इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग २

द्वितीय इंग्रज म्हैसूर युद्ध (१७८०-१७८४)
०१. पहिल्या म्हैसूर युद्धामुळे हैदर व इंग्रज यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले. पण ही मैत्री फार काळ टिकली नाही. याला काही गोष्टी कारणीभूत ठरल्या. पहिली गोष्ट १७७१ मध्ये मराठ्यांनी हैदरवर आक्रमण केले. तेव्हा इंग्रज हैदरच्या मदतीला आले नाहीत. त्यामुळे त्याला मराठ्यांकडून पराभव पत्करावा लागला. 

०२. दुसरी गोष्ट इंग्रजांनी फ्रेंचांचे माहे हे बंदर जिंकून घेतले. १७७८ मध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात फ्रांस अमेरिकन वसाहतीच्या बाजूने युरोपियन आघाडीत ब्रिटिशांविरूद्ध सामील झाला. त्यामुळे ब्रिटिशांनी फ्रेंचांच्या भारतातील सर्व वसाहती ताब्यात घेतल्या. त्यापैकी एक माहे बंदर हैदरच्या अधिपत्याखाली होते. 

०३. तोफा, बारूद, बंदुका इत्यादी युद्धसामग्रीसाठी हैदर फ्रेंचावर अवलंबून होता. ही सामग्री हैदरला मलबार किनाऱ्यावरील माहे बंदरातून मिळत होती. अशा स्थितीत इंग्रजांनी माहे जिंकून सरळ हैदरला आव्हान दिले होते. तरीही त्याने इंग्रजांशी संबंध तोडले नाहीत. पण जेव्हा मुंबईच्या कंपनीकडून हैदरने मागविलेले युद्ध साहित्य कंपनीने पाठविले नाही, तेव्हा मात्र हैदर खूप संतापला. तो इंग्रजांचा सूड घेण्याची वाट पाहू लागला.

०४. इंग्रज मराठ्यांच्या कारभारात हस्तक्षेप करीत असल्याने मराठे इंग्रजांवर नाखूष होते. हैदरची मनस्थिती लक्षात घेऊन मराठ्यांनी त्याला काही प्रदेश देण्याचे कबुल केले व आपल्या बाजूला ओढून घेतले. निजामाशी इंग्रजांनी केलेल्या तहाच्या अटी पाळल्या नाहीत. कंपनीने वार्षिक ७ लाख रुपये खंडणी निजामाला दिली नाही. उलट निजामाचा गुंटूर जिल्हा इंग्रजांनी बळकावला. अशाप्रकारे इंग्रजांवर चिडलेल्या अनेक शक्ती एकत्र आल्या. 

०५. १७७९ मध्ये नाना फडणीसाने इंग्रजांविरूद्ध युद्धाची एक प्रंचंड आघाडी उभारली. हे युद्ध १७८० मध्ये चालू झाले आणि १७८२ मध्ये संपले. मराठ्यांनी वऱ्हाड व मध्य प्रदेशाकडून तर निजामाने उत्तर सरकार प्रांताकडून इंग्रजांवर हल्ला करण्याचे ठरविले. यात हैदरकडे मद्रासची जबाबदारी होती.


०६. त्यानुसार जुलै १७८० मध्ये त्याने कर्नाटकवर आक्रमण केले. ८३,००० फौजेसह हैदरअलीने कर्नाटकावर स्वारी केली त्यावेळी त्याच्याकडे युरोपियन इंजिनियर्सनी बनवलेल्या शंभर अवजड मैदानी तोफाही होत्या. तेव्हा इंग्रजांनी कर्नल बेली व मेजर मनरो यांना मोहिमेवर पाठविले. हैदर अलीने कर्नाटक संपूर्णपणे बेचिराख केला

०७. कर्नल बेरीच्या नेतृत्वाखालील ४००० च्या ब्रिटिश फौजेला हैदरअलीने कोंडीत पकडले व तिला पोलिलोर येथे सप्टेंबर १७८१ मध्ये शरण येण्यास भाग पाडले. ऑक्टोबरमध्ये अर्काटही हैदरअलीच्या हातात पडले. बक्सार येथे विजय मिळविणारा सर हेक्टर मन्रो हासुद्धा हैदरअलीसमोर टिकाव धरू शकला नाही.  हेक्टर मन्रोने त्याच्याकडील अवजड तोफखाना कांजीवरम तलावात बुडवून टाकला व मद्रासकडे माघार घेतली.

०८. त्यानंतर घाबरून जाऊन पण मोठ्या मुत्सद्दीपणाने जनरल हेस्टिंग्जने निजाम व नागपूरकर भोसल्यांना हैदरपासून दूर केले. त्यांनी निजामाचा घेतलेला गुंटूर जिल्हा परत करून निजामाला शांत केले. शिंद्यांची मनधरणी करून त्यांच्याशी तह केला व वर्‍हाडच्या भोसल्यास लाच देऊन गप्प बसविले. पण हैदर लढत राहिला.

०९. वॉरन हेस्टींग्जने बंगाल येथील ब्रिटिश लष्कराचा सरसेनानी सर आयर कूटला ताबडतोब दक्षिणेत चिंगलपेट आणि वाँदिवॉश येथील वेढ्यात अडकून पडलेल्या ब्रिटिश फौजेच्या मदतीसाठी पाठवले. मराठ्यांच्या ताब्यातील ओरिसामधून इंग्लिश सैन्य दक्षिणेकडे पाठविण्यास मराठ्यांची अनुमतीही मिळवली.१ जुलै १७८१ रोजी पोर्टोनोव्हो येथे हैदरअलीची सर आयर कूटशी पहिली चकमक झाली. या लढाईत हैदरअलीचे एक हजार सैनिक कामी आले व त्याला माघार घ्यावी लागली. 

१०. हैदरअली व ब्रिटिश यांच्यात दुसरी लढाई तिकोल्लमच्या मैदानात झाली पण तिचा कोणताही निर्णय लागू शकला नाही. तिसरी मोठी लढाई २७ सप्टेंबर १७८१ रोजी शोलींघूर येथे झाली. या लढाईत हैदरअलीचे ५००० सैनिक ठार झाले.


११. मात्र लगेच सावरून १७८२ साली टिपूने ब्रेथवेटच्या नेतृत्वाखालील इंग्रज फौजेला तंजावर येथे हरवले. नंतर इंग्रजांनी डचांची नेगापटम व त्रिंकोमाली ही ठाणी घेतली. इतक्यात फ्रेंच जनरल सफ्रेन सैन्य घेऊन आला. त्याने त्रिंकोमाली परत घेतली व हैदर अलीने इंग्रजांपासून कडलोर घेतले. कडलोर हे ठिकाण जिंकल्याने हैदरअलीच्या आशा परत पल्लवित झाल्या. तशातच डे सफ्रेनच्या नेतृत्वाखालील फ्रेंच आरमारातील २००० सैनिक हैदरअलीच्या मदतीला आले.
१२. १७ मे १७८२ रोजी मराठ्यांनी हैदरला विश्वासात न घेत इंग्रजांसोबत सालबाईचा तह केला व आपल्यापुरते युद्ध समाप्त केले. त्यामुळे संतापलेल्या हैदरने न थांबता वॉरेन हेस्टिंग्जने पाठविलेल्या जनरल आयरकुट ह्या अनुभवी इंग्रज सेनापतीचा जबरदस्त पराभव केला. 

१३. पण ०७ डिसेंबर १७८२ रोजी हैदरअलीचा कर्करोगाने मृत्यु झाला. अशा परिस्थितीत हैदरअलीचा विश्वासू मंत्री पूर्णय्या याच्या सल्ल्यावरून टिपूच्या आगमनापर्यंत हैदरअलीच्या मृत्यूची बातमी गुप्त ठेवण्यात आली. टिपू आल्यानंतर त्याने आपल्या वडिलाचे शव श्रीरंगपट्टणम येथे आणून दफन केले. त्यानंतर टिपू हा टिपू सुलतान या नावाने गादीवर आला व त्याने ब्रिटिशांशी लढण्यासाठी एक योजना तयार केली.

१४. म्हणून इंग्रजांच्या मदतीसाठी मुंबईहून जनरल मैथ्युजला पाठविण्यात आले. त्याने पश्चिम तटावरील मंगलोर घेऊन बेद्नुरही जिंकले. तेव्हा टिपूने आक्रमक चढाई करून ते परत हिसकावून घेतले व शेकडो इंग्रजांना बंदी बनविले. यावेळी टिपुला फ्रेंचांचा थोडाफार पाठींबा होता. 

१५. युरोपात इंग्लंड व फ्रांस यांच्यात १७८३ मध्ये व्हर्सायच्या तहाद्वारे मैत्री झाली. त्यामुळे फ्रेंचांनी टिपुचा पाठींबा काढून घेतला. याचा फायदा घेऊन इंग्रजांनी कोइम्बतूर, पालघाट जिंकून टिपुची राजधानी श्रीरंगपट्टनमकडे मोर्चा वळविला. पण मद्रास गवर्नरने आर्थिक अडचणीमुळे इंग्रज फौज मागे घेण्यास कळविले. अखेर  मंगलोर तह होऊन ११ मार्च १७८४ रोजी हे युद्ध समाप्त झाले.

१६. या तहाद्वारे दोन्ही पक्षांनी जिंकलेला मुलुख आणि युद्धकैदी परस्परांना परत केले. वॉरन हेस्टींग्जच्या दृष्टीने हा तह ब्रिटिशांना कमीपणा आणणारा असला तरी त्याला तो मान्य करावा लागला. या तहामुळे दोन्ही पक्षात मैत्रीसंबंध निर्माण झाल्यामुळे म्हैसूर राज्यात कंपनीला व्यापार करण्याची परवानगी वॉरन हेस्टींग्जने टिपूकडे मागितली पण टिपूने ती मान्य केली नाही. 


तृतीय इंग्रज - म्हैसूर युद्ध (१७९०-१७९२)
०१. १७८४ च्या पीटच्या कायद्यात असे म्हटले होते कि कंपनी ह्यापुढे कोणताही नवीन प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न करणार नाही. तरीही लॉर्ड कॉर्नवैलिसने १७९० मध्ये टिपूविरुद्ध इंग्रज, मराठे आणि निजाम असा संघ तयार केलाकॉर्नवॉलिस याने निजामाचा गुंटुर प्रांत मागितला व त्याबद्दल टिपूने निजामाचा घेतलेला मुलूख परत घेण्यासाठी त्यास सैन्याची मदत देण्याचे मान्य केले. 

०२. तथापि ज्या मुलखावर निजाम हक्क सांगत होता, तो टिपूचाच आहे, ही गोष्ट मंगळूरच्या तहात इंग्रजांनी मान्य केली होती. तरीही कंपनीच्या मित्रराज्यांविरूद्ध सैन्य न वापरण्याच्या अटीवर इंग्रजांनी सैन्य दिले व मित्रराज्यांच्या यादीतून म्हैसूरला वगळले. यामुळे १७८४ चा तह मोडल्याबद्दल टिपू इंग्रजांवर फार चिडला. मग टिपूनेही त्यादृष्टीने फ्रांस व तुर्कस्थानला आपले दूत रवाना त्यांच्या सहाय्याची मागणी केली. गवर्नर कॉर्नवलिस याला हे आवडले नाही.

०३. टिपुने निजामाचे नरगुंद व कित्तूर हे प्रदेश जिंकून कॉर्नवलिसला संधी मिळवून दिली. पण कॉर्नवलिसने कारवाई करण्याअगोदर मराठे व निजाम टिपुच्या मदतीला जाणार नाहीत याची खबरदारी घेतली. त्याने निजामाला प्रदेश परत मिळवून देण्याचे वचन दिले. त्याचप्रमाणे त्याने टिपुला मदत न करण्यासाठी मराठ्यांचे मन वळविले.

०४. त्यातच त्रावणकोरच्या राजाने डचांपासून कोचीन संस्थानातील काही प्रदेश विकत घेण्याचा प्रयत्न केला. कोचीन संस्थान टिपुच्या संरक्षणाखालील असल्याने ते टिपूच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप होते. तसेच त्रावणकोरच्या राजाच्या आशीर्वादाखाली टिपूच्या राज्यातील बंडखोरानी आश्रय घेतला होता. 

०५. संतप्त होऊन एप्रिल १७९० मध्ये टिपूने त्रावणकोरवर आक्रमण केले. त्रावणकोरच्या मदतीला इंग्रज धावून आले. कारण तसा तह इंग्रज व त्रावणकोर यांच्यात १७८४ साली झाला होता. त्यामुळे टिपूविरुद्ध इंग्रज, मराठे व निजाम असा संघ तयार झाला होता. कॉर्नवलिसने जानेवारी १७९० मध्ये टिपूविरुद्ध युद्ध पुकारले. १७९० मध्ये तो स्वत:च स्वारीवर निघाला.

०६. युद्धाच्या प्रारंभीच्या काळात टिपुची सरशी होत गेली. मग स्वतः कॉर्नवालीसने मार्च १७९० मध्ये मोहिमेची सूत्रे आपल्या हातात घेतली. कॉर्नवलीस अडचणीत सापडला असता मराठ्यांनी त्यास सहाय्य केले. मुंबईकर इंग्रजांचीही मदत त्याला मिळाली. 

०७. २९ डिसेंबर १७८९ रोजी टिपूने कोईंबतूरहून १४,००० सैनिक घेउन नेडुमकोट्टाकडे चाल केली. तेथे झालेल्या लढाईत टिपूचा सपशेल पराभव झाला. त्याचे सैन्य पळ काढत असताना गव्हर्नर हॉलंडने त्याच्याशी वाटाघाटी सुरू केल्या. याच वेळी हॉलंडने टिपूचा काटा न काढल्यामुळे रागावलेल्या कॉर्नवॉलिसने त्याच्याऐवजी जनरल मेडोझला पाठवले. मेडोझने हॉलंडची हकालपट्टी करून तिरुचिरापल्ली येथे तळ ठोकला आणि टिपूविरुद्ध कारवाया करण्याचा बेत सुरू केला. 

०८. टिपूने तंजावर या मराठा राज्यावर केलेल्या आक्रमणामुळे मराठ्यांचा टिपूवर राग होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांना टिपूविरूद्धच्या संघर्षात ओढून त्यांना टिपूकडून जिंकलेल्या प्रदेशात वाटा देण्याच्या हेतूने ब्रिटिश दूताने १ जून १७९० रोजी मराठ्यांशी एक स्वतंत्र करार केला. या कराराला ५ जुलै १७९० रोजी गव्हर्नर जनरल इन कौन्सिलने मान्यता दिली. ब्रिटिशांनी निजामाशी केलेल्या करारात मराठ्यांनाही सहभागी करून त्या कराराला त्रिमित्र कराराचे स्वरुप दिले.०९. टिपूविरूद्धची पहिली मोहीम जनरल मेडोजच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती. पण या मोहीमेत जनरल मेडोजला मद्रास प्रेसिडन्सीकडून पुरेशी मदत न मिळाल्याने मेडोजची ही मोहीम अयशस्वी झाली. या युद्धाचा निकाल लवकर लागावा म्हणून कॉर्नवॉलिस स्वतः मद्रास येथे आला व त्याने वैयक्तिकरीत्या सैन्याचे नेतृत्व स्विकारले. मार्च १७९१ मध्ये कॉर्नवॉलिसने बंगलोरवर आक्रमण करून बंगलोर शहरावर ताबा मिळविला.

१०. टिपूला श्रीरंगपट्टणमजवळ आरिकेरा येथे कोंडीत पकडले. टिपूच्या ताब्यातील धारवाडचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटिश, निजाम आणि मराठ्यांच्या संयुक्त फौजांना शर्थीची झुंज द्यावी लागली. या युद्धमोहीमेत धारवाड किल्ला घेण्यासाठी या संयुक्त फौजांना सप्टेंबर १७९० ते एप्रिल १७९१ असे सहा महिने युद्ध करावे लागले.

११. एप्रिल १७९१ मध्ये निजामाची १०,००० ची फौज श्रीरंगपट्टणमच्या वेढ्यात इंग्रजांना येऊन मिळाली. नंतर पावसाळा आणि रसदीचा अल्पपुरवठा यामुळे हा वेढा उठवावा लागला. वेढा उठविल्यानंतर कॉर्नवॉलिस नवीन योजना आखण्यासाठी मद्रासला परत आला. युद्धसाहित्याच्या अभावी कॉर्नवॉलिसला माघार घ्यावी लागली, पण मराठ्यांमुळे त्याची अब्रु बचावली. 

१२. नवीन योजनेनुसार १७९२ च्या सुरुवातीला ब्रिटिश फौजेने श्रीरंगपट्टणमवर दुहेरी हल्ला केला. मराठे व निजामाच्या लष्करानेही म्हैसूर राज्यात धुमाकूळ घालून टिपूचे प्रचंड नुकसान केले. म्हैसूरचे डोंगरी किल्ले एकामागून एक ब्रिटिश फौजेच्या हाती पडू लागले. टिपू सुलतान त्याच्या तटबंदी असलेल्या राजधानीत आश्रयाला गेला होता पण तिथेही त्रिमित्र फौजेने त्याला घेराव घातला.

१३. तिघांचे सैन्य असल्याने टिपूची ताकद कमी पडली. शेवटी त्रस्त झालेल्या टिपू सुलतानाने शांततेसाठी कॉर्नवॉलिसकडे विनवणी केली. कॉर्नवॉलिसनेही स्वतःच्या अटींवर त्याला मान्यता दिली.

१४. म्हणून त्याने मार्च १७९२ मध्ये श्रीरंगपट्टमचा तह करून हा संघर्ष थांबविला. या तहानुसार टिपूला आपले अर्धे राज्य गमवावे लागले. इंग्रजांना दिंडीगल, बारामहाल सालेम व मलबार प्रदेश मिळाला. कुर्गचा राजा इंग्रजाचा मांडलिक झाला. मराठ्यांना कृष्णा नदीपासून तुंगभद्रेच्या उत्तरेकडील प्रदेश मिळाला तर निजामाला कुडाप्पा व गुंजीकोटीसोबतच  कृष्णा व पेन्नार नद्यामधील प्रदेशाची प्राप्ती झाली. प्रत्येकाला ४ लक्ष पौंड उत्पन्नाचा प्रदेश मिळाला. 

१५. टिपुला सर्व युध्दकैद्यांची सुटका करावी लागली. शिवाय टिपूला ३ कोटी ३० लाख रुपये युद्ध खंडणी द्यावी लागली. खंडणीची पूर्ण रक्कम देईपर्यंत टिपुला आपल्या दोन मुलांना इंग्रजाकडे 'ओलिस' ठेवावे लागले. या तहामुळे पश्चिमेकडून मुंबईकर इंग्रज व पूर्वेकडून मद्रासकर इंग्रज यांच्या सरहदी वाढून ते परस्परांच्या अधिक जवळ आले. 


'इंग्रज म्हैसूर युद्धे - भाग ३' वाचण्यासाठी येथे क्लिक करा.