दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे निधन
गडकिल्ल्यांचे अभ्यासक दुर्गमहर्षी प्रमोद ऊर्फ भाऊ मांडे यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले.


मांडे यांनी तब्बल ४० वर्षे सह्याद्रीच्या रांगामध्ये पायी भ्रमण करून २००० किल्ले पाहिले. त्याबाबत लेखन केले. त्याचे छायाचित्रण केले. 

टाटा मोटर्समध्ये २२ वर्षे नोकरी केल्यानंतर केवळ छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा, गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा यासाठी मांडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.


छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आत्मसात करायचा असेल तर गड किल्ल्यांलाच भेटी दिल्या पाहिजेत असे ठाम मत मांडे यांचे होते.

मांडे यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यामध्ये गड किल्ले महाराष्ट्राचे, सह्याद्रीतील रत्नभांडार, स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, १११ क्रांतिकारकांचे संक्षिप्त चरित्र अशी काही निवडक पुस्तकांची नावे सांगता येतील. 


मांडे हे भाऊ म्हणूनच सर्वांना परिचित होते. भाऊंना ‘दुर्ग महर्षी’ व ‘सह्याद्री पूत्र’ म्हणूनही उपाधी दिली गेली. 


कांचा इलैया लिखित ‘सामाजिक स्मग्लुरलू कोमातोल्लू’ पुस्तक प्रसिद्ध
तामिळ लेखक आणि दलित कार्यकर्ते प्रा. कांचा इलैया लिखित ‘सामाजिक स्मग्लुरलू कोमातोल्लू’ पुस्तक प्रसिद्ध झाले.


या पुस्तकाच्या विरोधात पुस्तकावर बंदी घालण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि मात्र न्यायालयाने बंदी घालण्याच्या आदेश काढण्यासस नकार दिला.


रशियामध्ये भारत-रशिया यांचा प्रथम ‘इंद्र-२०१७’ संयुक्त सराव आयोजित
प्रथम भारत-रशिया संयुक्त त्रिदलीय सराव – भारत आणि रशिया यांच्या तीनही संरक्षण सेवा दलांचा ‘इंद्र-२०१७’ हा पहिलाच संयुक्त सराव आयोजित करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०१७ या काळात रशियामध्ये आयोजित करण्यात आला आहे.


भारतीय तुकडीमध्ये लष्कराचे ३५० कर्मचारी, हवाई दलाचे ८० कर्मचारी, दोन IL-76 विमान आणि नौदलाची एक युद्धनौका आणि गस्तनौका यांचा समावेश आहे.


पूर्वी आयोजित केले गेलेले नऊ ‘इंद्र’ सरावांमध्ये केवळ एक संरक्षण दलाचा समावेश होता. यावेळी प्रथमच पायदळ, नौदल आणि हवाई दल या तिन्ही देवा दलांचा समावेश करण्यात आला आहे.


जॉर्ज सॉंडर्स यांच्या ‘लिंकन इन दी बार्डो’स यावर्षीचे ‘बुकर’‘लिंकन इन दी बार्डो,’ या जॉर्ज सॉंडर्स या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या पुस्तकास या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘मॅन बुकर’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 


बुकर पुरस्कारासाठी अमेरिकन लेखकांचा विचार करण्याचा निर्णय २०१४ मध्ये घेण्यात आला होता. यानंतर हा पुरस्कार मिळविणारे सॉंडर्स हे सलग दुसरे अमेरिकन लेखक ठरले आहेत. २०१४ आधी या पुरस्कारासाठी ब्रिटन, आयर्लंड व राष्ट्रकुल देशांमधील लेखकांचाच विचार करण्यात येत होता.


‘लिंकन इन दी बार्डो’ ही अमेरिकेचे इतिहासप्रसिद्ध राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी १८६२ मध्ये त्यांच्या मुलाच्या वॉशिंग्टनमधील दफनभूमीस दिलेल्या भेटीवर आधारित कादंबरी आहे. 


तिबेटी बौद्ध विचासरणीमध्ये ‘बार्डो’ ही मृत्यु व पुनर्जन्मामधील अवस्था आहे. या पार्श्‍वभूमीवर लिहिण्यात आलेल्या या कादंबरीमधील वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीची विशेष प्रशंसा करण्यात आली आहे.

लघुकथालेखक असलेल्या ५८ वर्षीय सॉंडर्स यांनी लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे

मित्तल यांची हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी
उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी दिली आहे. विद्यापीठातील ‘साउथ एशिया इन्स्टिट्यूट’साठी या देणगीचा वापर करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटचे नामकरण आता ‘लक्ष्मी मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूट’ असे करण्यात आले आहे.


या संस्थेची स्थापना २००३ मध्ये झाली. ही संस्था २०१० मध्ये आंतरविद्याशाखीय बनली. या संस्थेत दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांशी निगडित संशोधन होते. या संस्थेचे संचालक भारतीय वंशाचे तरुण खन्ना आहेत. 


सौरमालिकेमध्ये आहे आणखी एक ग्रह!
पृथ्वी असलेल्या सौरमालिकेमध्ये निश्‍चितपणे आणखी एक नववा ग्रह असल्याची माहिती नासा या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी दिली आहे.


सूर्यापासून नेपच्यून ग्रह असलेल्या अंतराच्या वीस पट अंतर सूर्य व या ग्रहामध्ये असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. याचबरोबर, या नवव्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या १० पट असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. हा नववा ग्रह ‘सुपर अर्थ’ असू शकण्याचे सकारात्मक संकेतही मिळाले आहेत.


अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधील (कॅलटेक) ज्येष्ठ शास्त्रज्ञ कॉन्स्टंटिन बॅटजिन यांनी या नवव्या ग्रहाच्या अस्तित्वास पुष्टी देणारे किमान पाच पुरावे आढळल्याची माहिती दिली आहे. या नवीन संशोधनामुळे पृथ्वीसारखाच ग्रह शोधण्याच्या मोहिमेस बळ मिळाल्याचे मानले जात आहे


गुरूत्वीय लहरींबरोबर गॅमा किरणांचाही शोध
दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे.


दोन न्युट्रॉन ताऱ्यांची ही पहिलीवहिली धडक टिपता आल्याने गुरूत्वलहरी या निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात. या आईनस्टाईन यांच्या भाकितालाही भक्कम पुरावा मिळाला आहे.


दोन न्युट्रॉन ताऱ्यांच्या धडकेची घटना आपल्यापासून केवळ १३ कोटी प्रकाशवर्ष दुर घडल्यामुळे गुरूत्वलहरींचे आतापर्यंतचे सर्वात ठळक निरीक्षण नोंदविले गेले आहे.यापुर्वी चार वेळा गुरूत्वीय लहरींचा शोध लागला असला तरी त्या आपल्यापासून खुप दुर अंतरावर होत्या.


ही घटना पहिल्यांदाच पृथ्वीपासून इतक्या जवळ घडल्याने गॅमा किरणांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. ताऱ्यांच्या धडकेमुळे घडलेल्या विस्फोटातून गॅमा किरणांचा झगमगाट बाहेर पडला.


या किरणांचा विस्फोट उपग्रहस्थित विविध दुर्बिणींनी गुरूत्वलहरींच्या निरीक्षणानंतर केवळ दोन सेकंदांच्या फरकाने टिपला आहे. यामुळे दोन न्युट्रॉन ताऱ्यांच्या धडकेमुळे गॅमा किरणे दिसतात या अनेक वर्ष जुन्या सिध्दांताला पुष्टी मिळाली आहे


आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस १७ ऑक्टोबर
१७ ऑक्टोबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस’ (International Day for The Eradication of Poverty) आयोजित केला जातो.


२०१७ ची संकल्पना ‘गरीबी मिटविण्यासाठी १७ ऑक्टोबरच्या आवाजाला उत्तर देणे: शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाकडे वाटचाल’ (Answering the Call of October 17 to end poverty: A path toward peaceful and inclusive societies) ही आहे.


संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने २२ डिसेंबर १९९२ रोजी दरवर्षी १७ ऑक्टोबरला ‘आंतरराष्ट्रीय दारिद्र्य निर्मूलन दिवस’ आयोजित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या दिवशी दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध राष्ट्रांकडून केले जाणारे प्रयत्न, विविध विकास कार्ये व योजना यांच्यासंबंधी माहिती जाहीर केली जाते.


अत्यंत गरीबी, हिंसा आणि उपासमारीचे बळी पडलेल्यांच्या सन्मानार्थ १९४८ साली १७ ऑक्टोबर रोजी पॅरिसमध्ये १ लाखांहून अधिक लोक एकत्र आले होते, जेथे ‘मानवाधिकार सार्वत्रिक घोषणापत्र (Universal Declaration of Human Rights)’ यावर स्वाक्षर्‍या करण्यात झाल्या. या दिवसाला चिन्हांकित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने या तारखेची निवड केली.