एस. स्वामिनाथन यांना MRSI-ICSC पुरस्कार प्रदान
मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडियाच्या (MRSI-ICSC) वतीने देण्यात येणारा ‘उच्च वाहकता आणि पदार्थ विज्ञान’ वार्षिक पुरस्कार यंदा नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्राचे (CeNTAB) संचालक एस. स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात आला. 


मुंबईतील IIT येथे आयोजित MRSI-ICSC संस्थेच्या २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे अध्यक्ष सुरेश दास यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात आला. 

स्वामिनाथन हे सास्त्र विद्यापीठाच्या प्रायोजित संशोधन विभागाचे अधिष्ठाता म्हणूनही काम पाहत आहेत. 

स्वामिनाथन आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी ‘सास्त्र’ नॅनो तंत्रज्ञान आणि प्रगत बायोमटेरिअल केंद्रामध्ये (CeNTAB) केलेले वैज्ञानिक प्रयोग आणि सैद्धांतिक कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.पलानीस्वामींनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी अण्णा द्रमुकचे नवनिर्वाचित नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान झाले आहेत. पलानीस्वामी यांनी राजभवनात झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी पलानीस्वामी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही राज्यपालांनी शपथ दिली


तत्पूर्वी १२४ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र पलानीस्वामी यांनी दिल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. येत्या १५ दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बेहिशेबी संपत्तीप्रकरणात जयललिता यांच्या संभाव्य वारसदार आणि अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस व्ही. शशिकला दोषी असल्याचा निकाल दिला. मंगळवारी न्यायालयाचे न्या. पी. सी. घोष व न्या. अमित्व रॉय यांच्या द्विसदस्यीय पीठाने जयललिता, शशिकला व व्ही. एन. सुधाकरन, एलावरासी यांच्याविरोधात निकाल दिला होता. 

जयललिता यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे हे प्रकरण १९ वर्षे जुने होते. शशिकला या बुधवारी शरण आल्यावर बंगळुरूतील तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली आहे.बीएसएफ जवानांना मिळणार सवलतीच्या दरात पतंजलीची उत्पादने
पतंजली उद्योग समूहाच्या पहिल्या लष्करी छावणीतील दुकानाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे बुधवारी करण्यात आले आहे. येत्या काळात अशा अनेक दुकानांचा शुभारंभ होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केलेल्या पतंजलीच्या उत्पादनांची विक्री आता लष्कर छावण्यांच्या परिसरात होणार आहे.

लष्करी छावण्यांच्या कॅंटीनमधून किरकोळ वस्तूंची आणि उत्पादनांची विक्री होते. या उत्पादनांची विक्री सवलतीच्या स्वरुपात होते. बाकी बाजारभावापेक्षा कॅंटीनमध्ये विक्रीसाठी असलेल्या वस्तू स्वस्त मिळतात. 

या ठिकाणी विविध कंपन्यांची उत्पादने ठेवली जातात. पतंजलीची उत्पादने या कॅंटीनमध्ये या आधीच आली आहेत परंतु यावेळी मात्र पतंजली उत्पादनांसाठी वेगळे दुकानचंं सुरू करण्यात आले आहे.

येत्या काही दिवसांमध्ये किमान १२ दुकाने या संघटनेतर्फे उघडण्यात येणार असल्याचे बीएसएफने सांगितले. ज्या ठिकाणी बीएसएफचे तळ आहे त्या ठिकाणी ही दुकाने उघडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


या करारानुसार भारतातील विविध बीएसएफ तळांवर ही दुकाने उघडण्यात येणार आहेत. सर्व उत्पादनांवर १५ ते २८ टक्क्यांदरम्यान सवलत मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.लॉरेस जागतिक पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट खेळाडुंची निवड
क्रीडा विश्‍वातील महान धावपटू उसेन बोल्ट आणि जिम्नॅस्ट सिमोनी बिल्स यांची प्रतिष्ठेच्या लॉरेस जागतिक पुरस्कारात वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. 

खेळामधील ‘ऑस्कर’ म्हणून या पुरस्कारांची ओळख आहे. बोल्टने विक्रमी चौथ्यांदा हा पुरस्कार पटकावला. यापूर्वी बोल्ट २००९, २०१० आणि २०१३ मध्ये या पुरस्काराचा मानकरी ठरला होता. 
बोल्टला सर्वकालिक सर्वोत्तम धावपटू मायकेल जॉन्सनच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

टेनिसपटू रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, साहसी क्रीडापटू केली स्लॅटर यांनीही हा पुरस्कार यापूर्वी चार वेळा पटकावला आहे. 

बोल्टप्रमाणेच ऑलिंपिकमध्ये जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात सर्वोत्तम कामगिरी करणारी सिमोनी बिलेस महिला विभागात सर्वोत्तम खेळाडू ठरली. रियो ऑलिंपिकमध्ये तिने चार सुवर्ण आणि एक ब्रॉंझ अशी एकूण पाच पदके मिळविली. 

ऑलिंपिकमधील सर्वकालिन सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या जलतरणपटू मायकेल फेल्प्सला जोरदार पुनरागमन करणारा खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पुनरागमनाच्या स्पर्धेत त्याने पाच सुवर्णपदकांची कमाई केली.

‘फॉर्म्युला वन’ मधील जगज्जेता निको रॉसबर्ग यालदेखील ‘ब्रेक थ्रू ऑफ दि इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यापूर्वी २०१४ आणि २०१५ मध्ये उपविजेता राहिल्यानंतर गेल्यावर्षी रॉसबर्गने प्रथमच विजेतेपदाला गवसणी घातली होती.भारताचा पहिला पिकलबॉल संघ सज्ज
गेल्या काही वर्षांमध्ये चांगल्याप्रकारे प्रसार झालेल्या पिकलबॉल या अनोख्या क्रीडाप्रकाराने भारतात आपला मजबूत जम बसवला आहे.

२००७ साली भारतीयांना ओळख झालेल्या या खेळाचा पहिला आंतरराष्ट्रीय संघ सज्ज झाला असून १८ व १९ फेब्रुवारीला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी २३ सदस्यांचा भारतीय संघ १७ फेब्रुवारीला बँकॉक (थायलंड) येथे रवाना होणार आहे.

बँकॉक येथील सँटीसुक इंग्लिश स्कूलच्या वतीने ‘बँकॉक खुल्या पिकलबॉल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यास्पर्धेसाठी भारतातील २३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे, भारताच्या या पहिल्या वहिल्या संघामध्ये ५ मुंबईकरांचा समावेश असून राजस्थानचे सर्वाधिक १० खेळाडू भारतीय संघात आहेत. 
बिहारच्या रंजन कुमार गुप्ताकडे भारताची धुरा सोपविण्यात आली असून तो पिकलबॉल राष्ट्रीय संघाचा पहिला कर्णधार ठरला आहे.स्मार्टफोन विक्रीत सॅमसंगला मागे टाकत अॅपल नंबर १
सॅमसंगला मागे टाकत अॅपलने जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत अव्वल स्थान काबीज केले आहे. दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच अॅपलने सॅमसंगला मागे टाकले आहे. 


अॅपलने चौथ्या तिमाहीमध्ये ७ कोटी ७० लाख ४ हजार स्मार्टफोनची विक्री केली आहे. तर सॅमसंगने गेल्या तिमाहीत ७ कोटी ६७ लाख ८ हजार स्मार्टफोनची विक्री केली आहे. गार्टनर या संशोधन संस्थेने याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

सध्या अॅपलकडून जगभरातील स्मार्टफोन बाजारपेठेचा १७.९% हिस्सा नियंत्रित केला जातो. तर सॅमसंगचा स्मार्टफोन बाजारपेठेतील हिस्सा १७.८% इतका आहे. 

गॅलेक्सी नोट ७ च्या बॅटरीमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचा फटका सॅमसंगला बसला आहे. तर आयफोन ७ प्लसला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाचा फायदा अॅपलला झाला आहे. 

४ कोटींहून अधिक स्मार्टफोनची विक्री करत हुवाईने सॅमसंग आणि अॅपलला काही प्रमाणात धक्का दिला आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत हुवाईने अॅपल आणि सॅमसंगनंतर तिसरे स्थान पटकावले आहे.ड्रोनच्या मदतीने परागीभवनाची क्रिया शक्य
कीटकांच्या आकाराचे ड्रोन जपानी वैज्ञानिकांनी तयार केले असून त्यांना घोडय़ाचे केस व चिकट जेल लावल्याने त्यांचा वापर पिकांच्या परागीभवनासाठी करणे शक्य होणार आहे. एरवी परागीभवनातून पिकांच्या उत्पादनास मदत करण्याचे काम मधमाशा करीत असतात पण आता त्यांची संख्या घटत आहे.

एक प्रकारे हे ड्रोन म्हणजे कृत्रिम परागीभवनकारक आहेत त्यात घोडय़ाचे केस व चिकट जेल वापरले असल्याने परागकण या केसांना चिकटून पसरतात. एका फुलापासून ते दुसऱ्या फुलावर जाऊन पडतात त्यामुळे जैवविविधता साधली जाते. संशोधकांच्या मते या ड्रोन्सचा वापर कृषी उत्पादन वाढीसाठी करता येईल, त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी होईल.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्सड इंडस्ट्रीयल सायन्स अँड टेक्नॉलॉजी व नॅनोमटेरियल रीसर्च इन्स्टिटय़ूट या जपनमधील संस्थांचे प्रमुख वैज्ञानिक एजिरो मियाको यांनी ही माहिती दिली. 

रोबोटिक पॉलिनेटर्सना परागीकरणाचे मार्ग शिकवण्यासाठी जीपीएस व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईळ, २००७ पासून विद्युत वाहक म्हणून काम करणाऱ्या द्रवांचा ते शोध घेत होते त्यातून हेअर वोक्स हा चिकट पदार्थ तयार करण्यात आला पण तो त्यांनाच उपयोगी वाटला नाही. नंतर त्यांनी मधमाशा व घरमाशा, मुंग्या यांच्या अभ्यासातून त्यांनी परागकण उचलू शकणारे चिकट केस तयार केले.

अपघातानेच हा शोध लागला असे श्वेतलान चेचेतका यांनी सांगितले. त्यांनी प्रथमच मुंग्यांना चिकट पदार्थ लावून त्यांना टय़ुलिरच्या शेतात सोडले नंतर त्यांच्या पायाला परागकण चिकटलेले दिसले. 

नंतर त्यांनी १०० डॉलर खर्चाचे ड्रोन तयार करून त्याला घोडय़ाचे केस व चिकट पदार्थ लावला त्यामुळे जास्त परागकण त्याला चिकटू लागले, त्यात विद्युत भार निर्माण होऊन ते केसांवर टिकू लागले म्हणजे पडून जात नव्हते. त्यांनी या ड्रोनचा वापर जपानच्या लिलियम जापोनिकम या गुलाबी पाने असलेल्या फुलांवर केला. त्यातून परागीभवन होऊ शकते असे स्पष्ट झाले.