नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये बदलणार
बनावट नोटांना आळा घालण्यासाठी पाचशे व दोन हजारच्या नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये जागतिक मानकांनुसार दर तीन ते चार वर्षांनी बदलण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. 


नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडू लागल्याने सरकारने हा प्रस्ताव आणला आहे. अनके विकसित देशांमध्ये नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये दर तीन ते चार वर्षांनी बदलण्यात येतात. त्यामुळे भारताने याचे अनुकरण करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. 


कोलकत्यातील भारतीय सांख्यिकी संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, देशात २०१६ मध्ये चारशे कोटी रुपयांच्या बनावट नोटा चलनात होत्या. 

भारतातील उच्च मूल्याच्या नोटांचा आकार बदलण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित होता. एक हजार रुपयांची नोट २००० मध्ये चलनात आल्यानंतर त्यात फार मोठे बदल करण्यात आले नव्हते. तसेच, १९८७ मध्ये चलनात आणलेल्या पाचशेच्या नोटेतही दशकभरापूर्वी बदल करण्यात आले होते. 

नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आणलेल्या नोटांमधील सुरक्षा वैशिष्ट्ये एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांसारखीच आहेत. मागील काही काळात जप्त केलेल्या बनावट नोटांची तपासणी केली असता दोन हजार रुपयांच्या नोटेतील १७ सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी ११ वैशिष्ट्ये बनावट नोटेत आढळून आली.भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
जम्मू काश्मीरमधील चेनानी ते नशरी या भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे आज(रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच जम्मु काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आदी मान्यवर उपस्थित होते. 

जम्मु-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हो बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यामुळे जम्मु-श्रीनगर हा प्रवास ३० किलोमीटर ने कमी होईल आहे तर या प्रवासातील दोन तास वेळ वाचणार आहे.

देशातील या सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी ९.२८ किलोमीटर आहे. २०११ साली या बोगद्याचे काम सुरु करण्यात आले होते. जवळपास सात वर्षाच्या मेहनतीनंतर या बोगद्याचे काम पुर्ण झाले असुन त्यासाठी ३७०० कोटी रुपये इतका खर्च लागला. 

अत्याधुनिक सुरक्षा असलेल्या या बोगद्यामध्ये १२४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी बोगद्या बाहेर पोलिस तैनात असणार आहेत. ‘एसबीआय’चा जगातील टॉप ५० बँकांमध्ये समावेश
देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या मुख्य स्टेट बँकेत (एसबीआय) पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले आहे. त्यामुळे आता एसबीआय जगातील ४५ व्या क्रमांकाची सर्वांत मोठी बॅंक बनली आहे.

एसबीआयमध्ये आज (शनिवार) स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि स्टेट बँक आॅफ पतियाळा या एसबीआयच्या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले आहे. 

विलीनीकरणानंतर आता सर्व बँकांची सर्व प्रकारची मालमत्ता एसबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच पाचही सहयोगी बँकांचा कर्मचारी वर्ग आणि बँकेचे ग्राहक देखील मुख्य एसबीआयमध्ये हस्तांतरित झाले आहेत.

पाचही बँकांचे मुख्य एसबीआयमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर एसबीआयचा ताळेबंद ४१ लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. आता देशभरात बॅंकेच्या २२५०० शाखा, भारतभर विविध राज्यांमध्ये ५८००० एटीएम आणि ग्राहकांची संख्या ५० कोटींवर पोचली आहे.पी. व्ही. सिंधूला विजेतेपद
सिंधूने भारतीय बॅडमिंटनची शान उंचावताना रिओ ऑलिंपिक रौप्यपदकानंतर मायदेशात प्रथमच विजेतेपद जिंकले. या यशामुळे तिने जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळविला. तसेच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानापासून काही गुणच दूर आहे.

पी. व्ही. सिंधूने स्मॅशचा धडाका करीत ऑलिंपिक विजेत्या कॅरोलिन मरिनला तिच्या क्षमतेचा पूर्ण कस बघण्यास भाग पाडले, पण अखेर ऑलिंपिक विजेती मरिन हिला सलग दुसऱ्यांदा सिंधूसमोर शरणागती पत्करावी लागली. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूने ऑलिंपिक विजेतीचा प्रतिकार 21-19, 21-16 असा सहज मोडून काढला. 

रिओ ऑलिंपिकच्या अंतिम लढतीत तीन गेममध्ये हार पत्करल्यानंतर सिंधूने मरिनला दुबईत दोन गेममध्ये हरवले होते. पण त्या वेळी मोसम संपत आहे. मरिन थकलेली आहे, असे सांगून सिंधूच्या विजयाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र या वेळी सिंधूने पूर्णपणे तंदुरुस्त असलेल्या मरिनला तिचा खेळ करण्याची संधीच दिली नाही. 

सिंधू आणि मरिन यांच्यातील ही नववी लढत होती. यापूर्वीच्या आठ सामन्यांत मरिनचे ५-३ असे वर्चस्व होते. यापूर्वीच्या लढतीत सिंधूचा दोन गेममध्येच विजय  दोघींतील भारतातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील लढत मरिनने जिंकली होती, २०१५ च्या सय्यद मोदी स्पर्धेत मरिनने दोन गेममध्येच बाजी मारली होती. 

दोघींत २०११ च्या मालदीव चॅलेंजमध्ये प्रथम लढत, त्यात सिंधूची सरशी होती. सिंधूला त्यानंतरच्या मरिनविरुद्धच्या विजयासाठी २०१५ च्या ऑक्‍टोबरपर्यंत (डेन्मार्क ओपन) प्रतीक्षा करावी लागली होती. सिंधूचे ऑलिंपिक रौप्यपदकानंतरचे हे दुसरे सुपर सीरिज विजेतेपद आहे. तिने गतवर्षी चायना ओपन जिंकली होती. किरणे सरळ जमिनीवर पोचल्याने तापमान वाढ
शुष्क हवामान, निरभ्र आकाशामुळे सूर्यकिरणे सरळ जमिनीवर पोचल्याने काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली. सध्या कर्कवृत्ताच्या मध्यावर सूर्य असून, कर्कवृत्ताचे अक्षांश हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा येथून गेले आहेत. 

परिणामी, या राज्यात तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या वर गेले. यामुळे उष्ण झालेली ही हवा तीन दिवसांत उत्तर भारत, पश्‍चिम, मध्य भारतातील प्रामुख्याने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्रात आली. 

गेल्या आठवड्यात उत्तर आणि पश्‍चिम भारतात निर्माण झालेली उष्णतेची लाट ही मध्य प्रदेशातील उच्च दाबामुळे निर्माण झालेल्या वादळामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा इकडे वळली. 

हवामान खात्याने वर्तविलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र सरकारने हिट ऍक्‍शन प्लॅनअंतर्गत २२ जिल्ह्यांचा समावेश केला आहे. गेल्या आठवड्यात या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. यामध्ये विदर्भातील ११, मराठवाड्यातील ८, नाशिक विभागातील २, पुणे विभागातील १ जिल्ह्याचा समावेश आहे. 

हिट ऍक्‍शन प्लॅनचा हेतू हा, की उष्माघातामुळे होणारे मृत्यू रोखणे. उष्माघात झालेल्या व्यक्तीवर तातडीने उपचार सुरू करणे. अन्य सेवा देणे. सर्व जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांत सर्व उपचार उपलब्ध करणे. ऍक्‍शन प्लॅननुसार या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. गुरूची 7 एप्रिलला प्रतियुती, गुरू येणार पृथ्वीजवळ
सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह गुरू हा ७ एप्रिलला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. ‘ज्युपिटर अॅट अपोझिशन’ या दिवशी गुरू व सूर्य समोरासमोर राहील. प्रतियुती काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सरासरी कमी असते.

गुरूच्या लागोपाठ प्रतियुतीमधील काळ हा साधारण तेरा महिन्यांचा असतो. याआधी ८ मार्च २०१६ रोजी गुरू-सूर्य प्रतियुती झालेली होती. 

पृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर ९३ कोटी किलोमीटर आहे. त्याचा व्यास १४२८०० किलोमीटर आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास ११.८६ वर्षे लागतात. गुरूला एकूण ६७ चंद्र आहेत. टेलिस्कोपमधून गुरूचे निरीक्षण केले असता त्याच्यावरील पट्टा व ४ चंद्र दिसतात. पृथ्वीपेक्षा गुरू हा ११.२५ पट मोठा आहे. 

७ डिसेंबर १९९५ रोजी मानवरहित यान गॅलिलिओ गुरूवर पोचले होते. मात्र गुरूवर सजीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळालेला नाही.

आरक्‍त ठिपका हे गुरूचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रेट रेड स्पॉट या नावाने हा ठिपका ओळखला जातो. हा ठिपका ४० हजार किलोमीटर लांब आणि १४ हजार किलोमीटर रुंद अशा अवाढव्य आकाराचा आहे. या ठिपक्‍यात पृथ्वीसारखे ३ ग्रह एकापुढे एक ठेवता येतील. 

न्यूटनकाळापासून म्हणजे जवळजवळ ३०० वर्षे हा ठिपका खगोल शास्त्रज्ञ पाहत आलेले आहेत. या ठिपक्‍याचे निरीक्षण केले असता ते एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे सहज लक्षात येईल. गुरूवर सतत घोंगावणारे चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणीच का निर्माण झाले, याचे कारण मात्र अजूनही अज्ञात आहे.

७ एप्रिल रोजी सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू हा पूर्व क्षितिजावर उगवेल आणि पहाटे पश्‍चिमेस मावळेल. हा ग्रह अतिशय तेजस्वी असल्याने सहज ओळखता येईल व साध्या डोळ्यांनीही पाहता येईल. 

परंतु गुरूवरील ग्रेट रेड स्पॉट व युरोपा, गॅनिमिड आयो व कॅलेस्टो हे त्याचे चार चंद्र साध्या डोळ्यांनी दिसू शकणारे नाहीत. त्यासाठी टेलिस्कोपची आवश्‍यकता आहे.