दिग्दर्शक कुंदन शहा यांचे मुंबईत निधन
‘नुक्कड’ आणि ‘वागले की दुनिया’ अशा लोकप्रिय मालिका आणि ‘जाने भी दो यारो’, ‘कभी हा कभी ना’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शक कुंदन शहा यांचे शनिवारी वयाच्या ६९व्या वर्षी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. 


पुण्यातील फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियात त्यांनी शिक्षण घेतले होते. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. आजही हा चित्रपट लोकप्रिय आहे. त्यांना या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कभी हा कभी ना’ हाही त्यांचा गाजलेला चित्रपट. त्यानंतर शहा यांनी ‘क्‍या कहना’, ‘दिल है तुम्हारा’, ‘खामोश’, ‘हम तो मोहब्बत करेगा’, ‘एक से बढकर एक’ या चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘पी से पीएम तक’ हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता.


देशात वाढणाऱ्या असहिष्णुतेच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. सरकारवर निष्क्रियतेचा आरोप करीत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारही परत केला होता

मुकेश अंबानी ठरले दहाव्यांदा देशातील सर्वाधिक श्रीमंत
‘फोर्ब्स’ नियतकालिकाने जाहीर केलेल्या २०१७ मधील भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग १० व्या वर्षी सर्वोच्च स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती ३८ अब्ज डॉलर म्हणजेच अडीच लाख कोटी रुपये झाली आहे.


फोर्ब्सने जारी केलेल्या ‘इंडिया रिच लिस्ट २०१७’ या अहवालानुसार, विप्रो उद्योग समूहाचे प्रमुख अजीम प्रेमजी दुसर्‍या स्थानी असून, त्यांची संपत्ती १९ अब्ज डॉलर झाली आहे. त्यांनी दोन स्थानांची प्रगती केली आहे. 
गेल्या वर्षी दुसर्‍या स्थानी असलेले सन फार्माचे दिलीप शांघवी नवव्या स्थानी घसरले आहेत. त्यांची संपत्ती १२.१ अब्ज डॉलर झाली आहे.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षी ४८ व्या स्थानी असलेले बालकृष्ण यंदा १९ व्या स्थानी आले आहेत.


भारतातील पहिल्या १०० श्रीमंतांच्या यादीत ७ महिलांचा समावेश आहे. ओ.पी. जिंदाल उद्योग समूहाच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल १६ व्या स्थानी असून त्यांची संपत्ती ७.५ अब्ज डॉलर आहे.
लुपिनच्या बिगरकार्यकारी चेअरमन मंजू देशबंधू गुप्ता ३.४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ४० व्या स्थानी आहेत.

बेनेट, कोलमन अ‍ॅण्ड कंपनीच्या इंदू जैन आणि त्यांच्या दोन मुलांची संपत्ती ३ अब्ज डॉलर असून ते ५१ व्या स्थानी आहेत.
टाफेच्या मल्लिका श्रीनिवासन , यूएसव्ही इंडियाच्या लीना तिवारी (७१ वे स्थान), बायोकॉनच्या संस्थापक किरण मुजुमदार-शॉ (७२ वे स्थान) यांचा या यादीत समावेश आहे. मुजुमदार-शॉ या स्वबळावर अब्जाधीश झालेल्या महिलांच्या यादीत प्रथम स्थानी आहेत. 


राष्ट्रपतींच्या हस्ते ‘भारत जल सप्ताह २०१७’ चे उद्घाटन होणार
राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते १० ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्‍लीत ‘भारत जल सप्‍ताह २०१७’ चे उद्घाटन करण्यात येणार आहे.


‘सर्वसमावेशक वाढीसाठी जल व ऊर्जा’ या संकल्पनेखाली चालणार्‍या पाच दिवसीय कार्यक्रमात १३ देशांमधून जवळपास १५०० प्रति‍निधी सहभागी होणार आहेत. याचबरोबरीने ११ ते १४ ऑक्टोबर २०१७ दरम्यान ‘इंडिया वॉटर एक्‍सपो २०१७’ या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. 

जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरूत्थान मंत्रालय २०१२ सालापासून भारत जल सप्‍ताह (IWW) चे आयोजन करीत आहे. यापूर्वी चार (२०१२, २०१३, २०१५, २०१६) IWW पार पडलेले आहेत.

वुशु विश्वविजेता स्पर्धाचे सुवर्णपदक पूजा कादीयन हिने जिंकले
पूजा कादीयन हिने कजान (रशिया) शहरात खेळल्या गेलेल्या २०१७ वुशु विश्वविजेता स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकून इतिहास घडविला आहे. वुशु विश्वविजेता स्पर्धेचे हे भारतासाठी पहिले सुवर्णपदक आहे. 


पूजा कादीयन हिने महिलांच्या ७५ किलो सांदा गटात अंतिम सामन्यात रशियाच्या एवगेनिया स्टेपानोवा हिचा पराभव केला. 


स्पर्धेत भारताला एकूण पाच पदके प्राप्त झालेली आहेत. यामध्ये रमेशचंद्र सिंह मोइरंगथम (पुरुष, सांदा-४८ किलो), सूर्या भानुप्रताप सिंह (पुरुष, सांदा-६० किलो) आणि राजिंदर सिंह (पुरुष, सांदा-९० किलो) तसेच अरुणपेमा देवी केइशम (महिला, सांदा-६५ किलो) यांनी कांस्यपदके मिळवलीत. पदकतालिकेत चीन (१५ पदके) प्रथम स्थानी तर इराण (८ पदके) दुसर्‍या स्थानी आहे. 

वुशु विश्वविजेता स्पर्धा (WWC) १९९१ सालापासून दर दोन वर्षांनी आयोजित केली जात आहे आणि या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय वुशु महासंघ (IWUF) कडून केले जाते.


अण्वस्त्रविरोधी ‘आयसीएन’ संघटनेस शांततेचे नोबेल
आण्विक शस्त्रास्त्रे नष्ट करावीत, या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु करण्यात आलेल्या मोहिमेस (आयसीएन) या वर्षीचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.


आयसीएन ही जगभरातील १०० पेक्षाही जास्त देशांमधील बिगरसरकारी संस्थांची संघटना आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कामकाज सुरु केलेल्या या संघटनेच्या निर्मितीची औपचारिक घोषणा व्हिएन्ना येथे २००७ मध्ये करण्यात आली होती.भारत, इथिओपिया यांच्यात करार 
द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी भारत आणि इथिओपिया यांच्यात व्यापार, दळणवळण आणि प्रसार माध्यमांच्या क्षेत्रात करार केले गेले आहेत. 
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या इथिओपियाच्या दौर्‍यादरम्यान हे करार झालेत. 


इथिओपियाचे राष्ट्राध्यक्ष मुलातू तेशोम यांच्यासमवेत राष्ट्रपतींनी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांवर तसेच इथिओपियाला वीज, आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्रात मदत करण्याकरिता चर्चा केली. 

इथिओपिया हा उत्तरपूर्व अफ्रीकेमधील एक स्वतंत्र देश आहे, जो अराजकीय पातळीवर अबिसीनिया म्हणून ओळखला जातो. या देशाची राजधानी अदीस अबाबा हे शहर असून या देशाचे चलन इथिओपियन बिर हे आहे. इथिओपिया हा आफ्रिकेतील भारतीय सवलतीच्या पतमर्यादेचा सर्वात मोठा ($१ अब्जपर्यंत) प्राप्तकर्ता आहे.


१४ व्या युरोपिय संघ-भारत शिखर परिषदेत तीन करार
६ ऑक्टोबर २०१७ रोजी नवी दिल्लीत १४ वी युरोपीय संघ-भारत शिखर परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेत युरोपीय संघाचे प्रतिनिधीत्व डोनाल्ड टस्क (युरोपीय परिषदेचे अध्यक्ष), आणि जीन क्लॉड जंकर (युरोपीय आयोगाचे अध्यक्ष) यांनी केले तर भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. युरोपीय संघ-भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांना ५५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. 


युरोपीय संघ हा मुख्यतः युरोपमध्ये स्थित २८ सदस्यीय देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे. हा समूह १ नोव्हेंबर १९९३ साली स्थापित करण्यात आला. सकल स्थानिक उत्पादन (GDP) याने युरोपीय संघ ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. 

युरोपमध्ये युरोपियन रिसर्च कौन्सिलपासून अनुदान प्राप्त केलेल्या भारतीय संशोधकांसाठी युरोपियन कमिशन आणि सायन्स अँड इंजिनियरिंग रिसर्च बोर्ड (SERB) यांच्यात अंमलबजावणीसाठीच्या व्यवस्थेसंदर्भात करार करण्यात आला.


तसेच बंगळुरू मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसर्‍या टप्प्याच्या लाइन R6 च्या विकासासाठी एकूण ५०० दशलक्ष युरोपैकी ३०० दशलक्ष युरोसाठीचा आर्थिक सहकार्य करार आणि 
आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) आणि युरोपियन इनव्हेस्टमेंट बँक यांच्या अंतरिम सचिवालयादरम्यानचे संयुक्त घोषणापत्र हे तीन करार करण्यात आले.