महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर पत्रकारिता
०१. महात्मा फुले यांच्या ‘सत्यशोधक समाजा’च्या चळवळीतून ब्राह्मणेतरांच्या पत्रकारितेला चालना मिळाली. ब्राह्मणांच्या हाती असलेली वृत्तपत्रे ब्राह्मणेतरांच्या तसेच दलितांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाहीत, या भुमिकेतून निघालेले पहिले पत्र म्हणजे कृष्णराव भालेकर (१८५०-१९१०) यांचे दीनबंधू. 

०२. पुणे येथे १ जानेवारी १८७७ रोजी भालेकरांनी ते सुरु केले. पुढे आर्थिक अडचणींमुळे त्यांना ते चालविता आले नाही, त्यामुळे १८८० साली त्यांनी मुंबईतील तत्कालीन कामगारनेते नारायण मेघाजी लोखंडे आणि रामजी संताजी आवटे यांच्या स्वाधीन केले. लोखंडे यांनी हे पत्र मुंबईहून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांनी ते बरीच वर्षे चालविले. परंतु लोखंडे यांच्या मृत्यूनंतर (१८९७) ते बंद पडले. 


०३. दीनबंधूप्रमाणेच दीनमित्र हेही ब्राह्मणेतर चळवळीचे मुखपत्र होते. रावसाहेब मुकुंदराव गणपतराव पाटील यांच्या संपादनाने आणि लेखनाने हे पत्र गाजले. मुकुंदराव पाटील यांनी ते तीस वर्षे चालविले. मुळात १८८८ मध्ये कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी मासिकरुपात दीनमित्र सुरु केले. १८९२ मध्ये गणपतरावांच्या निधनाने हे पत्र बंद पडले. 


०४. ब्राह्मणेतर चळवळीचे एक अध्वर्यू दिनकरराव जवळकर (१८९८-१९३२) यांची पत्रकारितेतील कामगिरीही महत्त्वाची आहे. शाहू महाराजांच्या इच्छेनुसार त्यांनी १९२२ मध्ये तरुण मराठा हे पत्र सुरु केले. चिपळूणकर व टिळक यांच्यावरील टीकेमुळे (देशाचे दुश्मन ही पुस्तिका) जवळकरांचे नाव गाजले. 

०५. फेब्रुवारी १९२८ मध्ये त्यांनी कैवारी हे पत्र भास्करराव जाधव व जेधे बंधु याच्या प्रेरणेने व सहकार्याने सुरु केले.परदेशात जाऊन आल्यावर जवळकर बदलले आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादापासून दूर होऊन ते डाव्या विचारांकडे झुकले. शेतकरी व कामगार यांची बाजू मांडण्यासाठी ९ मे १९३१ रोजी त्यांनी तेज साप्ताहिक काढले.

०६. ब्राह्मणेतरांच्या पत्रांमध्ये वा. रा. कोठारी (पुढे ते प्रभातकार म्हणून प्रसिद्ध झाले) यांचे जागरुक, भगवंत बळवंत पाळेकर यांचे जागृती आणि श्रीपतराव शिंदे यांचे विजयी मराठा यांचा समावेश होतो. 

०७. कोठारींनी सत्यशोधक मतांचा प्रचार करण्यासाठी १९ जुलै १९१७ रोजी जागरुक हे साप्ताहिक सुरु केले. या कामासाठी त्यांना भास्करराव जाधव, रावबहादूर डोंगरे आणि अण्णासाहेब लठ्ठे यांचे साहाय्य लाभले.

०८. भगवंतराव पाळेकर यांनी २५ ऑक्टोबर १९१७ रोजी जागृती हे पत्र काढले. दर शनिवारी ते बडोद्याहून प्रसिद्ध होत असे, तरीही त्यात महाराष्ट्रातील घडामोडींची नोंद असे. पाळेकरांनी हे पत्र सु. ३२ वर्षे चालविले. १ जानेवारी १९४९ रोजी ते बंद पडले. पाळेकरांवर फुले यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. ‘मराठा शिक्षण परिषदे’च्या कार्याशी ते संबंधित होते. 

०९. ब्राह्मणेतर चळवळीचे आणखी एक मुखपत्र म्हणजे श्रीपतराव शिंदे (१८८३-१९४४) यांचे विजयी मराठा. १ डिसेंबर १९१९ पासून ते सुरु झाले. केसरीविरुद्ध भूमिका घेणारे पत्र म्हणून विजयी मराठा बहुचर्चित झाले. १९३१ मध्ये शिंदे यांनी ‘शाहू सेवा सोसायटी’ ही संस्था ‘भारत सेवक समाज’ या संस्थेच्या धर्तीवर स्थापन केली. त्यानंतर विजयी मराठा त्या संस्थेच्या वतीने प्रकाशित होऊ लागले. १ जानेवारी १९३५ रोजी ते बंद पडले. 

१०. १९२० मध्ये कायद्यातील नव्या सुधारणेनुसार निवडणुका झाल्या. ब्राह्मणेतर पक्षाने निवडणुकीत भाग घेतला. या निवडणुकीत प्रचाराचे साधन म्हणून विजयी मराठाने कामगिरी बजावली.


११. याशिवाय खंडेराव बागल यांचे हंटर (१९२५), रामचंद्र रावनारायण लाड यांचे मजूर (१९२५) या पत्रांचाही निर्देश आवश्यक आहे. हंटर हे साप्ताहिक प्रथम हरिभाऊ चव्हाण व रामभाऊ जाधव यांनी सुरु केले. पुढे एक-दोन अंकांनंतर ते खंडेराव बागल यांना चालवावयास दिले व ते त्यांनी नावारुपास आणले. मजूर या पत्राला दिनकरराव जवळकर यांचा पाठिंबा होता. ब्राह्मण आणि टिळकपंथीय हे मजूर पत्राचे टीकेचे विषय होते.


१२. २४ मे १८९१ रोजी सत्यशोधक समाजाचे सत्यधर्मसमाज असे नामांतर करण्यात आले. सयाजीराव गायकवाड, शिवाजीराव होळकर, विश्राम रामजी घोले यांच्या मदतीने (आर्थिक साहाय्याने) या सत्यधर्म समाजाने सत्यप्रकाश नावाचे पत्र काढले. मात्र ते लवकरच बंद करावे लागले.



१३. अब्राह्मणी पत्रकारितेत वरील वृत्तपत्रांशिवाय बडोदावत्सल, राघवभूषण, अंबालहरी, शेतक-यांच्या कैवारी, इशारा, सत्सार, कैवारी, जागृती, विजयी मराठा, मातंग बंधू, नवा मनू, पतितपावन इ. वृत्तपत्रांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.





दलित पत्रकारिता
०१. आंबेडकरपूर्व दलित पत्रकारितेमध्ये गोपाळबाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागू बनसोडे यांचे सामाजिक जागृतीचे कार्य मोठे आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकारितेचे माध्यम जवळ केले. 


०२. गोपाळबाबा वलंगकर हे पहिले दलित पत्रकार. त्यांनी अस्पृश्यांतील सर्व जातींना संघटित करुन गुलामगिरीविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. 


०३. लष्करातून १८८६ मध्ये निवृत्त झाल्यावर २३ ऑक्टोबर १८८८ रोजी त्यांनी विटाळ विध्वंसन नावाची पुस्तिका प्रकाशित केली. या पुस्तिकेत त्यांनी हिंदू समाजव्यवस्थेचे बौद्धिक पातळीवर विश्लेषण केले आहे. १८९० मध्ये त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी ‘अनार्यदोष परिहारक मंडळी’ स्थापन केली. 


०४. इंग्रजांच्या राजवटीबाबत मात्र त्यांचे मत अनुकूल होते. इंग्रजी राजवट दलितांना उत्थानाची संधी देईल, अशी आशा त्यांना होती. अस्पृश्यांचा लष्करातील भरतीला करण्यात आलेल्या मनाईविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. या संदर्भात १८९४ मध्ये त्यांनी इंग्रज सरकारला विस्तृत निवेदन सादर केले. 


०५. दलितांचे पहिले संपादक शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे पहिले दलित पत्र (मासिक) १ जुलै १९०८ रोजी सुरु केले. सुमारे तीन वर्षे ते चालले. कांबळे यांनी आदि हिंदू हे वृत्तपत्र काढल्याचा उल्लेखही आढळतो. 


०६. सोमवंशीय मित्र या पत्रापूर्वी मराठा दीनबंधू (१९०१), अंत्यज विलाप (१९०६) आणि महारांचा सुधारक (१९०७) या तीन पत्रांचा उल्लेख केला जातो. त्याचे जनकत्व किसन फागू बनसोडे (१८७९-१९४६) यांच्याकडे दिले जाते. मात्र या तिन्ही पत्रांसंबंधी काहीही माहिती उपलब्ध नाही. 


०७. कांबळे यांनी सोमवंशीय मित्रमधून व तत्कालीन इतर मराठी-इंग्रजी पत्रांतून लेखन केले. ते कार्यकर्ता-संपादक होते. अस्पृश्यता-निवारणाच्या कार्यासाठी त्यांनी सभा, संमेलने व अधिवेशने आयोजित केली. मुरळी, जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली तसेच देवदासींच्या विवाहासाठी पुढाकारही घेतला. त्याचा परिणाम सोमवंशीय मित्रवर झाला. त्यात आर्थिक कारणांची भर पडली व १९११ मध्ये हे पत्र बंद पडले. 


०८. राजकीय प्रश्नाबद्दल लिहिताना जहाल पक्षाचा निर्देश ते ‘नवीन दांडगा पंथ’ असा व पुढे ‘टवाळ पक्ष’ म्हणूनही करीत. शिवजयंती उत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव यांवर त्यांनी टीका केली. 


०९. किसन फागू बनसोडे यांनीही दलित पत्रकारितेची पार्श्वभूमी तयार केली. शिक्षणाचा प्रसार आणि दलितांची आर्थिक उन्नती यांसाठी १९०३ साली त्यांनी ‘सन्मार्गबोधक निराश्रित समाज’ नावाची संस्था स्थापन केली. 


१०. १९०७ साली त्यांनी मुलींची शाळा काढली व मुद्रणालय सुरु केले. यांशिवाय त्यांनी तीन स्वतंत्र पत्रेही काढली. निराश्रित हिंदू नागरिक (१९१०), विटाळ विध्वंसक (१९१३), मजूर पत्रिका (१९१८) व चोखामेळा (१९३१) या चार पत्रांमधून दलितांवरील अन्यायाविरुद्ध त्यांनी लेखन केले. हिंदू धर्म, धर्मग्रंथ आणि रुढीग्रस्त समाज हे त्यांच्या लेखनाचे विषय होते.


११. डॉ. आंबेडकर यांनी मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात दलित पत्रकारितेच्या रुपाने केलेली कामगिरी मोलाची आहे. त्यांनी मूकनायक (३१ जानेवारी १९२०), बहिष्कृत भारत (१९२७), जनता (१९३०) आणि प्रबुद्ध भारत (१९५६) अशी चार पत्रे चालविली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समाज समता संघाचे अध्यक्ष होते व समता हे या संघाचे मुखपत्र होते.

१२. डॉ. आंबेडकरांची काही समाजसुधारकांसह शाहूमहाराजांशी १९१९ साली मुंबईत भेट झाली. या भेटीत वर्तमानपत्राची कल्पना मांडण्यात आली. महाराजांना ती पसंत पडल्यामुळे त्यांनी लगेच डॉ. आंबेडकरांना अडीच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले. त्यातून मूकनायकचा जन्म झाला. 


१३. मूकनायकाचे संपादकत्व त्यांनी पांडुरंग नंदराम भटकर या तरुणाकडे सोपविले. मूकनायकमधून डॉ. आंबेडकरांनी दलितांचे प्रश्न मांडले, तरी त्या काळी ते चळवळीचे मुखपत्र बनू शकले नाही. कारण मूकनायक सुरु झाल्यावर काही महिन्यांतच-म्हणजे ५ जुलै १९२० रोजी-अभ्यासासाठी डॉ. आंबेडकर लंडनला गेले. तेथून ते ३ एप्रिल १९२३ रोजी भारतात परतले. 


१४. मूकनायकमध्ये डॉ. आंबेडकरांनी चौदा लेख लिहिले. पुढे भटकर यांच्याकडून ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांनी सूत्रे हाती घेतली. तथापि १९२३ मध्ये मूकनायक बंद पडले.


१५. २० जुलै १९२४ रोजी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली, त्यातूनच ३ एप्रिल १९२७ रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक पत्र उदयाला आले.


१६. बहिष्कृत भारतचे संपादक, मुद्रक आणि प्रकाशक डॉ. आंबेडकर हेच होते. त्याचा उल्लेख त्यांनी पाक्षिक पत्र असा केला आहे. एका शुक्रवारी बहिष्कृत भारत व एका शुक्रवारी समता असा प्रयोगही त्यांनी काही काळ केला. अखेर १५ नोव्हेंबर १९२९ रोजी हे पत्र बंद पडले. 


१७. त्यानंतर २४ नोव्हेंबर १९३० रोजी जनताचा पहिला अंक प्रकाशित झाला. देवराव विष्णु नाईक हे त्याचे संपादक होते. जनता प्रथम पाक्षिक होते. मग ते ३१ ऑक्टोबर १९३१ रोजी साप्ताहिक झाले. जनता या शीर्षकाखाली इंग्रजीत द पीपल असे लिहिलेले असे. आपल्या व्यापामुळे डॉ. आंबेडकरांना लेखनासाठी पुरेशी सवड मिळत नसे; परंतु सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात ते आवर्जून लिहीत. 


१८. जनता पत्र पंचवीस वर्षे (१९५५ पर्यंत) नियमितपणे चालले. भा. द. कद्रेकर, गं. नी. सहस्रबुद्धे, बी. सी कांबळे आणि यशवंतराव आंबेडकर यांसारख्यांनी जनताचे संपादकपद सांभाळले. 


१९. जनताचे प्रबुद्ध भारत असे नामांतर ४ फेब्रुवारी १९५६ रोजी करण्यात आले. ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर या पत्रासाठी संपादक मंडळ नेमण्यात आले. संपादक म्हणून यशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दा. ता. रुपवते, शंकरराव खरात व भा. द. कद्रेकर यांनी क्रमाक्रमाने जबाबदारी सांभाळली. 


२०. ३ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यावर प्रबुद्ध भारत हे त्या पक्षाचे मुखपत्र बनले. १९६१ साली हे साप्ताहिक अंतर्गत वादामुळे बंद पडले.



२१. डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून अनेक विषय हाताळले. वृत्तपत्र हे मतपत्र असते, असे ठामपणे सांगून डॉ. आंबेडकरांनी हे लेखन केले आहे. ‘हिंदू धर्माला नोटीस’ व ‘अस्पृश्यता-निवारणाचा पोरखेळ’ यांसारखे त्यांचे लेख अविस्मरणीय ठरले आहेत.