लोकसभा अध्यक्ष – भाग २

अध्यक्षांची प्रशासकीय भूमिका

०१. अध्यक्ष लोकसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कार्य करतात. सचिवालय त्यांच्या अंतिम नियंत्रण व निर्देशाखाली कार्य करते. संसद सभागृहातील सर्व अनोळखी व्यक्ती, आगंतुक व पत्रकार हे अध्याक्षांच्या शिस्त व आदेशाच्या अधीन असतात.

०२. अध्यक्षांच्या संमतीविना सभागृहात कोणतेही नवीन बांधकाम किंवा त्यात बदल करता येत नाही. अध्यक्षांच्या परवानगीशिवाय संसदेच्या परिसरातील कोणत्याच व्यक्तीला (मंत्री ते सेवक) अटक करता येत नाही.

०३. लोकसभा सदस्याला गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झाली किंवा शिक्षा झाली किंवा कार्यकारी आदेशाखाली त्याला कोठडीत ठेवण्यात आले तर दंडाधिकाऱ्याने किंवा कार्यकारी अधिकाऱ्याने हि गोष्ट अध्यक्षांना त्वरित कळवली पाहिजे. तसेच त्याची सुटका झाल्यावरही कळवणे आवश्यक आहे.

अध्यक्ष आणि आंतरसंसदीय संबंध

०१. लोकसभेचे अध्यक्ष १९४९ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय संसदीय गटा’चे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारतात हा गट ‘कॉमनवेल्थ पार्लमेंटरी संघा’ची शाखा म्हणून आणि ‘आंतर संसदीय संघा’चा भारतातील राष्ट्रीय गट म्हणून कार्य करतो.

०२. त्यानुसार अध्यक्ष परदेशात जाणाऱ्या विविध भारतीय संसदीय शिष्टमंडळाच्या सदस्यांचे राज्यसभेच्या सभापतींशी चर्चा करून नामनिर्देशन करतात. बराचवेळा अध्यक्ष स्वतःच शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात.

०३. लोकसभा अध्यक्ष भारतातील कायदेमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात.

लोकसभा अध्यक्षांचे स्वातंत्र्य व निःपक्षपातीपणा

०१. लोकसभा अध्यक्षाना पदावधीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यांना लोकसभेच्या प्रभावी बहुमताने पारित झालेल्या ठरावाद्वारेच पदावरून दूर करता येते. हा ठराव मांडण्यासाठी १४ दिवसांची पूर्व नोटीस व त्यावर ५० सदस्यांच्या सह्या आवश्यक असतात. 

०२. त्यांचे पगार व भत्ते संसदेमार्फत चालवले जातात. ते भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतात. त्यांचे कार्य व वर्तणूक यावर लोकसभेत मौलिक प्रस्ताव वगळता चर्चा व टीका करता येत नाही.

०३. त्यांचे कार्यपद्धतीचे नियमन करण्याचे, कामकाज चालवण्याचे किंवा सभागृहात सुव्यवस्था राखण्याचे अधिकार देशातील कोणत्याही न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या अधिन नाही.

०४. त्यांना निःपक्ष बनविण्यासाठी मतदानाच्या पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार नाही.

०५. अध्यक्ष लोकसभेचे संवैधानिक व औपचारिक प्रमुख व प्रमुख प्रवक्ता असतात. वरील तरतुदींच्या आधारे लोकसभा अध्यक्ष पदाचे स्वातंत्र्य व निःपक्षपातीपणा साध्य करण्यात आला आहे.

* श्रेष्ठत्व अनुक्रमामध्ये त्यांचा स्थान ७ वे असून त्यांना भारताच्या सरन्यायाधीशाच्या बरोबरचा दर्जा आहे. अध्यक्षांचा दर्जा पंतप्रधान व उपपंतप्रधान वगळता इतर सर्व कॅबिनेट मंत्र्यापेक्षाही वरचा आहे.

प्रोटेम अध्यक्ष

०१. घटनेच्या कलम ९४ नुसार, जुन्या लोकसभेच्या विसर्जनानंतरही अध्यक्ष आपले पद रिक्त करत नाही. तर नवीन लोकसभेच्या पहिल्या सभेच्या लगेचपूर्वी आपले पद रिक्त करतात.

०२. त्यानंतर राष्ट्रपती नवीन लोकसभेतील एका सदस्याची ‘प्रोटेम अध्यक्ष’ म्हणून नेमणूक करतात. सामान्यतः ज्येष्ठतम सदस्याची निवड केली जाते. राष्ट्रपती त्यांना स्वतः लोकसभेचा सदस्य म्हणून शपथ देतात.

०३. प्रोटेम अध्यक्षांना अध्यक्षांचे सर्व अधिकार प्राप्त असतात.
त्यांची मुख्य दोन कामे
—– नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविणे. या बैठकीत ते नवीन सदस्यांना शपथ देतात.
—– नवीन अध्यक्षांची निवडणूक घडवून आणतात. लोकसभेने नवीन अध्यक्षांची निवड केल्यास प्रोटेम अध्यक्षांचे पद आपोआप संपुष्टात येते. हे पद तात्पुरते व काही दिवसासाठीच असते.

इतर कामे

०१. अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना स्वतःच्या पक्षाच्या कामापासून वेगळे ठेवायचे असते. ते पक्षाचेच राहतात पण पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहतात.

०२. पदाधिकारी म्हणून ते पक्षातील कोणतेही पद धारण करत नाहीत. पक्षाच्या कोणत्याही बैठकीत वा कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. स्वतःला ते राजकीय वादात किंवा पक्षाच्या मोहिमेत गुंतवून घेत नाहीत.

०३. अध्यक्षांच्या दृष्टीपथात आल्याशिवाय कोणत्याही सदस्याला सभागृहात भाषण देता येत नाही वा काही सांगता येत नाही. सदस्याने कोणत्या क्रमाने व किती वेळ बोलावे हे अध्यक्षच ठरवतात. आपले भाषण थांबवल्यास आपले शब्द व वाक्ये मागे घेण्यास अध्यक्ष सदस्यांना बजावू शकतात.

०४. एखादे विधेयक सभागृहाने संमत केल्यावर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवण्या अगोदर अध्यक्ष त्यावर आपली सही करून ते अधिकृत करतात. सभागृहाने संमत केलेल्या विधेयकात एखादी चूक आढळली तर अध्यक्ष ती दुरुस्त करतात.

०५. अध्यक्षांची निःपक्षता, क्षमता, चारित्र्य व वर्तन यांत दोष काढणे हा हक्कभंग होतो. अध्यक्ष सभागृहाचे सेवक व स्वामीही असतात.

आतापर्यंतचे लोकसभा अध्यक्ष

लोकसभाअध्यक्षांचे नावअध्यक्षांचा कार्यकाल
पहिली१.     जी.व्ही. मावळणकर१५ मे १९५२ ते २७ फेब्रुवारी १९५६
२.     अनंथसंथानम अय्यंगार८ मार्च १९५६ ते १० मे १९५७
दुसरी अनंथसंथानम अय्यंगार११ मे १९५७ ते १६ एप्रिल १९६२
तिसरीसरदार हुकुम सिंग१७ एप्रिल १९६२ ते १६ मार्च १९६७
चौथी१.     नीलम संजीव रेड्डी१७ मार्च १९६७ ते १९ जुलै १९६९
२.     गुरदयाळ सिंग धिल्लन८ ऑगस्ट १९६९ ते १९ मार्च १९७१
पाचवी१.     गुरदयाळ सिंग धिल्लन२२ मार्च १९७१ ते १ डिसेंबर १९७५
२.     बलीराम भगत१५ मार्च १९७६ ते २५ मार्च १९७७
सहावी१.     नीलम संजीव रेड्डी२६ मार्च १९७७ ते १३ जुलै १९७७
२.     के.एस. हेगडे२१ जुलै १९७७ ते २१ जानेवारी १९८०
सातवीबलराम जाखड२२ जानेवारी १९८० ते १५ जानेवारी १९८५
आठवी बलराम जाखड१६ जानेवारी १९८५ ते १८ डिसेंबर १९८९
नववीरवि रे१९ डिसेंबर १९८९ ते ९ जुलै १९९१
दहावीशिवराज पाटील चाकूरकर१० जुलै १९९१ ते २२ मे १९९६
अकरावीपी.ए. संगमा२३ मे १९९६ ते २३ मार्च १९९८
बारावीजी.एम.सी. बालयोगी२४ मार्च १९९८ ते १९ ऑक्टोबर १९९९
तेरावी१.     जी.एम.सी. बालयोगी२२ ऑक्टोबर १९९९ ते ३ मार्च २००२
२.     मनोहर जोशी१० मे २००२ ते २ जून २००४
चौदावीसोमनाथ चैटर्जी४ जून २००४ ते ३१ मे २००९