प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे

जन्म : १७ सप्टेंबर १८८५, (पनवेल, बॉम्बे राज्य, ब्रिटीश भारत)
मृत्यू : २० नोव्हेंबर १९७३ (मुंबई, महाराष्ट्र)

वैयक्तिक जीवन

०१. केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. तसेच शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे पिता होते. ठाकरे घराणे मूळ भोर संस्थानातील पाली गावचे आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू असलेल्या ठाकरेंचे पूर्वज शिवरायासोबत स्वराज्य स्थापनेच्या कार्यात होते.

०२. प्रबोधनकार १७ वर्षाचे असताना १९०२ मध्ये त्यांच्या वडिलांचे प्लेगच्या साथीत निधन झाले. प्रबोधनकारांचे शिक्षण पनवेल, कल्याण, बारामती आणि मुंबई या ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण मध्य प्रांतातील देवास येथे झाले. नंतर काही काळ कलकत्ता विद्यापीठात शिक्षण घेऊन शेवटी ते मुंबई येथे स्थायिक झाले.
०३. प्रबोधनकार प्रभावी वक्ते होते. त्याकाळातील प्रसिद्ध व्यक्ती टिळक, ‘काळ’कर्ते शि.म. परांजपे, ‘भाला’कार भोपटकर यांच्या तोडीस तोड अशी भाषणे केशवराव करीत असत. एक तरुण पट्टीचा वक्ता म्हणून त्यांची व्याख्याने खूप प्रसिद्ध झाली होती.
०४. आजोबांच्या मृत्यूमुळे पुन्हा त्यांना पनवेल गावी परतावे लागले. केशवरावांनी अनेक उद्योग केले. अगदी घर रंगविण्याचे कंत्राटही घेतले. पुढे नाट्यव्यवसायातही त्यांनी पदार्पण केले. या निमित्ताने ‘हिज मास्टर्स व्हीस- एच.एम.व्ही.’ या रेकॉर्डिंग करणाऱ्या कंपनीशी त्यांचा संबंध आला.
०५. सुप्रसिद्ध गायकांच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग करून घेताना मानधनही बऱ्यापैकी मिळू लागले. त्यातून त्यांनी ग्रामोफोन खरेदी केला आणि ग्रामोफोनचे कार्यक्रम करून थोडीफार प्राप्ती होऊ लागली. केशवराव दाते यांच्या महाराष्ट्र नाटक मंडळींच्या ‘सवाई माधवराव’ या नाटकात एक छोटीशी भूमिकादेखील त्यांनी केली.
०६. याच काळात त्यांनी ‘सारथी’ नावाचे मासिक चालू केले होते. हे मासिक वर्षभर चालू होते. परंतु स्वदेशी चळवळीच्या प्रसारात ‘सारथी’ वर सरकारने आक्षेप घेतला. साहजिकच सारथी बंद पडले.
०७. नाटक मंडळीबरोबर दौरे करणारी कंपनी कोल्हापूरला आली असताना प्रबोधनकार संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललित कलादर्श मंडळी’त आले. पण ती कंपनी सोडून त्यांनी एक छापखाना चालवावयास घेतला. तीतेही ते रमले नाहीत. परत ते ‘स्वदेशीहितचिंतक’ या नाटक कंपनी बरोबर खामगावला गेले.
०८. दरम्यान प्रबोधनकारांनी नाटक व्यवसाय सोडला आणि वर्सोवा येथे त्यांचा व त्यांच्या बहिणीचा विवाह एकाच मंडपात झाला.

सामाजिक कार्य

०१. त्यांना खटकणाऱ्या कृतीकडे ते त्रयस्थपणे पाहत नसत. तर प्रत्यक्ष कृती करून आपला निषेध नोंदवत असत. एका बाल-जरठ विवाहप्रसंगी या प्रथेची खिल्ली उडविणारे ‘म्हातारा इतुका न पाऊणशे वयमान’ हे पद जेवणाच्या भर पंक्तीत बोलणे, अशा एका प्रसंगी लग्न मंडप पेटवून देणे हे त्याची साक्ष देतात.
०२. त्यांच्या बौद्धिक आणि तार्किक विचारांची शुद्ध बैठक ‘लोकहितवादी’ तथा गोपाळ हरी देशमुख यांची ‘शतपत्रे’, ‘प्रभाकर’ या वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या लेखांमुळे झाली. ‘लोकहितवादी’ना आपला गुरु मानून त्यांनी आपल्या भावी जीवनातील सामाजिक कार्याची दिशा निश्चित केली.
०३. लोकांच्या सेवेसाठी मित्रांच्या सहकार्याने ‘दादर ……ट्स युनियन’ ची स्थापना केली. शिमग्याच्या सणात गलिच्छ प्रकरण आळा घालण्यासाठी ‘होळी का संमेलन’ हा उपक्रम आयोजित केला.
०४. याचवेळी नवमतवादी पदवीधर तरुणांनी डॉ. भाटवडेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉ. चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘सोशल सर्व्हिस लीग’ या संस्थेची १९११ साली स्थापना केली. प्रबोधनकार याचे अध्वर्यू होते.
०५. थिओसोफिस्त गजाननराव वैद्य यांनी १९१८ मध्ये ‘हिंदू मिशनरी सोसायटी’ स्थापन केली. प्रबोधनकार या संस्थेसाठी व्याख्याने देत. त्यापैकी ‘हिंदू धर्माचे दिव्य’ या व्याख्यानात त्यांनी हिंदू धर्मातील अनिष्ठ प्रथांचा उहापोह केला. याच विषयावर त्यांनी ‘हिंदू धर्माचे दिव्य’ हा ग्रंथ लिहिला.
०६. तरुण निष्ठावान कार्यकर्ते एकत्र येण्याची जागा म्हणून दादरच्या मध्यवस्तीतील खांडके इमारत भाड्याने घेतली व त्यास ‘स्वध्यायाश्रम’ असे संबोधण्यात आले. स्वध्यायाश्रमाचे सर्वात मोठे कार्य म्हणजे ‘हुंडा विश्वंसक संघ’ ही चळवळ होय. प्रबोधनकारांच्या जीवनात हे कार्य मोलाचे मानले जाते.
०७. महाराष्ट्रात उपऱ्यांची घुसखोरी नुकतीच सुरु झाली होती. प्रबोधनकरांनी या घुसखोरीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रीयनच उपरे, बेरोजगार आणि निर्वासित होण्यात होईल हे वेळीच ओळखल होते. मुंबईमध्ये मद्रासहून येणाऱ्या मद्रासी लोकांच्या झुंडीच्या झुंडीविरुद्ध ब्रिटीश शासनालाही प्रबोधनकरांनी आपल्या प्रखर लेखनीने सावध केले. म्हणूनच त्यावेळी ब्रिटीश शासनाने उद्योग धंद्यात स्थानिक लोकांना सामावून घ्यावे असा आदेश काढला होता.
०८. ठाकरे यांनी १६ ऑक्टोबर १९२१ रोजी स्वाध्याय आश्रमात आपल्या तरुण मित्रांच्या उपस्थितीत ‘प्रबोधन’ हे पाक्षिक सुरु केले. पहिलाच खप २००० प्रतींचा होता. याच कारणामुळे पुढे त्यांचे नाव ‘प्रबोधनकार’ असे पडले.
०९. १९२१ मध्ये त्यांनी वृत्तपत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्या काळात सरकारी नोकरास वृत्तपत्रात लेख लिहिणे व पुस्तक प्रकाशित करणे यास बंदी होती. त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली पण सरकारने नोकरीवर राहून, काही अटींवर वृतपत्र सुरु करण्यास परवानगी दिली. याचेही नाव ‘प्रबोधन’ असे होते.

१०. प्रबोधन वृत्तपत्र १९२१ ते १९३० पर्यंत चालले. त्यांनी आपले गुरु लोकहितवादी यांच्या स्मृती जागविण्यासाठी ऑगस्ट १९२७ मध्ये ‘लोकहितवादी’ चे पुनरुज्जीवन केले. ते दोन वर्षे चालले. त्यानंतर मात्र त्यांनी नवे वृत्त्पर सुरु न करता, ‘नवा काळ’ व अन्य काही वृत्तपत्रांमध्ये खूप लिहिले. त्यांची ओळख मात्र कायम स्वरुपात ‘प्रबोधनकार ठाकरे’ अशीच राहिली.
११. ‘मराठे, क्षत्रिय कि शुद्र’ असा एक वाद वेदोक्त प्रकरणाच्या निमित्ताने पुण्याच्या केसरीने निर्माण केला होता. प्रबोधनकार याच वेळी याच विषयावर अभ्यास आणि संशोधन करीत आहेत असे शाहू महाराजांना कळताच महाराजांनी त्यांना कोल्हापूरला बोलावून घेतले. महाराजांनी चालविलेले प्रयत्न पाहून प्रबोधनकार दिपून गेले आणि त्यांच्याशी जवळीकीचे संबंध निर्माण झाले.
१२. प्रबोधनकार ग्रामण्यावर आधारित ‘भिक्षुकशाहीचे बंड’ यावर ग्रंथलेखन करीत असल्याचे महाराजांना कळताच त्यांनी ग्रंथाच्या कामासाठी ५००० रुपयाचा चेक ठाकरेंना दिला. प्रबोधनकरांनी ग्रंथ प्रसिद्ध होताच त्याच्या २००० प्रती महाराजांना दिल्या.
१३. प्रबोधनकारांनी साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा ब्राह्मणांनी केलेल्या छळवादाची माहिती शाहू महाराजांना दिली. त्यावेळी शाहू महाराजांनी यावर ग्रंथ लिहा अशी सक्त सूचना केली. त्याची पूर्तता म्हणून प्रबोधनकारांनी ‘रंगो बापुजी’ हा ग्रंथ महाराजांच्या मृत्युनंतर २६ वर्षांनी, १९४८ साली प्रसिद्ध केला.
१४. कर्मवीरांनी साताऱ्यात ‘हरिजन बोर्डिंग’ सुरु केले होते. प्रबोधनकारांनी गांधीजींच्या हरिजन फंडातून या बोर्डिंगला आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी कर्मवीरांना सहाय्य केले. ठाकरेंनी आपल्या वृत्तपत्रांतून कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहचविली.
१५. केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले.
१६. समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत.
१७. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला.
१८. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली.
१९. त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.
२०. मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.
२१. प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.
२२. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा सत्तरीच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, सक्रिय भाग घेऊन काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.

साहित्य

०१. शालेय जीवनात ‘विद्यार्थी’ या छोट्या साप्ताहिकात सुरु केलेल्या लेखनापासून आयुष्याच्या अखेरीस ‘माझी जीवनगाथा’ आकारास येईपर्यंत त्यांची लेखणी थांबली नव्हती.
०२. ऊठ मऱ्हाठ्या ऊठ (लेखसंग्रह), कुमारिकांचे शाप (वैचारिक), कोदंडाचा टणत्कार (इतिहास संशोधन-१९१८), स्वाध्याय संदेश (लेखसंग्रह-१९२३), खरा ब्राह्मण (नाटक), ग्रामण्याचा साद्यंत इतिहास (इतिहास संशोधन), जुन्या आठवणी (ललित), टाकलेले पोर (नाटक), दगलबाज (वैचारिक), हिंदू धर्माचे दिव्य, देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे (वैचारिक), देवांची परिषद (वैचारिक), प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी (इतिहास संशोधन), भिक्षुकशाहीचे बंड (इतिहास संशोधन), रंगो बापूजी (चरित्र), पं. रमाबाई सरस्वती (चरित्र), वक्‍तृत्वशास्त्र (माहितीपर- १९१८ & १९७०), संगीत विधिनिषेध (नाटक), शनिमाहात्म्य (वैचारिक), शेतकऱ्यांचे स्वराज्य (वैचारिक), श्री. संत गाडगेबाबा (चरित्र), संगीत सीताशुद्धी (नाटक), हिंदू जनांचा ऱ्हास आणि अध:पात (अनुवाद) आणि माझी आत्मकथा (आत्मचरित्र) हे प्रबोधनकार ठाकरे लिखित काही महत्वाचे ग्रंथ आहेत.