मेहरून्निसा दलवाई यांचे निधनमुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक तसेच सेक्युलर भारताचे पुरस्कर्ते समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई (वय ८६) यांचे पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने गुरुवारी सकाळी ११ वाजता निधन झाले.


दलवाई यांच्या निधनानंतर गेली चाळीस वर्षे त्यांचे विचार सातत्याने पुढे नेण्यात मेहरून्निसा यांची महत्त्वाची भूमिका होती. ‘हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या त्या अध्यक्ष होत्या. तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यातही त्या अनेक वर्षे सक्रिय होत्या. 

‘मी भरून पावले आहे’ हे १९९५ मध्ये प्रकाशित झाले त्यांचे आत्मचारित्र प्रसिद्ध आहे.सर्वोत्तम विद्यापीठांत दिल्ली विद्यापीठचा प्रथम दहांत समावेश
देशातील पहिल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये दिल्ली विद्यापीठाचा समावेश झाला आहे. 

‘क्‍यूएस’ या जागतिक स्तरावरील संस्थेने त्यांच्या वार्षिक अहवालात २०१८ साठीची सर्वोत्तम दहा विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. 

विद्यापीठांच्या क्रमवारीत दिल्ली विद्यापीठाला देशात आठवे, तर जागतिक क्रमवारीत ४८१-४९१ स्थान मिळाले आहे; तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत ८०१ ते १००० असे स्थान दिले आहे. यासाठी विद्यापीठाचा केवळ ‘पुणे विद्यापीठ’ असा उल्लेख केलेला आहे. 

‘ब्रिक्‍स’ देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत विद्यापीठाला १३१ ते १४० आणि आशियाई विद्यापीठांच्या यादीत हे विद्यापीठ १७६ व्या स्थानावर दाखविले आहे. 

कर्नाटकच्या मनिपाल विद्यापीठाने खासगी विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथमच देशात अव्वल स्थान पटकावले आहे.रोहण बोपन्नाचे पहिले ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद रोहण बोपन्नाने कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला.

बोपन्ना व डाब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले. त्यांनी दोन मॅच पॉर्इंटचा बचाव करताना जर्मनीच्या अन्ना लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज 2-6, 6-2, 12-10 ने मोडून काढली.

भारत व कॅनडा यांची जोडी एकवेळ दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण गोरेनफिल्ड व फराह यांनी संधी गमावली. बोपन्ना व डाब्रोवस्की यांनी पूर्ण लाभ घेतला आणि दोन मॅच पॉर्इंट मिळवले. जर्मनीच्या खेळाडूने दुहेरी चूक करताच बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीचे जेतेपद निश्चित झाले.नरेंद्र मोदी – नझरबयेव यांच्या द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा
भारत आणि कझाकस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकचे अध्यक्ष नूर सुलतान नझरबयेव यांच्यात आज येथे चर्चा झाली.

येथे दोन दिवस होत असलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे आज येथे आगमन झाले आहे. या परिषदेमध्ये पाकिस्तानही सहभागी झाला आहे. या वेळी त्यांनी कझाकचे अध्यक्ष नझरबयेव यांची भेट घेतली.

शांधाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आर्थिक, कनेक्‍टिव्हिटी आणि दहशतवादाशी लढ्यासाठी भारताशी सहकार्य करेल, अशी आपल्याला आशा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.सूर्याच्या दिशेने जगातील पहिल्या मोहिमेस ‘नासा’ सज्ज
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ जगातील पहिल्या सौरमोहिमेसाठी सज्ज असून या मोहिमेद्वारे सूर्याभोवतीचे वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. पुढील वर्षी या मोहिमेला सुरवात होणार आहे.

साठ वर्षांपूर्वी सौर वाऱ्यांच्या अस्तित्वाचा अंदाज व्यक्त करणारे खगोलभौतिक शास्त्रज्ञ युजेन पार्कर यांच्या कार्याचा गौरव म्हणून सौरमोहिमेसाठी वापरल्या जाणाऱ्या अवकाशयानाला ‘पार्कर सोलार प्रोब’ (पार्कर सौरयान) असे नाव देण्यात आले आहे.

‘नासा’ने प्रथमच एका यानाला जिवंत व्यक्तीचे नाव दिले आहे. हे अवकाशयान एखाद्या लहान मोटारगाडी इतक्‍या आकाराचे आहे. यानामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली उपकरणे बसविण्यात आली आहेत. या उपकरणांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे सूर्याबाबत असलेल्या विविध अनुत्तरीत प्रश्‍नांची उत्तरे मिळण्याची शास्त्रज्ञांना आशा आहे. 

पार्कर सौरयान हे सूर्याच्या वातावरणात जाऊन निरीक्षण करणार आहे. आतापर्यंत कोणतेही यान गेले नाही, इतक्‍या जवळून हे यान जाणार असून यावेळी त्याला प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. 

या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी 4.5 इंच जाडीच्या कार्बनपासून तयार केलेले एक आवरण अवकाशयानाभोवती असणार आहे. सूर्याची प्रभा मूळ पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का असते?, अशासारख्या अनेक अनुत्तरीत प्रश्‍नांवर उत्तर शोधण्याचा यानाद्वारे प्रयत्न केला जाणार आहे. हे यान ३१ जुलै २०१८ मध्ये सूर्याकडे झेपावेल, असे ‘नासा’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले.