क्रांतिसिंह नाना पाटील

जन्म: ३ ऑगस्ट १९०० (बहेबोरगाव, वाळवा, सांगली, महाराष्ट्र)
मृत्यू: ६ डिसेंबर १९७६ (वाळवा, महाराष्ट्र)

जीवन

०१. क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
०२. नाना पाटील यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ असे होते. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील याना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.
०३. येडे मच्छिंद्र, दुधोंडी, नागराळे यथे प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते

स्वातंत्र्य लढा

०१. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
०२. नानांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती जी १९२९ ते १९३२ या काळात भूमिगतच होती. नाना प्रामुख्याने सातारा जिल्ह्याच्या तासगाव, वाळवा, खानापूर, कराड या तालुक्यात सक्रिय होते. काही काळ ते धनकवडी, पुरंदर येथेही होते. तेथे त्यांना शामराव ताकवले यांनी मदत केली.
०३. कायदेभंग चळवळीत भाग घेऊन सत्यशोधकी नाना सत्यागृही नाना बनले. त्यानंतर गांधींनी पुकारलेल्या वैयक्तिक सत्यागृहात नानांनी आपल्या वाळवा तालुक्यात दोन वेळा सत्यागृह केला. गांधीवादी असूनसुद्धा गांधी इतकी प्रतिकार शक्ती त्यांच्याकडे नव्हती. ब्रिटीश सरकारवर थेट हल्ला करण्यात यावा अशा मताचे ते होते. इंग्रज सरकारने नानांना फरारी घोषित करून त्यांच्या घरादाराचा लिलाव पुकारला परंतु हा लिलाव घेण्यास कोणीच पुढे आले नाही.
०४. ७ मार्च १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला. सर्व राजकीय कैद्यांची सुटका झाली. नानावरील पकड वॉरंट ही रद्द झाले. पण तलाठी प्रकरणात त्यांना दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली.
०५. ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार‘ हे सूत्र त्यांनी १९४२ च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती.
०६. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे केली जात. लोकन्यायालये, सैनिक व घटना, कर्जनिवारण, दारूबंदी, जमीनदारी व सावकारी बाबतचे प्रश्न, अन्नधान्य पुरवठा, कपडा, आरोग्य, शिक्षण, समाजाचे नैतिक पुनर्वसनाचे प्रश्न, जातीयतेला मूठमाती, बाजार व्यवस्था यासारखी अशी बारा कलमी योजना नानांच्या ग्राम राज्यात अंतर्भूत होती.
०७. जमीन मालकी हक्काच्या प्रश्नासंबंधी न्यायनिवाडा करणे, दरोडेखोर व सरकारी हस्तकांपासून लोकांचे संरक्षण करणे, महात्मा गांधींच्या विचारावर आधारित ग्रामराज्याची स्थापना करणे, अन्नधान्य व बाजारव्यवस्था तसेच वाहतूक याबाबतीतील व्यापारी व सरकारी संस्था यांना संरक्षण देणे, सावकारांचे जुलमी व्यवहार व फौजदारी गुन्हे इत्यादीबाबत न्याय निवाडा करणे ही प्रतीसरकारची उद्दिष्टे होती.
०८. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता. प्रतीसरकारची प्रमुख तीन विभागात रचना होती. तुफान सेना, लोकराज्य आणि न्यायव्यवस्था.
०९. त्यातील एक दल तुफान दलाचे फील्ड मार्शल कुंडलचे जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. १९४४ च्या अखेरीस या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. भूमिगत दल, तुफान दलाचे मध्यवर्ती नियंत्रण, फिरती न्यायमंडळे, गाव पंचायत कमिट्या अशी तुफान संघटनेची चौपदरी यंत्रणा होती.
१०. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली. नाना पाटलांच्या ‘प्रति सरकार’ला लोक ‘पत्रीसरकार’ म्हणत. नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अशा अफवा असत.
११. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
१२. प्रतिसरकारच्या न्यायालयीन कामकाजासाठी स्वतंत्र न्यायदान मंडळे स्थापन करण्यात आली होती. सरकारचा कारभार लोकशाही पद्धतीने चालत असे. १९४३ ते १९४६ या तीन वर्षाच्या काळात सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार अस्तित्वात होते.
१३. १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते ४४ महिने भूमिगतच होते. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच ७ मे १९४६ रोजी क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.
१४. नानांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी ‘गांधी -विवाह’ ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

सामाजिक कार्य

०१. १९१९ पासून प्रार्थना समाजासोबत त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. अंधविश्वास आणि अनिष्ट प्रथा याबाबत जागृती करणे आणि बहुजन समाजाचा विकास करणे हे नानांच्या सामाजिक कार्याचे उद्दिष्ट होते.
०२. नानांनी १० वर्षे प्रार्थना समाज व सत्यशोधक समाज यांच्यासोबत कार्य केले. या काळात त्यांनी ‘समाज-विवाह’ आणि ‘स्त्री शिक्षण’ यांसारखे उपक्रम राबविले. सत्यशोधक समाजाने चालविलेल्या शेतकरी चळवळीत नानांनी भाग घेतला. याच कारणावरून सरकारने नानांना मिळालेल्या हक्काच्या तलाठ्याच्या नोकरीवरून काढून टाकले.
०३. ते जातीव्यवस्थेविरोधात होते. प्रभू आणि त्याच्या भक्ता मध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही असे ते म्हणत असत. संपूर्ण आयुष्यात त्यांनी गरीब आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला.लग्न आणि इतर समारंभातील अनावश्यक खर्च टाळा असे ते शेतकऱ्याना समजावत असत. कर्ज घेणे ताळा आणि मुलांना त्यांच्या सामाजिक विकासासाठी शिक्षण द्या असे ते उपदेश देत.
०४. १९७० च्या काळात शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, शेतमालाच्या भावासाठी जे संघर्ष केले त्याची पार्श्वभूमी नाना पाटील यांनी तयार केली होती.

स्वातंत्र्योत्तर काळ

०१. महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण चिघळले. ब्राह्मण समाजाची घरे जाळली गेली. यास ब्राह्मणेतर चळवळीतील लोक जबाबदार आहेत असे समजून बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळाने त्यांच्यावर आकस धरला. जाळपोळीशी संबंध नसणाऱ्या ब्राह्मणेतर लोकांनाही पकडण्यात आले. नाना पाटील यांना या सरकारी कारवाया आवडल्या नाहीत.
०२. त्यातच शंकरराव मोरे, केशवराव जेधे, भाऊसाहेब राउत, तुळशीदास जाधव, माधवराव बागल इत्यादींनी २६ एप्रिल १९४८ रोजी ‘शेतकरी कामगार पक्ष’ स्थापन केला. नानांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षापासून केली. परंतु त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आणि शेतकरी कामगार पक्षात सामील झाले. शेतकरी कामगारांचे राज्य स्थापन करण्यासाठी नानांनी महाराष्ट्रभर प्रचार दौरे काढले.
०३. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला.राजकीयदृष्ट्या नाना पाटील यांचा कडवा समाजवाद सहसा व्यावसाईक राजकीय नेत्यांच्या पचनी पडला नाही. म्हणून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले.
०४. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.