ज्येष्ठ नेपथ्यकार संजय काशिकर यांचे निधन
नागपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी आणि विदर्भातील आघाडीचे नेपथ्यकार संजय काशिकर यांचे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व मुलगी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे.


तीन दशकांपेक्षा अधिक काळ रंगभूमीची प्रामाणिक सेवा करणाऱ्या या कलावंताची अचानक एक्‍झीट सर्वांना चटका लावून गेली. शेफ विष्णू मनोहर यांचा ५३ तास स्वयंपाकाचा विश्‍वविक्रम
अमेरिकेचे बेंजामिन पेरी यांचा सलग ४० तास स्वयंपाकाचा विश्‍वविक्रम मोडीत काढून सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी ५३ तासांचा नवा विश्‍वविक्रम नोंदवला.

नागपूर येथील इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात त्यांनी हा विक्रम रचला. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लवकरच त्यांचे नाव नोंदविण्यात येईल. 

विष्णू मनोहर यांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजता ५० तासांचे लक्ष्य ठेवून हा प्रवास सुरू केला. एक हजारांपेक्षा अधिक पदार्थ तयार करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, विश्‍वविक्रम तासांच्या आधारावर रचायचा असल्यामुळे त्यांनी त्यावरच लक्ष केंद्रीत केले आणि साडेसातशे पदार्थ तयार केले.

सायंकाळी ५:३० वाजता त्यांनी कुकिंग मॅराथॉनला पूर्णविराम दिला. या प्रवासाचा एकूण कालावधी साडेसत्तावन्न तास एवढा होता. मात्र, नियमानुसार प्रत्येक तासाला पाच मिनिटे या अनुषंगाने २८५ मिनिटे (जवळपास साडेचारतास) त्यांना विश्रांती घेता येणार होती. त्यामुळे विश्रांतीचा कालावधी वगळून ५३ तासांच्या विश्‍वविक्रमावर विष्णू मनोहर यांनी मोहर उमटवली. विकासासाठी निती आयोगाचा १५ वर्षांचा आराखडा
पंचवार्षिक योजना तयार करणाऱ्या योजना आयोगाच्या जागी आलेल्या निती आयोगाने आगामी पंधरा वर्षांतील वाटचालीसाठीचा ‘विकास आराखडा दस्तावेज’ तयार केला आहे. सर्व मुख्यमंत्र्यांचा समावेश असलेल्या निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची आज या आराखड्यावर चर्चा झाली. 

निती आयोगाच्या प्रशासकीय मंडळाची ही तिसरी बैठक होती. पहिल्या बैठकीमध्ये केंद्र आणि राज्यांच्या योजनांमधील सहकार्यावर चर्चा झाली होती, तर गेल्यावर्षी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे उपगट तयार करणे, दारिद्य्र निर्मूलन आणि कृषी विकासामध्ये राज्यांचा सहभाग वाढविण्यासाठी कृती दल बनविणे यासारखे निर्णय झाले होते. 

त्यापार्श्‍वभूमीवर, देशाच्या आर्थिक विकासासाठी 15 वर्षांचे व्हिजन डॉक्‍युमेंट (दस्तावेज) तयार करणे, यात सात वर्षांचा रणनिती दस्तावेज आणि तीन वर्षांची कृती योजना तयार करणे, हा बैठकीचा मुख्य उद्देश होता. 

निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडीया यांनी देशातील आर्थिक बदलासाठीच्या तातडीच्या उपाययोजनांसाठीचे सादरीकरण केले. सोबतच, GSTच्या (वस्तू आणि सेवा कर) अंमलबजावणीवरही चर्चा झाली. तर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच्या उपाययोजनांवर सादरीकरण केले.के. विश्‍वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार हिंदीबरोबरच दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्‍वनाथ यांना जाहीर झाला आहे. 


नवी दिल्लीत तीन मे रोजी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. दहा लाख रुपये रोख, सुवर्ण कमळ आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चित्रपटसृष्टीत मोलाची कामगिरी करणाऱ्या तंत्रज्ञ, तसेच कलाकारांना भारत सरकारतर्फे दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. 

२०१५ चा पुरस्कार मनोज कुमार यांना मिळाला होता. आता २०१६ च्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी के. विश्‍वनाथ ठरले आहेत.

के. विश्‍वनाथ यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९३० रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात चेन्नईच्या एका स्टुडिओत तांत्रिक सहायक म्हणून केली. त्यानंतर ते चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले. तेलगू, तमीळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

के. विश्‍वनाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्वाती मुथ्थम’ या चित्रपटाची ५९ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत निवड करण्यात आली होती. ‘सरगम’, ‘कामचोर’, ‘जाग उठा इंसान’, ‘संजोग’, ‘संगीत’, ‘धनवान’ आणि ‘ईश्‍वर’ हे त्यांचे हिंदीतील काही गाजलेले चित्रपट आहेत.

के. विश्‍वनाथ यांना यापूर्वी पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार व अकराहून अधिक फिल्म फेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या १९९२ मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला आहे.एचआयव्हीग्रस्तांच्या हिताच्या तरतुदी असलेला कायदा लागू
एचआयव्ही किंवा एड्सने बाधित असलेल्या लोकांना नोकऱ्या नाकारता येणार नाहीत किंवा त्यांना नोकरीवरून काढून टाकता येणार नाही, अशी तरतूद असलेला नवा कायदा अमलात आला आहे.

याशिवाय, अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना किमान ३ महिने कैद (जी दोन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते) आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड अशीही तरतूद या कायद्यात आहे.

एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंधक व नियंत्रण) कायदा २०१७ ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अलीकडेच मंजुरी दिली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. याबाबतचे विधेयक लोकसभेने ११ एप्रिलला पारित केले. राज्यसभेने ते २१ मार्चलाच पारित केले होते.

नव्या कायद्यात एचआयव्हीग्रस्त लोकांची मालमत्ता व अधिकार यांचे संरक्षण करण्याची हमी देण्यात आली आहे. एखादी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे उघड करणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकेल.

एचआयव्ही किंवा एड्सने ग्रस्त लोकांबाबत नोकरीत किंवा शैक्षणिक संस्थेत अथवा आरोग्य सेवा पुरवण्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करण्यास या कायद्याने प्रतिबंध केला आहे.

 व्यक्तीच्या मंजुरीशिवाय त्याची एचआयव्ही चाचणी, वैद्यकीय उपचार किंवा संशोधन केले जाऊ शकणार नाही, अशीही त्यात तरतूद आहे. 
एखाद्या व्यक्तीबाबतची माहिती न्यायाच्या हितार्थ आवश्यक आहे, अशा आशयाच्या न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याची एचआयव्हीबाबतची स्थिती जाहीर करण्यास भाग पाडता येणार नाही, असे या कायद्यात नमूद करण्यात आले आहे.गोळाफेकीत मनप्रीतला सुवर्ण
भारताच्या मनप्रीत कौरने गोळाफेकीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. भारताने या सुवर्णपदकाबरोबरच चार रौप्य व दोन कांस्यपदकांचीही कमाई केली.

मनप्रीतने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करताना १८.८६ मीटपर्यंत गोळा फेकला आणि २०१५ मध्ये तिनेच नोंदविलेला १७.९६ मीटर हा राष्ट्रीय विक्रम मोडला.मलेरियाच्या पहिल्या लसीसाठी आफ्रिकेची निवड
मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लस घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशांमध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) आज जाहीर केले. 

या तीन देशांमध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरू होणार आहे.

अद्यापही डॉक्‍टरांपुढे मलेरियाचे मोठे आव्हान असून, जगभरात या रोगामुळे दरवर्षी वीस कोटी जण आजारी पडतात. यापैकी पाच लाख जणांचा मृत्यू होतो. मृतांमध्ये बहुतांश जण आफ्रिकेतील लहान मुले असतात. 


ग्लॅक्‍सो स्मिथ क्‍लिन या कंपनीने आरटीएस (अथवा मॉस्क्‍युरिक्‍स) ही लस तयार केली आहे. ही लस हा मलेरियावरील अंतिम उपाय नसला तरीही योग्य काळजी घेत त्याचा वापर केल्यास हजारो जणांचे आयुष्य वाचविण्याची लसीची क्षमता आहे.

मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात झालेल्या विविध प्रयत्नांमुळे गेल्या पंधरा वर्षांमध्ये या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत ६२ टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. 


पुढील वर्षीपासून दिली जाणारी मलेरियावरील ही लस पाच ते सतरा महिन्यांपर्यंतच्या मुलांना दिली जाणार आहे. प्रयोगशाळांमधील चाचणीवेळी लसीचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दिसून येतात का, हे या वेळी तपासले जाणार आहे.