दर्जेदार शिक्षणात मुंबईपेक्षा पुणे सरस
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील विद्यापीठांच्या राष्ट्रीय मानांकनाच्या (नॅशनल इन्स्टिट्यूशन रॅंकिंग फ्रेमवर्क) श्रेणीमध्ये शंभर विद्यापीठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाला दहावे स्थान मिळाले आहे. याच श्रेणीत बंगळूरचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रथम क्रमांकावर, दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दुसरे आणि बनारस हिंदू विद्यापीठ तिसऱ्या स्थानावर आहे. 

राज्यातील पारंपरिक विद्यापीठांमध्ये श्रेणीच्या क्रमवारीत एकही पारंपरिक विद्यापीठ नाही, त्यामुळे पुणे विद्यापीठ राज्यात अव्वल ठरले आहे. अभिमत विद्यापीठांनी मात्र या यादीत चांगले स्थान मिळविले आहे. 

मानांकनाची ही स्पर्धा या वर्षी सर्वांसाठी प्रथमच सक्तीची करण्यात आली होती. गेल्या वर्षीपासून ही श्रेणी निश्‍चित करण्यास सुरवात झाली. मात्र, गेल्या वर्षी विद्यापीठाने त्यात भाग घेतला नव्हता. 

देशपातळीवर पहिल्या शंभरच्या सर्वसाधारण यादीत राज्यातील आठ शिक्षण संस्था, महाविद्यालये व अभियांत्रिकी प्रत्येकी दहा, फार्मसीच्या १५ शिक्षण संस्था आहेत. 

जगातील पहिल्या २०० दर्जेदार विद्यापीठांत भारतातील एकही विद्यापीठ नाही, या वस्तुस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने २०१५ मध्ये राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संरचना (एनआयआरएफ) जाहीर करण्याची घोषणा केली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे निधन
किशोरीताई आमोणकर यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजनावर त्यांची हुकूमत होती. सततच्या रियाजामुळे त्यांचे गाणे रसिकांच्या हृदयाचा ठाव घ्यायचे.

“अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग’, “सहेला रे…’ सारख्या अनेत भावमधुर गीतांनी रसिकांच्या ह्दयाचा ठाव घेणाऱ्या किशोरीताईंचा जन्म मुंबईत १० एप्रिल १९३१ मध्ये झाला. 


त्या ख्यातनाम गायिका मोगुबाई कुर्डीकर यांच्या कन्या. मात्र त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला प्रारंभ केला तो भेंडी बाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकर यांच्या तालमीत. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मातोश्री मोगुबाईंकडे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांचे संपूर्ण शिक्षण त्यांच्या मातोश्री गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्याकडे झाले. मोगुबाईंचे शिक्षण अल्लादियॉं खॉं साहेबांकडे झाले होते. 

घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला. घराणी वेगवेगळी असली तरी संगीत एकच आहे असे त्या म्हणायच्या. त्यांनी सर्व घराण्यांच्या गायकी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता.

१९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्‍वगायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. 
‘जाईन विचारीत रानफुला’ हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला. 

मुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्‍टर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले.

१९८७ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने. तर २००२ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरवले.गुजरातच्या पोलीस महासंचालकपदी गीता जोहरी
गुजरातच्या पोलिसांच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एक महिला पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे. गीता जोहरी या आता गुजरात पोलिसांच्या महासंचालक होणार आहेत. 

याआधीचेच पोलीस महासंचालक पी पी पांडे या पदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी गीता जोहरी यांची नेमणूक झाली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे पांडे यांना या पदावरून दूर व्हावं लागलं होतं. इशरत जहाँ एन्काउंटर केसमध्ये पांडे हे आरोपी आहेत.

गीता जोहरी या १९८२ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या सध्या गुजरातच्या सध्या त्या गुजरात हाऊसिंग काॅर्पोरेशनच्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.फेडररचे मोसमातील तिसरे जेतेपद
वयाची पस्तिशी ओलांडलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने २०१७च्या टेनिस हंगामात स्वप्नवत वाटचाल कायम राखत कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालला नमवण्याची किमया केली. मियामी खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने हंगामात तिसऱ्यांदा समोर आलेल्या नदालवर स्वित्झर्लंडच्या खेळाडूने सहज मात केली.

रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत फेडररने ९४ मिनिटांच्या खेळात नदालवर ६-३, ६-४ असा विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.

फेडररने २०१७ मध्ये तीन जेतेपदे नावावर केली. चालू हंगामात फेडररची आत्तापर्यंतची जयपराजयाची आकडेवारी ही २०-१ अशी आहे. 


नदाल पाचव्यांदा मियामी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला, परंतु त्याची जेतेपदाची पाटी यंदाही कोरीच राहिली. जोहाना कोन्टाची ऐतिहासिक भरारी
ब्रिटनच्या जोहाना कोन्टाने मियामी खुल्या टेनिस स्पध्रेत महिला एकेरीचे जेतेपद पटकावताना कॅरोलिन वोझ्नियाकीवर ६-४, ६-३ अशी मात केली. 

इंग्लंड महिला टेनिसपटूंच्या इतिहासात ४० वर्षांत जिंकलेले हे मोठे जेतेपद आहे. या विजयाबरोबर कोन्टाने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आगेकूच केली.

सिडनी येथे जन्मलेल्या या २५ वर्षीय खेळाडूने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सवर मात करीत धक्कादायक निकाल नोंदवला होता. त्याच कामगिरीत सातत्य राखत तिने वोझ्नियाकीविरुद्ध खेळ केला आणि जेतेपदाला गवसणी घातली.

याआधी १९७७ साली ब्रिटनच्या व्हर्जिनिया वेड हिने विम्बल्डन चषक उंचावला होता. त्यानंतर महत्त्वाची स्पर्धा जिंकणारी कोन्टा ही इंग्लंडची पहिली महिला टेनिसपटू आहे.मेक इन इंडियातील ब्राबो रोबोटला युरोपात विक्रीस परवानगी

टाटा मोटर्सच्या मालकीच्या असलेल्या टीएएल कंपनीने ब्राबो हा मेक इन इंडिया संकल्पनेखाली तयार केलेला रोबोट म्हणजे यंत्रमानव आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी योग्य ठरला असून युरोपातील बाजारपेठेसाठी त्याला सीई प्रमाणपत्र मिळाले आहे. 

ब्राबो हा रोबोट मेक इन इंडिया सप्ताहात गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता व तो सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात स्वयंचलीकरणासाठी योग्य आहे. आता युरोपातील आरोग्य, सुरक्षा, पर्यावरण मानकानुसार या रोबोटच्या विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे. 

कच्चा माल हाताळणे, पॅकेजिंग करणे यासाठी या रोबोटचा उपयोग होणार असून तो भारतीय बनावटीचा आहे. सुटे भाग जोडणे, कॅमेरा व दृष्टीशी संबंधित इतर कामे अशा अनेक बाबी तो करू शकतो. सौरवातामुळे मंगळावरचे वातावरण नष्ट
सौरवात व प्रारणांमुळे मंगळावरचे वातावरण नष्ट झाले. परिणामी, अब्जावधी वर्षांपूर्वी सजीवसृष्टीस अनुकूल असलेला ग्रह वाळवंटासारखा बनला, असे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

नासाच्या मार्स अ‍ॅटमॉस्फिअर अँड व्होलॅटाइल मिशनचे प्रमुख संशोधक ब्रुसक जॅकोस्की यांनी सांगितले, की मंगळावर जो वायू होता तो अवकाशात नष्ट झाला. आतापर्यंत ६५ टक्क्यांपर्यंत असलेला अरगॉन वायूही अवकाशात गेला. 

२०१५ मध्ये मावेन यानाच्या सदस्यांनी संशोधनाचे निष्कर्ष मांडताना सांगितले, की मंगळावर एकेकाळी वातावरण होते, पण तो वायू अवकाशात फेकला गेला. मावेन यानावरील उपकरणांनी मंगळावरील आजच्या वातावरणाची मापने घेतली आहेत. 

द्रव पाणी हे जीवसृष्टीसाठी आवश्यक असते, पण आज वातावरण फारच थंड असल्याने सूक्ष्मजीवांना ते अनुकूल नाही. कोरडी नदीपात्रे व खनिजे अजूनही तेथे आहेत. हे सगळे तेथे एकेकाळी पाणी असल्यामुळे शक्य झाले आहे. 

पूर्वी मंगळावरचे वातावरण वेगळे होते ते पृष्ठभागावर पाणी वाहण्यास अनुकूल होते. सौरवात व प्रारणे यामुळे मंगळावरील वातावरणाचा ऱ्हास झाला. सौरवात हा सूर्याच्या पृष्ठभागावरून सुटणारा विद्युतभारित वायूंचा प्रवाह असतो. 

पूर्वी सूर्याची अतिनील किरणे फारच तीव्र होती, त्यामुळे मंगळावरील वातावरणावर परिणाम झाला. त्याआधी मंगळावर सूक्ष्मजीव असावेत. नंतर मंगळ थंड झाला व तेथील सूक्ष्मजीव नष्ट झाले. बॉब डिलन यांनी साहित्याचे नोबेल अखेर स्वीकारले
बऱ्याच अनिश्चिततेनंतर अखेर बॉब डिलन यांनी साहित्याचे नोबेल पारितोषिक स्वीकारले असल्याचे स्वीडिश अकादमीने म्हटले आहे. स्टॉकहोम येथे एका खासगी समारंभात अकादमीच्या बारा सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना सुवर्णपदक व मानपत्र देण्यात आले. 

त्यांच्या मानपत्रात लॅटिन भाषेतील महाकवी एनेड यांच्या ओळी उद्धृत केल्या होत्या. त्यात म्हटले आहे, की पृथ्वीवरील जीवन आपल्या कलेने समृद्ध करणाऱ्यास हा पुरस्कार अर्पण करण्यात येत आहे.

डिलन यांच्या रूपाने प्रथमच गीतकारास साहित्याचे नोबेल मिळाले असून ते आता थॉमस मान, सॅम्युअल बेकेट, गॅब्रिएल गार्शिया माक्र्वेझ व डोरिस लेसिंग यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. 

स्टॉकहोममध्ये डिलन यांची मैफल होण्यापूर्वी अज्ञात ठिकाणी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ट्रिप्लिकेट अल्बमच्या प्रसारासाठी ते युरोपच्या दौऱ्यावर आले आहेत. 

ते १० जूनपर्यंत नोबेल पुरस्कार मिळाल्याबाबत भाषण देतील अशी अपेक्षा आहे अन्यथा त्यांची पुरस्काराची रक्कम त्यांना गमवावी लागेल, ते ध्वनिमुद्रित स्वरूपात भाषण देतील किंवा एखादे गाणे सादर करू शकतील. पुरस्काराची रक्कम ८,९१,००० अमेरिकी डॉलर्स आहे.

माझी गाणी ही साहित्य आहेत असे मला कधी वाटले नव्हते, असे त्यांनी डिसेंबरमध्ये पुरस्कार कार्यक्रमात अनुपस्थित असताना अमेरिकी राजदूतांनी वाचून दाखवलेल्या भाषणात म्हटले होते. पुरस्कार कार्यक्रमास डिसेंबरमध्ये अनुपस्थित राहिल्याबाबत डिलन यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली होती.