रेल्वे मंत्रालय घेणार ‘ऍपल’ची मदत 
देशभरातील रेल्वे गाड्यांना वेगाचा बूस्टर डोस देण्यासाठी रेल्वे मंत्रालय सज्ज झाले असून यासाठी सरकार ‘ऍपल’सारख्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची मदत घेण्याच्या तयारीत आहे. 


या माध्यमातून रेल्वेचा वेग प्रतितास सहाशे किलोमीटरपर्यंत वाढविला जाणार आहे अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिली.

दिल्ली ते मुंबई आणि दिल्ली ते कोलकता या दोन वर्दळीच्या मार्गांवरील गतिमान एक्‍स्प्रेसच्या वेगामध्ये वाढ केली जाणार असून यासाठी निती आयोगाने रेल्वे मंत्रालयाच्या अठरा हजार कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
अजित दोवाल चीन दौऱ्यावर
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे पुढील महिन्यात ‘ब्रिक्‍स’ राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी बीजिंगला जाणार आहेत. 


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते गोपाळ बागले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ही माहिती दिली.


राम नाथ कोविंद भारताचे १४ वे राष्ट्रपती
भारताच्या राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार राम नाथ कोविंद यांचा राष्ट्रपती निवडणूक २०१७ मध्ये विजय झाला आहे. ते भारताचे १४ वे राष्ट्रपती असतील. 


भारताचे सरन्यायाधीश जे. एस. खेहार यांच्याकडून राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर ते २६ जुलै २०१७ रोजी माननीय प्रणब मुखर्जी यांच्याकडून कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील.


१७ जुलै २०१७ रोजी झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सर्व राज्यांच्या विधानसभांचे ४१०९ सदस्य (आमदार) आणि संसदेचे ७७१ सदस्य (खासदार) अश्या एकूण ४८८० वैध मतदारांपैकी ९९.४९% लोकांनी मतदान केले होते. 


२० जुलै २०१७ रोजी झालेल्या मतमोजणीनुसार, राम नाथ कोविंद यांनी ७,०२,०४४ मूल्यासह २९३० मते (६५.६५%) मिळाली आहेत तर मीरा कुमार यांना ३,६७,३१४ मूल्यासह १८४४ मते (३५%) मिळाली. तसेच ७७ मते अवैध ठरलेली आहेत.


१ ऑक्टोबर १९४५ रोजी उत्तरप्रदेशच्या कानपूर देवघाट जिल्ह्यातील पाराउंख गावात जन्मलेल्या राम नाथ कोविंद यांनी वाणिज्यशास्त्राची पदवी आणि त्यानंतर कायदा शिक्षण (LLB) घेतलेले आहे.

७२ वर्षीय राम नाथ कोविंद १२ वर्षे राज्यसभेचे सदस्य होते आणि अनेक संसदीय मंडळांचा भाग होते. त्यांनी भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी सन १९८२-१९८४ या काळात दिल्ली उच्च न्यायालयात केंद्रीय सरकारची बाजू मांडली होती. 


के. आर. नारायणन यांच्यानंतर दलित समाजातून आलेले हे दुसरे भारतीय राष्ट्रपती आहेत.


भारतीय घटनेच्या कलम ५२ मध्ये असे म्हटले आहे की, भारताचे एक राष्ट्रपती असतील. केंद्राचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीला निहित केले जाईल. ते देशाचे प्रमुख असतील आणि राष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. 


भारतीय संसदीय लोकशाहीमधे, राष्ट्रपती हे पहिले नागरिक आहेत आणि देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि म्हणून ते कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत


चांद्र बॅगेला लिलावात मिळाले १८ लाख डॉलर
अमेरिकेचा अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी जी बॅग वापरली, तिला लिलावात १८लाख डॉलर एवढी किंमत मिळाली.


अमेरिकेच्या अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले या घटनेला ४८ वर्षे झाली. त्यानिमित्त चांद्र मोहिमांसदर्भातील वस्तूंचा लिलाव न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी झाला. लिलावात ठेवलेल्या वस्तूंमध्ये या बॅगेला सर्वाधिक किंमत मिळाली आहे. 


लिलावात अन्य वस्तूंमध्ये ‘अपोलो 13’ या अवकाश मोहिमेच्या लेखी प्रतीची विक्री २७५००० हजार डॉलरला झाली. अमेरिकेचे अंतराळवीर गुस ग्रीसम यांच्या ‘स्पेससूट’ला ४३७५० डॉलर, तर नील आर्मस्ट्रॉंगने बझ ऑल्ड्रिनचे चंद्रावर काढलेल्या प्रसिद्ध छायाचित्राला ३५००० डॉलर मिळाले


ऑस्ट्रेलियात आढळले हजारो वर्षांपूर्वीचे मानवी अवशेष
ऑस्ट्रेलिया खंडात ६५ हजार वर्षांपूर्वी मानवाचे अस्तित्व असल्याचे पुरावे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मिळाले आहे. या शोधाने आधुनिक मानवाने आफ्रिकेतून स्थलांतराला सुरुवात केल्याच्या ज्ञात इतिहासाला बदलले आहे. 


ऑस्ट्रेलिया खंडाच्या उत्तरेकडील प्राचीन काकाडूतील जाबिलूका येथील खाणींच्या पट्टय़ामध्ये पुरातत्त्व खोदकामात ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीचे वास्तव्य येथे किमान ६५ हजार वर्षांपासून असल्याचे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना आढळून आले


तसेच याआधी समजल्या जाणाऱ्या काळाच्या १८ हजार वर्षांपूर्वीपासून मानवाचे ऑस्टेलियात वास्तव्य होते असे आढळून आले.