ईशान्य भारताची ओळख

०१. सात राज्यांनी बनलेला हा प्रदेश आताच संवेदनशील झालेला नाही. स्वतंत्र भारतात सामिल झालेल्या, फाळणीमुळे नुकसान झालेल्या, विकास खुटलेल्या आणि उर्वरित भारतापासून वेगळ्या पडलेल्या या भूमीला झालेल्या जखमा खूप जुन्या आहेत.

०२. ईशान्य भारतातील सात राज्यांना एकत्रितपणे ‘सात भगिनी’ या नावाने ओळखले जाते. आसाम, मेघालय, त्रिपुरा,मिझोराम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश, ही ती सात राज्ये. भौगोलिकदृष्ट्या सिक्कीमचाही ईशान्य भारतात समावेश होतो. ती आठवी भगिनी असे म्हणायला हरकत नाही. 


०३. ईशान्य भारत असे एकत्रितपणे म्हटले तरी भारतातल्या इतर प्रदेशांप्रमाणेच या सात राज्यांमध्येही प्रचंड प्रमाणात भाषिक, सांस्कृतिक वैविध्य आढळून येते. वंश, भाषा आणि संस्कृती या दृष्टिकोणातून पाहिले तर ईशान्य भारतातील लोक हे भारतातल्या इतर प्रदेशांपेक्षा आग्नेय आशियातील ब्रह्मदेश, थायलंड, लाओ, तसेच दक्षिण चीनमधील युनान गुआंगझी (Guangxi) या भागातील लोकांशी अधिक जवळचे आहेत. 

०४. आग्नेय आशियातील ‘ताई’ (Tai) लोकांचे आजचे वंशज त्या प्रदेशाबरोबरच ईशान्य भारतातही आहेत. ईशान्येतील अनेक लोक ‘आहोम’ जमातींच्या लोकांना आपले पूर्वज मानतात. हे आहोम ताई लोकांपैकीच एक आहेत. 

०५. दक्षिण चीनच्या युनान प्रांतातून हे ताई लोक आग्नेय आशिया आणि ईशान्य भारतापर्यंत पसरले, असाही एक मतप्रवाह आहे. म्हणूनच आजच्या ईशान्य भारताला, भारतीय उपखंड आणि आग्नेय आशिया यांना जोडणारा सेतू असे म्हटले जाते. 

०६. भाषेच्या दृष्टीनेही ईशान्य भारताची आग्नेय आशियाशी असलेली जवळीक दिसून येते. या भागात जशा इंडो-आर्यन गटातल्या भाषा बोलल्या जातात (भारतातल्या बहुतेक भाषा या गटातल्या आहेत). त्याचप्रमाणे तिबेटो-बर्मन गटातल्याही अनेक भाषा बोलल्या जातात, (आग्नेय आशियातल्या अनेक भाषा या गटातल्या आहेत). 

०७. ईशान्य भारताच्या लोकसंख्येत आदिवासी जमातींचे फार मोठे प्राबल्य आहे. या प्रत्येक जमातींची काही वैशिष्ट्ये आहेत. मेघालयातील गारो (यांचे मूळ तिबेटो-बर्मन आहे), खासी (हे माओ-ख्येर लोकांचे वंशज आहेत) या महत्त्वाच्या जमाती. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मातृसत्ताक समाजव्यवस्था पाळतात. 

०८. अरुणाचल प्रदेशातील सुमारे २६ जमातींमध्ये जातिरहित समाजव्यवस्था आहे. आसामातील बोडो,नागालँडमधील अंगामी या इतर काही महत्त्वाच्या जमाती आहेत. 



ईशान्य भारताचा इतिहास
०१. ब्रिटिशपूर्व काळातला या प्रदेशाचा इतिहास पाहिला तर अगदी सातव्या-आठव्या शतकापासून तुटक माहिती उपलब्ध आहे. या भागावर स्थानिक राजघराण्यांप्रमाणेच कधी आहोम, कधी ब्रह्मदेशी, कधी मुघलांची सत्ता होती. 

०२. ब्रिटिशांचे साम्राज्य भारतात पसरत होते त्या काळात मणिपूर, त्रिपुरा, नागालँड या भागांत वेगवेगळी राजघराणी राज्य करीत होती. या राजघराण्यांच्या वारसापैकी एक व्यक्ती भारतीय सिनेसंगीताच्या इतिहासात मधुर चाली देणारा संगीतकार म्हणून विख्यात झाली. ती व्यक्ती म्हणजे सचिन देव बर्मन. त्यांची आई मणिपूरची राजकन्या होती, जिचा विवाह त्रिपुराच्या राजपुत्राशी झाला होता. 

०३. ब्रिटिशांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून इथे आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. १८७४मध्ये आसाम प्रांताची निर्मिती ब्रिटिशांनी केली. त्यावेळी अरुणाचल प्रदेश ‘नेफा’ (North East Frontier Area) या नावाने ओळखला जात असे. 

०४. भारतीय उपखंडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने ब्रिटिशांसाठी हा प्रदेश अतिशय महत्त्वाचा होता. तसेच इथल्या डोंगरउतारांवर चहाचे मळे लावून व्यापार करण्याऱ्या ब्रिटिश जमीनदारांसाठीही हा प्रदेश महत्त्वाचा होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने उडी घेतल्यानंतर आग्नेय आशियातल्या जवळजवळ सर्व देशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. जपानी सैन्याला पहिला कडवा प्रतिकार ब्रह्मदेशात झाला. आणि त्यानंतर ईशान्य भारतामध्ये. 

०५. आजच्या मणिपूर राज्याची राजधानी असलेल्या इंफाळ शहराच्या वेशीवर भारतीय सैनिकांचा भरणा असलेल्या ब्रिटिश सैन्याने जपानशी कडवी झुंज दिली. तर आजच्या नागालँडची राजधानी असलेल्या कोहिमा शहरात ब्रिटिश आणि जपानींमध्ये जून १९४४मध्ये घमासान युद्ध होऊन जपानी सेनेला परतीची वाट धरावी लागली. दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या पराभवाची ती सुरुवात होती.

०६. १९४७मध्ये भारत स्वतंत्र झाला, तेव्हा आसाम आणि नेफा आपोआपच भारतात सामिल झाले. त्रिपुराच्या महाराणीने स्वतंत्र भारताच्या सरकारबरोबर करार करून आपले राज्य भारतात विलिन केले. 

०७. मणिपूरचे विलिनीकरण मात्र वादग्रस्त ठरले. मिझो लोकांचे वेगळे राज्य भारतात असावे, ही मागणी मान्य न झाल्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला, तर १९२०च्या दशकापासूनच मूळ धरू लागलेल्या नागा राष्ट्रवादाचा परिणाम म्हणून तिथे फुटीरतावाद रुजला. स्वातंत्र्यानंतर लगेचच अशा तऱ्हेने ईशान्य भारतात ठिकठिकाणी असंतोषाची बीजे रोवली गेली. 

०८. १९४७च्या भारत-पाकिस्तान फाळणीचा ईशान्य भारतावर, तिथल्या भूगोलावर, अर्थकारणावर आणि विकासावर खोलवर परिणाम झाला. पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) वेगळा झाल्यामुळे ईशान्य भारत संपूर्णपणे land locked प्रदेश झाला. 

०९. सगळ्यात जवळचे, चितगाव बंदर पाकिस्तानात गेले. तर कलकत्ता बंदराचे अंतर हजारो किलोमीटरनी वाढले. त्रिपुरातील आगरतळा हे शहर (जे ईशान्य भारतातील कलकत्त्याला सर्वात जवळचे शहर आहे) फाळणीपूर्वी कलकत्त्याहून ३५० कि.मी. अंतरावर होते. तेच अंतर आता सुमारे १७०० कि.मी. झाले. 

१०. फाळणीचा दुसरा आणि पहिल्याइतकाच दूरगामी परिणाम म्हणजे लोकसंख्येचे स्थलांतर. फाळणीच्या वेळी पूर्व बंगालातून प्रचंड संख्येने बंगाली हिंदूंनी त्रिपुरामध्ये आणि ईशान्य भारताच्या इतरही भागात स्थलांतर केले. त्याचा परिणाम म्हणून तिथले लोकसंख्येचे संतुलन बदलून गेले. १९७० मध्ये बांगलादेश मुक्तिलढ्याच्या वेळीही पुन्हा एकदा लोकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले.



फुटीरतावादाची सुरुवात व त्यावरील उपाय
०१. स्वातंत्र्य मिळाले त्या वेळी आसाम हे भारतीय संघराज्यातील एक राज्य होते, तर त्रिपुरा आणि मणिपूर यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा होता. 

०२. १९७२ मध्ये त्रिपुरा आणि मणिपूर यांना राज्याचा दर्जा मिळाला. जुन्या आसाममधून १९६३ मध्ये नागालँड, १९७२मध्ये मेघालय, आणि १९८७मध्ये मिझोराम ही राज्ये तयार झाली. तर १९७५मध्ये नेफा आसामातून वेगळा करून त्याला अरुणाचल प्रदेश हे नाव देण्यात आले. 

०३. १९६२च्या भारत-चीन युद्धात नेफामधील काही प्रदेश चीनने बळकावला. पूर्व बंगालमधून आलेल्या बंगाली स्थलांतरितांमुळे त्रिपुरा राज्यात मूळच्या आदिवासींवर अल्पसंख्याक होण्याची पाळी आली. त्यामुळे तिथे सुरुवातीच्या काळात वांशिक दंगली झाल्या. 

०४. केंद्र सरकारकडून अन्याय झाल्याची भावना, राज्यपुनर्रचना आयोगाने आसामातून वेगळे काढून नवे राज्य निर्माण करायला दिलेला नकार, यातून मिझोराममध्ये असंतोष पसरला आणि त्याचे रूपांतर थेट फुटीरतावादात झाले. 

०५. १९६०च्या दशकात मिझो नॅशनल फ्रंट आणि तिचे नेते लालडेंगा यांनी भारतातून फुटून स्वतंत्र होण्यासाठी सशस्त्र चळवळ उभी केली. 

०६. १९५०च्या दशकापासून आजतागायत नागा लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांनी ईशान्य भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांत विखुरलेल्या सर्व नागा लोकांचे एकच राज्य करण्याची मागणी सातत्याने केली आहे. त्यातून नागालँडमध्येही फुटीरतावादाची लागण झाली आहे. तसेच अपरिमित हिंसाचारही झाला आहे. 

०७. आसाममध्येही बोडो जमातींच्या लोकांची अशीच वेगळ्या राज्याची मागणी आहे. 

०८. त्रिपुरातील आदिवासींसाठी वेगळी विकास परिषद निर्माण केली गेली. मिझोरामला आसाममधून वेगळे काढून आधी केंद्रशासित प्रदेशाचा आणि नंतर राज्याचा दर्जा दिला गेला. यानंतर तिथला हिंसाचार जवळजवळ थांबला आहे. 

०९. नागालँडच्या फुटीरतावाद्यांपैकी नॅशनल सोशॅलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड (इसाक-मुश्वा गट) या प्रमुख संघटनेने केंद्र सरकारबरोबर शस्त्रसंधी करून वाटाघाटी चालवल्या आहेत. 

१०. १९६०च्या दशकापासून मणिपूर राज्यात युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या नेतृत्वाखाली फुटीरतावादी चळवळ चालू आहे.

११. ईशान्य भारतातल्या फुटीरतावादाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय संसदेने १९५८मध्ये ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट’ (आफ्स्पा) हा कायदा पास केला. 

१२. सुरुवातीला हा कायदा आसाम आणि मणिपूर राज्यांमध्ये लागू झाला. १९७२मध्ये आसाम राज्याची पुनर्रचना होऊन नवी राज्ये / केंद्रशासित प्रदेश तयार झाल्यानंतर हा कायदा सर्वच ईशान्य भारतात लागू केला गेला. (१९९० पासून हा कायदा जम्मू-काश्मिरमध्येही लागू केला गेला आहे.) 


१३. आफ्स्पा हा एक राक्षसी कायदा आहे. लोकशाहीला कलंक लावणाऱ्या आणि मूलभूत मानवी हक्कांची पायमल्ली करणाऱ्या अनेक तरतुदी या कायद्यात आहेत. या कायद्याखाली येणाऱ्या प्रदेशात लष्कराची सत्ता चालते, आणि संशयित व्यक्तीला चौकशीविना ठार मारण्याचा अतिरेकी अधिकारही लष्करी अधिकाऱ्यांना दिला गेला आहे. 

१४. लष्करी अधिकाऱ्यांकडून या कायद्याचा अतिवापर झाल्याच्या, तसेच निरपराध नागरिकांचे बळी घेण्याच्या अनेक घटना मानवाधिकार आयोगापुढे आल्या आहेत. या प्रकरणी लक्ष घालून केंद्र सरकारने २००४ मध्ये न्या. जीवन रेड्डी आयोग नेमला. त्या आयोगाने आफ्स्पा रद्द करण्याची स्पष्ट शिफारस करूनही आजही हा कायदा अस्तित्वात आहेच. 

१५. काहीशा मनाविरुद्ध भारतात सामिल झालेल्या, फाळणीमुळे नुकसान झालेल्या, विकास खुंटलेल्या आणि उर्वरित भारतापासून (‘चिकन नेक’चा अपवाद वगळून) भौगोलिकदृष्ट्या तुटलेल्या ईशान्य भारतातील जनतेवर आफ्स्पा कायदा लादून केंद्र सरकारने आणि भारतीय जनतेने अपरिमित असंवेदनशीलता दाखवली आहे.

१६. या प्रदेशात वारंवार उसळणा-या हिंसाचारामागे सतत बदलणारे लोकसंख्येचे संतुलन, आर्थिक विकासाचा अभाव,रोजगाराचा अभाव, देशाच्या इतर भागाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना, अशी अनेकविध कारणे आहेत. 

१७. बांगलादेशीयांची कथित घुसखोरी, या एकमेव कारणाने त्याचे स्पष्टीकरण होत नाही. त्याला धार्मिक-जातीय रंग देणे, हेही चूकच आहे. सध्या आसाममध्ये सुरू असलेल्या दंगली या धार्मिक नसून प्रामुख्याने वांशिक आहेत. मूळचे बोडो आदिवासी विरुद्ध ‘बाहेरून आलेले’ (ज्यात बंगाली, बांगलादेशी हिंदू, बांगलादेशी मुस्लिम हे सर्वच आले) असा आहे. 

१८. तो प्रामुख्याने बोडोंच्या सामूहिक मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमणाशी निगडित आहे. यात धर्माचा कुठेही संबंध नाही. याच प्रकारच्या वांशिक दंगली पूर्वी त्रिपुरामध्ये होत होत्या. तिथे हिंदू धर्म मानणाऱ्या आदिवासी जमाती आणि पूर्व बंगालातून स्थलांतर करून आलेले बंगाली हिंदू यांच्यात वांशिक संघर्ष होता. तेव्हा त्रिपुरात मूळ आदिवासी अल्पसंख्य झाले होते, आज बोडो प्रदेशात बोडो अल्पसंख्य आहेत.


१९. भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणाच्या काही निर्णयांमध्ये ईशान्य भारताच्या समस्येविषयी जाणीव दिसून येते. ब्रह्मदेश आणि त्यालगतच्या आग्नेय आशियातील देशांशी संबंध सुधारण्याऱ्या Look East Policy मध्ये ईशान्य भारताचा विचार आहे. एकतर त्यामध्ये ब्रह्मदेश किंवा बांगलादेशातून ईशान्य भारतासाठी व्यापाराचे सागरी मार्ग खुले करण्याचा विचार आहे.