*दिल्ली केंद्रातील मराठीचा राष्ट्रीय वृत्त विभाग मुंबईला
०१. आता दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी मराठीतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातमीपत्रे रद्द करण्याचा निर्णय ‘प्रसारभारती’ने घेतला आहे. या निर्णयानुसार, दिल्ली केंद्रातील मराठीचा राष्ट्रीय वृत्त विभाग आता मुंबईत हलविण्यात येणार आहे.


०२. केवळ मराठीच नव्हे, तर दिल्लीतील चौदा प्रादेशिक भाषांचा राष्ट्रीय वृत्त विभाग आता त्या त्या राज्यांच्या राजधानीत हलविला जाणार आहे. त्यामध्ये मराठीसह गुजराती, बंगाली, तमिळ, मल्याळी, पंजाबी, उडिया, काश्मिरी, डोंगरी, अरुणाचली आदींचा समावेश आहे. 

०३. संस्कृत आणि उर्दू भाषेचा अपवाद करण्यात आला आहे. त्यामुळे राजधानीतील ‘आकाशवाणी भवना’मध्ये आता फक्त हिंदी, संस्कृत आणि उर्दू या तीन भाषाचे अस्तित्व उरणार आहे.

०४. त्याबाबतची अधिकृत घोषणा माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी लोकसभेत केली. पालघरचे खासदार चिंतामणी वनगा यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

०५. १ ऑक्टोबर १९३९ मध्ये दिल्लीतील मराठी वृत्तविभागाचा प्रारंभ झाला होता. दोन वर्षांपूर्वी अमृत महोत्सवाचा सुंदर सोहळा झाला होता. दिल्लीवरून सकाळी साडेआठ वाजता, दुपारी दीड वाजता आणि रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी राष्ट्रीय बातमीपत्रे दिली जातात. 



* जपान सम्राटाची निवृत्ती
०१. जपानचे सम्राट अकिहितो यांनी गेल्या आठवडय़ात दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राजपद त्यागण्याची आणि निवृत्तीचे जीवन जगण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

२. जपानमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार कार्यरत असले तरी देशाचा कारभार सम्राटांच्या नावाने चालवला जातो.

०३. राजकीय बाबतीत सम्राट हे केवळ राज्याचे नामधारी प्रमुख असले तरी जपानी समाजात सम्राटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सम्राट अकिहितो यांनी २८ वर्षांच्या कार्यकाळात जाहीर भाषण करण्याची ही केवळ दुसरी वेळ होती. यापूर्वी त्यांनी २०११ साली जपानला त्सुनामीचा फटका बसला आणि फुकुशिमा अणुकेंद्रात स्फोट होऊन जे संकट उभे राहिले त्या वेळी राष्ट्राला संबोधित केले होते. 

०४. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या पराभवाची घोषणा करण्यासाठी तत्कालीन सम्राट हिरोहितो यांनी रेडिओवरून असे भाषण केले होते. सम्राट हिरोहितो यांच्या नावानेच जपानने युद्ध पुकारले होते आणि त्यांना स्मरूनच इतकी अपरिमित हानी सोसली होती.


०५. आजवर जपानच्या निम्मा सम्राटांनी मरणापूर्वी निवृत्ती स्वीकारून बौद्ध मठांमध्ये शांत जीवन व्यतित केले आहे. पण १९व्या शतकात सम्राटांना देवत्व बहाल केले जाऊ लागल्यापासून ही पद्धत बंद पडली होती.

०६. आजवर आठ वेळा महिला जपानच्या सम्राज्ञी बनल्या आहेत, पण ‘इम्पेरियल हाऊसहोल्ड लॉ’नुसार केवळ पुरुषच सम्राट बनू शकतात.

०७. ख्रिस्तपूर्व ६०० पासून आजतागायत कायम असलेले जपानचे राजघराणे जगातील एकमेव आहे. इसवीसन ५०० पासून आतापर्यंत अखंड परंपरा असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. 

०८. जपानचा पहिला सम्राट जिम्मू हा सूर्यदेवतेपासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते. सध्याचे अकिहितो १२५वे सम्राट आहेत. 

०९. जपानच्या शिंतो धर्मात सम्राटाला देवाचा अवतार समजले जाते. सम्राटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने कॅलेंडर (संवत्सर) जाहीर केले जाते. यापूर्वीचे सम्राट हिरोहितो १९८९ साली वारले. त्यांच्या नावाने ‘शोवा’ म्हणजे ‘तेजस्वी जपान’ संवत्सर सुरू केले. आताचे सम्राट अकिहितो वारले की त्यांच्या नावाने ‘हिसी’ (सर्वत्र शांतता) संवत्सर सुरू केले जाईल. नवे संवत्सर सुरू झाले की कालगणना शून्यावर आणून पुन्हा पहिल्यापासून सुरू केली जाते. 

१०. जपानचे राज्यपद ‘क्रिसँथेमम थ्रोन’ म्हणून ओळखले जाते. क्रिसँथेमम नावाचे फूल राजपदाचे प्रतीक मानले जाते. प्रत्यक्षात या फुलाच्या आकाराचे सिंहासनही असून ते नव्या सम्राटाच्या राज्याभिषेकावेळी वापरले जाते.



* मायकेल फेल्प्सचे सुवर्ण हुकले
०१. जलतरणपटू मायकेल फेल्प्सला १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. या प्रकारात सलग चौथे सुवर्णपदक पटकावण्याची फेल्प्सची संधीही हुकली. फेल्प्सला आदर्श मानणाऱ्या सिंगापूरच्या जोसेफ स्कूलिंगने सिंगापूरला जलतरणात पहिलवहिले सुवर्णपदक मिळवून दिले.



* नदालला पुरुष दुहेरीत सुवर्ण
०१. राफेल नदाल आणि त्याचा मित्र मार्क लोपेझ जोडीने पुरुष दुहेरीत स्पेनला सुवर्णपदक मिळवून दिले. अंतिम लढतीत स्पेनच्या या जोडीने रोमानियाच्या फ्लोरिन मर्गेआ आणि होरिया टेकाऊ जोडीवर ६-२, ३-६, ६-४ असा विजय मिळवला. 

०२. नदालने २००८ बीजिंग स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावणारा नदाल केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. सेरेना आणि व्हिनस विल्यम्स आणि चिलीच्या निकोलस मासू यांच्या विक्रमाची बरोबरी केली.



* तारक मेहता’ची लिम्का बुकमध्ये नोंद
०१. ‘सब’ वाहिनीवर सुरू असलेली ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे दोन हजार भाग आत्तापर्यंत प्रसारित झाले असून त्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्ड’मध्येही घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत दीर्घकाळ चाललेली विनोदी मालिका म्हणूनही ‘तारक मेहता’ची नोंद घेण्यात आली आहे. 

०२. पत्रकार आणि स्तंभलेखक तारक मेहता यांच्या ‘दुनिया ने उंधा चष्मा’ या स्तंभावर ही मालिका आधारित आहे. हा स्तंभ एका गुजराती मासिकात प्रसिद्ध झाला होता.



* आसाम विधानसभेत जीएसटी मंजूर
०१. आसाम विधानसभेने एकमताने वस्तू-सेवाकर विधेयक (जीएसटी) मंजूर केले. केंद्र शासनानंतर जीएसटी विधेयक मंजूर करणारे आसाम देशातील पहिले राज्य ठरले आहे. काँग्रेस आणि एआययूडीएफच्या आमदारांनी आसाम विधानसभेत विधेयकाला पाठिंबा दिला. 

०२. जीएसटी विधेयक मागच्या आठवडयात राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले. संसदेच्या मान्यतेनंतर २९ पैकी अर्ध्या राज्यांची मंजुरी मिळाली की जीएसटीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे. 

०३. राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिले जाते. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे.