इंग्रज शीख युद्ध

पहिले इंग्रज शीख युद्ध (१८४५-१८५६)

०१. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजितसिंहाच्या हाती होती इंग्रजांनी रणजीतसिंहाच्या अधिकाराला मर्यादा घालण्यासाठी २८ एप्रिल १८०९ रोजी अमृतसरचा मैत्रीची तह केला. रणजितसिंहाने सतलज नदीच्या पूर्वेकडे राज्यविस्तार करू नये अशी अट इंग्रजांनी घातली. पुढे तीस वर्षे हीच व्यवस्था कायम राहिली. पहिल्या इंग्रज-अफगाण युद्धात रणजितसिंगाने इंग्रजांना सहकार्यही दिले.

०२. १८१२ पर्यंत इंग्रज-शीख संबंध सलोख्याचे राहिले. पण त्यानंतर मराठा व गुरखा यांना मदत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात दुरावा निर्माण होत गेला. या चिंतेतून मुक्त होण्यासाठी त्यांनी रणजितसिंगशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचे ठरविले. या उद्देशाने प्रेरित होऊनच इंग्रजांनी रॉर्बट बर्न याला रणतिजसिगला काही वस्तू भेट देण्यासाठी लाहोरला पाठविण्यात आले.

०३. एवढयाने संतुष्ट न होता गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिक याने स्वत: रणजितसिंगची सतलज नदीच्या काठावर रोपड येथे २७ ऑक्टोबर १८३१ रोजी भेट घेतली. यावेळी रणजितसिंगने रशियन आक्रमणाचे संकट उत्पन्न झाले तर परस्परात मैत्री कायम ठेवण्याचे आश्वासन दिले. या भेटीत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रणजितसिंगने कंपनीला आपल्या राज्यात व्यापार करण्याची परवानगी दिली.

०४. गवर्नर जनरल बेंटिकने रणजितसिंहास कल्पना न देता १८३२ मध्ये सिंधच्या अमीरासोबत एक व्यापारी तह केला. रणजितसिंहास सिंध पाहिजे होता, म्हणून तो ब्रिटीशांच्या या कृतीवर नाराज झाला. शिखांनी एक लष्करी ठाणे ताब्यात घेतले होते ते ठाणे १८३५ साली सोडण्यास इंग्रजांनी शिखांना भाग पाडले. पुढे त्या ठिकाणी १८३८ मध्ये इंग्रजांनी आपला कायमस्वरूपी लष्करी तळ उभारला. पुढे हेच पहिले इंग्रज-शीख युद्ध उद्भवण्यास कारणीभूत ठरले.
०५. इंग्रजांनी रणजितसिंहाच्या शीख राज्यास चारही बाजूंनी वेढले होते. सतलज नदीच्या पुर्वेकडे फिरोजपूर लुधियाना, अंबाला व मिरत येथे इंग्रज सैन्याच्या छावण्या उभारण्यात आल्या होत्या. इंग्रजांनी शिखांना त्यांच्या फौजा शिकुरपर्यंत मागे घ्यायला लावल्या होत्या. इंग्रजांनी त्यांची फौज २५०० पासून १४००० पर्यंत वाढविली होती. पंजाब जिंकण्यासाठीच या सर्व हालचाली केल्या गेल्या होत्या.

०६. त्यातच १८४३ मध्ये इंग्रजांनी सिंध घेतला हे शिखांना आवडले नाही. त्यानंतर सिंधमध्येही कंपनीने आपले सैन्य वाढवले होते. येथे त्यांचे ३२०० सैनिक व ६८ तोफा होत्या. त्यामुळे मुलतान मार्गाने केव्हाही आक्रमण करता येणार होते. दरम्यान १८३९ साली रणजीतसिंहाचा मृत्यू झाला होता. मृत्युनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीपसिंग गादीवर बसला आणि राणी जिंदान ही अल्पवयीन पुत्राची पालक म्हणून पंजाबचा राज्यकारभार पाहत होती.

०७. दिलीपसिंगची आई राणी जिंदनकौर व वजीर लालसिंह यास सैन्याचे वाढते वर्चस्व सहन होत नव्हते. त्यातच दरबारी मंडळींवर व लष्करावर राणीचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. यावेळी इंग्रजांनी सतलजच्या डाव्या किनाऱ्यावरील प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात राहील अशी घोषणा केली.

०८. त्याच वेळी ब्रिटिश गव्हर्नर हार्डिंग याने सिंध प्रांतावरील स्वारीनंतर इंग्रजी सैन्य फिरोझपूरजवळ आणून ठेवले. त्यामुळे इंग्रज सैन्य आपल्या सैन्यावर स्वारी करणार असा शीख सैन्याचा ग्रह होऊन, त्यांनी ११ डिसेंबर १८४५ रोजी हरिकी आणि कसूर यांच्यामधून सतलज नदी ओलांडून इंग्रजांच्या प्रदेशावर स्वारी केली. आणि हयू गफ यांच्या नेतृत्वाखालील इंग्रज सैन्याशी संघर्ष सुरु केला.

०९. त्यामुळे हार्डिंगने १३ डिसेंबर १८४५ ला शिखांबरोबर युद्ध घोषित केले. त्याने दिलीपसिंगच्या राज्याचा सतलजच्या पूर्वेकडील प्रदेश इंग्रज साम्राज्यात विलीन करण्यात येत असल्याची घोषणा केली.

१०. या युध्दात शीख सैनिक प्राणपणाने लढले. परंतु त्यांचे काही सरदार इंग्रजांना फितूर झाल्यामुळे मुडकी, फिरोझशाह, अलीवाल येथील लढायांत शिखांचा पराभव झाला. पण सोब्रओनची पाचवी लढाई (१० फेब्रुवारी १८४६) निर्णायक ठरली. या युध्दात शीख सैन्य मोठया प्रमाणावर मारले गेले. इंग्रजांनी लाहोरवर वर्चस्व प्रस्थापित केले. या वेळी ९ मार्च १८४६ रोजी शिखांना लाहोरचा तह स्वीकारण्यास इंग्रजांनी भाग पाडले.

११. तहानुसार शिखांना सतलजच्या डाव्या किनाऱ्यावरील व सतलज बियास दुआबातील प्रदेश इंग्रजांना द्यावा लागला. शिखांना दीड कोटी रुपये युद्ध खंडणी द्यावी लागली. शिखांकडे फक्त ५० लाख रुपये होते. उर्वरित खंडणीसाठी त्यांना सिंधू व बियासमधील पहाडी प्रदेश किल्ले, काश्मीर व हजारा इंग्रजांना द्यावे लागले. शिवाय फक्त १२ हजारापर्यंत घोडदळ व २० हजारापर्यंत पायदळ ठेवण्यास शीख दरबारला परवानगी देऊन त्यांची युद्धक्षमता कमी करण्यात आली.

१२. दिलीपसिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. मात्र त्याला मदत करण्यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील सरदार नेमले. दलीपसिंगाला गादीवर बसवून पालक म्हणून त्याची आई जिंदनने लालसिंगाच्या सल्ल्याने राज्यकारभार करावा, असे ठरविण्यात आले. तसेच ब्रिटिश सैन्य लाहोरला एक वर्ष रहावे, हे मान्य करण्यात आले. हेन्री लॅरेन्सला लाहोर येथे इंग्रजांचा रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले.

१३. शिखांना इंग्रज रेसिडेंट नियंत्रण नकोसे झाले. त्यातच रेसिडेंटने लाहोर दरबारास असा आदेश दिला कि, एक कोटी खंडणीसाठी काश्मीर गूलाबसिंहास देऊन टाकावा. या आदेशाने पालन करु नये अशी सुचना लालसिंहाने काश्मीरचा गव्हर्नर इमामउद्दीन यास दिली. त्यामुळे इंग्रज सैन्याने सरळ सरळ काश्मीरचा ताबा मिळवला.

१४. या घटनेची चौकशी करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती तिने लालसिंहास दोषी ठरवून त्यास पंजाबमधून हद्दपार करण्यात आले. लाहोरची सत्ता एका प्रतिनिधी मंडळाकडे सोपविण्यात आली. यातून काश्मीरच्या सुभेदाराचे बंड उद्भवले. ते इंग्रजांनी मोडून काढले. त्यातुनच इंग्रज व शीख दरबार यांच्यात भैरोवालचा तह २२ डिसेंबर १८४६ रोजी झाला.

१५. या तहानुसार पंजाबची राज्यव्यवस्था आठ शीख सरदारांच्या रीजन्सी कौन्सिलने पहावी व त्यावर ब्रिटिश रेसिडेंट अध्यक्ष असावा, असे ठरले. लाहोर तहात ठरल्याप्रमाणे लाहोर येथे कंपनीचे सैन्य १८४६ हे वर्ष संपेपर्यत थांबणार होते. पण भैरोवालच्या तहात दलीपसिंग वयात येईपर्यंत इंग्रजी फौज लाहोरला ठेवावी व त्याबद्दल शिखांनी ब्रिटिशांना प्रतिवर्षी २२ लक्ष रूपये द्यावे असे ठरले.

१६. ह्या तहामुळे लाहोर दरबारावर इंग्रजी पकड घट्ट होऊन पुढील काळात पंजाब ताब्यात घेण्यास इंग्रजांचा मार्ग सुकर झाला. इंग्रजांनी यावेळी पंजाब शक्य असतानाही जिंकला नाही. कारण इंग्रजांना भारत व अफगाणिस्तान यांच्यात एक स्वतंत्र राज्य Buffer State म्हणून हवे होते. 

१७. इंग्रज रेसीडेंटच्या हातात पंजाबच्या सर्व सत्तेचे केंद्रीकरण झाले. त्यास राणी जिंदनकौरने आक्षेप घेतला. त्यामूळे गव्हर्नर जनरलने २ ऑगस्ट १८४७ रोजी घोंषणा केली की अल्पवयीन राजाचे शिक्षण व पालनपोषण पित्याप्रमाणे करण्याची गव्हर्नर जनरलची इच्छा आहे आणि त्या दृष्टीेने राजा आणि त्याची आई यांना एकमेकांपासून वेगळे ठेवण्याची नितांत गरज आहे.

१८. त्यामुळे राणी जिंदान हिला इंग्रजांनी शेखूपुरा बनारसला नेउन ठेवले. तिचा वार्षिक तनखाही फक्त ४८००० इतका कमी केला होता. शिवाय तिचे दागदागिनेही काढून ठेवले. राणीला इंग्रजांनी हद्दपार करताच बंड फैलावले.

दुसरे इंग्रज शीख युद्ध

०१. १८४६ च्या तहाप्रमाणे ब्रिटिश रेसिडेंटचे वर्चस्व शीख दरबारावर कायम झाले. सेनाधिकाऱ्यांच्या विरूद्ध सैन्यात असंतोष धुमसत होता. त्यातच लॉर्ड हार्डिगच्या जागेवर जानेवारी १८४८ मध्ये डलहौसीची नियुक्ती झाली.
०२. १८४६ मध्ये इंग्रज रेसिडेंटच्या सूचनेवरुन मुलतानचा गवर्नर मुलराजला भेटीदाखल २० लक्ष रु चा नजराणा देण्यास सांगण्यात आले, तसेच रावी नदीच्या उत्तरेकडील प्रदेश लाहोर दरबारला सोपविण्यास सांगण्यात आले. आणि मुलतान प्रांताचा कर तीन वर्षासाठी ३३ लाखने वाढविण्याचे ठरविण्यात आले.
०३. या गोष्टी मुलराजाला मान्य नव्हत्या, म्हणून त्याने डिसेंबर १८४७ मध्ये त्याने आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. त्यामूळे त्याच्या जागेवर ३०,००० रु वार्षिक वेतनावर कहानसिंहाला नियूक्त करण्यात आले. त्याला मदत करण्यासाठी जे दोन इंग्रज अधिकारी आले होते. त्यांच्या उद्दाम वर्तनामुळे त्यांना ठार मारण्यात आले. प्रजेने जे बंड केले त्याचे नेतृत्व मुलराजला देण्यात आले. या बंडाचे लोण इतरत्रही पसरले.

०४. ऑक्टोबर १८४८ मध्ये डलहौसीने घोषणा केली की कोणतीही पूर्वसूचना न देता शिखांनी अकारण युध्द सुरु केले आहे. मी शपथपूर्वक सांगतो की शिखांपासून या युध्दाचा बदला घेतला जाईल. यावरून इंग्रज शीख युद्ध नोव्हेंबर १८४८ मध्ये सुरु झाले. ह्या युद्धात पेशावर परत घेण्यासाठी अफगाणांनी शिखांशी सहकार्य केले. तरीही मुळराजाचा पाडाव झाला.
०५. १६ नोव्हेंबर १८४८ रोजी हयु गफ याचा शीख सैन्याशी संघर्ष झाला. त्यांच्यात झालेल्या या रामनगरच्या लढाईत कोणताही निर्णय लागला नाही. लाहोरच्या रेसिडेंटने मुलतानला वेढा घालण्यसाठी शेरसिंगाबरोबर सैन्य पाठविले, पण तो शिखांनाच मिळाला. जानेवारी १८४९ मध्ये चिलिआनवाला येथे शीख व ब्रिटिश सैन्यांत लढाई झाली. ती निर्णायक न झाल्याने हयू गफच्या जागेवर चार्ल्स नेपियरची नियुक्ती करण्यात आली.
०६. चिनाब नदीकाठी गुजराथ शहराजवळ दोन्ही सैन्यांत घनघोर संग्राम झाला. हे युध्द तोफांची लढाई म्हणून प्रसिध्द आहे. ही निर्णायक लढाई होती. त्यात शिखांचा पराभव होऊन शेरसिंग व खालसा सैन्य ब्रिटिशांना शरण गेले. दिलीपसिंगला वार्षिक ५०,००० पौंड पेन्शन देऊन उच्च शिक्षणासाठी इंग्लडला पाठविण्यात आले. पुढे तो ख्रिस्ती झाला. आयुक्तांच्या एका समितीकडे पंजाबचे प्रशासन सोपविण्यात आले.
०७. त्यानंतर लॉर्ड डलहौसीने २९ मार्च १८४९ रोजी पंजाबचे राज्य खालसा करून ब्रिटीश साम्राज्यास जोडून टाकले. पंजाब प्रांत मिळाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याची सरहद्द अफगाणिस्तानच्या सरहद्दीपर्यंत भिडली. पंजाब स्वतंत्र प्रांत करण्यात आला . पुढील काळात ब्रिटिशांच्या सनदशीर धोरणामुळे शीख ब्रिटिशांचे कायम मित्र बनले. त्यांनी दुसरे इंग्रज-अफगाण युद्ध व १८५७ चा उठाव यांत ब्रिटिशांना सहकार्य दिले.