राज्यात ‘सर्वांसाठी’ एक लाख घरे
केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने ‘सर्वांसाठी घरे’ या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत १७ राज्यांमधील ५३ शहरांतील ३५२ प्रस्तावित गृहप्रकल्पांची यादी जाहीर केली. 


या दोन लाख प्रस्तावित घरांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वांधिक म्हणजे तब्बल एक लाख घरे येणार आहेत. या गृहप्रकल्पांचे बांधकाम लवकरच पूर्ण केले जाणार असून, राज्यातील ९ ते १० शहरांत हे प्रकल्प उभे केले जाणार आहेत. 

मुंबई, पुण्यासह मालेगाव आणि नगर आदी शहरांचा यात समावेश आहे. खासगी भागीदारीतून तब्बल दोन लाखांवर परवडणारी घरे साकारणारी ही देशातील पहिलीच योजना ठरणार आहे.

याअंतर्गत महाराष्ट्रात एक लाख, राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ४१९२१, गुजरातमध्ये २८४६५, कर्नाटकात ७०३७, तर उत्तर प्रदेशात ६०५५ घरकुले बांधण्यात येतील. हृदय प्रत्यारोपणात आशियात चेन्नईची बाजी
चेन्नईतील १५० वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रविवारी झाली. आशिया खंडात सर्वांत जास्त हृदय प्रत्यारोपणात चेन्नईने बाजी मारली आहे. याचा खर्च तमिळनाडू सरकारच्या मुख्यमंत्री आरोग्य योजनेतून करण्यात आला.

तमिळनाडूतील थिरुवनमलाई येथील ३१ वर्षांच्या महिलेवर फोर्टिस मलार या रुग्णालयात ही १५० वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन वर्षांचे बाळ असलेल्या या मातेला प्रसूतीनंतर हृदयाचा आजार (पोस्टपार्टम कार्डिओमायोपॅथी) झाला होता. हा आजार शेवटच्या टप्प्यात पोचला होता. 
तिला १ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

आठवडाभरानंतर पुद्दुचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या ३० वर्षांच्या तरुणाचा मेंदू मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. 

दिलेल्या अवयवांपैकी हृदय या महिलेला देण्याचा निर्णय ‘ट्रान्सटान’ने (ट्रान्सप्लांट ॲथॉरिटी ऑफ तमिळनाडू) घेतला. त्यानुसार पुद्दुचेरी येथून हृदय चेन्नईला आणण्यासाठी तमिळनाडू पोलिसांच्या मदतीने ‘ग्रीन कॉरिडोर’ करण्यात आला होता. ही शस्त्रक्रिया काल झाली.ईबेचा भारतीय व्यवसाय आता फ्लिपकार्टकडे!
ऑनलाईन बाजारपेठ फ्लिपकार्टने ईबे इंडियाचा व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच, कंपनीने नव्या गुंतवणूक फेरीत मायक्रोसॉफ्ट, टेन्सेन्ट आणि ईबे या बड्या कंपन्यांकडून तब्बल १.४ अब्ज डॉलरचा निधी उभा केल्याची माहिती दिली. यानंतर आता कंपनीचे बाजारमूल्य ११.६ अब्ज डॉलरएवढे झाले आहे, अशी माहिती कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

फ्लिपकार्टला गेल्या दशकभरात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे, एखाद्या इंटरनेट कंपनीने एवढा निधी उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीने ईबेसोबत विशेष धोरणात्मक करार केला आहे. याअंतर्गत ईबे फ्लिपकार्टमधील इक्विटी हिस्सेदारीसाठी रोख पैसे मोजणार आहे आणि आपल्या भारतीय व्यवसायाची फ्लिपकार्टला विक्री करणार आहे. या व्यवहारानंतरदेखील ईबे.इनचे कामकाज स्वतंत्रपणे सुरु राहणार आहे


ईबेसोबत भागीदारीमुळे फ्लिपकार्टला आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्ताराची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, कंपनीच्या ग्राहकांना ईबेच्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांची व्हरायटी उपलब्ध होईल आणि ईबेच्या ग्राहकांना फ्लिपकार्टवरील विक्रेत्यांची विशेष भारतीय उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल.भारत- ऑस्ट्रेलियामध्ये सहा करार
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्या भारत दौऱ्याला सोमवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सहा करार झाले असून दहशतवाद, संघटीत गुन्हेगारी अशा विविध विषयांवरील करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. 

या दौऱ्यात दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यावर भर असेल असे त्यांनी सांगितले. आम्ही भारतासोबत एकत्र काम करु इच्छितो. ऑस्ट्रेलियात सुमारे पाच लाख नागरिक भारतीय वंशाचे आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.


माल्कम टर्नबुल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद हाऊसमध्ये स्वागत केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय बैठक झाली. यामध्ये दोन्ही देशांनी सहा करारांवर स्वाक्षरी केली. यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. 

भारतीय विद्यार्थ्यांना चांगली संधी आणि सोयी सुविधा दिल्या जातील असे टर्नबुल यांनी सांगितले. दहशतवादविरोधी करार तसेच मानवी तस्करी, आर्थिक गैरव्यवहार आणि अन्य गुन्ह्यासंबंधीच्या करारामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होतील अशी आशाही त्यांनी वर्तवली आहे.

सोमवारी टर्नबुल यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर टर्नबुल यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. २०१४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान टॉनी अॅबोट भारत दौऱ्यावर आले होते. यानंतर मोदीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले होते.भारतीय महिलांची विजयी भरारी
बेलारुसचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाने जागतिक हॉकी लीग दुसऱ्या फेरीत चिलीला नमवले. या विजयासह भारतीय संघ जागतिक लीगच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. 

निर्धारित वेळेत सामना १-१ बरोबरीत सुटला. शूटआऊटमध्ये भारतीय संघाने ३-१ अशी बाजी मारली. भारताची गोलरक्षक सविताला स्पर्धेतील सवरेत्कृष्ट गोलरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शूटआऊटमध्येही सविताने शानदार बचावाचे प्रदर्शन करताना चिलीच्या किमी जेकब आणि जोसेफा व्हिलाबेइटा या आघाडीपटूंना गोल करण्यापासून रोखले. 

कर्णधार राणी आणि मोनिका यांनी प्रत्येकी एक गोल करत शूटआऊटमध्ये भारताला आघाडी मिळवून दिली. चिलीच्या कॅरोलिन गार्सिआने गोल करत चिलीचे खाते उघडले. मात्र दीपिकाने भारतातर्फे गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.भारतीय वंशाच्या महिलेला ‘बिझनेस वूमन ऑफ द ईयर’
ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीय वंशाच्या महिला शिक्षणतज्ज्ञाला ‘एशियन बिझनेस वूमन ऑफ द ईयर’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आशा खेमका (वय६५) असे या शिक्षिकेचे नाव असून, त्यांचा आज येथील एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. 

आशा खेमका या त्यांच्या विवाहानंतर ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या. त्या वेळी इंग्रजी भाषेचे ज्ञान नसतानाही त्यांनी जिद्दीने ही भाषा आत्मसात करत आज त्या वेस्ट नॉटिंगहॅमशायर महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिक्षणक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

खेमका या मूळ बिहारमधील सीतामढी गावातील असून, वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी शाळा सोडून दिली होती. यानंतर वयाच्या पंचविशीमध्ये आपल्या पती आणि मुलांसह त्या ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या. येथे आल्यावर टीव्हीवरील लहान मुलांचे कार्यक्रम पाहत त्या इंग्रजी शिकल्या. 

त्यांनी कॅराडिफ विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि नंतर त्या प्राध्यापिका झाल्या. २०१३ मध्ये त्यांना ‘डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा ब्रिटनमधील अत्यंत प्रतिष्ठेचा नागरी सन्मान प्राप्त झाला. 

हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या १९३१ नंतरच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला होत. १९३१ मध्ये हा पुरस्कार धार संस्थानच्या महाराणी लक्ष्मीदेवीबाई साहिबा यांना मिळाला होता. भारतीय नौदलाची चीन, पाकिस्तानसह संयुक्त कारवाई
आशिया खंडातील दोन सर्वात मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये कायमच वर्चस्वाची लढाई सुरु असते. मात्र एडनच्या आखातात चक्क भारत, चीन आणि पाकिस्तानने संयुक्त कारवाई केली आहे. सोमालियन चाच्यांकडून एका मालवाहू जहाजावर हल्ला करण्यात आल्यानंतर भारत, चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांनी संयुक्त कारवाई केली. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

ओएस ३५ हे मालवाहू जहाज मलेशियातील केलांगमधून निघाले असताना एडनच्या आखातात त्यावर हल्ला झाला. यानंतर धोक्याचा संदेश मिळाल्यानंतर भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई आणि आयएनएस तरकश जहाजे ज्या भागात हल्ला झाला, त्या ठिकाणी पोहोचली. ही दोन्ही जहाजे या भागात तैनात असलेल्या चार जहाजांच्या ताफ्याचा भाग होती.

भारतीय नौदलाची जहाजे हल्ला झालेल्या ठिकाणी पोहोचताच चीन आणि पाकिस्तानच्या नौदलाची जहाजेदेखील संबंधित ठिकाणी आली. चीनने ओएस-३५ या १७८ मीटर जहाजाच्या मदतीसाठी १८ जणांचे पथक पाठवले. तर भारतीय नौदलाने या जहाजासाठी कम्युनिकेशन लिंक उपलब्ध करुन दिली. यासोबतच या संपूर्ण मोहिमेला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हवाई मदत देण्याची कामगिरीदेखील भारतीय नौदलाने पार पाडली.

चिनी नौदलाच्या युलीन या जहाजानेदेखील कारवाईत सहभाग घेतला. युलीनवरुन क्षेपणास्त्र डागण्यात आली. त्यामुळे मालवाहू जहाजाची सुखरुप सुटका होण्यास मदत झाली.