जगातील सर्वात मोठा पेट्रोप्रकल्प कोकणात उभारणार
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिदुस्तान पेट्रोलियम या तीन सरकारी तेल कंपन्या मिळून उभारणार असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील बाभुळवाडी गावाची निवड निश्चित झाली आहे.


मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजचा जामनगर, गुजरात येथील ३३ लाख टन वार्षिक क्षमतेचा प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना म्हणून गणला जातो. 

बाभुळवाडी प्रकल्पाची क्षमता याहून सुमारे दुप्पट म्हणजे वार्षिक ६० लाख टन एवढी असेल. या प्रकल्पासाठी सुमारे १.५ लाख कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असून त्यातून रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील.

सर्व बाबींचा तौलनिक अभ्यास करून बाभुळवाडीची अंतिमत: निवड करण्यात आली. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम करणाऱ्या इंजिनीअर्स इंडिया लि.ने प्रकल्प उभारणीसाठी प्राथमिक अभ्यास व तयारी सुरू केली आहे.पंतप्रधानांच्या हस्ते ११२ फूट उंच शिवप्रतिमेचे अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाशिवरात्रीच्या निमित्ताने ११२ फूट उंचीच्या शिवप्रतिमेचे अनावरण करण्यासाठी शुक्रवार संध्याकाळी कोईम्बतूर येथे दाखल होणार आहेत. 

‘इशा योग केंद्र’ या ठिकाणी शिवप्रतिमेचे अनावरण करण्यात येणार आहे. ११२ फूट उंचीच्या या भव्य पुतळ्याची निर्मिती ‘ईशा फाऊंडेशन’ने कोईम्बतूरमध्ये केली आहे.


पुतळा तयार करण्यासाठी फाऊंडेशनने जंगलात खूप आतपर्यंतच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा दावा काही स्थानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, आठवडाभरापूर्वी मद्रास उच्च न्यायालयात फाऊंडेशनविरोधात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती.

‘हिल एरिया कंजर्व्हेशन अॅथॉरिटी’ची परवानगी न घेता फाऊंडेशनने मोठ्या प्रमाणावर निर्माण कार्य करून नियमांचे उल्लंघन केल्याचे माध्यमातील वृत्तात विरोधकांचा हवाला देत म्हटले आहे. 

डोंगराळ भागात कोणत्याही प्रकारच्या बांधकामासाठी मंजुरी देण्याची जबाबदारी ‘हिल एरिया कंजर्वेशन अॅथॉरिटी’वर आहे. या सर्व प्रकाराची माहिती राष्ट्रीय हरित लवादाला देण्यात आली होती. पूजा घाटकरला १० मी एअर रायफल ‘वर्ल्डकप’ स्पर्धेत कांस्यपदक
भारताची नेमबाज पूजा घाटकर हिने नेमबाजीच्या वर्ल्डकपमध्ये १० मी एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे. ऐनवेळी आलेल्या तांत्रिक अडचणीवर मात करूनही पूजाने आत्मविश्वास कायम ठेवून कांस्य पदकावर नाव कोरले. २८ वर्षीय पूजा घाटकरने १० मी एअर रायफलमध्ये सुरूवातीपासून चांगली कामगिरी केली.

ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केलेल्या गगन नारंगच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱया पुजाने स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत २२८.८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. तर चीनच्या मेन्ग्यो शी हिने २५२.१ गुणांसह नव्या विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली. 

पुजा घाटकर हिला डोंग लिजे हिने तोडीस तोड लढत दिली. मात्र अखेरच्या क्षणी अचूक नेमबाजी करीत लिजे हिने २४८.९ गुणांपर्यंत मजल मारली. आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केलेल्या पूजा घाटकर हिचे वर्ल्डकप स्पर्धेतील हे पहिलेच पदक ठरले आहे. 

पूजाला रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अवघ्या काही गुणांच्या फरकामुळे मुकावे लागले होते. त्यानंतर पूजाने अविरत मेहनत आणि सरावाच्या जोरावर कामगिरीत सुधारणा करत वर्ल्डकपमध्ये मजल मारली. घाटकरने अंतिम फेरीत १९ व्या प्रयत्नात १०.८ आणि २१ व्या प्रयत्नात १०.७ असा अचूक लक्ष्यवेध करत कांस्य पदकावर शिक्कामोर्तब केले.२६ फेब्रुवारी रोजी होणार कंकणाकृती सूर्यग्रहण
या महिन्याच्या शेवटी होणारे सूर्यग्रहण जगभरातील खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. सर्व जगभरात या सूर्यग्रहणाविषयी चर्चा होत आहे. या महिन्यात होणारे सूर्यग्रहण हे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ठरणार आहे. सुर्यासमोरुन चंद्र जाणार आहे, तेव्हा हे सूर्यग्रहण होईल. 

या सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. म्हणजेच सूर्य एखाद्या बांगडीसारखा दिसणार आहे. हे सूर्यग्रहणा पाहण्यासाठी जगभरातील सर्व खगोलप्रेमी उत्सुक आहेत. जाणून घेऊया या सूर्यग्रहणाविषयी.

२६ फेब्रुवारी रोजी हे सूर्यग्रहण होणार आहे. चंद्र सूर्यासमोर येईल आणि सूर्याच्या फक्त चमकदार कडा आपल्याला दिसतील. त्यामुळेच या सूर्यग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहण हा एक नैसर्गिक योगच असतो. या सूर्यग्रहणाची सुरुवात चिलेमधून होणार आहे आणि दक्षिण अमेरिकेमध्ये सकाळी सकाळपासून दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराच्या भागात हे सूर्यग्रहण दिसेल. नैऋत्य अफ्रिकेमध्ये हे सूर्यग्रहण संपेल.

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्यावर ग्रहण होते. पृथ्वीभोवती फिरताना २६ फेब्रुवारीला चंद्र सूर्या समोरुन जाईल. सूर्यग्रहण हे पूर्णपणे नैसर्गिक असते परंतु काही ठिकाणी सूर्यग्रहणाला अशुभ मानले जाते. हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असा सल्ला देण्यात आला आहे.

हे सूर्यग्रहण भारतीय खगोलशास्त्र प्रेमींना पाहता येणार नाही. हे सूर्य ग्रहण केवळ लॅटिन अमेरिका, नैऋत्य अफ्रिका, प्रशांत महासागर, अटलांटिक आणि अंटार्टिका या भागात दिसणार आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्र प्रेमी या सूर्याग्रहणाला मुकणार आहेत.चिनी कोबीची लागवड अवकाश स्थानकात यशस्वी
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात चिनी कोबीची लागवड यशस्वी झाली असून त्यात कोबीला चांगली पानेही आली आहेत असे नासाने म्हटले आहे.

अवकाश स्थानकातील अंतराळवीरांनी अजून कोबीचे सेवन केलेले नाही. चिनी प्रकारातील टोकियो बेकाना नावाची ही कोबीची प्रजाती असून ती अवकाशवीर पेगी व्हिटसन यांनी वाढवली आहे. थोडी कोबी खाण्यासाठी वापरली जाणार असून बाकीची नासाच्या केनेडी अवकाश केंद्रात अभ्यासासाठी परत पाठवली जाणार आहे. अवकाश स्थानकात वाढवलेले हे पाचवे पीक आहे.


चिनी कोबी प्रथमच वाढवण्यात आली असून पाने असलेल्या भाज्यांचे अवकाशातील गुणधर्म तपासण्याचा त्यात हेतू आहे, या भाज्यांमध्ये पोषणमूल्येही वाढवता येणार आहेत. नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरच्या स्पेस फूड सिस्टीम्स टीमने काही स्वयंसेवक गोळा केले असून ते या भाजीचा स्वाद घेणार आहेत.

टोकियो बेकाना ही कोबीची चांगली प्रजाती असून खगोल वैज्ञानिक नेहमी असे सांगतात की, अवकाशात त्यांच्या जिभेवरील रूची कलिका काम करीत नाहीत त्यामुळे ते नेहमी सॉस, मध व सॉय सॉस हे चवीसाठी वापरतात.

गुरुत्व कमी असलेल्या परिस्थितीत अवकाशवीरांच्या शरीरातील अर्धद्रव हे पायाकडे न जाता सगळीकडे पसरतात. पृथ्वीवर हे अर्धद्रव पायाकडे जात असतात. ताजी चिनी कोबी जरी वापरली तरी त्यांच्या रुचिकलिका उद्दिपीत झाल्या नाहीत तर त्यावर टाकण्यासाठी वेगळे पदार्थ रांच ड्रेसिंगच्या स्वरूपात पाठवले जाणार आहेत.

आता आणखी एक भाजी अवकाशात वाढीसाठी पाठवली जाणार आहे, अवकाश स्थानकात त्यामुळे बगीचाच तयार होणार आहे. पुढील काळात अरबिडॉप्सिस ही सपुष्प वनस्पती पाठवण्यात येणार आहे. जनुकीय कारणास्तव ती महत्त्वाची आहे.

अवकाशात वनस्पती कसे जुळवून घेतात यावर त्यामुळे प्रकाश पडेल असे फ्लोरिडा विद्यापीठाच्या प्रमुख संशोधक डॉ. अ‍ॅना लिसा पॉल यांनी सांगितले. भाज्यांची लागवड ही आगामी मोहिमांमध्ये अवकाशवीरांना ताजे अन्न उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाची आहे.भारतातील ‘आयटी’ क्षेत्रास युरोपचे निमंत्रण
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाद्वारे एच वन बी व्हिसासंदर्भात कडक धोरण अवलंबिले जाण्याच्या शक्‍यतेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय सरकार चिंतीत असताना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीयांना अधिक संख्येने सामावून घेण्याचे सकारात्मक संकेत युरोपिअन युनियनने दिले आहेत.

जागतिक व्यापारासंदर्भात कोणत्याही स्वरुपाच्या “प्रोटेक्‍शनिज्म” धोरणाचा अंगीकार केला जाणार नाही, असे स्पष्ट संकेत इयुने यावेळी दिले. 

युरोपिअन संसदेमधील परराष्ट्र व्यवहार समितीचे शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आल्ले आहेत. यावेळी त्यांनी यासंदर्भातील इयुची भूमिका स्पष्ट केली.

इयु व भारतामध्ये प्रस्तावित असलेला संवेदनशील ‘व्यापार व गुंतवणूक करार’ हा मोठ्या काळासाठी प्रलंबित राहिला आहे. या करारासंदर्भात पुन्हा बोलणी सुरु करण्यास दोन्ही बाजुंना आलेल्या अपयशासंदर्भात इयुकडून यावेळी ‘चिंता’ व्यक्त करण्यात आली आहे. 

तसेच याचबरोबर, या करारामध्ये इयु व भारतामधील सध्याच्या व्यापाराची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची क्षमता असल्याचे सांगत शिष्टमंडळातर्फे यावेळी यासंदर्भातील चर्चा लवकर सुरु करण्याचे आवाहन भारतीय नेतृत्वास करण्यात आले. या करारावर २०१३ नंतर चर्चा झालेली नाही.

युरोप हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल कामगार असलेल्या भारतीयांना अधिक संख्येने सामावून घेण्यास तयार असल्याचे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असलेल्या डेव्हिड मॅकऍलिस्टर यांनी स्पष्ट केले.