फाळणीनंतरच्या समस्या

०१. फाळणीनंतर भारतासमोर काही समस्या आवासून उभ्या होत्या. त्यात संस्थानांचे भारतात विलीनीकरण, फाळणीमुळे उद्भवलेल्या जातीय दंगली शमविणे, पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या सुमारे ६० लाख निर्वासितांचे पुनर्वसन, जातीय दंगलीमुळे पीडित मुस्लिमांचे संरक्षण, पाकिस्तानशी युद्ध टाळणे या प्रमुख समस्या होत्या.

०२. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. आंतरराष्ट्रीय जगतात अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांचा उदय होऊन यांच्यात शीतयुद्ध सुरु होते. अशा परिस्थितीत देशाचे अंतर्गत स्वातंत्र्य व सार्वभौमत्व टिकवून आंतरराष्ट्रीय शांततेला अनुकूल होणारे परराष्ट्र धोरण ठरविणे ही अत्यंत अवघड कामगिरी नेहरूंना व नवजात स्वातंत्र्याला आव्हान ठरणार होती.

०३. फाळणीनंतर दोन्ही देशांच्या सीमा निश्चित करणे, सनदी नोकर व अन्य सेवांमधील नोकरवर्ग व इतर साधनसामग्रीची विभागणी करणे, लष्करी सेवा व साधनसामाग्री याचे विभाजन करणे आव्हानात्मक होते. फाळणीनंतर ही एक मोठी समस्या झाली.

* सीमानिश्चिती

०१. फाळणीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पंजाब व बंगालच्या कायदेमंडळांनी आपापल्या प्रांतांची फाळणी करण्याचा निर्णय बहुमताने घेतला. सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत या प्रांतांत मुस्लिम बहुसंख्य असल्याने ते प्रांत पूर्णतः पाकिस्तानात समाविष्ट होणे क्रमप्राप्त होते. परंतु पंजाब व बंगाल या दोन प्रांतांची विभागणी करण्यात आली.

०२. या प्रांतांची विभागणी सुरळीतपणे व कायदेशीरपणे होण्यासाठी सर रैडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त करण्यात आले. या कमिशनने मुस्लिम बहुल प्रदेश व मुस्लिमेतर प्रदेश असा आधार घेऊन व दोन्ही प्रांतांची नैसर्गिक रचना डोळ्यांसमोर ठेऊन विभागणी व सीमाही निश्चित केली. भारत व पाकिस्तान या दोन देशांचे कायदेशीर विभाजन केलेली सीमारेषा ‘रॅडक्लिफ लाईन’ म्हणून ओळखली जाते.

०३. सीमानिश्चिती सुरु असतानाच १५ ऑगस्ट नंतर पंजाबमध्ये संभाव्य सीमेच्या दोन्ही बाजूंना भयानक हिंसाचार सुरु झाला. हिंसा थांबविण्यासाठी सीमा सुरक्षा दलाने गोळीबार करण्याचे नाकारले. कारण यात कोणावर गोळीबार करायचा हे त्यांना ठरविता येत नव्हते. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी हतबल झाले.

०४. यानंतर मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या रेल्वेने पाकिस्तानातील हिंदूंना भारतात व भारतातील मुसलमानांना पाकिस्तानी प्रदेशात नेण्याचे कार्य केले. १९४७ पर्यंत अशा सुमारे ८० लाख निर्वासितांनी सीमा ओलांडल्या.

०५. प्रचंड प्रमाणावर झालेल्या कत्तलीमुळे नंतर दोन्ही देशांच्या सरकारसमोर निर्वासितांच्या पुनर्वसनाचा गहन प्रश्न उभा राहिला होता. त्यासाठी भारत सरकारने स्वतंत्र पुनर्वसन खाते निर्माण केले. निर्वासितांची दिल्ली, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सोय करण्यात आली.

* मालमत्ता विभागणीची समस्या

०१. यासाठी दोन्ही देशांचे प्रत्येकी दोन सदस्य असलेली एक ‘फाळणी समिती’ व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी एक ‘सुकाणू समिती’ अशा दोन समित्या नियुक्त करण्यात आल्या होत्या.

०२. अविभाजित भारताच्या खजिन्यातील रोख शिल्लक सार्वजनिक कर्जे या प्रश्नावर मतभेद निर्माण झाले. पाकिस्तानने रोखीपैकी १/४ रकमेची मागणी केली. परंतु भारताने रोख शिल्लक कमी आहे. अवमूल्यनाचा हिशोब जमेस धरून इतकी रक्कम पाकिस्तानला देणे शक्य नसल्याचे सांगितले.

०३. परंतु गांधीजीनी पाकिस्तानची बाजू न्याय्य आहे असे समजून ५५ कोटी रुपये पाकिस्तान देण्यात यावे असे सांगितले. शेवटी महात्मा गांधीजींची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी भारताने ५५ कोटी रुपये दिले.

* लष्करी मनुष्यबळ व साधनसामग्रीची विभागणी

०१. नागरी सेवेपेक्षा लष्करी साधनसामग्रीच्या विभाजनाबाबत खूप मतभेद झाले. तत्कालीन सरसेनापती अचीन्लेक यांच्या अध्यक्षतेखाली एक संरक्षण समिती स्थापन करून तिच्याकडे सेना आणि अन्य लष्करी साधन सामग्रीच्या विभाजनाचा प्रश्न सोपविण्यात आला.

०२. प्रथम मुस्लिम बहुल दले पाकिस्तानकडे आणि मुस्लिमेतर दले भारताकडे अशी विभागणी ठरविण्यात आली. परंतु पाकिस्तानने या, मुद्द्यावर आडमुठेपणाचे धोरण स्वीकारले.

०३. शेवटी ब्रिटिश सैनिक मायदेशी परतल्यानंतर सैन्यदल साधनसामग्री पाकिस्तानकडे हस्तांतर करण्याची समस्या फेब्रुवारी १९४८ अखेर कशीबशी सुटली.

* महात्मा गांधीजींची हत्या

०१. गांधींच्या इच्छेविरुद्ध भारताची फाळणी करण्यात आली. गांधींनी हिंदू-मुस्लिम ऐक्य निर्माण व्हावे यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु दंग्यात प्रचंड प्रमाणावर हत्या होत असल्याचे पाहून त्यांने दुःखी अंतःकरणाने फाळणीला मान्यता दिली.

०२. फाळणी झाल्यानंतर निर्माण झालेल्या द्वेषमूलक वातावरणात जातीय दंगलीचा कहर झाला. या दंगली थांबविण्यासाठी गांधीजींनी एकट्याने प्रयत्न केले. ते ‘One Man Army’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

०३. भारतातील कलुषित वातावरण शांत करण्यासाठी व तसेच नागरिकांना आपापल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी गांधीजींनी दिल्लीत प्रार्थना सभा आयोजित केल्या होत्या. याच वेळी अविभाजित भारताच्या साधन सामग्रीचे वाटप सुरू होते.

०४. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याच्या प्रश्नावरून मतभेद झाल्याने, त्या तात्कालिक प्रश्नावरून कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी गांधीजींची हत्या घडवून आणली. ३० जानेवारी १९४८ रोजी दिल्लीत प्रार्थना सभेत नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली.

०५. गांधीजींच्या हत्येने सारा देश हादरला. गांधीजींना आकाशवाणीवरून श्रद्धांजली अर्पित करताना पंडित नेहरू विव्हल झाले. विव्हळ अंतःकरणाने नेहरू उद्गारले होते, “आमच्या जीवनातून प्रकाश निघून गेला आहे, आणि सर्वत्र काळोख पसरला आहे!”. सर्व भारतीयांच्या भावना नेहरूंनी एकाच वाक्यात व्यक्त केल्या होत्या.

* भारताचे नेतृत्व

०१. गांधीजींच्या मृत्यूनंतर अखिल भारतीय नेतृत्वात एक पोकळी निर्माण झाली. ही पोकळी सर्वार्थाने कधीच भरून निघणारी नव्हती. तरीही लोकोत्तर महात्माजींची जागा बऱ्याचअंशी सर्वमान्य नेता म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भरून काढली.

०२. नेहरू मुख्यतः राजकीय नेते होते. त्यांना सरदार पटेल या समर्थ वास्तववादी नेत्याची साथ लाभली होती. परंतु डिसेंबर १९५० मध्ये पटेलांच्या अकाली निधनामुळे नेहरूंचे नेतृत्व एकमुखी झाले.

०३. नेहरूंच्या इतकी लोकप्रियता अन्य कोणाही नेत्याच्या वाट्याला आली नाही. एक अर्थाने ‘नेहरू युग’ म्हणविल्या जाणाऱ्या काळात नेहरू भारताचे अनभिषिक्त सम्राट, भारताचे भाग्यविधाते व स्वतंत्र भारताचे शिल्पकार होते असे म्हटले जाते.

भारताचे स्वातंत्र्य व फाळणी – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
भारताचे स्वातंत्र्य व फाळणी – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.