न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ऊर्फ माधवराव रानडे

जन्म : १८ जानेवारी १८४२ (निफाड, नाशिक, महाराष्ट्र)
मृत्यू : १६ जानेवारी १९०१

वैयक्तिक जीवन

०१. महादेव गोविंद रानडे हे ब्रिटीशकालीन भारतातील एक मोठे समाजसेवक होते. १८६२ साली त्यांच्या तत्वावर आधारित ‘इंदूप्रकाश’ या वर्तमानपत्रात लेखन करून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली.
-हे वृत्तपत्र दोन भाषेत होते. त्यांना ‘फादर ऑफ जस्टीस’ ही बिरुदावली बहाल करण्यात आलेली आहे. त्यांना ‘पदवीधरांचे मुकुटमणी’ असेही म्हटले जाते.

-गणेश वासुदेव जोशींच्या समाज विषयक व अर्थविषयक विचारांचा रानडेवर प्रभाव होता.

०२. त्यांचे वडील कंपनी सरकारच्या पदरी कारकून होते. म्हणून त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली.
-१८५६ नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, १८५८ मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला.
०३. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी ‘मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष’ या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले.
-१८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर १८६२ साली विद्यापीठाचे जे पहिले चार पदवीधर झाले त्यापैकी महादेव गोविंद रानडे हे एक होते. इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी ऑनर्ससह पदवी प्राप्त केली.
०४. १८६४ साली ते इतिहास हा विषय घेऊन एल्फिन्स्टन कॉलेजमधून  एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले.
-१८६६ साली ते कायद्याची एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली.
०५. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रानडेंनी दोन वर्षे ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून नोकरी केली. त्यानंतर ते अक्कलकोट संस्थानात दिवाणजी म्हणून रुजू झाले.
-त्याच्यानंतर काही काळ त्यांनी कोल्हापूर संस्थानात न्यायाधीश म्हणूनही काम केले. पुढे १८६८ साली ते एल्फिन्सटन कॉलेजमध्ये इंग्रजी व इतिहासचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
०६. १८७१ मध्ये ते एडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण झाले.
-१८७१ मध्ये मुंबईत फौजदारी न्यायाधीश पदी काम केल्यानंतर नोव्हेंबर १८७१ मध्ये त्यांची पुणे येथील न्यायपालिकेत सबऑडमिनेट न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

-जानेवारी १८७८ मध्ये न्या. रानडे यांची नाशिक येथे ‘सदर अमीन’ म्हणून नेमणूक करण्यात आली.

०७. माधवरावांच्या समाजकारणाच्या प्रारंभी अलेक्झांडर ग्रॅन्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा त्यांच्यावरील विश्वास त्यांनी अनुभवला.
-पण पुढे क्रांतिकारकांचे, पेंढाऱ्यांचे बंड, दुष्काळ आणि तत्कालीन सरकारविरोधी घटनांत माधवरावांचा हात असल्याचा संशय सरकारला येऊ लागला.
– मे १८७९ मध्ये पुण्यातील विश्रामबाग वाडा व बुधवार वाडा येथे आगी लावण्यात आल्या. त्याच्या संशयावरून आणि वासुदेव बळवंत फडके यांना पाठिबा दिल्याच्या कारणावरून त्यांची बदली १८७९ साली धुळे येथे झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या टपालावर नजर ठेवण्यात येऊ लागली.

-यामुळे गणेशशास्त्री लेले या मित्राने त्यांना नोकरीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. पण माधवरांवांनी हा सल्ला मानला नाही. पुढे यथावकाश सरकारचा संशय दूर झाला.

०८. १८८० मध्ये परत त्यांची पुणे येथे बदली करण्यात आली. १८८४ मध्ये पुण्याच्या स्मॉल कॉज कोर्टात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
-१८९२ साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक झाली व सेवानिवृत्तीपर्यंत (१९०१) ते याच पदावर कायम राहिले.
-१८८५ मध्ये त्यांची मुंबई कौन्सिलवर कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड झाली. (१८९० व १८९३ मध्ये पुन्हा निवड झाली.)
-१८८६ मध्ये त्यांची भारत सरकारच्या अर्थसमितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. वित्तीय समितीवर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय होते.
०९. ते उत्तम वक्ते होते. इंग्रजी व मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना देशोद्धाराची तळमळ होती. त्यांचे शरीर भरदार होते.
-अतिवाचनामुळे त्यांचा एक डोळा निकामी झाला होता. त्यांची वेशभूषा व राहणी अत्यंत साधारण होती. ते अहंकारी नव्हते. त्यांचे विचार क्रांतिकारक नव्हते तर उत्क्रांतीवादी होते.
१०. १८९७ साली शासकीय केंद्रीय आणि प्रांतिक खर्चाचे मोजमाप करणाऱ्या समितीवर त्यांची नेमणूक झाली. या समितीच्या शिफारसी देताना त्यांनी सरकारला आर्थिक नोकरकपातीचा सल्ला दिला.
-त्यांच्या याच कार्यामुळे ब्रिटीश सरकारकडून त्यांना ‘कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर’ या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले

सामाजिक कार्य

०१. १८६१ साली स्थापन करण्यात आलेल्या विधवा विवाह मंडळाचे रानडे सुद्धा एक संस्थापक सदस्य होते.
-याच काळात बाळ गंगाधर टिळक यांचे सल्लागार आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचे गुरु म्हणून सुद्धा रानडे यांनी भूमिका बजावली.
-म्हणूनच त्यांना ‘महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक’ असे म्हटले जाते. त्यांना ‘मराठी पत्रकारितेचे जनक’ असेही म्हटले जाते.
०२. रानडेनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. १८६५ मध्ये त्यांनी विष्णूशास्त्री पंडित आणि इतरांच्या सहकार्याने ‘विधवा विवाहोत्तेजक मंडळ’ स्थापन केले.
-या मंडळाने १८६९ साली पुण्यात वेणूबाई परांजपे यांचा पांडुरंग करमरकर यांच्यासोबत पहिला विधवा विवाह घडवून आणला. पुण्यातील विष्णूशास्त्री बापट हे विधवा विवाहाचे आद्यप्रचारक होते. त्यांनी शासनाच्या संमतीवय विधेयकास पाठींबा दर्शविला.
०३. परंतु रानडेना याची अंमलबजावणी घरातच करता आली नाही.
-विधवा बहिणीचा विवाह त्यांनी वडील व समाजाच्या भीतीने लावून दिला नाही. तेव्हा फुलेंनी त्यांच्यावर टीका करताना म्हटले कि, “रावसाहेब, मग सुधारकाचे ढोंग सोडून द्या.”
०४. म.गो. रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला.
-ही पत्नी आजारी पडली आणि तिचे १८७३ साली निधन झाले.
-त्यांच्या वडिलांनी त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या ११ वर्षाच्या यमुना चिपळूणकर या कन्येशी जी एक बालवधू होती तिच्यासोबत माधवरावांचा विवाह करून दिला.
०५. लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले. माधवरावांची त्या काळात ‘बोलके सुधारक’ म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली.
-विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दु:खी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले. १८८२ साली रानडे यांनी पुण्यात फिमेल स्कूल स्थापन करण्यात पुढाकार घेतला. याचेच नाव हुजूरपागा शाळा असे आहे.
०६. सामाजिक सुधारणा कि राजकीय सुधारणा या वादातून सार्वजनिक सभेतून टिळकांनी रानडेंची हकालपट्टी केली. यानंतर रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केली.
०७. ३१ मार्च १८६७ रोजी केशवचंद्र सेन, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक आणि इतर समविचारी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली.
-१८६८ साली रानडे डॉ. रा. गो. भांडारकर समवेत प्रार्थना समाजात दाखल झाले. त्याआधीही १८६१ साली रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होताच.
०८. रानडेनी प्रार्थना समाजाच्या कार्याला चालना दिली. प्रार्थना समाजाच्या आधारस्तंभापैकी रानडे हे एक होते. प्रार्थना समाजाच्या मतांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी ‘एकेश्वरवाद्यांची कैफियत’ नावाचा निबंध लिहिला.
-तसेच त्यांचे प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन, तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य हे निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजले.
०९. ‘लव ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मँन‘ हे समाजाचे घोषवाक्य रानडे यांनीच निश्चित केले होते.
-समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे आणि सद्यस्थितीतील ईश्वराची जुनी चौकट बदलून त्याठिकाणी अध्यात्मावर आधारित नवी व्यवस्था निर्माण करणे. ही दोन प्रार्थना समाजाची उद्दिष्टे रानडे यांनीच स्पष्ट केली.
१०. पुण्यातील सार्वजनिक काका यांच्या समवेत रानडेनी हिराबाग येथे ‘पुना सार्वजनिक सभा’ सुरु केली. तसेच ‘अहमदनगर एज्युकेशन सोसायटी’ ची सुद्धा स्थापना केली.
-त्याबरोबर ‘स्थानिक सार्वजनिक वाचनालय’ सुरु करण्याची प्रेरणा देखील रानडे यांचीच होती.
११. १८७४ मध्ये सार्वजनिक सभेच्या वतीने जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज त्यांनी इंग्लंडला पाठविला.
-भारताचे प्रतिनिधी विलायतच्या पार्लमेंटमध्ये असावेत आणि हिंदी राज्यकारभाराचे प्रश्न त्यांच्या संमतीने सोडवावेत असे त्या अर्जाचे स्वरूप होते.
१२. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या ‘राष्ट्रीय काँग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेतही (इ.स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता.
-राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले अधिवेशन सार्वजनिक काका यांच्या समवेत त्यांनीच आयोजित केले होते.
१३. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, समाजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची’ स्थापना केली.
-या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. १८८७ च्या मद्रास कॉंग्रेस अधिवेशनापासून, कॉंग्रेस अधिवेशनासोबतच सामाजिक परिषद भरविण्यात येऊ लागली.
१४. १८९५ मध्ये पुणे येथे कॉंग्रेसचे अधिवेशन भरणार होते. टिळकांनी कॉंग्रेसच्या मंडपात सामाजिक परिषदा घेण्यास विरोध केला. असे केल्यास मंडपाला आग लावण्याची धमकी दिली. यामुळे रानडेंची कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाली.
१५. १८९० साली रानडेंनी औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरु केला. भारताच्या औद्योगिक विकासाला त्याद्वारे चालना दिली.
-त्यांनी ‘हिंदी अर्थशास्त्रा’चा पाया घातला. त्यांनी देशाच्या अर्थविकासासाठी लोकांनी आळस सोडला पाहिजे असे सांगितले. त्यांनी नेहीमीच संयुक्त कुटुंब पद्धतीला विरोध केला
१६. न्यायमूर्ती रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा (हीच संस्था पुणे शहरात दरवर्षी, वसंत व्याख्यानमाला आयोजित करते), नेटिव्ह जनरल लायब्ररी, फीमेल हायस्कूल, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळा, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, औद्योगिक परिषद, औद्योगिक प्रदर्शन, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, हिंदू विडोज होम (१८९६), डेक्कन सभा (१८९६) इत्यादी अनेक संस्था त्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुढाकार घेऊन स्थापन केल्या.
१७. न्या. रानडेंनी ‘मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ’ नावाची एक संस्था स्थापन केली. इतिहास, शास्त्रे, थोरपुरुषांची चरित्रे, धर्म, देशाची सुधारणा इत्यादी विषयांवर पुस्तके प्रसिद्ध करणे हा या संस्थेचा मुख्य हेतू होता.
-यासोबतच रानडे यांनी इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल, पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे, रंगशाला, Industrial Association Of Western India (१८८९) यांच्या स्थापनेत सहभाग घेतला.
१८. मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नांमुळे यशस्वी ठरले होते. त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजण्याची प्रथा सुरू झाली.
-न्यायमूर्ती रानडे हे स्वतः उत्तम संशोधक, विश्लेषक होते हे त्यांच्या द राइझ ऑफ मराठा पॉवर (१९००)  (मराठी सत्तेचा उदय) या ग्रंथावरून दिसून येते.
-या ग्रंथात त्यांनी ग्रांट डफ या इंग्रज इतिहासकाराने मराठ्यांचा इतिहास लिहिताना केलेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या. त्यांच्या व्याख्यानांचे संग्रहही पुढील काळात प्रकाशित झाले.
-‘मिसेलतेअस रायटिंग ऑफ जस्टीस मि. रानडे’ आणि ‘एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी’ (१८९९) हे रानडेचे इतर ग्रंथ आहेत.
१९. रानडेंनी १८८४ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश करण्यासाठीचा ठराव मांडला. यासाठीचा दुसरा प्रयत्न त्यांनी १८९८ साली केला.
-१८८५ मध्ये पदवीधर मंडळ स्थापन झाले. रानडेंनी या मंडळापुढे ‘आमचे पदवीधर लवकर का मरतात?’ या विषयावर व्याख्यान दिले. 
२०. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया रानडे यांनीच घातला. ए.ओ. ह्यूम यांनी, “भारतात २४ देशांचा विचार करणारी एकच व्यक्ती, ती म्हणजे रानडे.” अशा शब्दात रानडेंची प्रशंसा केली.
२१. १८७७ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी त्यांनी त्याच सालच्या ब्रिटनच्या कार्यक्रमात दुष्काळा वेळीची धान्य टंचाई नैसर्गिक नसून लोकांची ग्राहक शक्ती कमी झाल्यामुळे झाली आहे असे सिद्ध करून सादर केले.
२२. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते.
-रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते.
२३. “ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही” असे त्यांचे मत होते.
-हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.
२४. अंधविश्वास आणि टोकाच्या धर्मिकतेवर रानडे यांनी नेहमीच जरी टीका केली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र ते पुराणमतवादी होते. ‘पंच हौद’ प्रकरणात आपल्या मताची मजबुतपणे बाजू घेण्याऐवजी त्यांनी प्रायश्चित्त केले होते.
२५. रानडे यांच्या मते, “कालमानानुसार समाज बदलत असतो, त्यात परिवर्तन होणे अपरिहार्य असते. अशा परिवर्तनाना विरोध न करता, त्यास खुल्या मनाने सामोरे गेले पाहिजे व बदल स्वीकारले पाहिजेत.

२६. न्या. रानडे इ.स १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.

२७. ‘ महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.’ अशा प्रकारे टिळकांनी रानडे यांचे वर्णन केले.

ओळख

मुंबई विद्यापीठाचा पहिला पदवीधर
मुंबई विद्यापीठ पदवीधरांचा मुकुटमणी
हिंदी अर्थशास्त्राचा पायारचनाकार

वर्णन

“थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला उब देऊन जिवंत करण्याचे कार्य रानडेंनी केले” -लोकमान्य टिळक
“कदाचित संपूर्ण भारतात रानडेप्रमाणे राष्ट्रहिताचे बारकाईने चिंतन करणारी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही.”

प्रसिद्ध वाक्ये

“कार्य करताना येणारा मृत्यू हा सर्वोत्कृष्ट मृत्यू असतो.”
“भारतात राजकीय प्रगतीच्या अगोदर सामाजिक प्रगतीची गरज आहे.”
“वाढती लोकसंख्या हे भारताच्या दारिद्र्याचे कारण आहे.”
“भारतासारख्या विशाल देशात जोपर्यंत हिंदू व मुसलमान एक होणार नाहीत तोपर्यंत कोणतीही प्रगती शक्य होणार नाही.”ग्रंथ व निबंध१. The Rise of Maratha Power (मराठा सत्तेचा उदय)
२. Religious And Social Reforms  (धार्मिक व सामाजिक सुधारणा)