०१. आगरकर ‘सुधारकाग्रणी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात, एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती असे होते. 


०२. त्यांनी प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी कर्‍हाड येथे घेतले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांना मुन्सफ कोर्टात कारकुनी करावी लागली. नंतर नोकरी सोडून शिक्षणासाठी ते रत्नागिरीला गेले पण काही अडचणीमुळे परत येउन कराडला त्यांनी कम्पाउडरची नोकरी धरली. पुढे ते अकोला येथे गेले व तेथूनच १८७५ साली मॅट्रिक झाले. 

०३. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. ते बी.ए. (१८७८) व पुढे इतिहास व तत्वज्ञान हे विषय घेऊन एम.ए. (१८८०) झाले. या काळात ‘वऱ्हाड समाचार’ मध्ये नियमित लेख लिहून त्यांनी आपली उपजीविका चालविली. 

०४. इंदौरचे संस्थानिक शिवाजीराव होळकर यांनी त्यांना मासिक ५०० रुपयांची नोकरी दिली. पण समाजसेवा मनात असल्याने आगरकरांनी ती स्वीकारली नाही. 

०५. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आणि तेथे शिकविण्यास सुरुवात केली

०६. १८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापली. त्याच्याच  अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते ऑगस्ट १८९२ ला ते फर्ग्युसनचे प्राचार्यही (दुसरे) झाले.


०७. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. आगरकर केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.

०८. कोल्हापूरच्या दिवाण-बर्वे प्रसंगी ‘केसरी’तील लिखाणामुळे टिळक व आगरकर यांना ४ 
महिने (१२० दिवस) शिक्षा झाली व त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावे लागले. चांगल्या वागणुकीमुळे त्यांना शिक्षेतून १९ दिवसाची सुट मिळाली. तेथे त्यांनी १०१ दिवस शिक्षा भोगली.

०९. आगरकरांचे म्हणणे राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला महत्त्व देणे असे होते. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते, तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य आधी मिळाल्यास सामाजिक सुधारणा नंतर करता येतील.

१०. बालविवाह, विधवांची स्थिती, सतीची चाल, केशवपन इत्यादी चालीरीती जुनाट आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. हा कलंक धुवून काढण्यासाठी सरकारने कायदे केले पाहिजेत असा आगरकरांचा आग्रह होता. एकूणच सामाजिक सुधारणा म्हणजे समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरा बदलून टाकल्या पाहिजेत असे त्यांनी स्पष्टपणे प्रतिपादन केले होते.

११. पुढे अनेक कारणावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेदाची दरी रूंदावत गेली. संमतीवयावरून आणि बालविवाहाच्या प्रश्नावरून ती वाढली. सहाजिकच केसरीतून सुधारणावादी मते मांडताना आगरकरांची कुचंबणा होऊ लागली.

१२. आगरकरांनी बालविवाहास विरोध करण्यासाठी ‘महाराष्ट्र बालविवाह निषेधक मंडळ’ स्थापन केले. तसेच त्यांनी १८८१-९२ च्या समती वय विधेयकाला पाठींबा दिला होता 

१३. आगरकरांनी स्वतंत्र वर्तमानपत्र काढून आपल्यातील दुही स्पष्ट करू नये असे टिळकांचे म्हणणे होते. त्यांनी केसरीत स्वंतत्रपणे आपले नाव लिहून आपले विचार मांडायला टिळकांची काहीच हरकत नव्हती. सुरुवातीच्या काळात आगरकरांनी तेही केले. विशेष म्हणजे अग्रलेखाविरोधात भूमिकाही त्यात असत, आणि टिळकही त्या छापत.

१४. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी विजयादशमीच्या दिवशी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती.

१५. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था,चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. हिंदू धर्मातील शिमगा या सणांवर त्यांनी टीका केली.

१६. आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे, मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात वा लोकरूढीत आधार असो वा नसो, हे आगरकरांचे महत्त्वाचे तत्त्व होते. स्त्रियांच्या अगदी पेहेरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. विधवा पुनर्विवाहाला आगरकरांनी प्रोत्साहन दिले. म्हणूनच त्यांना बुद्धीप्रामाण्यवादी समाजसुधारक असे म्हटले जाते.

१७. ‘इष्ट असेल ते बोलेन व साध्य असेल ते करेन’ हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य होते. त्यांच्यावर हर्बर्ट स्पेन्सर यांच्या सोशोलोजी इथिक्स व जॉन स्टूअर्ट मिल यांच्या ऑन लिबर्टी सब्जेक्शन ऑफ वुमन्स या पुस्तकांचा प्रभाव होता.‘विचारकलह हा समाजस्वास्थ्याला आवश्यक आहे,’ असे त्यांचे मत होते. 

१८. त्यांच्या या विचारसरणीमुळे त्यांना टोकाचा विरोध झाला. सनातनी लोकांनी त्यांच्या जिवंतपणीच त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती. त्याबाबत आगरकरांनी त्यांच्या ‘फुटके नशीब’ या आत्मचरित्रात असे लिहिले आहे कि, “मी एकमेव असा समाजसुधारक आहे ज्याने स्वतःच्या डोळ्याने स्वतःचाच अंत्यविधी पहिला.”

१९. जरी आगरकर सुधारणावादी विचाराचे असले तरी त्यांनी कधीही ते आपल्या पत्नीवर लादले नाही. त्यांची पत्नी नेहमी जुनाट विचारधारा व हिंदू परंपरेचा अंगीकार करत असे, पण आगरकर तिच्या मार्गात आडवे आले नाहीत. 

२०. वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या १७ जून १८९५ ला पुणे येथे त्यांचे अस्थमा च्या आजारामुळे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी प्रेत दहनासाठी परचुंडीत २० रुपये बांधून ठेवले होते. त्यांच्या मृत्यूनंतर सुधारक हे वृत्तपत्र देवधर पटवर्धन व त्यानंतर रामचंद्र विष्णू यांनी चालविले.

२१. आगरकरांनी आत्मचरित्रव्यतिरिक्त शेक्सपियरच्या हैमलेट या नाटकाचा मराठीत ‘विकारविलासित’ म्हणून अनुवाद केला. हा अनुवादाचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातो. याशिवाय स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल, डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस, गुलामांचे राष्ट्र, अलंकार मीमांसा व वाक्याचे पृथक्करण हे आगरकरांचे इतर प्रसिद्ध ग्रंथ आहेत. 

२२. त्यांच्या ‘अनाथांचा कोणी वाली नाही’ या लेखात त्यांनी विद्यापीठाचा कला शाखेचा त्रैवार्षिक अभ्यासक्रम अत्यंत कठीण आहे असे सांगितले. पुणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या हौदावर ब्राह्मणांसाठी व शुद्रांसाठी असे दोन फलक होते. यावर आगरकरांनी ‘म्युन्सिपल हौद व ब्राह्मणांवर गदा’ हा लेख लिहून अस्पृश्यता व सोवळ्या ओवळ्यावर टीका केली. 

२३. ‘वाचाल तर चकित व्हाल’ या लेखात आगरकरांनी भारताच्या दारिद्र्याचे प्रमाण दाखविले. ‘शहाण्यांचा मूर्खपणा’ या लेखात सक्तीच्या वैधव्यावर टीका केली. पशु हत्यांवर प्रतिबंधासाठी त्यांनी सुधारक मध्ये ‘धर्माचा सुकाळ व बकऱ्यांचा बकाळ’ हा लेख लिहिला. ‘आमचे ग्रहण आणखी सुटलेच नाही’ या लेखात ग्रहणासंबंधींच्या गैरसमजुतीवर टीका केली.

२४. आगरकरांना ईश्वराचे अस्तित्व मान्य नव्हते. वि.स. खांडेकर यांनी त्यांचे वर्णन ‘देव न मानणारा दे माणूस’ असे केले आहे. हीच त्यांची ओळख होती. 

२५. गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आचार्य अत्रे यांनी पुण्यात इ.स. १९३४साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली. 

२६. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ’सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर या नावाचा पुरस्कार दिला जातो. इ.स. २०१०मध्ये हा पुरस्कार डॉ. श्रीराम लागू यांना, तर २०१२साली मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. सय्यदभाई यांना देण्यात आला. 

२७. महाराष्ट्र संपादक परिषद ही संस्था, आदर्श पत्रकारितेसाठी गो.ग. आगरकर पुरस्कार देते. २०१२साली हा पुरस्कार महेश म्हात्रे यांना मिळाला होता.