुआस्थापनांची यादी दरवर्षी सादर करणे आवश्यक आहे.
दरवर्षी एक जानेवारीला या यादीची देवाणघेवाण होते. लागोपाठ २६ व्या वर्षी यादीची देवाणघेवाण झाली असून १ जानेवारी १९९२ रोजी पहिल्यांदा ती करण्यात आली होती. 

०४. दोन्ही देशांनी त्यांच्या तुरूंगात असलेल्या कैद्यांची यादीही एकमेकांना सादर केली. राजनैतिक संपर्क कराराअंतर्गत या याद्या एकमेकांना देण्यात आल्या. याबाबतचा करार २१ मे २००८ रोजी झाला होता. पाकिस्तानने मानवतावादी तत्त्वावर उपस्थित केलेल्या प्रकरणात सहकार्य करण्याची भारताची तयारी आहे. दोन्ही देश एकमेकांच्या पकडलेल्या मच्छीमारांना वेळोवेळी सोडून देत असतात.

०५. पाकिस्तानच्या कोठडीत असलेल्या कुलभूषण जाधव व हमीद नेहल अन्सारी यांच्याशी राजनैतिक संपर्काची परवानगी देण्याची मागणी भारताने केली आहे.पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जाधव यांना गेल्या मार्चमध्ये बलुचिस्तानातून अटक केली होती. अन्सारी हे अफगाणिस्तानातून २०१२ मध्ये चुकून पाकिस्तानात गेले होते.